रंगभूमी, मालिका, चित्रपट, जाहिरात आणि लवकरच आता वेब सिरीज अश्या उत्तमोत्तम आणि विविध माध्यमातून आपल्या अभिनयाच्या खास शैलीतून रसिकांचं मनोरंजन करणारे दिग्गज आणि प्रतिभावंत अभिनेते “जयवंत वाडकर”.. प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने आम्ही त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या..
नाव : जयवंत पांडुरंग वाडकर
जन्म : मुंबई
शिक्षण : बीकॉम
वाढदिवस : ५ जून
लग्नाचा वाढदिवस : २९ जुलै
“अभिनेता नसतो तर नक्कीच क्रिकेटर झालो असतो”
मी आधी क्रिकेटर होतो. अनेक स्पर्धा, मॅचेस खेळलो आहे. जेंव्हा आपण कॉलेज मध्ये जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक गोष्टीचा भाग होण्याची एक उत्सुकता असते. आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्यायचा असतो. १९७९ ला “सतीश पुळेकर” हे मी, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, प्रशांत दामले आमचे सगळ्यांचे ४ ते ५ वर्ष ते दिग्दर्शक होते. राज्यस्तरीय स्पर्धा असो किंवा बाकी अनेक स्पर्धा आम्ही खुप गाजवल्या. आम्ही सगळीकडे एकदम टॉप ला असायचो. जयंत सावरकरांमुळे मला पहिलं नाटक मिळालं. तेंव्हा मग आम्ही “ऊन पाऊस” नावाची एकांकिका केली. त्यावर “घर-घर” नाटक झालं आणि मग त्यावर “गोलमाल” हा चित्रपट आला. “मामा पेंडसे” हे माझ्या व्यावसाईक नाटकाचे माझे पहिले दिग्दर्शक आणि मग नंतर साहित्य संघातून अनेक नाटकं मिळत गेली. तर सुरुवात हि अश्या अनेक दिग्ग्ज लोकांसोबत काम करण्यापासून झाली हे माझं भाग्यच मानतो. दिग्ग्ज लोकांसोबत काम करण्याची संधी आणि अनुभव इथून मिळत गेला. खूप पुरस्कार मिळाले. मग त्याच दरम्यान १९८५ साली पहिला चित्रपट दामू केंकरेंमुळे मिळाला. मग अशोक सराफ, लक्ष्या बेर्डे यांच्या सोबतीने हा चित्रपट केला. “तुझ्यावाचून करमेना” हा पहिला चित्रपट आला. मी आणि विजय पाटकर अशी आमची जोडी होती. मग त्यानंतर अनेक चित्रपट केले. १९७६ साली “तेजाब” केला मग हा प्रवास आज पर्यंत चालू आहे. “तेजाब” पासून “बेबी” पर्यंत अश्या अनेक हिंदी फिल्मस् केल्या. हा प्रवास कधीच न संपणारा आहे. चित्रपटांसोबतच मी ४ वेबसेरीज सुद्धा करतोय त्या सुद्धा लवकरच भेटीला येणार आहेत.
“हिंदीत मिळणारा मान मोठा”
अर्थात दिग्गज लोकांबरोबर काम करताना खूप चांगले अनुभव आले. खूप आठवणी आहेत. नुकतंच “रणवीर शौरी” सोबत खूप काम केलं तो खूप मस्त अनुभव होता. सोबत काम करत असताना त्यांना खूप फोन येत होते पण मला त्यांनी विचारून,अगदी माझी परवानगी घेऊन तो फोन उचल्ला. यामुळे आम्हाला त्रास होऊ नये शूट करताना हा मानस होता. तसेचं “वीर दास” हा एकटा माणूस अनेक रोल पार पाडतो. तो खूप चांगला लेखक,अभिनेता, स्टॅन्ड अप कॉमेडी करतो. त्याच्या सोबत काम करताना येणारा अनुभव कमाल आहे. तो मला “हसमुख” या सिरीजच्या निमित्ताने भेटला. हिंदीत काम करताना एक वेगळ्या दर्जाचा आदर दिला जातो. तो कुठेच मराठीत दिला जात नाही याची खंत जाणवते. तर हा किस्सा अगदीच आठवणीत राहिला त्यांना त्या लोकांना माझ्या बद्दल असलेली माहिती हि भन्नाट होती. आदर हा हिंदीत फार दिला जातो.
