कलात्मकतेने घडलेला डिजाईनर चा प्रवास….
अभिनयातून उमजलेलं अनोखं विश्व…
अभिनेत्री ते फॅशन डिझायनर….
रंगभूमीवरून अभिनयात पदार्पण करून मराठी सोबत हिंदी मालिकांत आपली अशी एक ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शाल्मली टोळ्ये.
“एक तर्फी प्रेम” या नाटकातून रंगभूमीवर आणि अभिनयात पदार्पण, अवघाची हा संसार हि पहिली मालिका.. हा खेळ सावल्यांचा, या सुखांनो या, या गोजिरवाण्या घरात या काही लक्षवेधी मालिकांतून शाल्मली आपल्या भेटीला आली. दुर्वा या मालिकेतील तिची भूमिका हि सगळ्यांच्याचं आठवणीत राहिली. शाल्मली अभिनयाच्या सोबतीने हल्ली अजून काही भन्नाट करतेय. अभिनयाच्या सोबतीने आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाल्मली अनेक बड्या सेलिब्रिटी मंडळींसाठी आणि आपल्या मित्र मैत्रिणीसाठी ड्रेस डिझायनर आणि स्टायलिस्ट म्हणून काम करतेय. हा एक अनोखा आणि सुंदर असा प्रवास घडत गेला.तिच्या या नव्या प्रवासाबद्दल आपल्याला काही खास गोष्टी सांगतेय..चला तर मग शाल्मली कडून आपण तिच्या या अनोख्या प्रवासाची गोष्ट जाणून घेऊयात..
१) अभिनय आणि आता डिझायनर हे कसं घडलं ?
मी गेले १० पेक्षा जास्त वर्ष या क्षेत्रात आहे. मला अभिनयसोबत काही ना काही वेगळं करायचं होत. आपण अश्या फील्ड मध्ये आहोत की इथे कधी हि काही ही घडू शकतं. त्यामुळे मला माझ्यातल्या वेगळे पणाचा शोध घ्यायचा होता. मग मला अभिनयासोबत “कॉस्ट्यूम डिजाईन” करायला आवडेल असं मला वाटलं. कॉस्ट्यूम डिजाईन करायला मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलंय ते माझ्या मैत्रिणींनी. माझ्या रूम मेट्स असण्याऱ्या कलाकार मैत्रिणी प्रार्थना बेहेरे आणि स्वप्नाली पाटील. आम्ही एकत्र राहायचो तेव्हा कधी त्यांना पार्टीस आणि चित्रटाच्या प्रीमियर ला जायचं असायचं तेव्हा मला त्यांना नटवायला आवडायचं. त्यांच्या स्टायलिंग ची जवाबदारी तेव्हा मी घ्यायचे. मग तेव्हा त्या दोघी सांगायच्या तू डिझायनिंग कर. तुला छान जमेल हे. मला स्वतःला शॉपिंग भयंकर आवडत. सोबतीने लोंकाना नट वायला आवडतं. मग तेव्हा कुठेतरी असं वाटलं कि आपल्यासाठी हा जॉब बेस्ट आहे. आपल्याला हे करायला नक्कीच आवडेल म्हणून मी अभिनयाच्या सोबतीने डिझायनिंग चा विचार केला. जेव्हा मी “देवा शप्पथ” मालिका करत होते तेव्हा मी कॉस्ट्यूम डिजाईनर म्हणून मी एक चित्रपट केला होता. पहिलाचं एवढा मोठा प्रोजेक्ट आणि ती सुद्धा फिल्म त्यामुळे माझ्या बहिणीने मला यात साथ दिली. पहिला अनुभव एवढा कमाल होता. लवकरचं ती फिल्म येईल आणि जेव्हा मी हे आमच्या सिरीयल च्या निर्मात्यां अपर्णा केतकर यांना सांगितलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला. तेव्हा त्यांनी सांगितली कि तुझा ड्रेसिंग सेन्स मला खूप आवडतो. आमची एक नवी मालिका येतेय तर त्या साठी तू कॉस्ट्यूम डिजाईन करशील का? मी पटकन हो म्हंटल. हा एक नवा अनुभव होता मी त्या मालिकेसाठी कॉस्ट्यूम डिजाईन केले. यासाठी मी प्रार्थना बेहेरे, अपर्णा ताई, अभिषेक जावकर या सगळ्यांचे फार धन्यवाद! माझ्यावर विश्वास दाखवला.
२) आवडता डिझायनर?
या फील्ड मध्ये खूप डिझायनर आवडतात असा कोणी एक नाही आहे. रोहित बाल, मसाबा आवडते कारण तिचं कलेक्शन फार मस्तयं आणि सुनीत वर्मा यांच्या सोबतीने विक्रम फडणीस असे अनेक डिझायनर मला फार आवडतात. प्रत्येक डिझायनर कडून खूप शिकण्यासारखं असत.
३) तू नुकतंच एका मालिकेसाठी डिझायनर म्हणून काम केलंस.. तो अनुभव कसा होता?
