देबत्तमा साहाच्या सुरेल गायनाने ‘मिठाई’च्या सेटवर सर्वजण झाले मंत्रमुग्ध!


‘झी टीव्ही’वरील नवी मालिका ‘मिठाई’चे कथानक हे प्रेमकथा आणि कौटुंबिक नाट्याचे मिश्रण असून ते गोड मिठाईच्या आवरणात घडते.मिठाई (देबत्तमा साहा) आणि सिध्दार्थ (आशीष भारद्वाज) या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांच्या या कथेत मथुरा येथील एका हलवायाची कथा सादर करण्यात आली आहे. आता जवळपास नामशेष होत चाललेला आलू जिलेबी हा मिठाईचा प्रकार बनविण्यात कुशल असलेल्या एका हलवायाची मुलगी मिठाई आपल्या वडिलांचा हा वारसा पुढे कायम राखण्याचा निर्धार करते, त्याची कथा या मालिकेत दाखविण्यात आली आहे. या मालिकेचा प्रारंभ दणक्यात झाला असून प्रेक्षकांनीही या मालिकेवर आपल्या पसंतीची मोहोर उमटविली असली, तरी मालिकेच्या कथानकाला आता अनेक अनपेक्षित कलाटण्या मिळणार असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढीस लागेल.
आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या मालिकेतील सर्वच कलाकार रात्रंदिन काम करीत असले, तरी आपली मिठाई ऊर्फ देबत्तमा साहा हिने आपल्या अंगच्या एका गुणाने सेटवर सर्वांना मोहित करून सोडले आहे. देबत्तमाला लहानपणापासूनच गाण्याची आवड असून आपल्या सुरेल आणि गोड आवाजाने तिने ‘मिठाई’च्या सर्व कलाकारांना मंत्रमुग्ध करून सोडले आहे. विशेष म्हणजे ती जेव्हा जेव्हा गाते, तेव्हा तिचा सहकलाकार आशीष भारद्वाज हा गिटार वाजवून तिला साथ देतो. मालिकेच्या कथानकात सध्या अनेक नाट्यपूर्ण घटना घडत असून त्यामुळे सर्वच कलाकार चित्रीकरणात आकंठ बुडाले आहेत. त्यांना फावला वेळ फारच थोडा मिळतो. पण एखादा दिवस ते मुद्दाम मोकळा वेळ काढतात आणि सुरेल संगीताचा आस्वाद घेतात, हे पाहून खूप बरे वाटते. यामुळे देबत्तमाला आपली गाण्याची आवडही जपता येते आणि तिला गाण्याचा सरावही करता येतो.

देबत्तमा साहा म्हणाली, “बर््याच लोकांना ही गोष्ट ठाऊक नसेल, पण मला गाण्याची अत्यंत आवड आहे. अलीकडेच मिठाईच्या सेटवर मी आणि माझा सहकलाकार आशीष भारद्वाज यांनी सर्व कलाकार आणि कर्मचार््यांसाठी काही गाणी गायली. त्यांना ती फार पसंत पडली. मी गात असताना आशीष गिटार वाजवीत होता. या गाण्याच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आमच्याकडे आम्हाला वेळ मिळाला की सेटवर रोज एकदा गाण्याचा कार्यक्रम करण्याचा आग्रह धरला आहे. लहानपणापासूनच मला गाण्याची आवड होती. त्यामुळे या मोकळ्या वेळेत मला हा गाण्याचा कार्यक्रम करताना खूप मजा येते. यामुळे मला माझी गाण्याची आवडही जोपासता येते आणि मला माझ्या योजना पूर्ण करण्यास खूप प्रोत्साहन मिळतं. मला माझी गाण्याची करिअरही यामुळे जोपासता येईल.”
देबत्तमाच्या गाण्यावर मिठाईचे सर्व कलाकार एकदम खुश असले, तरी प्रेक्षकांना लवकरच आगामी भागांमध्ये कथानकाला अनेक कलाटण्या मिळाल्याचे पाहायला मिळेल, असे दिसते. परिणामी त्यांची मालिकेतील उत्कंठा अजूनही वाढेल, असे दिसते.