लहानपणा पासूनच अभिनयाची आवड असताना पुढे याच क्षेत्रात येण्याच्या धाडसी निर्णयामुळे आज “डबल सीट” सारख्या गाजलेल्या चित्रपटात अनोखी भूमिका साकारलेला, फ्रेशर्स मालिकेतून झळकलेला नवखा चेहरा आणि आता “कागर” सारख्या उत्सुकता वर्धक चित्रपटातुन आपल्या भेटीला येणारा अभिनेता “शुभंकर तावडे” प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने शुभंकरशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…
- संपूर्ण नाव : शुभंकर सुनील तावडे
- वाढदिवस : २६ ऑक्टोबर १९९४
- जन्म ठिकाण : मुंबई
- शिक्षण : बीएएम ऍडव्हर्टायजिंग
“कागर आहे खास”
“कागर” चित्रपटा बद्दल सांगायचं म्हणजे, तीन गोष्टी आहेत ज्या या चित्रपटाशी निगडित आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक “मकरंद माने” राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री “रिंकू राजगुरू” आणि माझी अभिनेता म्हणून महत्वपूर्ण प्रथम पदार्पण असलेली ही फिल्म आहे. तर एकंदरीत हि गोष्ट आणि हा चित्रपट माझ्यासाठी फारच खास आहे. या तीन गोष्टी एकाच वेळी मिळणं हि फार मोठी गोष्ट आहे आणि मला हि संधी मिळाली म्हणून नक्कीच हा चित्रपट माझ्यासाठी फारच जवळचा आहे. या चित्रपटाच्या कास्टिंग पासून ते अनेक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया खूप वेगळी आहे. ज्यातून मला स्वतःला फार शिकायला मिळालं. या फिल्म साठी मी तीन महिने पुण्यात राहिलो. १२ ते १३ किलो वजन कमी केलं. मग त्यानंतर अकलूज ला जाऊन मी तिथे राहिलो. तिथल्या मुलांसोबत गप्पा मारायचो. ते कसे राहतात त्यांची जीवनशैली, त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करायचो. त्याच्या भाषेचा लहेजा अवगत करण्यासाठी मी त्यांच्या गप्पा रेकॉर्ड करून मी ऐकायचो. कारण इकडची भाषा आणि तिथली स्थानिक भाषा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मला फार कष्ट करावे लागले. मग यातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या तिथलं राजकारण आणि चित्रपटाची कथा या सगळ्या गोष्टी शिकणायची जी एक प्रकिया प्रत्येक कलाकाराला हवी असते ती मला अनुभवयाला मिळाली. या सगळ्या गोष्टी योगायोगाने उत्तम रित्या जमून आल्या तर म्हणून “कागर” करणं माझ्यासाठी खास आहे.
“रुईया कॉलेज दुसरं घर”
माझ्या आणि वडिलांच्या नात्यासारखं आमचं हे एक अतूट नातं आहे. तिथली सगळी मंडळी माझ्यासाठी दुसरं कुटुंब आहे. माझा अनेक वेळ हा रुईयात जायचा. मी रुईया मधून सगळंच शिकलो आहे.एक कलाकार म्हणून कसं असावं आणि वैयक्तिक रित्या आपण आयुष्यात कस असावं अश्या असंख्य गोष्टी मी तिकडून शिकलो. रुईया मधून अनेक दिग्ग्ज कलाकार घडले आहेत आणि अश्या ठिकाणी मला या गोष्टी शिकायला मिळाल्या याचा अभिमान आहे. मी सुद्धा यात खारीचा वाटा उचलला आहे आणि त्या दिग्गज कलाकारांच्या सोबतीने आज माझं नाव सुद्धा घेतलं जातं याचा सार्थ अभिमान वाटतो. कॉलेज च प्रतिनिधित्व करतोय. एक लीड अभिनेता म्हणून एक चित्रपट करत असताना मी रुईयाचा आहे याचा एक अभिमान आहे.
“सह-कलाकारांकडून शिकलो आणि आजही शिकतोय.”
