संपूर्ण नाव : तितिक्षा सुरेश तावडे वाढदिवस : ३ जुलै १९९० जन्मठिकाण : डोंबिवली शिक्षण : हॉटेल मॅनेजमेंट
“सरस्वती” ते “तू अशी जवळी रहा” अश्या मालिकांमधून आपल्या भेटीला आलेली नवखी अभिनेत्री.
अभिनयाच्या सोबतीने कुकिंग आणि क्रिकेट अश्या भिन्न आवडी जपणारी क्रिकेट फॅन आणि प्लेयर “तितीक्षा तावडे” सोबत प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या “स्टार ऑफ द वीक” निमित्त केलेल्या काही खास गप्पा.
“अनपेक्षित प्रवास”
हा प्रवास माझ्यासाठी फार अनपेक्षित होता. कारण जेंव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं तेव्हा असं कुठेही मनात नव्हतं कि मला अभिनेत्री व्हायचंय. मी त्यानंतर २ वर्ष नोकरी केली आणि तेव्हा माझी बहीण [खुशबू तावडे] अभिनेत्री झाली होती मग तिच्याकडे बघून मला असं वाटायचं अरे हि काही तरी वेगळं करतेय आणि मग तेंव्हा मला असं वाटलं कि असं काहीतरी वेगळं करूया. यात किती प्रसिद्धी आणि बाकी गोष्टी मिळतात. लोकं आपल्याला अभिनेत्री म्हणून ओळखतात. जेंव्हा आम्ही सगळे कुठे घरच्या समारंभांना जायचो तेंव्हा तिच्याकडे फार खास लक्ष दिल जायचं. मग मला वाटायचं यार आपण का नाही??? म्हंटल आपण कुठेतरी एक प्रयत्न करून बघू या. मग मी नोकरी सोडली आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मग नशिबाने एक एक गोष्टी आपसूक घडत गेल्या आणि त्यामुळे आज या क्षेत्रात आहे.
“क्रिकेट प्रेमी : क्रिकेटरची भूमिका करायला आवडेल”
प्रत्येक क्रिकेटची मॅच नाही बघू शकत पण आमच्या घरात एक रीत आहे कि एखादा क्रिकेट सामना तरी बघावा. यावर्षी आयपीयल मुंबईत होत्या. आम्ही सगळे सहकुटूंब न चुकता क्रिकेट बघायला वानखेडेला जातो. या व्यतिरिक्त सेटवर कधीकधी खेळणं होत, मोकळ्या वेळेत आम्ही सगळे कलाकार क्रिकेट खेळतो. बॅट – बॉल नसला तरी सेटवरच्या प्रॉपर्टीस खोटी फळं, किंवा भिंतीला लावलेल्या फ्रेम्स, शोपीस तर अश्या गोष्टीचा वापर आम्ही स्टंप्स, बॅट बनवून आम्ही क्रिकेट खेळलोय. आधी सारखं फार क्रिकेट खेळायला नाही जमत पण माझ्या नशिबाने मला भविष्यात क्रिकेटर ची भूमिका मिळावी तर मला ती करायला नक्कीचं आवडेल.
“जादुई प्रवास”
मला माझ्या या प्रवासाबद्दल फार आश्चर्य वाटतं. जेंव्हा “सरस्वती” मालिका मिळाली तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं कि मी एका लीड रोल साठी सक्षम आहे. कारण मला काहीच यायचं नाही. त्यात मला एका गावठी मुलीची भूमिका साकारायची होती तर हे कुठेतरी आव्हानात्मक होतं. मला आदल्या रात्री असं फार वाटतं होत कि मला उद्या सेटवरून काढून टाकतील कारण मला एवढ्या लोकांसमोर बोलता येणार नाही. ऑडिशन काय एका बंद खोलीत दिली जाते. पण चारचौघात मला काहीच करता येणार नाही. पण माहित नाही कसं काहीतरी घडलं आणि मी अगदी सहजरित्या अभिनय करायला लागले. मला दिग्दर्शक फार चांगले मिळाले आणि बाकी सहकलाकार फार समजून घेणारे होते त्यामुळे त्यांच्या अनुभवातून मी शिकत होते. मग दुर्गा चा डबल रोल करायला मिळाला. मग त्यात मला दुबई ला जायला मिळालं. कुठेतरी छोटी स्वप्नं बघून हा प्रवास एवढा मोठा होईल हे कधीच वाटलं नव्हतं. एकदम जादुई प्रवास आहे हा. त्या आधी “कन्यादान” मालिकेत अगदी छोटा रोल केला होता. “सरस्वती” मालिका अडीच वर्ष चालली मग त्या नंतर मी थोडा ब्रेक घेऊन फिरायला गेले. तिकडून आल्यावर मला कन्यादानच्या निर्मात्यांचा फोन आला कि आमचा एक शो येतोय तुला करायला आवडेल का? माझ्यासाठी हे फार अद्भुत होत कि ज्यांच्याकडे मी माझ्या करियर ची सुरुवात केली त्यांच्याकडून आज मला मुख्य भूमिकेसाठी फोन येतोय. एकंदरीत माझ्यासाठी हा जादुई प्रवास आहे. इथला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करतेय आणि जगतेय.