नुकतंच “तुला पाहते रे” साठी डिझायनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली हा अनुभव खूपच मस्त होता. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक नवे लूक्स करायला मिळाले तर मला त्यात दोन वर्ग दाखवायचे होते श्रीमंत आणि गरीब तर याना अनुसरून काम करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होत. हि एक फार मोठी प्रक्रिया असते. अनेकांची मत घेऊन, कलाकारांचे लूक्स लक्षात घेऊन डिजाइन करायचे असतात पण सगळ्यांची उत्तम सोबत लाभली आणि हे काम पार पडलं. जेव्हा “विकिशा” च्या लग्नाचा सीन होता तेव्हा मी फक्त यासाठी स्टायलिंग केलं, कोण काय कपडे घालणार ते केशरचना कशी असेल, दागिने काय आणि कोणते घालणार.
सोबत थीम होती एक शाही विवाह सोहळा होणार होता याची तयारी आम्ही गेले दिड महिना करत होतो. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अफलातून अनुभव होता आणि कामाच्या शेवटी चॅनेल आणि निर्माता जेव्हा आपलं कौतुक करतात तेव्हा आपल्यलाला कामाची पोचपावती मिळते. एक खास अनुभव आणि मी करत असलेलं काम हे एकदम बरोबर आहे याच एक समाधान आहे. या क्षेत्रात मी नवखी असून अनेकांनी माझ्या कामावर जो विश्वास दाखवला हे सर्वस्व आहे. इथे अजून छान छान काम करायला मिळो हीच इच्छा आहे.
४) डिझायनर म्हणून काम करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी मनात असतात?
हल्ली प्रत्येक जण सोशल मीडिया वर सेलिब्रिटीना फॉलो करतात. अनेक डिझायनर आहेत त्यांच कला कौशल्य प्रत्येक जण या सोशल मिडीया वर अनुभवत असतो बघत असतो. खूप नवे ब्रॅण्ड्स आहेत ते आज इथून लोकांपर्यंत पोहचतात. तर माझ्यासाठी इथे अनेक गोष्टी चॅलेंजिग आहेत कि आपण दुसऱ्या सारखं सुद्धा काम करू नये. कोणाची स्टाईल कॉपी नाही झाली पाहिजे. हे फार कठीण आहे कि प्रत्येक गोष्टीत विविधता दिसली पाहिजे. आपण सगळ्यात कसं वेगळं पण दिसलं पाहिजे यासाठी काही कल्पकता वापरावी लागते म्हणून कामात वेगळेपणा आणण्यासाठी फार गोष्टी या एकमेकांशी जुळवून बघायला लागतात आणि आपल्या कौशल्यांची इथे ताकद कायम वापरावी लागते.
५) कामात काय वेगळेपण आणण्याचा प्रयत्न असतो?
आपल्या प्रत्येक कामात वेगळेपणा कायम असायला हवा हि फार महत्वाची गोष्ट आहे. एक डिझायनर म्हणून काम करताना नेहमीच कल्पकता वापरता आली पाहिजे. आपली अशी एक स्टाईल निर्माण करावी, आपण जिथे काम करतोय त्या बद्दल अनेक वेगळ्या गोष्टींची माहिती जमा करावी. कोणाला तरी डिझायनर म्हणून काम करताना मदत करा या मदतीतून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. डिझायनर म्हणून काम करताना संदर्भ आणि यांच्या सोबतीने अनेक गोष्टी न्याहाळता यायला हव्यात. प्रत्येक लुक चा अभ्यास करावा लागतो. कामाशी प्रामाणिक राहून आणि कामाचा अनोख्या तऱ्हेने अभ्यास करून कामात विविधता आणली पाहिजे.
६) भविष्यात स्वतःच बुटीक काढण्याचा काही संकल्प?
भविष्यात मला माझं असं स्वतःच बुटीक चालू करायला नक्कीच आवडेल मी आणि माझी बहीण या गोष्टीचा विचार देखील करतोय. थोडा वेळ या गोष्टीसाठी लागणार आहे पण नक्कीच स्वतःच बुटीक चालू करणार. माझ्या बुटीक मध्ये भारतीय गोष्टीना प्राधान्य देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. गावा गावात जाऊन तिथल्या गोष्टी गोळा करायला आणि तिथली संस्कृती माझ्या डिजाईन च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन यायला खूप आवडेल. भारतीय संस्कृतीच्या कला माझ्या बुटीक मध्ये असतील. नक्कीच माझा असा एक वेगळा टच त्यांना असेल मग त्या डिझायनर साड्या, दागिने, बॅग्स यांना आपली अशी एक पारंपरिक झालर लावून या गोष्टी माझ्या बुटीक मध्ये ठेवेन.
७) या सगळ्यात तुला प्रोत्साहन देणारी व्यक्ती कोण?
प्रार्थना बेहेरे, स्वप्नाली पाटील, गिरीजा ओक, श्रुजा प्रभुदेसाई, सीमा देशमुख आणि हृता दुर्गुळे या सगळ्या मैत्रिणींची हक्काची साथ मला आजवर लाभली आहे. त्या नेहमीच मला प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे या सगळ्यांचा माझ्या या नव्या वाटचालीत हक्काचा वाटा आहे .