“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली उत्तम अभिनेत्री..
युट्युब क्षेत्रात निर्मिती म्हणून काम करणारी युट्युबर आणि गीतकार अशी बहुपैलू ओळख जपणारी अभिनेत्री “अदिती द्रविड”
संपूर्ण नाव : अदिती विनायक द्रविड
वाढदिवस : १ मार्च १९९१
जन्मठिकाण : पुणे
शिक्षण : एमए(MA) भरतनाट्यम्
“कल्पकतेने व्यक्त होण्यासाठी युट्युब”
माझी अभिनयाची सुरुवात ही नृत्यापासून नंतर मग नाटकं, मालिका अशी झाली. युट्युब चॅनेल सुरू करण्यामागे एक गंमत आहे. आपल्याला पटापट गोष्टी करण्याची सवय आहे तर युट्युब चा हा एक फायदा आहे की इथे वेळेचं बंधन नाही त्यामुळे अगदी २ ते ३ मिनिटांचा विडिओ तुम्ही अपलोड करू शकता. फक्त इथे संवादाची गरज असते, विषयाला बंधन नसतं. कल्पकतेने आपल्याला आपले विचार मांडण्यासाठी हे माध्यम बेस्ट आहे म्हणून मी युट्युब चॅनेल सुरू करण्याचा विचार केला आणि यातून “टायनी टॉकीज” ची निर्मिती झाली. मालिका आणि नाटकांतून काम करायला मज्जा येते, पण अजून त्यांच्या सोबतीने स्वतःच्या कला दाखवण्याची ही एक संधी मिळते तर या हेतूने मी आणि माझ्या टीम ने या चॅनेल ची सुरुवात केली.
“बहुपैली कामातून घडले”
पदवी पर्यंत च्या शिक्षणासाठी पुण्यात होते तेंव्हा पाच वर्षे मी लोकांच्या नाटकाच्या तालमी बघायचे पण मनात कुठेतरी इच्छा होती की एकदा हे करून बघायला पाहिजे म्हणून मी नाटकात काम केलं. पदवीच्या शेवटच्या वर्षी मी नाटक केलं तेंव्हा पुण्यात “विनोद करंडक”, ही एक स्पर्धा व्हायची आणि त्यात मी रंगभूमीवर मुख्य भूमिकेत काम केलं आणि त्यात इतकी मज्जा आली की मी तेंव्हा पासून ठरवलं की पुढे आयुष्यात हेच करायचं. त्या नंतर मनात नाटकांविषयी प्रेम वाढत गेलं, नाटकाची प्रक्रिया आणि प्रयोगाला होणारी गर्दी आवडायला लागली हे करायला धम्माल येते म्हणून, मग त्या नंतर “हया गोजिरवाण्या घरात” हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक केलं. मग “माझ्या नावऱ्याची बायको” ही पहिली मालिका केली. पीएनजी ज्वेलर्स साठी जाहिरात केली. “यु अँड मी” हे रसिका सुनील सोबत विडिओ सॉंग टायनी टॉकीज साठी केलं. मी गाणी देखील लिहिते तर झी टॉकीज साठी मी व्यावसायिक कामासाठी गाणी लिहिली तर असा सगळा प्रवास आज पर्यंत चालू आहे.
“विविध डान्स फॉर्म्स अनुभवायला आवडतील”
माझ्या करियर ची सुरुवात ही नृत्यापासून झाली आहे तर नक्कीच मी याकडे करियरच्या दृष्टीकोनातून बघते. या सगळया गोष्टी काही वेगळ्या नाहीत. म्हणजे आपण जेंव्हा नृत्य करतो तेंव्हा आपण संवादा शिवाय आपल्या भावना व्यक्त करत असतो. हा मूक अभिनय असतो, इथे संवाद आले की आपण अभिनय करतो आणि हेच काम लिखाणातून करतो तेंव्हा लेखक होतो. इथलं प्रत्येक माध्यम हे एकमेकांशी निगडित आहे. प्रत्येक कलाकृती मधून व्यक्त होता येतं. म्हणून मला हे काम आवडतं. मला १००% विविध डान्स फॉर्म्स अनुभवायला आणि शिकायला नक्कीच आवडतील. एखादा डान्सचा रियालिटी शो असेल किंवा इव्हेंट्स असतील अश्या प्रत्येक माध्यमातून नृत्याचे विविध प्रकार अनुभवायला आवडतील.
