प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित “एबी आणि सीडी” या सिनेमातून “सायली संजीव” लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला..
“काही दिया परदेस” ह्या मालिकेतून घराघरात ओळखली जाणारी “गौरी” म्हणजेच सायली संजीव..
छोट्या पडदा गाजवल्या नंतर लवकरचं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची किमया दाखवायला सज्ज झालेली अभिनेत्री “सायली संजीव” हिच्याशी प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने केलेल्या दिलखुलास गप्पा….
- नाव : सायली संजीव चांदसरकर
- वाढदिवस : ३१ जानेवारी १९९३
- जन्मठिकाण : धुळे
- शिक्षण : Bachelor of Arts (B.A.) in Political Science
“अशोक मामांची मानलेली मुलगी”
सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की, ती एक आपण अफवा म्हणू शकतो, खूप लोकांना असं वाटतं की मी निवेदिता सराफ यांच्या सारखी दिसते तर लोकांना वाटतं मी त्यांचीच मुलगी आहे आणि मी अशोक सराफांच्या वाढदिवसाला सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली होती तर त्यात मी हॅप्पी बिर्थडे पप्पा! असं लिहलेलं. अशोक सराफ मला त्यांची मुलगी मानतात तर मी त्यांची मानलेली मुलगी आहे हे बऱ्याचं लोकांना माहीत नाही.
“मी कधीच ब्रेक घेणार नाही, चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून भेटीला”
आता अनेकांना माहीत नाही मी सध्या काय करतेय. प्रेक्षकांना मी बरेच दिवस दिसले नाही पण मी जेंव्हा मालिका करत होते तेंव्हा फार कमी काम करत होते पण आता मी फार कामात आहे. माझे ५ चित्रपट तयार आहेत ते प्रदर्शित होण्याची मी सुद्धा वाट बघत आहे. एक वेबसिरीज येत्या काही दिवसात येईल. त्या नंतर मी २ ते ३ चित्रपटाचं चित्रीकरण चालू होईल. सध्या मी प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित, मिलिंद लेले दिग्दर्शित “एबी आणि सिडी” हा नवा चित्रपट करतेय. या सगळ्यामुळे लोकांना वाटतंय मी कुठेतरी ब्रेक घेतला आहे तर असं काही नसून मी कधीच ब्रेक घेणार नाही. मला काम करायला आवडतं. मी स्वतः या सगळ्या फिल्म्स कधी प्रदर्शित होणार आहेत यांची वाट बघतेय.
“मला सुट्टी आवडत नाही, आवडीतून घडलेलं करिअर”
मी अगदीच मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेले आहे. माझ्या वडिलांना वाटत होतं मी वकील व्हावं तर हा हट्ट नव्हता पण त्यांची इच्छा होती. आठवी, नववी नंतर माझा एकंदरीत कल हा राजकीय अभ्यासाकडे होता. माझ्या घरात कोणी ही कलाकार किंवा राजकारणी नाही. पण मला ही दोन्ही क्षेत्र मनापासून आवडतात. या सगळ्यात मी एलएलबी साठी ऍडमिशन घेतलं, पण बीए नंतर मी एका नाटकात भाग घेतला तेंव्हा अभिनय ही आवड होती पण करियरच्या दृष्टीकोनातून कधी याकडे पाहिलं नव्हतं. एक एकांकिका केली आणि त्या कामासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले तेंव्हा तिथे परीक्षक म्हणून “प्रवीण तरडे” होते त्यांनी मला सांगितलं “तू स्क्रीन वर छान दिसशील” तर आवड म्हणून हे करावं म्हणून मी या क्षेत्रात आले. ऑडिशन द्यायला लागले, पण पुढे काही होईना मग मग हे नको करायला असं वाटलं. आई बाबांच्या मनात इंडस्ट्री बद्दल काही गैरसमज होते. पण मग मला जाणवायला लागलं की अभिनय करून कामाचं समाधान मिळतंय. त्या काळात बाबांना हृदय विकारांचा झटका आला तेंव्हा एकदमचं दडपण आलं. घरी बाबा एकटे कमावणारे होते. अचानक या गोष्टी घडल्या आणि मग तेंव्हा मी ठरवलं की आपण अभिनय करावा आणि माझ्याकडे योगायोगाने “काहे दिया परदेस” ही मालिका आली. मग मी घरच्यांना वेळ देऊन ही मालिका केली. मालिका संपून अगदीच दोन दिवस आराम केला आणि तिसऱ्या दिवशी मी “मृण्मयी देशपांडे” सोबत चित्रपट करत होते. मला सुट्टी आवडत नाही, तर आज या गोष्टी मला जाणवतात की आपण कामाची ओढ असल्यामुळे इथे आहोत.