“लवकरच आम्ही बहिणी सोबत काम करू”
नक्कीच आम्ही दोघी एकत्र काम करू. आमचे या दृष्टीने प्लॅन्स चालू आहेत. सध्या डिजिटल मीडिया एवढं कमालीचं माध्यम झालंय. इन्स्टाग्राम हे खूप जास्त पॉवर फुल नेटवर्किंग आहे की यातून फॅन्स आम्हाला नेहमी सांगत असतात की तुम्हाला दोघींना एकत्र बघायचंय. तर यासाठी आम्ही दोघी प्लॅनिंग करतोय तर लवकरचं आम्ही दोघी काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.
“लाडकी बहिण : अनोखी केमिस्ट्री”
आम्ही दोघी बहिणींपेक्षा जवळच्या मैत्रिणी आहोत. आमचं गिफ्ट शॉप आहे. त्यामुळे आई बाबा दोघे सुद्धा तिकडे कामात असायचे मग अश्या वेळी माझी बहीण माझ्या सोबत असायची. ती लहानपणा पासून आज पर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या आई बाबांची भूमिका बजावत आहे. आज सुद्धा ती तेवढीच काळजी घेते. आता तिचं लग्न झालंय तरीही आम्ही नेहमी एकमेकींच्या सोबत असतो. ती एकदम आई सारखी वागते. सकाळी शूट ला जाताना माझ्यासाठी डब्बा तयार असतो. रात्री घरी आले की जेवण ती माझ्यासाठी बनवते. तर हे कुठेच बदललं नाही आहे. कधीकधी भावंडांमध्ये भांडण होतात पण आम्ही एका क्षेत्रात असून आम्ही कधीचं कोणत्या गोष्टीसाठी आजवर भांडलो नाही आहोत. आम्ही न बोलता सुद्धा खूप बोलू शकतो.
“कुकिंग स्ट्रेस बस्टर”
कुकिंग माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. वेळ मिळाला की माझा संपूर्ण वेळ कुकिंग साठी देते. फक्त मग त्यावेळी मला माझ्या कामात कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. शूट मुळे फार कमी वेळ कुकिंग साठी दिला जातो पण कधी माझा उशिरा कॉल टाइम असेल तेंव्हा मी काहीतरी बनवून नेते. घरी खुशबू आणि संग्राम च उशिरा पॅकअप असल्यास मी त्यांच्यासाठी जेवण बनवते.
“अश्या पाच गोष्टी त्या शिवाय राहू शकत नाही”
पहिली गोष्ट : घरच्यांशी बोलल्या शिवाय राहू शकत नाही. दिवसातून एकदा तरी घरी फोन करतेयं. त्याशिवाय माझा दिवस संपत नाही. दुसरी गोष्ट : कामाशिवाय नाही राहू शकत. मला सुट्टी असली की करमत नाही.तिसरी गोष्ट : पुस्तकांशिवाय मी जगू शकत नाही. मला वाचायला आवडत त्यामुळे पुस्तक हवंच.चौथी गोष्ट : पूजा करून दिवसांची सुरुवात करते.पाचवी गोष्ट : फिरण्या शिवाय मी राहू शकत नाही. कामातून वेळ काढून अगदी जवळच्या ठिकाणी फिरून येते.
