“मालिका तसेच चित्रपट माध्यमातून अभिनयाच्या सोबतीने पटकथाकार म्हणून नावारूपास येऊन मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता आणि लेखक तेजपाल वाघ”.
अभिनय आणि लेखन करताना स्वतःची आवड म्हणून निसर्ग संवर्धनासाठी तो प्रयत्न करतो आहे.
“लागीर झालं जी” चा क्रेएटीव्ह हेड “तेजपाल वाघ” बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून….
संपूर्ण नाव : तेजपाल जयंत वाघ जन्मठिकाण : सातारा वाढदिवस : २९ ऑक्टोबर शिक्षण : एमएसी (MSC), (झुलॉजी, Zoology) आणि बीएड.
“आणि माझ्यातला वास्तववादी लेखक घडत गेला”
मला मुळात याच क्षेत्रात काम करायचं होतं मग ते अगदी स्पॉट बॉय च काम असतं तरी चाललं असतं. लहानपणी मला कोणी प्रश्न विचारला की मोठा होऊन काय व्हायचंय तेंव्हा उत्तर हेच असायचं की “मला सगळंच व्हायचंय” तर सगळंच कुणाला होता येतं तर ते एका अभिनेत्याला होता येतं. तो अभिनय करताना विविध भूमिका बजावत असतो. मग तो डॉक्टर असतो, इंजिनियर असतो. हे माझं चौथीतलं उत्तर होत की मला सगळंच व्हायचंय. अभिनेता म्हणून मी कितपत यशस्वी झालो माहीत नाही पण अभिनय ही फक्त आवड आहे. व्यवसाय म्हणून आपण काय करावं तर आपल्याकडे लिखाणाचं अंग आहे जे महाराष्ट्राचा सुपरस्टार ला आल्यावर समजलं. सचिन मोटे, सचिन गोस्वामी या लोकांमुळे लिखाणाच्या क्षेत्रात नावारूपाला आलो. सचिन मोटे यांच्या मुळे मी लेखन, पटकथा या क्षेत्राकडे वळलो आणि मग त्यांच्या सोबत राहून पटकथा कश्या लिहायच्या, इव्हेंट्स कसे लिहायचे हे शिकत गेलो आणि मग असं वाटलं की शब्दबंबाळ वगैरे लिहिणारा लेखक नाही. मी माझ्या आजूबाजूला हे दिसत ते कागदावर लिहिणारा माणूस आहे. तर स्क्रीन प्ले राईटर (पटकथाकार) चा प्रवास असा घडला आहे. जे आपल्या आजूबाजूला घडतंय ते कागदावर मांडून ते पडद्यावर उमटवण्यासाठी एक माध्यम असतं तर हे माध्यम लेखकाच्या रूपाने समोर येतं. मी जे काही गावाकडचे अनुभव घेतो ते कागदावर आलं पाहिजे कारण जे कागदावर येणार तेच पडद्यावर उमटणार. अश्या तऱ्हेनं हा पटकथाकार म्हणून प्रवास सुरु झाला.
“क्रेऐटिव्ह हेड म्हणजे…”
क्रेऐटिव्ह हेड म्हणजे एखाद्या लग्नात मुलीचा मामा जी भूमिका बजावतो तो एक कार्यवाहक असतो. मुळात त्याच्यावर खूप जवाबदारी असते. मुलीला मंडपात घेऊन येण्यापासून ते थेट लोकांच्या पाहुणचारा पर्यंत अशी सगळी मल्टिटास्किंग भूमिका एखादा क्रेऐटिव्ह हेड बजावतो. तो त्याच्या सगळ्याच भूमिका अगदी कल्पकतेने बजावत असतो. कोणाला ही न दुखावता सगळी कामं करावी लागतात. कलाकार नेमकं कसं काम करतात, जो काही कन्टेन्ट आहे तो दिग्दर्शक कसा पार पाडतो, सगळं काम झाल्यावर पुन्हा एकदा एक शेवटची नजर त्यावरून फिरवून सगळी कामं चोखपणे पार पाडण्याची जवाबदारी हा क्रेऐटिव्ह हेड करत असतो. “लागींर झालं जी” चा प्रत्येक भाग मी ३ ते ४ वेळा बघतो. तर अशी अनेक काम करून क्रेऐटिव्ह हेड आपली भूमिका बजावत असतो.
