अनेक दर्जेदार मालिका आणि नाटकांतून आपल्या भेटीला येत राहणारी, कोणतीही भूमिका अगदी लिलया पार पाडून रसिक प्रेक्षकांची मन जिंकून घेणाऱ्या “तुझ्यात जीव रंगला” ह्या मालिकेतील “नंदिता वहिनी” उर्फ “धनश्री काडगावकर” हिच्या सोबत प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने केलेल्या काही खास गप्पा..
संपूर्ण नाव : धनश्री काडगावकर
वाढदिवस : ६ एप्रिल
लग्नाचा वाढदिवस : ७ डिसेंबर
जन्मठिकाण : सोलापूर
“छंदातून जोपासते कला”
मी काही गायिका वैगरे नाही. पण माझे बाबा शास्त्रीय गायक आहेत. आमच्या घरातील हि गायनाची परंपरा सध्या माझा भाऊ सौरभ चालवतो. तो गायनाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी यामध्येच करिअर करतोय. खरंतर शूट आणि बाकी इतर गोष्टींमुळे गायनाकडे लक्ष द्यायला जमत नाही. पण बऱ्याचदा मला गाणी ऐकायला फार आवडतात. एखाद्या गाण्याचे शब्द काय आहेत या सगळ्याचा थोडाफार अभ्यास करून घरच्या घरी गात असते. गुणगुणायची सवय आहे हा एक छंद आहे, जो माझ्या मनाला आनंद देऊन जातो. डान्सचं बघायला गेलो तर सध्या कोल्हापूर मध्ये शूट सुरू आहे आमची एक हेयर आर्टिस्ट आहे तिच्या डान्स ग्रुप सोबत मी डान्सची प्रॅक्टिस करते. तिथे आम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातात, मुळात मी भरतनाट्यम शिकलेले आहे. डान्स हे माझ्यासाठी माझं पॅशन तसेचं माझं पहिलं प्रेम आहे. आणि म्हणूनच मालिका संपल्यावर भरतनाट्यम् आणि डान्स कडे लक्ष द्यायचं.
“ऑरगॅनिक पदार्थ खाऊन फिट राहते”
हल्ली प्रत्येकाला फिट राहण्याची गरज आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनात कोणाला फिट राहायला जमत नाही. त्यामुळे कामाच्या जागी आपल्याला पूर्ण वेळ देता यावा म्हणून, आपण फिट राहून व्यायाम करायला हवा . गेली दीड वर्ष आम्ही गावात शूट करत आहोत. इथे शूट केल्यानंतर आम्हाला एक छान काकू मिळाल्या आहेत ज्या आम्हाला घरचं जेवण जेऊ घालतात. जे ऑरगॅनिक फूड आहे ते आम्हाला इथून मिळत. फिटनेसच्या बाबतीत मी फार लक्ष देते. फिट राहण्याकडे माझा कल आहे. स्वतःवर प्रेम करून आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. व्यायाम करून मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. मला एक सवय आहे आरशात बघून स्वतः सोबत संवाद साधण्याची मग काही सकारात्मक गोष्टी यातून मला मिळतात.
“अभिनेत्री नसते तर”
अभिनय क्षेत्रात येण्याचं कधीच ठरलं नव्हतं. अभिनयात येणं हे स्वप्नवत आहे. मला एवढी प्रसिद्धी मिळेल हेस्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. या मागे आई बाबाचा पाठिंबा खूप आहे. एखाद्या आयटी कंपनी मध्ये काम करणं एवढचं स्वप्न होत. हा पण डान्सची फार आवड होती. जॉब करता करता मी डान्स मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं असं केलं असतं. मी अभिनेत्री नसते तर डान्स इन्सिटट्यूट चालू केली असती ते एक स्वप्न आहे. मी जे काम करतेय त्या कामामध्ये मी खूप खुश आहे.
“बोल्ड भूमिका : कथेवर अवलंबून आहे”
जर चांगली कथा असेल किंवा मला संपूर्ण कथा आवडली तर मी नक्कीच बोल्ड भूमिका करेन. माझ्यासाठी हे फार आव्हानात्मक काम असेल. काहीतरी वेगळं आहे किंवा मनावर दडपण येऊन जेव्हा ते काम पूर्ण करण्याची संधी मला मिळेल तेंव्हा मी नक्कीच बोल्ड भूमिका साकारेन. लोकं कितपत मला अश्या भूमिकेत स्वीकारतील हे बघायला मला नक्की आवडेल.
“मालिका, चित्रपट आणि नाटक हे वर्गीकरण नको”
या साऱ्या इंडस्ट्रीमध्ये खूप काळ घालवला आहे असं मी मुळीत म्हणणार नाही. कारण मी अनेक गोष्टी सध्या शिकत आहे. इंडस्ट्रीत खुपणाऱ्या गोष्टी अश्या आहेत कि मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसेरीज हि अभिनयाची अनोखी माध्यमं समजली जातात. पण यात काम करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल वर्गीकरण केलं जातं. हि मालिका करणारी अभिनेत्री, चित्रपट करणारी अभिनेत्री हे अश्या तऱ्हेचं वर्गीकरण केलं गेलं नाही पाहिजे. मालिकेतले कलाकार सुद्धा चित्रपटात तेवढयाचं उत्साहाने आणि चित्रपटाच्या बरोबरीची भूमिका साकारू शकतात. कलाकार हा प्रत्येक माध्यमातून काम करू शकतो असं मला वाटत.