“मी कॉम्बिनेशन फोटोग्राफी करतो”
मी असं नाही म्हणार खिल्ली उडवतात. तर ते माझ्या फोटो मधून कुठेतरी स्वतःला रिप्रेझेन्ट करतात. स्वतःला यातून पब्लिसिटी मिळवून देतात. पण मला यातून खूप आनंद मिळतो. मी फोटो काढताना एका वेगळ्या नजरेतून ते काढत असतो. मी कुठेतरी त्या फोटो मध्ये एक वेगळी स्टोरी शोधून किंवा कॉम्बिनेशन ठेवून फोटो काढतो. मी रंगपंचमीला एका फोटो टाकला आणि तो खूप व्हायरल झाला. त्यात विजय पाटकर आणि सुशांत शेलार हे दोघे एका फ्रेम मध्ये होते हा फोटो मी सहज टाकला आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. मी कॉम्बिनेशन फोटोग्राफी करतो आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होत. कामाबद्दल हल्ली कमी बोललं जातं अनेक ठिकाणी मला सेल्फी काढायला लावतात तर हे कुठेतरी मी एक कॉम्प्लिमेंट मानतो.
“पाठिशी उभी राहणारी फॅमिली”
माझं खूप मस्त कुटूंब आहे. मला नशिबाने खूप चांगलं कुटूंब मला मिळालं आहे. “विद्या नाईक- वाडकर” माझी बायको हि फार समजूतदार आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला ती माझ्या सोबत असते. मुलगी स्वामिनी आणि माझा मुलगा तन्मय अशी माझी फॅमिली आहे. स्वामिनी सुद्धा आता इंडस्ट्रीत काम करतेय तर मला असं कुठेतरी वाटतं कि स्वच्छ मनाने कोणत्याही गोष्टी केल्या ना कि त्या आपोआप घडत जातात.
“विजय पाटकर हक्काचा मित्र”
इंडस्ट्रीतील जवळचा आणि हक्काचा मित्र “विजय पाटकर” मी नुकतंच त्याचं १० बाय १० हे नाटक पाहिलं. साधारण २० वर्षांनंतर तो रंगभूमीवर परत एकदा पदार्पण करत होता. माझ्याच मनात धाकधूक होती कि हा कसं निभावेल. पण विजय विजय आहे. प्रयोग झाला आणि मी त्याला घट्ट मिठी मारली आणि मी रडलोचं. असा आमच्या नात्यामध्ये खूप स्ट्रॉंग बॉण्ड आहे. आम्ही खूपदा भेटत असतो. माणसं जोडणं हा माझा छंद आहे. त्यामुळे माझा मित्रपरिवाराचा गोतावळा हि खूप मोठा आहे.
“लक्ष्या खूप काही शिकवून गेला”
लक्ष्या सोबत असंख्य आठवणी आहेत. दुर्दैवाने तो फार लवकर सोडून गेला. लक्ष्या म्हंटल कि आम्ही कुठेतरी फार जास्त हळवे होतो. आम्ही अगदी पहिल्या नाटकापासून ते चित्रपटापर्यंत एकत्र आहोत. आजही त्याची फॅमिली मी विजय पाटकर सगळे एकत्र आहोत. एक कौटूंबिक वातावरण आमच्यात आहेत . एक आठवण फार गंमतीशीर आहे आम्ही नाटक करत होतो. तेंव्हा आमचा साताऱ्याला प्रयोग होता. पण आम्हाला तिथे गेल्यावर समजलं बुकिंग नाही आहे. मग प्रयोग तर रद्द झाला, मग आम्ही सगळे “रमी” खेळत बसलो होतो तर तिथले काही लोक आमच्याजवळ आली. त्यांनी आमची विचारपूस केली मग “लक्ष्या” ला असं वाटलं हे आपल्याला विचारतील नाटक का नाही केलं तर त्याने आवाज बदलून बोलयला सुरुवात केली आणि समोरची व्यक्ती जेंव्हा बोलली कि आम्हाला एक काँट्रॅक हवा तेव्हा याचा आवाज अगदी नीट होऊन हा पटकन जोरात “तुम्हाला कधी हवाय काँट्रॅक” आणि त्या नंतर आम्ही सगळेच हसून हसून लोटपोट झालो. हा किस्सा नेहमीच लक्षात राहणारा आहे. अनेक गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो. इंडस्ट्री मधल्या अनेक गोष्टी बारकाईने शिकवल्या. व्यवहार शिकवले, वेळेवर येणं या गोष्टी मी शिकलो. आज लक्ष्या असता तर त्याने इंडस्ट्री कुठच्याकठे नेऊन ठेवली असती. मनाचा मोठेपणा हा त्याच्याकडे होता आणि त्यामुळे आमच्याकडे या गोष्टी आल्या आहेत.