मला एक गोष्टीच फार समाधान आहे कि मला खूप चांगल्या लोकांसोबत कामं करायला मिळाली. मग मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी, विद्याधर जोशी, वंदना गुप्ते ह्यांच्या कडून शिकणं हि एक पर्वणी आहे. आपण आपल्या कामाच्या बाबतीत किती प्रोफेशनल असायला हवं, आपलं काम एके काम, कामावरच फोकस कसा जपला पाहिजे अश्या अनेक गोष्टींच शिक्षण मला यांच्या सोबत काम करताना मिळत गेलं. जे काम करायचं ते खरं काम करायचं हा मोलाचा आणि धडा यांच्याकडून मिळत गेला. आपला सहकलाकार जर अश्या तऱ्हेनं काम करत असेल तर आपसूकपणे शिकायला मिळतं. अश्या रीतीने आजवर हि शिकण्याची प्रकिया चालू आहे कामातून मिळणारे अनुभव आणि या गोष्टी खूप शिकवून जातात.
“लहानपणीच ग्लॅमरस जगाची ओळख”
खरंतर लहानपणा पासून घरात एक दिग्ग्ज कलाकार असल्या कारणामुळे याची बाबांमुळे एक सवय झाली होती. प्रसिद्धी काय असते किंवा या ग्लॅमरस जगाची ओळख, तिथून अनुभवयाला मिळाली. मी मालिका करत होतो वडिल तेंव्हा अनेक गोष्टी सांगायचे. आधी मला सुनील तावडे चा मुलगा म्हणून ओळखलं जायचं. पण मी स्वतः इंडस्ट्रीत अशी एक स्वतःची ओळख निर्माण करतोय. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आता लोक शुभंकर तावडे म्हणून मला ओळखतात. तर हा फरक प्रामुख्याने जाणवतो. इंडस्ट्रीत आल्यावर दडपण कधीच नाही जाणवलं पण याच कामातून आपण रसिकांच्या समोर येतोय.
“बाबा फारच भारी अभिनेते”
कामाचं दडपण कधीच येत नाही. पण मी सुनील तावडे चा मुलगा आहे यावरून लोकं ओळखतात तर या गोष्टीची एक सवय झाली आहे. मला माझं माहित आहे कि हा एक माझा वेगळा प्रवास आहे. मी माझी तुलना त्यांच्या सोबत कधीच करूच शकत नाही कारण ते कमाल अभिनेते आहेत. आणि त्यांना खूप अनुभव आहे. त्याच्या कामाची शैली वेगळी आहे मी त्यांचा अभिनेता म्हणून खूप आदर करतो.
“मी नवीन आहे म्हणून मला वेगळी वागणूक वैगरे असं कधीच झालं नाही”
मला माझ्या नशिबाने अनेक दिग्ग्ज लोकांसोबत काम करायला मिळाली आणि त्यांच्या कडून मिळणारी वागणूक खूपच चांगली आहे. मी जेंव्हा डबल सीट केला तेंव्हा सुद्धा सगळेच एकमेकांशी चर्चा करून काम करायचो. मला फार मदत करायचे चुकलो तर समजून घेऊन ही गोष्ट अशी कर असं सांगायचे. आता हि कागर करताना मकरंद सर मला फार मदत करायचे. एक नवखा कलाकार म्हणून याला कुठेतरी पुढे घेऊन जाऊ या विचाराने प्रत्येक जण मदत करून काम करतंय.
“अभ्यासपूर्ण भूमिका साकारायची आहे”
भविष्यात अनेक वेगळंवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. अशी कोणती एक भूमिका नाही आहे. ज्या भूमिके साठी मला अभिनयाची एक प्रक्रिया अनुभवयाला मिळेल अश्या भूमिका करायला आवडतील. एकंदरीत भूमिकांचा अभ्यास आणि विविध विषय हाताळायला आवडतील. आपण फक्त एक कलाकार म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी एक माणूस या नात्याने शिकत असतो. मी कागर करत असताना मला राजकारणाविषयी अनेक गोष्टी समजल्या तर अभिनया सोबत आपण माणूस म्हणून इथे घडत असतो.