“मी स्वतःला उत्तम अभिनेत्री समजत नाही, अनेक दिग्गज आदर्श” मला अनेक लोक प्रेरणा देऊन जातात. त्यामुळे अशी लोकं या इंडस्ट्रीत फार आहेत. खूप लोकांचं काम आवडतं, कामाची पद्धत आवडते. सुबोध भावे हे या इंडस्ट्री मधले पहिले मित्र आहेत. ते मला फार जास्त साथ देतात, सल्ले देतात. ते ज्या पद्धतीने आज काम करतात, त्यांचा उत्साह हा दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याकडे बघून खूप लोकं मोठी झाली आहेत. ते आदर्श आहेत पण माझ्यासाठी सगळंच आहेत. आमचं एक बाप लेकीचं अनोखं नात आहे. किती काम करावं, कसं करावं, कामातली अचूक वेळ साधून कसं उत्तम काम करावं हे त्यांच्याकडून शिकते आहे. मोहन जोशी आहेत जे म्हणतात की आता मी एवढचं काम करणार पण ते त्यांच्या चौपट काम करतात. शुभांगी गोखले आहे जी माझी आई आहे ती खूप लाड करते पण लाडापेक्षा कसं आणि किती काम करावं हे त्यांनी मला “काहे दिया परदेस” मध्ये शिकवलं. अगदी काम करताना उभं कस राहावं इथपासून, हातवारे कसे करावे हे त्यांनी शिकवलं आहे. मी अजून अभिनय शिकते आहे त्यामुळे मी स्वतःला उत्तम अभिनेत्री समजत नाही.
“इंडस्ट्रीत काम करण्याचा चांगला अनुभव”
या इंडस्ट्रीत मला पावलोपावली खूप चांगली लोकं भेटली आहेत. या बाबतीत मी स्वतःला फार नशीबवान समजते की उत्तम लोकांची साथ लाभली. कधीच वाईट अनुभव नाही आले. मला हिंदीत आणि मराठीत दोन्ही कडे सुंदर अनुभव आले आहेत.
“प्रत्येक जण प्रतिस्पर्धी” मी कोणाला प्रतिस्पर्धी नाही मानत. प्रत्येकांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मला जे काम मिळालं ते दुसऱ्या कोणाला मिळेल असं नाही होऊ शकत. स्पर्धा कशाची करावी हा सुद्धा एक प्रश्नच आहे. एकीकडे हल्ली सगळेच प्रतिस्पर्धी आहेत. खूप स्पर्धा वाढली आहे ही डोक्यात एक गोष्ट ठेऊन काम करावं लागतं.
“घरच्यांचा खंबीर पाठींबा”
झी आणि काहे दिया परदेस यांच्या पाठींब्यामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या. आई मालिका बघायची तिला हे आवडायचं पण मग म्हणून आपल्या मुली ने हे काम करावं असं तिला वाटायचं नाही. मग एका मालिकेमुळे त्यांना सुद्धा एक सेक्युरिटी आली. सेटवरच्या सगळ्या लोकांना आई बाबा भेटून गेले. घरच्यांना एका क्षणाला समजलं की आपली मुलगी जे काम करते आहे ते योग्य करतेय.
“फॅन्स च्या प्रेमाचा वर्षाव”
मला रोज I love you चे मेसेज येतात. मी काही नाही करू शकत. माझ्या फेसबूक आणि इंनस्टाग्राम च्या पोस्ट वर नेहमी love you मेसेजस् असतात. हे मला फार आवडतं. माझे फॅन्स सगळे प्रेम करणारे आहेत. ते माझ्या डोक्यात कधीच हवा जाऊ देत नाहीत. नेहमी आपण केलेल्या कामाची पोहचपावती ते या माध्यमातून देत असतात.
“राजकीय आणि अभिनयात साथ देणारा साथीदार हवा”
माझा एवढयात काही लग्नाचा प्लॅन नाही आहे. माझं स्वप्न आहे की मुंबईत स्वतःच घर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही. मुलगा कसा असावा तर प्रत्येक मुलीला छान, देखणा, सुंदर, समजून घेऊन पाठींबा देणारा वगैरे हवा असतो तर नक्कीच या गोष्टी आहेत, पण माझं राजकीय आणि अभिनयातील करियर याला पाठींबा देणारा जोडीदार मला हवा आहे. मला राजकारणात काही तरी करायचंय तर अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळून मला यात साथ देणारा नवरा मला हवाय.
