परदेशात सुद्धा वडापाव, मिसळ यासारखे पदार्थ चाखायला मिळाले तर???
USA मध्ये अमृता देशपांडे आणि अपर्णा पाध्ये या दोन मैत्रिणी सोबत येऊन हा “मराठी मसाला” फूड ट्रक चालवत आहेत .परदेशात फूड ट्रक ची मोठ्या प्रमाणावर चलती आहे. इथल्या फूड ट्रक वर इथलेच पदार्थ खायला मिळतात. पण USA मध्ये सध्या अनेकजण या मराठी पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या फूड ट्रक च्या माध्यमातून तुम्हाला अनेक चवदार चविष्ट पदार्थांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. वडापाव, साबुदाण्याची खिचडी, सुरळीच्या वड्या, चहा असे चविष्ट पदार्थ खाऊ घालणारा (Charlotte ) मधील हा महाराष्ट्रीय फूड ट्रक!
महाराष्ट्रात आपल्याला अगदी सहजरित्या स्ट्रीट फूडचा आनंद लूटता येतो पण हाच आनंद सध्या परदेशात सुद्धा घेतला जातोय. आपल्या मातृभूमीत मिळणाऱ्या पदार्थांची चव इथे सुद्धा फूड ट्रक च्या माध्यमातून सगळे चाखत आहेत. अमृता देशपांडे आणि अपर्णा पाध्ये या दोन मैत्रीणींनी सोबत येऊन हा “मराठी मसाला” फूड ट्रक सुरू केला. मराठी खाद्यसंस्कृती आणि कला यांचा अनोखा संगम साधून त्यांनी हा फूड ट्रक परदेशात चालू केलाय! या फूड ट्रक च्या “अपर्णा पाध्ये” यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल आपल्याला काही खास गोष्टी सांगितल्या.
गेली अनेक वर्षे परदेशात राहून महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड मिस केलं मग मी आणि माझे पती संदीप यांनी सोबत येऊन हा फूड ट्रक चालू केला. आम्हाला चेफ म्हणून आमची मैत्रीण अमृता देशपांडे हिची साथ लाभली. आज आम्ही अनेक ठिकाणी हा फूड ट्रक घेऊन जातो आणि लोकांना मराठी खाद्यपदार्थ चाखायला लावतो आहोत. यातून अनेक अनुभव येतात. लोकांचा मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद आम्हाला काम करायला ऊर्जा देतो. आमच्या ५ जणींची टीम आहे. आमची टीम एवढी कमालीची आहे की प्रत्येकीला कुकिंग बद्दल असलेलं प्रेम आणि पॅशन यांच्या जोरावर आम्ही हे काम करतोय. मी स्वतः हा ट्रक चालवते. अापल्याकडच्या खाद्यपदार्थांना एक अलग अंदाज देऊन काही तरी नवीन प्रयोग करून लोकांना काय वेगळं देता येईल याचा विचार करून पदार्थांची लिस्ट केली जाते. जवळ्पास एक महिना अगोदर आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हे ठरवतो.
जगात कुठेही गेलो तरी वडापावला कधीचं न विसरणारा प्रत्येक मराठी माणूस परदेशात सुद्धा या वडापावची चव चाखतोय तो “मराठी मसाला” या फूड ट्रकच्या माध्यमातून. इथे अनेक चवदार पदार्थांची रेलचेल आहे. तुम्हाला वडापाव, पावभाजी, मिसळ पाव, भेळ, पाणीपुरी, समोसा, कचोरी, रगडा पॅटिस, खिमा चिकन पॅटिस यासारख्या फास्ट फूड सोबत तहान भागवणारी अनेक मराठमोळी थंडपेय इथे मिळतील. ट्रॉपिकल थंडर, कोकम सरबत, सोलकढी, मसाला मठ्ठा, कैरीचं पन्हं. तिखटाच्या सोबतीने महाराष्ट्रीयन गोडधोड गुलाबजाम, आम्रखंड, श्रीखंड, खीर असे कित्येक पदार्थ आम्ही इथल्या लोकांना खाऊ घालतो आहोत.
वडा पाव, सुरळीच्या वड्या, मिसळ, चाट, समोसा, भेळ असे अनेक पदार्थ असतात तर कधी जेवणासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. कढी-खिचडी, साबुदाणा खिचडी, चिकन, खिमा, असे लज्जतदार पदार्थ सगळयांना आकर्षित करतात लोक आवडीने येऊन खातात. ते पदार्थ खाऊन लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच आमच्यासाठी खूप देऊन जातो. लोकं खूप कौतुक करतात. भारतीयांसोबत परदेशी लोकं सुद्धा आमच्या फूड ट्रक वर येऊन आवडीने वडा पाव खातात. त्यांना फूड सर्व्ह करून आम्हाला आमच्या कामाचं समाधान प्राप्त होत. ऑफिस, कॉलेज, इव्हेंट्सना आम्ही जातो तिथे लोकांना जेवायला देतो. होळीच्या निमित्ताने आम्ही एक इव्हेंट ठेवला होता तर तेव्हा आम्ही अनेक पदार्थ ठेवले होते. चाट पासून कबाब पर्यंत अश्या अनेक पदार्थांची रेलचेल होती. इथल्या स्थानिकांपासून फूड ट्रक वर खायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला खायला करून देणं हाच आमचा प्रयत्न होता आणि असा हा प्रवास चालू आहे. अजुन खूप मोठा पल्ला गाठायचा आहे!!
“मराठी मसाला” आणि त्यांच्या संपूर्ण टीमला प्लॅनेट मराठी मॅगझिन कडून खूप खूप शुभेच्छा..!!
शब्दांकन : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)
खूप छान😊
Thanks Garje Marathi for including our write up. It is good to come across your platform which highlights work of Non resident Maharashstrians abroad.Do drop a mail for future projects or collaborations at info@planetmarathi.org