“माझ्यासाठी लिखाण म्हणजे जे लोकांनी पाहिलं नाही ते”
मुळात असं लिहिलं गेलं पाहिजे जे लोकांनी या आधी कधी पाहिलं नसेल अश्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. जे आपल्या आजूबाजूला पाहतो पण आपण त्या गोष्टीचा विचार कधी करत नाही पण अनेकदा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलून काही रोजच्या आपल्या बाजूला घडणाऱ्या गोष्टी पडद्यावर उमटल्या तर या विचाराने लिहिलं जात. माझ्यासाठी लिखाण म्हणजे जे लोकांनी पाहिलं नाही ते लोकांना दाखवून त्यांच्या पर्यंत पोहचवावं. माझं काम एखाद्या शेफ सारखं आहे की प्रत्येकाला काही तरी वेगळं आवडत. जो वेगळेपणा आहे तो लोकांना देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आजवर आपण अनेक सामूहिक विवाह पाहिले पण हेच मालिकेत कधी दाखवलं नाही गेलं तर ते आम्ही मालिकेच्या माध्यमातून लोकांना दाखवलं. आजवर एखाद्या फौजीची प्रेमकहाणी कोणी दाखवली नाही तर अश्या काही गोष्टी लोकांना दाखवायला मज्जा येते. यातलं वेगळेपण लोकांनी बघावं हाच प्रयत्न असतो. मला कथेतील बारकावे टिपायला आवडतात.
“व्यक्त व्हायचं होत म्हणून लेखक झालो”
लेखन सुरू करावं असं वाटलं नाही कधी. मी कॉलेज मध्ये असताना “वीर झुंजले साथ” नावाची एकांकिका लिहिली आणि त्याचं कौतुक झालं. त्यानंतर मी “महाराष्ट्राचा सुपरस्टार” साठी पटकथा लिहायला लागलो आणि मग मी अनेक विषय, कल्पना सुचवत राहिलो. मग सचिन मोटे यांनी यात मार्गदर्शन केलं की कोणत्या पद्धतीने लिहावं , लिहिण्यातले बारकावे टिपत राहिलो आणि लिहीत राहिलो. मग त्यानंतर मी अनेक स्क्रीन प्ले वाचले, ते कसे लिहितात यावर थोडंफार वाचन केलं मग त्यातून टेक्निकली कसं लिहिलं जात याचा उलगडा होत गेला. पण माझ्यामते टेक्निकली कथा किंवा चित्रपट कसा लिहितात या पेक्षा आपल्याला ज्या गोष्टी मनाला भावतात त्यातून आपण कसे व्यक्त होतो. हे जे व्यक्त होणं आहे यातून माझ्यातला लेखक घडत गेला. मला व्यक्त व्हायचं होत म्हणून मी लेखक झालो असं मला वाटतं.
“लेखकांना योग्य मानधन द्यावं”
लेखक म्हणून मराठी इंडस्ट्रीत हाच बदल व्हायला हवा की लेखकांना भरपूर मानधन मिळालं पाहिजे. आपल्याकडे घरी जशी आईला वागणूक दिली जाते तशी वागणूक कुठेतरी लेखकांना दिली जाते. लेखकांची किंमत रहात नाही. कुठला ही चित्रपट कथेच्या जोरावर निर्माण होतो. लेखकाच्या मनात पहिल्यांदा कथेची गर्भधारणा होते आणि एवढं सगळं करून लेखकांना आपल्या इंडस्ट्रीत गृहीत धरलं जात. लेखक हा मुखदुर्बल असतो कारण पैसे वाढवून मागितले की आपल्याकडे बजेट बद्दल बोललं जातं मग बजेट नसतं पण आपण असा विचार करतो की यार आपण हा चित्रपट करू आपल्यामुळे बाकी १०० लोकांना रोजगार मिळेल पण याचा विचार निर्माते करत नाहीत. निर्माता खूप मानधन घेतो पण त्यातले फार कमी पैसे हे लेखकांना दिले जातात. मराठी इंडस्ट्रीत असे अनेक लेखक आहे जे खूप उत्तम कथा लिहून पैसे घेतात आणि त्यांना योग्य रक्कम दिली जाते. मराठी इंडस्ट्रीत बजेट ची समस्या आहे तर माझ्यामते जेवढं बजेट आहे त्यांची किमान ३ ते ४ टक्के पैसे लेखकांना मिळावेत.