“राजकारण आवडीचं”
मी मनसेची उपाध्यक्ष आहे हे अनेक लोकांना माहीत आहे. मला राजकारणात नक्कीच काही तरी करायला आवडेल. भविष्यात सक्रिय राजकारणात पदार्पण करायला नक्कीच आवडेल कारण या क्षेत्रात येऊन समजासाठी काही तरी काम करून समाजात बदल घडवावे अस मला वाटतं.
“एबी आणि सिडी चा अद्भुत योगायोग”
या चित्रपटात काम करणं आणि यासाठी माझी निवड होणं हे सगळंच एवढं मजेशीर होत. मी नाशिक ला होते आणि मला भयंकर बातम्या बघायची सवय आहे तर तेंव्हा बातम्या बघताना फास्ट न्यूज मध्ये एक हेडलाईन पाहिली की “एबी आणि सिडी” या मराठी चित्रपटात “अमिताभ बच्चन” झळकणार! तेंव्हा मनात एक गोष्ट पटकन येऊन गेली यार असा एखादा चित्रपट करायला मिळायला हवा. त्याचं संध्याकाळी मला फोन आला की २०, २१ , २२ ला फ्री आहात का? तर मी त्यांना फिल्म च नाव विचारलं आणि ती फिल्म “एबी आणि सिडी” होती . मी कुठेतरी मनात एखादी गोष्ट आणली आणि ती सत्यात उतरणार यांचा आनंद झाला. एखादी गोष्ट मनापासून मागितली किंवा विचार केला की ती पूर्ण होतेच. तर हा एक अद्भुत योगायोग आहे माझ्यासाठी या फिल्म मध्ये काम करण्याचा.
“राजकारण ते कलाकारण”
अभिनयाच्या सोबतीने राजकारण, चित्रकला, फिरायला जाणे खूप आवडते. कलात्मक गोष्टी करायला आवडतात. आयुष्यात ड्रीम टूर करण्याची इच्छा आहे.
“कामाची गरज असल्यास बोल्ड सीन करेन”
बोल्ड भूमिका करण्याची व्याख्या फार वेगळी आहे. नक्कीच मला बोल्ड भूमिका साकारायला आवडेल. पण जिथे बोल्ड भूमिका करायची गरज आहे अश्याच ठिकाणी ती मी करेन. उगाचं न्यूड सीन करायला नाही आवडणार. अगदीच जिथे बोल्ड भूमिका करण्याची गरज असेल तिथे काम करेन पण त्याला कारण असेल तरच हे काम करेन.
“गोडसं तितकीच शॉर्ट टेम्पर”
खऱ्या आयुष्यात मी फार मस्तीखोर, आगाऊ, डॅंबिस आहे. मी गोड आहे खरी असं लोक म्हणतात पण मी चटकन राग येणारी आहे. मला खोटं बोललेलं आवडतं नाही. उगाचं गोड गोड नाही बोलता येत, त्यामुळे मला खोट्या गोष्टी नाही आवडत. माझ्या आई बाबांमुळे माझ्यात गोडवा आलेला आहे असं वाटतं.
“कास्टिंग काऊच चा अनुभव”
कास्टिंग काऊच अजूनही चालतचं पण आता गेल्या काही दिवसात याचं प्रमाण कमी झालं आहे. मला वाईट अनुभव नाही आलेत पण दोन अडीच वर्षांपूर्वी मला एका हिंदी फिल्म साठी काम करण्याचा वेळी कास्टिंग काऊच चा अनुभव आला. त्यासाठी मी नकार दिला. मला मराठी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच एवढ्या प्रमाणात होतं असेल असं वाटत नाही. सध्या #MeToo मुळे दोन्ही इंडस्ट्रीत दहशत आहे. आपण कसे आहोत यावर समोरची व्यक्ती आपल्यासोबत वागते. यासाठी कोणा एका व्यक्तीला बोलणं फार चुकीचं आहे.
अश्या पाच गोष्टी ज्या शिवाय तू राहू शकत नाहीस?
टीव्ही, चहा सोबत बातम्या, फोन, पैशाचं पाकीट.
रॅपिड फायर….हे कि ते….
- आवडता अभिनेता : ऋषी सक्सेना, सचिन देशपांडे, ललित प्रभाकर, अशोक सराफ – अशोक सराफ
आवडती अभिनेत्री : शुभांगी गोखले, हृता दुर्गुळे, मृण्मयी देशपांडे – शुभांगी गोखले - मालिका, चित्रपट की जाहिरात ? : मालिका
- आवडत सोशल मीडिया : फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर ? – इंस्टाग्राम
- मुंबई की नाशिक ? : मुंबई
- काहे दिया परदेस की परफेक्ट पती ? – काहे दिया परदेस
प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे “सायली संजीव” ह्या बहुगुणी आणि निरागस सुंदर अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!