“फडके रोड, दिवाळी पहाट आणि बरंच काही”
डोंबिवली म्हंटलं की फडके रोड आठवतो तिकडे दिवाळी पहाट ला अगदी सगळेच मस्त तयार होऊन येतात. मित्र मैत्रिणींना भेटतात. तर झालं असं की मी सुरुवातीला क्रिकेट खेळायचे तर मी एकदम टॉम बॉय होते तर ते साडी नेसणं काही मला जमायचं नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी जायच्या तर मी तिकडे जाणं टाळायचे तर सुरुवातीला मी एक वर्ष सुद्धा तिकडे गेले नाही. नंतर मी शिक्षणासाठी गोव्याला गेले आणि तिकडून आल्यावर जवळपास २० वर्ष डोंबिवलीत राहून मी २० वर्षांनी मी त्या दिवाळी पहाट ला गेले. त्यानंतर मला जाणवलं की यार आपण २० वर्ष काय मिस केलंय. तर या गोष्टीच कुठेतरी वाईट वाटत पण मला नशिबाने दर पाडव्याला, दिवाळी पहाट ला चॅनेल कडून तिकडे जाण्याची संधी मिळते मग आता ही फार वेगळी भावना आहे की आता लोकं आपल्याला बघायला येतात. डोंबिवली ने माझ्यावर फार प्रेम केलंय आणि आता ते मी अनुभवते आहे.
“रेस्टॉरंट उघडलं असतं”
अभिनेत्री नसते तर मी रेस्टॉरंट चालू केलं असतं. मी आणि माझ्या बहिणेने आम्ही दोघींनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय तर आम्ही दोघींनाही कुकिंग, कॅफे कल्चर खूप आवडतं. तर आम्ही रेस्टॉरंट चालू केलं असत. आणि हा व्यवसाय केला असता.
“प्लस आणि वीक पॉईंट”
प्लस पॉईंट हाच की मी कोणावर ही खूप प्रेम करू शकते. मी मोजून मारून प्रेम नाही करत. प्रेमाला काही मर्यादा नाही. वीक पॉईंट सुद्धा हाच आहे की आपण एखाद्यावर प्रेम केलं आणि कुठेतरी काही घडलं किंवा कोणी काही बोललं तर ते आपल्या फार मनाला लागतं.
“सारासार विचार करून इंडस्ट्रीत निर्णय घेतले जावे”
आपल्या मराठी इंडस्ट्रीत अभिनयाला फार प्राधान्य दिलं जातं ही एक फार चांगली गोष्ट आहे, हे मी अनुभवलंय. जेंव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला असं वाटलं की इथे फक्त स्वभाव आणि दिसण्यावर गोष्टी बघितल्या जातात पण माझ्या कामाचं कौतुक केलं गेलं तर इथे कामाला प्राधान्य दिलं जातं. हल्लीच्या काही घटना बघितल्या गेल्या तर प्रत्येक कामाच्या दोन बाजू असतात तर आपण त्या दोन्ही समजून घेतल्या पाहिजेत. पण आजही लुक्स वरून किंवा शेवटच्या क्षणाला कोणालाही तडकाफडकी काढून टाकणं हा प्रकार फार विचित्र आहे. कारण अभिनय हे असं क्षेत्र आहे जे विश्वासावर चालतं. इथे कौतुक होतचं पण कधीकधी आपल्या चुका सुद्धा दाखवल्या जातात. पण एखाद्या कलाकाराला काढून टाकण्या अगोदर त्याला त्याची पूर्वसूचना दिली जावी. कास्टिंग च्या वेळी हा विचार केला तर ऐनवेळी काढून टाकल्यास त्या कलाकाराला मानसिक धक्का नाही बसणार. अभिनयाचा आत्मविश्वास एकदा गमावला की पुन्हा कॅमेरा समोर उभं राहणं कठीण जातं तर आपल्या इंडस्ट्रीत या गोष्टीचा विचार केला जावा असं मला वाटतं.
रॅपिड फायर ….
- आवडत अभिनेता : संग्राम साळवी, सिद्धार्थ बोडके – संग्राम साळवी
- आवडती अभिनेत्री : खुशबू तावडे, गौरी नलावडे, भाग्यश्री लिमये – खुशबू तावडे
- अभिनय, स्पोर्ट्स, कुकिंग – अभिनय
- आवडतं सोशल मिडिया : फेसबुक, इंन्स्टाग्राम – इंन्स्टाग्राम
बहुगुणी अभिनेत्री “तितिक्षा तावडे” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!