“प्राणीप्रेमी आणि बरंच काही”
मी खूप जास्त डिस्कवरी चॅनल बघायचो. मला असं कायम वाटायचं की मी असं काहीतरी साप पकडताना विडिओ काढून टाकावा, कुठेतरी या दगडा खाली काय हे बघावं. मी “वाई” या गावात राहिलेलो आहे त्यामुळे कृष्णा नदी त्याचा आजूबाजूचा परीसर पक्षी, मासे पडकणे असे सगळे लहानपणी चे उद्योग असायचे. एकदा एक घुबड ज्याला इजा झाली होती तर ते माझ्याकडे ३ महिने होतं. एकदा घार कोलमडून पडली होती तिच्यावर उपचार करून ती जवळपास सव्वा महिना माझ्याकडे होती. अनेक साप आले आमच्या वाई मध्ये तेंव्हा एवढं प्रबोधन नव्हतं मग त्यावेळी आम्ही काही मंडळी साप पकडून पाचगणी च्या घाटात सोडून यायचो तिथून मला प्राण्यांची आवड निर्माण झाली. मला जंगली प्राण्यांची फार आवड आहे. मला पाळीव प्राण्यांची एवढी कणव नाही. आपली जी नैसर्गिक समृद्धी आहे ती फार जपायला हवी तिचं संवर्धन करायला हवं असं मला वाटतं.
“कलाकारांनी राजकारणात यायला पाहिजे”
मला नक्कीच राजकारणात पदार्पण करायला आवडेल कारण राजकारणात काही उत्तम लोकांची गरज आहे. मला असं वाटतं की डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारख्या हुशार आणि शिव अभ्यासक अभिनेता आज खासदार आहे त्यांच्यावर खूप चांगल्या आणि उत्तम रीतीने संस्कार झालेत. एक कलाकार असल्याने कुठेतरी त्यांच्या विचारातील कल्पकता ही राजकारणात उतरू शकते. कलाकार मंडळीनी राजकारणात यायला पाहिजे कारण त्यांच्या डोक्यात विचार करण्याची अफाट शक्ती असते. राजकारण किती वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो हा विचार करून कलाकारांनी राजकारणात यावं. आपल्याकडे का एखादा चित्रकार हा वनमंत्री नाही आहे. जर तो वनमंत्री चित्रकार असेल तर तो ही भूमी हिरवीगार करेल. तर आपल्याकडे अशी लोकं समोर येत नाहीत. दाक्षिणात्य राजकारणात या गोष्टी घडतात तिकडे अनेक कलाकार, लेखक हे मंत्री आहेत तर अश्या पद्धतीचं राजकारण आपल्याकडे नाही आहे. मुळात आपल्याकडे राजकारण म्हणजे वाईट हा एक दृष्टीकोन झाला आहे तर मग यामुळे चांगली लोकं आपल्या राजकारणात येत नाही. आपल्याकडे हे राजकारण बदलत चाललंय. चांगली लोक आहेत पण कल्पकता असलेली लोकं यायला हवी. विकासाच्या दृष्टीने बदल व्हावते असं मला वाटतं. त्या मातीमधला माणूस हा लोकांशी राजकारणातून जोडला गेला पाहिजे. मला राजकारणात सहभाग घ्यायला नक्की आवडेल आणि मी यात सक्रिय सहभागी होईन.
“तर लेखक झालो नसतो…”
माझ्या या प्रवासात अश्या या दोन व्यक्ती भेटल्या त्या होत्या सचिन मोटे आणि अश्विन कुमार पाटील ज्यांच्या मुळे माझ्या करियरची दिशा घडली. अश्विन कुमार पाटील हे महाराष्ट्राचे सुपरस्टार या शो चे कार्यकारी निर्माते होते आणि सचिन मोटे ते तिकडचे लेखक होते या दोघांनी मला बळजबरीने “फु बाई फु” ला लिही असं सांगितलं आणि पुरस्कार सोहळ्यांना सचिन मोटे ना असिस्टंट म्हणून काम कर असं अश्विन पाटील यांनी सांगितलं आणि मग मी या क्षेत्रात आलो. नाही तर मी आज लेखक नसतो कुठेतरी अभिनयासाठी इंडस्ट्रीत धडपड केली असती. या दोघांमुळे लिखाणाकडे वळलो.
