कविता कॅफे: मराठी कवितांचे नवे डिजिटल पर्व!
आजच्या तारखेला कविता फक्त मंचावरून, संमेलनातून, किंवा मुशायऱ्यातूनच अनुभवली जाते असे नाही. इंटरनेट आणि स्वाभाविक रित्या सोशल मीडियामुळे कवितेला, काव्यवाचनाला आणि सादरीकरणाला व्हिडियोचे एक वेगळे माध्यम प्राप्त झाले आहे.
हिंदी आणि इंग्रजी कवींच्या कविता आपण सतत युट्युबवर तसेच फेसबूकवर पाहतो आणि शेअर सुद्धा करतो. त्याचप्रमाणे आता दर्जेदार मराठी कविताही आपल्याला शेअर करता येणार आहेत. कविता कॅफे ह्या युट्यूब चॅनेलवर 49 कवितांचे चित्रीकरण झाले असून त्याच चॅनेलच्या दुसऱ्या पर्वात 5 प्रतिथयश कवींच्या कवितांचे चित्रीकरण पालघर येथे करण्यात आले आहे.
अशोक नायगावकर, संभाजी भगत, तुकाराम धांडे, चंद्रशेखर सानेकर आणि अरूण म्हात्रे असे ह्या सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे अतिशय अनोख्या पद्धतीने कविता लोकांसमोर पहिल्यांदाच येणार आहेत. ह्या पर्वाचा लाँच येत्या 2 मार्च ला रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटर मध्ये दिग्गजांच्या तसंच विविध क्षेत्रातल्या कलावंतांच्या उपस्थिततीत पार पडणार आहे.
Arun Mhatre Ashok Naygaonkar Chandrashekhar Sanekar Tukaram Dhande
संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार ( बालगंधर्व, येलो, उबंटू आदि चित्रपटांचे संगीतकार) ह्या कार्यक्रमकाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ह्या पर्वातल्या कवींचे काव्यवाचन सुद्धा ह्यादिवशी संपन्न होणार आहे.
“आपल्या आधीच्या दशकातल्या कवींचे डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे हे आम्हाला मनापासून वाटते. त्याचप्रमाणे डिजिटलमध्ये मराठी कवितांचे समकालिन व्यासपीठ असणे गरजेचे आहे ह्याची जाणीव आम्हाला होतीच. त्यातून ह्या पर्वाची निर्मिती करण्यात आली आहे,” असे दिग्दर्शक संकेत म्हात्रे ह्यांनी सांगितले.
“कविता म्हटली की लोकांना क्लिष्ट आणि अवजड वाटते. तिच कविता सध्या, सोप्या आणि सुसज्ज पद्धतीने आम्हाला ह्या उपक्रमातून लोकांपर्यंत पोचवायची आहे,” असे प्रणव पाठक, कविता कॅफेचे निर्माते ह्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम २ मार्च, शनिवारी, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून सुरू होणार असून विनामूल्य असणार आहे.
दिनांक : २ मार्च २०१९
ठिकाण : रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी , तिसरा मजला मिनी थिएटर
प्रवेश: विनामुल्य
सौजन्य : अंतरा चौघुले