छोट्या पडद्यावर पदार्पण करून प्रेक्षकांची मन जिंकून अवघ्या तरुणाईचा लाडका फुलपाखरु मालिकेतला मानस म्हणचेचं “यशोमान आपटे”!
मराठी टेलिव्हीजन विश्वातली चॉकलेट बॉय म्हणून यशोमानची वेगळीच ओळख झाली आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून यशोमान ने अभिनयात पदार्पण केलं, “झोपाळा, माऊ” यासारखी नाटक, “३५% काठावर पास” हा मराठी चित्रपट अश्या अनेक कलाकृतींमधून आजवर यशोमान आपल्या भेटीला आला आहे आणि आज टीव्ही इंडस्ट्रीत एक नवखा पण सुप्रसिद्ध कलाकार म्हणून नावारूपाला आलेल्या यशोमान सोबत आम्ही काही खास गप्पा मारल्या. त्याचा हा अभिनय कारकिर्दीचा प्रवास जाणून घेऊ या प्लॅनेट मराठीच्या “स्टार ऑफ द वीक” मध्ये.
तुझ्या पार्श्वभूमी बद्दल काय सांगशील?
माझ्या घरात बालपणापासून अभिनयाच वातावरण होतं. माझे बाबा फ्रीलान्सर लेखक आहेत. काका दिग्दर्शक. एकदम इंडस्ट्रीमय वातावरण होतं पण तेंव्हा मी अभिनय करायचं काही ठरवलं नव्हतं. मला स्टेज वर उभं राहायला सुद्धा दडपण यायचं. ध्यानीमनी नसताना अभिनयात पदार्पण झालंय! ११ वीत असताना कॉलेज मधल्या नाट्य मंडळात गेलो मग पहिली एकांकिका केली. त्यासाठी बेस्ट प्राईझ मिळालं. मग तिथे कुठे तरी वाटलं अरे आपण हे करू शकतो. एक मनात आत्मविश्वास निर्माण झाला. अभिजीत खाडे, अंबर हडप, यांच्या सोबत काम केलं. गणेश पंडित यांनी खूप अभिनयातले बारकावे शिकवले. २ नाटकं, चित्रपट केले मग फुलपाखरू साठी ऑडिशन दिली आणि मग इथे सिलेक्शन झालं आणि टेलिव्हिजन वरचा प्रवास सुरु झाला.
फुलपाखरू या मालिकेतील तुझ्या स्वतःच्या व्यक्तीरेखे बद्दल काय सांगशील?
मानस आणि माझ्यात काही फारसा फरक नाही आहे. मानसला गाणं गायला तसेच गिटार वाजवायला ही येतं. हे मला सुद्धा येत फक्त काही काही गुण आमच्यात जुळतं नाहीत. तो फारच सोज्वळ वैगरे आहे तसा मी फारसा नाही आहे. मानस ची व्यक्तीरेखा साकारताना फार मोकळेपणाने वागतो आम्हाला मंदार देवस्थळी यांनी फुलपाखरू च्या पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं. तुम्ही नॅचरल अभिनय करा.
पुर्णिमा तळवलकर तसचं ऋता दुर्गुळे या सारख्या अनुभवी कलाकारां बरोबर काम करतानाचा अनुभव कसा आहे?
अनुभव हा नेहमीच काही ना काही शिकवून जातो. अनुभव मस्तच आहे. कारण अनेक सहकलाकार आणि त्यात सुद्धा अनुभवी कलाकार सोबत काम करताना एक वेगळा अनुभव असतो. पूर्णिमा आणि ऋता यांच्या कडून खूप काही शिकलोय, शिकतोय! त्यांचे अनुभव आणि या गोष्टीतुन आपण काम करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवून काम करायला हवं हे समजत. ऋता ने या आधी मालिकेत फार काम केलंय तर तिच्या कडून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मालिकेचं शूटिंग कसं होत किंवा प्रमोशन इव्हेंट्स बद्दल सांगते तर या गोष्टी समजतात. पूर्णिमा तळवलकर आणि माझे मालिकेतील बाबा यांच्या कडून इंडस्ट्रीत कसं रहावं आणि कोणत्या प्रसंगाला कसं वागायचं हे ते सांगत असतात. बाकी त्याच्या अभिनयाच्या शैलीतून खूप काही शिकायला मिळतं. मग या गोष्टी मला काम करताना उपयोगी पडतात.
नाटक, सिनेमा किंवा मालिका या पैकी पुढे काम करायला जास्त कुठे आवडेल?
मी नाटकपासून सुरुवात केली आहे की रंगभूमीवर काम करताना त्याच्याशी एक नात निर्माण होत. रंगभूमीची ओढ कायम मनात आहे. त्यामुळे नाटक करायला नक्कीच आवडेल पण मालिका संपल्यानंतर एखादा चित्रपट करायला जास्त आवडेल. आता नाटक आणि चित्रपट हे कसं जमून येईल ठाऊक नाही पण दोन्ही कडे काम करण्याची कायमच इच्छा आहे.