“विषयांना बंधन नाही” – डिजिटल / वेब माध्यम बेस्ट
टेलिव्हिजन वर अजून कुठेतरी मर्यादा आहेत असं मला वाटतं. कारण टीव्ही बघणारा आणि मालिका बघणारा हा वर्ग कुठेतरी कौटुंबिक असतो किंवा सगळ्याच वयोगटातील लोकं मालिका आणि टीव्ही बघतात त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांना काम करताना भान ठेवायला लागतं की आपण काय प्रेक्षकांना दाखवतो आहोत, काय विषय आहे यांचा विचार करून टेलिव्हिजन वर काम होतं. या पुढे जाऊन वेब असेल युट्युब, नेटफलिक्स यावर अनेक विषय हाताळले जातात. हवा तो विषय आपण इथे हाताळू शकतो. समाजकारण, राजकारण ते अगदी प्रेम, रोमॅंटिक विषय, बोल्ड, विनोदी, मनोरंजन असे असंख्य विषय मांडण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. जश्या गोष्टी सुचत जातील तश्या आपण मांडू शकतो.
“अभिनय, नृत्य, लिखाण हि तिन्ही माध्यमं अभिनयातून दाखवते”
अभिनय केला की आपल्याला डान्स सुद्धा करता येतो. त्यात गाणी म्हणता येतात तर अभिनयात या तिन्ही गोष्टी सामावून घेता येतात. अभिनय करताना डान्स आणि गीतकार म्हणून काम करण्याची संधी मिळते तर हेच डान्स मध्ये सुद्धा होतं. तिथे सुद्धा नाचताना आपल्या भावना या हावभावातून दाखवून देता येतात. जी पद असतात त्या वर डान्स करता येतो. आपण ही पद लिहिली असतील तर हे उत्तम प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येतात. म्हणून ही तिन्ही क्षेत्र माझ्यासाठी महत्वाची आहेत.
“म्हणून झिलमिल आहे खास”
आतापर्यंत च्या प्रवासातला “झिलमिल” या गाण्याचा अल्बम हा माझ्या आयुष्यातील फार मस्त अनुभव होता. या निमित्ताने गाणं लिहायला मिळालं. हा अल्बम खास असण्याची काही कारणं आहेत. एकतर बॉलिवूड चे सुप्रसिद्ध गायक “सलीम मर्चंट” यांनी ते गाणं गायलं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मराठी मधलं त्यांचं पहिलं गाणं आणि ते मी लिहिलेलं तर ही गोष्ट माझ्यासाठी फार मोलाची आणि खास आहे. सलीम सरांच्या स्टुडिओत आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं. मी माझ्या आयुष्यातले १० तास त्यांच्या सोबत घालवले हा अनुभव कमालीचा होता. अनेक कल्पक गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली. त्यांना गाण्याचे शब्द आणि गाणं आवडलं त्यांनी त्याचं कौतुक केलं. अजून एक गोष्ट माझ्या जवळचे मित्र साई-पियुष यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. विडिओ पॅलेस चे नानुभाई यांनी झिलमिल ची निर्मिती केली. आवडीच्या लोकांसोबत ही काम करण्याची संधी आणि सलीम सरांच मार्गदर्शन तर यामुळे हा अल्बम अजून जास्त खास झाला.
“बाल कलाकार ते दिग्गज कलाकार काही नं काही शिकवण देऊन जातात”
मी फार नशीबवान आहे की मला सगळेच सहकलाकार फार उत्तम आणि मस्त मिळालेत. नाटकात सुप्रिया पाठारे (ताई) होती. साईनकित कामत होता तो सुद्धा नवीन होता इंडस्ट्रीत. तर सुप्रिया ताईने ने आम्हाला दोघांना मस्त सांभाळून घेतलं. माझ्या नवऱ्याची बायको मध्ये अगदी अरुण नलावडें पासून रसिका सुनील पर्यंत सगळ्या सहकलाकाराकडून अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. एवढ्या दिगग्ज कलाकारांपासून नवख्या कलाकाराने समजून घेऊन कामं केली. कोणताही मतभेद न करता समजून घेऊन शिकवून काम करण्याचा अनुभव घेता आला. सध्या करत असलेल्या आंबेडकरांच्या मालिकेतील छोटा भिमा हे पात्र ज्याने साकारलं त्याच्या कडून अनेक कमालीच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एवढा लहान असून अनेक गोष्टी त्यांच्या कडून शिकण्याजोगं आहेत. मग अभिनयाची शिकवण असेल किंवा आमच्या सोबत १४ तास काम करणं असू देत. मी अमृत कडून अनेक गोष्टी शिकले आहे. चिन्मयी ताई, मिलिंद दादा आमचे दिग्दर्शक किंवा बाकी टीम असेल. अपर्णा पाडगावकर मॅडम अश्या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं.
“विकी कौशल ते विक्रम गोखले” / दिगग्ज लोकांसोबत काम करण्याची इच्छा!
भविष्यात “विकी कौशल” सोबत काम करण्याची संधी मिळावी, सध्या मी त्याच्या खूपचं प्रेमात आहे. मी मोहन जोशीं सोबत काम केलंय तर तो अनुभव खूप मस्त आहे. पण अशी अनेक लोकं आहेत ज्यांच्या सोबत काम करायचं. मराठीत मध्ये रोहिणी हट्टंगडी, विक्रम गोखले अशी अनेक कर्तृत्ववान लोकं आपल्याकडे आहेत ज्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे.