“प्रत्येक भूमिका खास”
माझ्या सगळ्याच भूमिका चांगल्या आहेत. भूमिका खूप वेगळ्या आणि हटके होत्या. प्रत्येक भूमिका हि आपण त्याच तन्मयतेने आणि उत्साहाने करायला पाहिजे. माझ्या सगळ्याच भूमिका मला आवडतात. विविध भूमिका साकारायला मिळणं हि फार मोठी गोष्ट आहे.
“लेखकाला मान द्या”
मराठी इंडस्ट्रीत खुपणारी गोष्ट अशी कि लोकं फार कमी अभ्यास करून एखाद्या चित्रपटाची निर्मिती करतात. आपल्याकडे स्क्रीन प्ले, पटकथा या गोष्टीचा फार विचार न करता वर्षाला अनेक चित्रपट येतात. आणि मग त्यातले अगदीच कमी सिनेमे चालतात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांनी एखाद्या विषयाचा सारासार विचार करून चित्रपट बनवायला हवा. आपल्या इंडस्ट्रीत लेखकाला अगदी दुय्यम स्थान दिलं जातंय जे हिंदीत होत नाही. लेखकाला त्याचा योग्य मान मिळायला हवा. आपल्याकडे खूप लोकं आहेत जे वर्षाला अनेक प्रोजेक्ट्स करतात पण ते का करतात हे समजत नाही. वर्षाला अगदीच २ किंवा ३ फिल्मस् केल्या तर त्या चालतील.
“निरीक्षणातून गोष्टी शिका”
हल्लीच्या नवख्या कलाकारांनी निरीक्षण केलं पाहिजे अनेकांची काम बघितली पाहिजे. वाचन केलं पाहिजे. व्हॅनिटी मध्ये बसून न राहता अनेक आपल्या पेक्षा मोठ्या सह कलाकारांची काम बघायला हवीत. त्यांच्या कामातून आपल्याला शिकायला मिळतं. कामाची आवड आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता हल्लीच्या नवख्या कलाकारांमध्ये असायला हवी असं मला वाटतं. नव्या कलाकारांनी जाण ठेवून, समोरच्या व्यक्तीच् कामाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे त्याला योग्य रित्या मान दिला पाहिजे.
“राजकारण नको रे”
अनेक बडी नेते मंडळी जरी मित्र असली तरी राजकारणात जायला कधीच आवडणार नाही. आपल्याकडे राजकारण हे फार वाईट पद्दतीने चालवलं जातंय. मी राजकारणापासून दूर राहणं पसंत करेन.
रॅपिड फायर “हे” कि “ते”
- आवडता दिग्दर्शक – महेश कोठारे, विजय पाटकर, सचिन पिळगावकर : विजय पाटकर
- आवडता अभिनेता –
- अंकुश चौधरी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्नील जोशी : अंकुश चौधरी
- आवडती अभिनेत्री –
- किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर : किशोरी शहाणे
- नाटक, सिनेमा, मालिका कि जाहिरात : नाटक
- कॉमेडी भूमिका कि गंभीर भूमिका : कॉमेडी भूमिका
प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे जगतमित्र तसेच हरहुन्नरी दिग्गज अभिनेते “जयवंत वाडकर” ह्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..