मराठी टेलिव्हिजन विश्वात नव्याने उदयास आलेला चेहरा
“प्राजक्ता गायकवाड”
“नांदा सौख्य भरे” या मालसिक्कीम छोट्या पडद्यावर पदार्पण करून आता नावाजलेल्या “स्वराज्य रक्षक संभाजी” या बहुचर्चित मालिकेत “येसूबाई” यांची भूमिका ती अगदी लिलया पार पाडते आहे.प्राजक्ता अभिनयासोबतीने नृत्यात सुद्धा पारंगत आहे. शिक्षण सांभाळून ती अभिनयाकडे सुद्धा तेवढंच बारकाईने लक्ष देऊन अभिनय करते. प्राजक्ता ही एक कलाकार म्हणून जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती एक डान्सर म्हणून सुद्धा नाव कमावते आहे. अभिनय, डान्स आणि या सगळ्यांच्या सोबत सामाजिक बांधिलकी जपून प्राजक्ताला समाजकार्याची सुद्धा आवड आहे. एवढी मोठी आणि ऐतिहासिक भूमिका ती कशी साकारते आणि तिच्या आजवचरच्या अभिनयाचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या या आठवड्याच्या स्टार ऑफ द वीक मधून…
तुझ्या पार्श्वभूमी बद्दल काय सांगशील?
खरंतर आधीच्या ज्या दोन्ही मालिका होत्या “नांदा सौख्य भरे आणि तू माझा सांगाती ” यातली प्रत्येक भूमिका ही वेगळी होती. नांदा सौख्य भरे मध्ये एक कॉलेज मध्ये जाणारी मुलगी तसेच तू माझा सांगाती मध्ये संत सखू ची भूमिका होती तर त्याला एक वेगळा टच होता. एकमेकांपेक्षा आणि वेगळ्या भूमिका दोन्ही मालिकेत साकारल्या, आणि आता येसूबाईची भूमिका ही या दोन्ही पेक्षा फारच वेगळी अशी भूमिका साकारायला मिळतेय.
अभिनय क्षेत्रातलं पहिलं पाऊल?
“जेव्हा एखादा कलाकार नवीन भूमिका करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस ती भूमिका त्याला नवीन जन्म देते, असं माझं वैयक्तीक मत आहे.” त्यामुळे प्रत्येक नवा रोल हा एक अनोखं पाऊल असतं. माझ्या अभिनयाची सुरुवात शाळेत असताना झाली. वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरीय – राज्यस्तरीय नाटकं ह्या सगळ्यांमध्ये माझा सहभाग असायचा.
छोट्या पडद्यावर येसूबाई साकारल्यावर एकदमचं प्रसिद्धी आणि नावारूपाला आल्यानंतर खाजगी
आयुष्यात बदल जाणवतो का?
येसूबाई साकारून १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे एक वर्ष इतकं काही देऊन गेलंय. आपण काम करताना प्रेक्षकांचा कधीच हिरमोड होऊ नये हेच डोक्यात ठेवुन प्रत्येक कलाकाराने काम करायला हवं असं मला वाटतं. अनुभव खूप भन्नाट आणि मस्त असतात. फॅन फॉलोइंग सुद्धा वाढलंय आता कुठे ही गेली की लोक आधी मुजरा आणि नमस्कार करतात, पाया पडतात, कधीचं कोणी अरे तुरे करून बोलत नाही प्रत्येकांच्या बोलण्यात एक मान असतो त्यांच्यासाठी आम्ही खरेतर देव आहोत. अश्या तऱ्हेने आम्हाला सगळीकडे आदरपूर्वक वागवलं जातं.
पण मला लोकं प्रत्येक भूमिकेत सांभाळून घेतात प्रत्येक भूमिकेवर तेवढंच प्रेम करतात. सोशल मीडियावर एखादा फोटो अपलोड केला तरी लोक त्यावर अगदी भरभरून कौतुक करतात. एकदा मी वारीतून दर्शन करून निघाले आणि तिथून निघताना एक आजोबा भेटले तर अचानक रडायला लागले. मला काहीचं समजत नव्हतं ते अचानक पाया पडले तर ते म्हंटले बाळा मी तुझ्या नाही तर तू साकारत असलेल्या व्यक्तीरेखेच्या येसूबाईच्या पाया पडतोय ही कामाची पोचपावती होती आणि हे एवढं सुख देणारं होतं की लोक आपल्या भूमिका वर किती प्रेम करतात याचा अनुभव आला त्यांची प्रतिक्रिया आयुष्यभर लक्षात राहील.
येसूबाई यांसारख्या ऐतिहासिक भूमिका साकारताना विशेष मेहनत घ्यावी लागली असणारं. भिती किंवा दडपण येतं का?