“प्लस आणि वीक पॉइण्ट”
प्लस पॉइण्ट असा आहे कि हल्ली माझे पेशन्स खूप वाढलेयत. स्वतःवर संयम ठेवून काम करायला जमतं. समोर काहीही घडत असलं कि तोलून मापून बोलते. माझे डोळे हा एक प्लस पॉइण्ट असू शकतो असं मला वाटतं. अनेकांकडून मिळणारी हि एक कॉम्प्लिमेंट असते कि माझे डोळे फार बोलके आहेत. वीक पॉइण्ट बद्दल बोलायचं झालं तर माझं खाणं, “चहा” हा माझा अगदीचं वीक पॉइण्ट आहे. मी कितीही डाएट केलं तरी चहा हा सोडूच शकत नाही. यांच्या सोबतीने माझी फॅमिली आणि माझा नवरा हा माझा वीक पॉइण्ट आहेत.
“लोकांना भावणारी नंदिता”
अनेक किस्से आहेत आठवणीत राहणारे. मी मध्यंतरी मॉल मध्ये गेले असताना एक आजी आल्या होत्या त्यांनी बाकी कलाकार सोबत फोटो काढले आणि माझ्या जवळ येऊन म्हणाल्या कि या बाई सोबत मला फोटो नाही काढायचा हि फार खडूस बाई आहे तर असे अनेक किस्से घडत असतात. सेट वर लोक भेटायला येतात तेव्हा त्यांना तिथे मी फार खडूस वाटते. लोकांच्या मनात एक फ्रेम तयार झाली माझ्याबद्दल पण मी हे सगळं मस्त एन्जॉय करतेय. आपली भूमिका लोकांपर्यंत अश्या तऱ्हेने पोहचते तर याच एक समाधान आहे. आमच्या गावात एक छोटी मुलगी शूट नसताना आम्ही तिच्या सोबत गप्पा मारत होतो तर सनी दादांनी तिला माझ्या बद्दल विचारलं तेंव्हा ती एवढी लहान मुलगी म्हणाली कि “काही काम न करता फक्त चंदे चंदे ओरडते एवढचं करते” हि एक कॉम्प्लिमेंट, हा अनुभव लक्षात राहणारा आहे.
“भाषेचा लहेजा जपला पाहिजे”
“गंध फुलांचा गेला सांगून” या मालिकेत बंजारा समाजातील मुलीची व्यक्तिरेखा साकारताना असू देत किंवा आता “तुझ्यात जीव रंगला” ढाली कोल्हापुरी भाषा असेल या साठी खूप मेहनत घ्यावी लागते. गावरान भाषा साकारण्यासाठी भाषा समजून सांगणारी अनेक लोक असतात. जेंव्हा कोल्हापुरात आलो आणि आमच्या कडे स्क्रिप्ट आली तेव्हा सुद्धा आम्ही गावठी बोलायचो पण इथे असलेले स्पॉट दादा, ड्रेसिंग दादा आमची टीम हि कोल्हापुरी आहे, तर त्यांच्या कडून ऐकून ऐकून त्या भाषेतला टोन आपल्या बोलण्यात कसा येऊ शकतो यावर विचार करायचो. सुरुवातीला आम्हाला अवधुत जोशी यांनी फार मदत केली. इथल्या मूळ भाषेचा टोन, भाषेतील लहेजा पकडण्यासाठी. आता अनेकदा घरी सुद्धा कोल्हापुरी भाषेतून संवाद साधण्याची सवय मला लागली आहे.
“घरच्यांचा भरभक्कम पाठींबा”
सुरुवातीला आई बाबांना थोडी काळजी वाटायची कि इथे काम कसं करेल वैगरे पण मग आपल्या प्रवासाच्या दिशा आपल्याला माहित असतात तर मग पुढे या प्रवासात त्यांची साथ लाभली यासाठी मोठं भाग्य लागतं. अनेक उपदेश ते मला वारंवार देत असतात मग लग्नानंतर सासू सासरे यांचा मिळणारा पाठींबा हा खूप होता. सासऱ्यांकडुन खूप दाद मिळते. माझ्या प्रत्येक कामातील बदल ते मला वारंवार सांगत असतात. जेंव्हा मला हि ऑफर आली तेव्हा माझ्या नवऱ्याने मला हे काम कर असं सांगितलं. एक वेगळी भूमिका करण्यासाठी त्याने आजवर मला मदत केली आहे. तर मी यासाठी माझ्या नवऱ्याचे दुर्वेश देशमुख चे फार आभार मानते. अश्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेचं मी आजवर काम करु शकत आहे.
रॅपिड फायर हे कि ते
पुणे कि मुंबई : मुंबई
मालिका, चित्रपट कि नाटक : तिन्ही ! एक असं नाही सांगता येणार.
रोमँटिक, व्हिलन कि कॉमेडी : रोमँटिक
आवडती स्टाईल : ट्रेडीशनल कि वेस्टर्न : ट्रेडीशनल
अभिनय, गायन की नृत्य : अभिनय
आवडता अभिनेता (ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर,हार्दिक जोशी) : ललित प्रभाकर
आवडती अभिनेत्री (अक्षया देवधर, क्षिती जोग, मृणाल दुसानिस ) : क्षिती जोग