मराठी इंडस्ट्रीत “पिट्या” या नावाने ओळखले जाणारे रमेश परदेशी..
अनेक हटके भूमिका पार पाडून अभिनयाची शैली जपणारा अभिनेता..
अभिनयाच्या सोबतीने फिटनेसची हि आवड जपून फिटनेस फ्रिक राहणारा…
मालिका आणि चित्रपटांतून आपलं मनोरंजन करणारा , प्लॅनेट मराठी चा या आठवड्याचा स्टार ऑफ द वीक अभिनेता रमेश परदेशी उर्फ “पिट्या” बद्दल जाणून घेऊ या काही खास गोष्टी….
1.नुकत्याच गाजलेल्या “मुळशी पॅटन” मध्ये काम करताना काय अनुभव होता?
प्रत्येक चित्रपटाचा अनुभव हा अनोखा असतो. मी आणि प्रवीण गेली ४० वर्ष सोबत काम करतोय. हा अनुभव शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढा समृद्ध करून जाणारा आहे. चित्रपटाचं शूट हे सगळं खऱ्या लोकेशन वर झालंय त्यामुळे मी एक कलाकार म्हणून या चित्रपटाचा भाग होतोच पण creative production ची संपूर्ण जवाबदारी माझ्यावर होती. हा चित्रपट आणि याचा विषय हे करणं एक टास्क होता. मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांच्या सोबतच बॉंडिंग आधीपासून मस्त आहे ते यामुळे अजून वाढलं. एक अनोखा टास्क होता हा..
2.फिटनेसचं तुमच्या आयुष्यात काहीसं अनोख स्थान आहे त्याबद्दल काय सांगाल?
आमच्या घरात एक नियम होता तो म्हणजे “व्यायाम” करण्याचा. मी घरात एकटा मुलगा असल्यामुळे आमच्याकडे हा नियम काटेकोर पणे पाळला जायचा आणि जर व्यायाम नाही केला तर जेवायला मिळायचं नाही. म्हणून व्यायाम करण्याची सवय लागली. मला मुळशी पॅटन साठी दीड वर्ष आधी पासून तयारी करायला लागली होती. एक कलाकार म्हणून फिट राहणं फार महत्त्वाचे आहे म्हणून फिटनेस आणि माझं हे नातं अतूट आहे.
3.इंडस्ट्री मधला जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोण?
अर्थातचं “प्रवीण तरडे”
4.रेगे, देऊळ बंद, किंवा मुळशी पॅटन असो ह्या तिघांमध्ये हि कॉमन फॅक्टर आहेत प्रवीण तरडे.. काय सांगाल ह्याबद्दल?
आम्ही लहानपणा पासूनच एकत्र आहोत. त्यामुळे फक्त या तीन चित्रपटासाठी नव्हे तर आयुष्यात प्रवीण तरडे हा प्रत्येक ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे. त्याचा पहिल्या एकांकिकेचा हिरो मीच होतो.
5.हिंदीत तुम्ही अजय देवगण सोबत एका दर्जेदार चित्रपटात काम केलं तो अनुभव कसा होता? अनुभव अफलातून होता. अजय देवगण फार स्मित भाषी आहेत. प्रत्येक सहकलाकाराला समजून घेऊन काम करतात. भारी आहेत ते. एखाद्या नव्या व्यक्तीला अगदी छान समजून घेऊन काम करण्याची संधी ते देतात. खूप कमी बोलणारे असले तरी त्यांचा स्वभाव लोकांना भावतो.
6.”उद्गार पुणे” या बद्दल काय सांगाल?
उद्गार पुणे ही मी, प्रवीण तरडे आणि अनिरुद्ध आम्ही तिघांनी उद्गार पुणे ची स्थापना केली. या नाट्य संस्थे अंतर्गत आम्ही अनेक एकांकिका केल्या पुषोत्तम करंडक चा बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. सिक्वेन्स हा दोन अंकी प्रयोग केला. तेव्हा सुनील कुलकर्णी हे आमचे गुरू होते त्यांच्या सहकार्यांने खूप काम, अनेक एकांकिका केल्या. अजून एक गोष्ट “उद्गार पुणे” आवर्जून करते ती म्हणजे दर १ जानेवारी ला आम्ही “निर्व्यसनी दिन” साजरा करतो.
7.आजवरच्या अभिनय कारकिर्दीतला खास क्षण कोणता?
मुळशी पॅटन मध्ये माझा पोलीस स्टेशन मधला एक सीन आहे तो सीन बघून माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि तू एकदम भारी काम केलं अस सांगितलं. ही कामाची पोचपावती फार खास आणि आठवणी मधली होती. आपल्या कामाचं आपल्या एवढ्या जवळच्या व्यक्तीने कौतुक केलं हा क्षण फार मोलाचा आणि आठवणीतला आहे.
8.”पिट्या” हे नाव कसं पडलं?
मला घरी लहानपणी सगळे पिंट्या म्हणायचे पण मग मित्रांनी या पिंट्या चा पिट्या केला खरंतर आज हे नाव माझी इंडस्ट्री ओळख निर्माण करणार आहे. सगळेच याच नावाने ओळखतात.
9.सक्रिय राजकारणात येण्याचा काही मानस?
नाही बिलकुल राजकारणात येण्याचा मानस नाही. पण मला मराठी चित्रपटासाठी काही तरी काम करायला नक्की आवडेल. खासकरून आपल्याकडे निर्मात्यांना अनेक गोष्टी सहन करायला लागतआहेत. निर्मात्याला जगवलं पाहिजे. आपल्याकडे निर्माता जगला तरंच चित्रपट जगेल.
10.गेले अनेक वर्ष इंडस्ट्री खूप जवळून पाहत आलेला आहेत.. कोणती गोष्ट खटकते?
इंडस्ट्रीत एकच गोष्ट खुपते ती म्हणजे की सगळ्यांनी सगळ्या सह कलाकारांचं कौतुक करावं किंवा त्यांना प्रेरणा दयावी. इथे माझ्या मित्राचा चित्रपट आहे मग मी त्याला शुभेच्छा देईन आणि हा दुसरा मित्र नाही तर याला नाही असं व्हायाला नको. आपल्या मराठीत सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करावं. एखाद्याचं काम आवडलं तर मनापासून कौतुक करावं इथे उगाचं दुजाभाव करायला नको हीच एक गोष्ट फार मला खुपते.