“व्यायाम करून फिट राहतो”
फिटनेसच माझ्या आयुष्यात फार महत्व आहे. मी आधी फार चिल मारायचो पण मग पहिली फिल्म केल्यानंतर त्या दरम्यान मी संपूर्ण लक्ष फिटनेस वर दिलं. तेंव्हा मला माझ्यात झालेला फरक जाणवला. म्हणून मी रोज जमेल तसं सायकल चालवतो किंवा धावतो. मी जिम वैगरे सध्या न करता घरच्या घरी किंवा स्वतःला शक्य होईल त्या परीने वर्क आऊट करतोय. कामात गुंतलो कि कुठेतरी जिम ला जण जमत नाही.
“कलाकारचं व्हायचं होत”
लहानपणापासून कलाकारी हि होतीचं. अभिनयाचे गुण हे अवगत होते. मी अनेक कलाकारांचे आवाज काढायचो. शाळेत असताना रोज घरी येऊन “लगान” हा चित्रपट नित्यनियमाने बघायचो. सहावीत असताना हा मी चित्रपट वर्षभर पहिला. अगदी तोंडपाठ झाला माझा. तेंव्हा पासून कुठेतरी याच क्षेत्रात यावं हि एक इच्छा होती. माझी आवड हि कुठेतरी डान्स कडे वळली तर मग डान्स शिकलो. हे करता करता रंगभूमी, नाटक, रुईया, हा प्रवास सुरु झाला. मला एक गोष्ट माहित होती कि मला कलाकार व्हायचंय. लोकांसाठी त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपल्याला काही तरी करायचं हि जिद्द होती. मला अभिनयातून आनंद मिळायचा. मग पुढे जाऊन मुंबईतल्या ड्रामा स्कूल मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. रंगभूमिशी निगडित अनेक गोष्टी इथे शिकवल्या जातात तर मग तेंव्हा कुठेतरी मनात पक्क झालं कि आपण अभिनेताच व्हायचं. मग मी खूप नाव कमवेन, नाही कमावणार किंवा यात खूप संघर्ष करावा लागेल याची पर्वा न करता मी इथे आलो पण यातूनच आनंद मिळतो मग हेच करणार.
“तबला सोडल्याची खंत”
मी जवळपास ८ वर्ष तबला शिकत होतो मग तबला सोडून मी डान्स आणि अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायला लागलो पण मग तबला सोडल्याचा दुःख आज सुद्धा आहेच.
“संगीत आणि डान्स”
माझ्यातल्या छुप्या कला याच कि डान्स आणि संगीत. या दोन्ही गोष्टींच काही शिक्षण न घेता मी स्वतःच शिकलो. त्यामुळे मी गातो आणि डान्स सुद्धा करतो.
“बुलेट साठी घरच्यांसोबत अबोला”
खूप वर्षांपूर्वी माझा बाईक वरून पडून अपघात झाला मग म्हणून नंतर बाईक चालवायला घरून मनाई झाली. पण मग मला बुलेट हवीच होती म्हणून त्यासाठी मी एक आठवडा घरच्यांसोबत अबोला धरला होता.
“भाऊ – बहीण जगात भारी”
मी माझ्या ताईच [अंकिता तावडे] हीच खूप जास्त ऐकतो. आम्ही दोघेही एकमेकांना कामासाठी मदत करतो. ती मला समजावते आणि मी तिला समजावतो तर असं आमच्या भावा बहिणीचं कमाल नातं आहे.
रॅपिड फायर हे कि ते
आवडता अभिनेता – सुनील तावडे, ओंकार राऊत, अंकुश चौधरी : सुनील तावडे
आवडती अभिनेत्री – मुक्ता बर्वे, रिंकू राजगुरू, मिताली मयेकर : मुक्ता बर्वे
चित्रपट, मालिका, नाटक कि जाहिरात : चित्रपट