कोणत्या नावाजलेल्या कलाकारां बरोबर काम करण्याची इच्छा आहे?
अनेक बॉलिवूड मधले कलाकार आहे ज्यांच्या सोबत एकदा तरी काम करायचं आहे. इरफान खान, नसरुद्दिन शहा, आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत ड्रीम वर्क करायचंय. मराठीत विक्रम गोखले सरांसोबत सुद्धा काम करायचं.
अभिनेता झाला नसतास तर कोण झाला असतास? अभिनयात पदार्पण करायचं हे आधी काही ठरलं नव्हतं. मी ११ वित कॉमर्स साठी ऍडमिशन घेतलं आणि मग नंतर कॉलेज मधलं नाट्य मंडळ मध्ये जायला लागलो. कॉमर्सची पाश्वभूमी असल्या करणाने सीए किंवा सीएस करणार होतो. अभिनेता नसतो तर सीए झालो असतो .
तुझा आदर्श कोण आहे?
माझा पहिला आदर्श माझे बाबा आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गॉड फादर बापमाणूस असतो तो माझे बाबा आहेत! बाबा याच क्षेत्रात असल्या करणाने खूप गोष्टी शिकायला मिळतात. आयुष्यात अनेक समस्या असू देत किंवा कामासंबधित अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी ते मदत करतात, मार्गदर्शन करतात. त्यांच वाचन अफाट आहे. खूप गोष्टी शिकतो. आणि दुसरे आदर्श माझे काका ते एक दिग्दर्शक होते पण त्याच्या सोबत काम करण्याची संधी नाही मिळाली. पण इंडस्ट्रीत काम करताना अनेकांकडून त्याच्या बद्दल खूप गोष्टी ऐकायला मिळतात. ते कसे शिकवायचे हे अनेकांकडून ऐकायला मिळतं. पण त्यांच्या सोबतीने काम करण्याची संधी नाही मिळाली.
तू अभिनेता म्हणून फेमस तर आहेसच पण तू उत्तम गातोस सुद्धा. ही फक्त आवड आहे की भावी आयुष्यात आम्हाला पार्श्वगायक म्हणून यशोमान ऐकायला मिळणार आहे?
गाण्याच्या बाबतीत मी गाणं शिकलो नाही आहे. हा एक छंद आहे. गाण्याची आवड खूप आहे म्हणून मी या क्षेत्रात पाऊल असं ठेवणार नाही. मंदार देवस्थळी यांनी मला ती एक संधी दिली म्हणून मी प्ले बॅक गायक म्हणून गायलो अशी संधी कोणत्या दिग्दर्शकाने दिली तर ठीक आहे पण ही एक आवड आहे आणि आवडच राहणार.
इंस्ट्रीमध्ये आता तसा बराच वेळ झाला वावरतोयस, कोणत्या गोष्टीची खंत आहे का?
खूप गोष्टीची खंत जाणवते एक अभिनेता किंवा कलाकार म्हणून इथे प्रत्येक जण काम करत असताना त्यांच्या विषयी अफवा आणि त्या व्यक्तीला हवं तसं ट्रोल केलं जातं यावर उपाय म्हणून याकडे दुर्लक्ष करावं पण मग प्रेक्षकांच्या मनात त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्री बद्दल एक फ्रेम तयार होते. ते त्याला त्याच दृष्टीकोनातून बघायला लागतात. दुसरी गोष्टी आपल्याकडे तंत्रज्ञान एवढं अफाट आहे की त्यांच्या वापराने आपण खूप काही करू शकतो. शूटिंग करताना तंत्रज्ञानचा वापर करून आपण कलात्मक घडवू शकतो आणि सादर करू शकतो. दर्जेदार काम थोडं कमी होतंय. अनेकदा चांगल्या कथांना न्याय मिळत नाही मग कुठेतरी यात निर्माता किंवा कथाकार यांच्या समस्या आहेत मग यामुळे आपल्याकडे चांगले चित्रपट बनत नाहीत. मराठी प्रेक्षकांना एका विशिष्ट शैलीतील कामं बघण्याची सवय झाली आहे तर त्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. प्रेक्षक वर्गाची विचारसरणी बदलली पाहिजे. हल्लीची तरुणाई वेब सिरीज बघते, त्यांना ते आवडतंय पण मग मराठीत सुद्धा अश्या तऱ्हेच्या वेब सिरीज यायला हव्यात. एकाच फ्रेम मधून सगळं बघणं चुकीचे आहे. नव्या विषयांवर विचार करणारे अनेक कार्यक्रम, रोजच्या जिवनातील गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजेत. सेक्स, बोल्डनेस हा मराठीत दाखवला तर त्याला प्रेक्षक नावं ठेवतात पण हीच विचारसरणी बदलून प्रेक्षकांचा दृष्टिकोन दृढ व्हायला हवा.
No 1 star Yashoman Apte