मला जेव्हा कळालं मी ही भूमिका करतेय तेव्हा मला अमोल दादांनी पहिला प्रश्न असा केला होता की तुला घोडेस्वारी, तलवार बाजी येते का? मी तिथे नाही असं म्हणून आले होते पण त्या माझ्या नाही म्हणण्यात सुद्धा एवढी सकारात्मकता होती की पुण्यात आल्या नंतर पुढच्या आठ दिवसात मी सगळं शिकले. घोडेस्वारी, तलवारकाठी आणि हे सगळं होऊन शूटींग सुरू व्हायला १५ दिवस होते. मला एक लिस्ट दिली त्यात अनेक पुस्तकांची, कादंबऱ्याची, चरित्र कथा आहेत हे सगळं वाचून त्या भूमिकेसाठी माझा अभ्यास झाला. मग सेट वर लाठीकाठी, घोडेस्वारीचा सराव असे. हा एक प्रकारे त्या भूमिकेसाठीचा अभ्यासचं होता. अजून सुद्धा हा अभ्यास चालूच आहे आणि हे सगळं करून मी सीन करायला उभी राहते तेव्हा अमोल दादा कडून खुप शिकायला मिळतं. एक सहकलाकार म्हणून त्याला सांभाळून घेणं इथपासून ते संवाद कसे करावेत हे सगळं त्याचा कडून शिकतेय. दडपण असं नाही आलं कारण आपण जीव ओतून काम केल्यावर प्रेक्षकांकडून कमालीचा प्रतिसाद आला. त्या प्रतिसादामुळे काम करण्याची ओढ वाढते. सुरुवातीला थोडं साडी, दागिने सांभाळण्यात अडचण आली, पण नंतर हे सगळं सांभाळून घ्यायला जमत गेलं. आमची टीम एवढी मस्त आहे की कधी अडचण आलीच नाही.
अमोल कोल्हे सारख्या अनुभवी आणि आपल्या व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ असणाऱ्या कलाकारासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?
सातवीत असताना आम्ही अमोल दादा सोबत महानाट्य केलं होतं “शिवपुत्र संभाजी” म्हणून त्याचे अजून सुद्धा प्रयोग चालू आहेत आणि एक गोष्ट सांगायला एवढा आनंद होतो की “की तेव्हा त्या नाटकात मी लहान येसुबाईची भूमिका साकारली होती आणि आता मोठ्या येसुबाई ची भूमिका साकारायला मिळतेय कदाचित हा एक मी योगायोग समजते.” अमोल दादा कडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. एकतर त्यांचं वाचन एवढं अफाट आहे या विषयावर त्यांचा एवढा अभ्यास आहे की त्यांना संवाद असे पाठ करायला लागत नाही. एखाद वाक्य कसं आणि कुठल्या प्रकारे घ्यायचं, कुठल्या शब्दाला वजन दयायचं, ते घोडेस्वारी खूप अफलातून करतात. ते मी त्यांच्या कडून शिकले. ऐतिहासिक मालिका करताना एक थाट आणि रुबाबदारपणा अंगवळणी असणं गरजेचं असतं. महाराणी येसूबाईची भूमिका करताना मला हा रुबाबदारपणा साकारण्यासाठी मला दादांनी फार मदत केली.
मालिकेमध्ये काम करत असताना, तुला जर आता रंगभूमी कडे परत जाण्याचा योग आला तर तुझा निर्णय काय असेल?
मला नक्कीच रंगभूमीवर काम करायाला आवडेल. अभिनय क्षेत्राचा पाया रंगभूमी आहे. जर एखादी चांगली कथा आली तर मी नक्कीच पुन्हा रंगभूमीवर काम करेन.
कोणत्या दिग्दर्शक / अभिनेता/ अभिनेत्री सोबत सिनेमा करण्याची इच्छा आहे?
हा प्रश्न फार अवघड आहे. मला साऊथचे चित्रपट बघायला फार आवडतात तर मला नागार्जून सोबत काम करायला आवडेल. एकदा तरी त्यांच्या सोबत काम करायचं.
भावी आयुष्यात एखादी बोल्ड भूमिका ऑफर झाली तर करशील का?
या बद्दल अजून काही विचार केला नाही तशी काही ऑफर आलीच तर तेव्हा विचार करेन. पण आता सध्या येसूबाईची भूमिका एन्जॉय करते आहे.
तुझा चाहतावर्ग हा झपाट्याने वाढतोय. त्यांच्यातलाचं एखादा गमतीदार किंवा लक्षात राहिलेला प्रसंग?
मी बाबांसोबत चांदी खरेदी साठी गेले होते. एकतर पुणेकर असल्यामुळे अगदी चेहऱ्यावर स्टोल वैगरे बांधून फिरते. आम्ही दुकानात गेलो त्यानंतर माझ्या फक्त आवाजाने त्यांनी मला ओळखलं की येसूबाईची भूमिका करतेस नं? असं विचारलं आणि मी पटकन हो म्हंटलं. मग त्यांची ७५ वर्षांची आई, बायको त्यांनी माझं एवढं आदरातिथ्य केलं एखाद्या देवीची पूजा करावी असं सगळं केलं. फॅन्स किती काय काय करतात याच बेस्ट अनुभव होता. आणि हे सगळं झाल्यावर मी २-३ हजाराची खरेदी केली मग मी किती पैसे झाले असं काकांना विचारलं तेंव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अस होत की “ महाराजांनी त्या वेळेस आम्हाला सोनं चांदी वाटली म्हणून आता आमच्याकडे सोनं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या सूनबाईं कडून पैसे घेणार नाही. हा किस्सा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. एखाद्या कलाकारावरचं प्रेम हे यातून दिसून येतं.