“प्रसिद्धी, व्हायरल आणि यश “
सध्या बघायला गेलं तर ओव्हर नाईट फेम हा खरंतर इंडस्ट्रीची समस्या नसून काम करताना किंवा हल्लीचा पटकन मिळणारा सोशल मीडिया वर मिळणारा संपर्क हा हे यामागचं कारण आहे. व्हायरल, फेमस आणि यशस्वी होणं या तिन्ही गोष्टी एकत्र मिळतात. प्रसिद्धी होणं आणि यातुन फेम मिळणं यात गफलत झाली ना तर नक्कीच समस्या निर्माण होऊ शकतात. एखादी गोष्ट व्हायरल होते म्हणजे ती चांगली असं नाही या उलट एखादी गोष्ट फार कल्पक असते पण ती लोकांपर्यंत पोहचत नाही. लोकं हल्ली वाट्टेल त्या गोष्टी उचलुन धरतात. युट्युब हा फुकट असलेला मंच असल्यामुळे कधी कोणी काही ही टाकू शकतं तर यामुळे कधी कधी समस्या होतात. जे कलाकार खूप जीव ओतून काम करतात त्यांच्यासाठी चुकीची गोष्ट आहे की लोक त्यांची सर्रास पणे खिल्ली उडवतात. मग या गोष्टीच वाईट वाटतं तर अश्या दोन्ही प्रकारच्या चांगल्या वाईट अनुभव आणि प्रतिक्रिया मिळत असतात हा कामाचा एक भाग आहे. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची गरज आहे तिथे कलाकार हक्काने बोलतात आणि सोबत येऊन काम करतात ही चांगली गोष्ट इंडस्ट्रीत घडते.
“पाच गोष्टींशिवाय राहू शकत नाही”
इंन्स्टाग्राम, चिकन लॉलीपॉप, मेकअप, गाणं, मित्र-मैत्रिणी आणि घरच्यांशिवाय मी राहू शकत नाही.
“पुरस्कारापेक्षा मोठी पोचपावती”
खरंतर “ह्या गोजिरवाण्या घरात” हे नाटक जेवढं प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवं होतं तेवढं पोहचू शकलं नाही, पण जेवढं पोहचलं त्याला लोकांनी खूप मस्त प्रतिसाद दिला. त्या नाटकाचा विषय फार सुंदर होता. मी फाईन आर्टिस्ट असते, त्यात माझं स्वप्न असतं की माझं चित्र पॅरिस च्या कालादालनात पोहचावं या दरम्यान माझा अपघात होतो आणि माझी दृष्टी जाते तर मला त्यात अंध व्यक्तीची भूमिका साकारायची होती. या सगळ्यात माझा नवरा आणि सासू कशी मदत करून माझ्यातली कला जागवून ठेवतात तर हे काम करणं फार आव्हानात्मक होतं. आमच्या या नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला अंध शाळेच्या मुली आल्या होत्या नाटक संपल्यावर त्या येऊन मला भेटल्या. त्यांना ते नाटक भावलं, आपलंसं वाटलं आणि त्यांना त्यांच्यातली कलाकार दिसली अशी प्रतिक्रिया मला त्यांनी दिली तर ही पोचपावती माझ्यासाठी कुठल्या ही पुरस्कारा पेक्षा फार महत्वाची आणि जवळची आहे.
“फॅन मोमेंट”
सलीम मर्चंट सरांना भेटले हीच फॅन मोमेंट आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर वरून माझं नाव ट्विट केलं होतं ही गोष्ट माझ्यासाठी खूप भारी होती.
“वेब आणि नव्या गाण्यांसह प्रेक्षकांच्या भेटीला”
सध्या चालू असलेली मालिका आणि लवकरचं एका वेब सिरिज मधून मी सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. मी एक नवीन गाणं सुद्धा लिहितेय.
रॅपिड फायर …हे कि ते
- आवडती अभिनेत्री : रसिका सुनील, अनिता दाते, सुप्रिया पाठारे – रसिका सुनील
- आवडता अभिनेता : अभिजीत खांडकेकर, साईनकेत कामत, निखिल चव्हाण, पुष्कर जोग – अभिजीत खांडकेकर
- नाटक, मालिका, वेब – नाटक
- आवडत सोशल मीडिया : फेसबुक की इंनस्टाग्राम – इंनस्टाग्राम
- कधी ट्रोल झाली आहेस का? : नशिबाने अजून तरी ट्रोल झाले नाही.
- सेटवर एखादी गोष्ट आवडीने करायला आवडते? – सेटवर सतत ब्लॅक कॉफी प्यायला आवडते.
- गाणं की फिरणं? – गाणं
- अभिनय की नृत्य – नृत्य
प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे “अदिती द्रविड” ह्या बहुगुणी अभिनेत्री ला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!