“गंमत एका किस्स्याची”
असे आठवणींमधले खूप किस्से आहेत. पण लागींर झालं जी लिहिताना असे अनेक किस्से आहेत जे मी अनुभवले आहेत. या मालिकेत राहुल्या ला शीतल आवडत असते पण मग राहुल्याला मदत करायला मध्ये अजिंक्य जातो आणि मग त्यांची प्रेम कहाणी सुरू होते तर हा असा अनुभव मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात घेतला आहे. माझ्या मित्रा सोबत असा किस्सा झाला होता आणि हा किस्सा मालिकेत वापरताना फार मजेशीर वाटलं या सारखे असंख्य किस्से आहेत जे लिहिताना घडत असतात.
“आवडत्या कलाकारांकडून कौतुक”
फॅन मोमेंट असे पटकन नाही सांगता येणार मी महाराष्ट्राचा सुपरस्टार हा शो करत होतो तेंव्हा एक मुलगी आली होती अगदी थरथरत कापत होती ती आली तिने मला माझं काम फार आवडत असं सांगितलं पण मला एक आठवण सांगावीशी वाटते की आपल्याला जी व्यक्ती आवडते आणि त्या व्यक्ती कडून आपल्या कामाचं कौतुक ऐकण्याची संधी मला मिळाली तर हे फार भारी होतं. मी मधल्या काळात “चला हवा येऊ द्या” साठी काम करत होतो तेव्हा मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वैदेही परशुरामी ला भेटलो तेंव्हा तिने माझ्या कामाचं कौतुक केलं तू छान लिहितोस अस सांगितलं तर माझ्यासाठी तो क्षण मस्त होता. आपल्याला जिचं काम आवडत ती व्यक्ती येऊन आपल्या कामाचं कौतुक करते तर हे छान होत. तसचं गावातल्या एका मुलीने मला फोन करून सांगितलं होतं की सर मी आर्मी मधल्या मुलांसोबत लग्न करते आहे मालिका बघून तिने हा निर्णय घेतला होता. काही कारणामुळे मला लग्नाला जायला नाही जमलं पण अश्या कामाच्या पोचपावत्या मिळणं फार भारी असतं. तर ही एक फॅन मोमेंट सांगू शकतो.
“मेकअप” मध्ये रिंकू राजगुरू सोबत अभिनेत्याची भूमिका बजावणार…
अभिनेता म्हणून मी एक “मेकअप” नावाचा आगामी चित्रपट करतो आहे. रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर हे प्रमुख भुमिकेत आहेत. ह्या चित्रपटात माझा एक मस्त रोल आहे. सिनेमाचे दिग्दर्शक गणेश पंडित यांना मी अभिनय करतो हे ठाऊक होतं म्हणून त्यांनी मला ही एक संधी दिली आहे. रिंकू राजगुरू सोबत काम करताना धम्माल आली तर आमची अशी मस्त केमिस्ट्री या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. लेखक म्हणून मी २ चित्रपट लिहितोय ते काय आहेत हे लवकरचं समजेल.
रॅपिड फायर….
आवडता अभिनेता – निखिल चव्हाण, अभिजीत खांडकेकर, रितेश देशमुख, ललित प्रभाकर : ललित प्रभाकर
आवडती अभिनेत्री – श्वेता शिंदे, नेहा महाजन, अनिता दाते, शिवानी बावकर : अनिता दाते
लेखन, अभिनय, सूत्रसंचालन : लेखन
चित्रपट, नाटक, मालिका कि रिअलिटी शो : मालिका
सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सोशल मीडिया…फेसबुक, इंस्टाग्राम : इंस्टाग्राम
बहुगुणी अभिनेता तसेच लेखक “तेजपाल वाघ” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या संपूर्ण टीम तर्फे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!