“तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतून घराघरात पोहचलेला सगळ्यांचा आवडता ‘राणा दादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी.
हार्दिक च्या आवडी -निवडीं सोबत काही खास गप्पा जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून….
- संपूर्ण नाव : हार्दिक महेश जोशी
- जन्मठिकाण : मुंबई
- वाढदिवस : १० ऑक्टोबर १९८८
- शिक्षण : शालेय शिक्षण (इंडियन एज्युकेशन सोसायटी) पदवी (गुरुनानक खालसा कॉलेज)
“रंगभूमीवर काम करण्याची इच्छा”
मी कधी नाटकात काम केलं नाही आहे, पण मला प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात काम करायला आवडेल. या आधी अनेक स्पर्धांसाठी एकांकिकेत काम केलंय. आमच्यावेळी कॉलेज हे नाटकांसाठी फार प्राधान्य देत नव्हतं. जास्त मुलं यासाठी पुढाकार घेणारी नव्हती. मी कॉलेज मध्ये मॉडेलिंग केलंय. एक मराठी मुलगा मॉडेलिंग करतो ही गोष्ट त्यावेळी मोठी होती.
“चॅलेंजिंग भूमिका आवडतील”
वेब वर काम करायला आवडेल. मी एक कलाकार आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात कलेशी निगडित अभिनय करायला मला आवडेल. मालिकेत आधी “राणा” होता आता नवीन भूमिका आहे तर अश्या वैविध्यपूर्ण आणि साहसी भूमिका करण्याकडे माझा कल असतो. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते. आधी पेहेलवान होतो तर तेव्हा वजन वाढवलं होत आणि आता नव्या भूमिकेसाठी वजन कमी करावं लागलंय.
“सहज सोप्प आयुष्य जगायला आवडतं” / राणा मुळे ओळख निर्माण झाली.
हार्दिक जोशीला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख मिळाली. समाजात मी या नावाने ओळखला गेलो. “राणा” या पात्रामुळे माझं करियर उभं राहिलं या साठी मी ‘झी मराठी’ आणि सगळ्या टीम चा आभारी आहे, की आज त्यांच्यामुळे मी माझी ओळख निर्माण करू शकलो.आज सगळ्यांच्या पाठींब्यामुळे राणा हे पात्र नावारूपाला आलंय. यात प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आहे, त्यांनी या राणाला आपलंसं केलं. इतर कलाकारांप्रमाणे मी सुद्धा सेलिब्रिटी आयुष्य जगतोय. जेव्हा कधी पॅक उप होतं तेव्हा तिथे सेलेब्रिटी आयुष्य संपून वैयक्तिक आयुष्य मी अनुभवतो. सगळं एकदम नॉर्मल वागणं आणि सेटवर फिरणं या गोष्टी मी करतो. मी नेहमीच “वैयक्तिक आणि व्यावसायिक” आयुष्य वेगळं जगत आलो आहे, मला त्यांची सरमिसळ करून जगायला आवडत नाही. मी स्टार झालो असं मला वाटतं नाही मी फक्त प्रामाणिक पणे आज काम करतो आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. प्रेक्षकांना हार्दिक कडून नक्कीच वेगळं काहीतरी बघायला मिळून त्यांच्या इच्छा पुर्ण होतील. पण मी आहे तसाच राहतो, वागतो. मित्रांसोबत गप्पा गोष्टी असू देत किंवा कट्टयावर गप्पा मारणं, बाईक वर फिरणं यात काहीच बदल नाही झाला. फक्त कधी कधी कलाकाराला त्यांच्या कामासाठी प्रोटोकॉल जपावा लागतो तेवढं जपून मी आयुष्य मस्त जगतो.
“सुट्टीत घरच्यांना वेळ”
“तुझ्यात जीव रंगला” ही अशी पहिली मालिका आहे जी Male Oriented आहे. यामुळे खूप कामाचा व्याप असतो. यामुळे घरच्यांना वेळ देणं एवढं जमत नाही. मी घरच्यांना जमेल तसा वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा कामाच्या गडबडीत त्यांना भेटणं जमत नाही, त्यामुळे मनात एक खंत राहते. पण घरचे समजून घेतात. जेव्हा सुट्टी असते तेव्हा घरच्यांना, मित्रपरिवाराला, आमच्या घरात कुत्रे आहेत तर त्यांना वेळ देतो ते सुद्धा आमच्या कुटुंबातील घटक आहेत.
“साधं राहण्याकडे कल”
अर्थात मला सुद्धा ट्रेंड फॉलो करायला आवडतात. पण मी साधं राहण्याचा प्रयत्न करतो. मूड नुसार मी कपडे घालतो. मला आपला पारंपारिक लुक जास्त आवडतो. मी सणासंभाराला आणि गणपती मध्ये सोवळं नेसतो. आपण आपला पारंपारिकपणा जपला तर पुढची पिढी तो जपून ठेवेल. इव्हेंट्स आणि पार्टी ला मला डिझायनर कपडे घालायला आवडतात, तर यात माझी आई माझ्यासाठी डिजाईन निवडते. तिचं सांगणं असतं असा रहा, हे ट्राय कर तर म्हणून मी फार कपड्यांच्या बाबतीत लक्ष नाही देत. मला ट्रेंड्स फॉलो करून आपली स्टाईल कोणी तरी फॉलो करावी असं देखील वाटतं.
“मी स्टार नाही”
मी स्वतःला स्टार समजत नाही. मला मुळात स्टार हे संकल्पना पटत नाही आणि ती मी माझ्या डोक्यात ठेवत नाही. अगदी टेलिव्हिजन बघणारा प्रेक्षक आणि १०० किमी लांबून मला भेटायला येणारा प्रेक्षक हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मुळात आपण मुंबई सारख्या मेट्रो पॉलिटिकल शहरात वाढलेलो आहोत इथे कोणाला कोणाची पडली नाही आहे. इथे गावात शूट करताना हा फरक जाणवतो. मी आज जो काही आहे तो प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे. मी एक कलाकार आहे आणि सातत्याने मी प्रामाणिक पणे काम करत राहणार आणि लोकांची मन जिंकत राहणार.
“फिटनेस फ्रिक”
मी खूप फिट राहण्याचा प्रयत्न करतो. मला जिम ला जाणं आणि फिट राहणं फार आवडतं. मी सेटवर जाताना जिम च्या कपड्यात जातो आणि शूट संपवून जिम ला जातो मग कितीही वाजले असू देतं. जिम करणं हे माझ्यासाठी सवयीचा एक भाग आहे. गेली ३ वर्ष मी जिम ला जातोय. आपण फिट राहिलो तर जास्त छान दिसू. आज मालिकेच्या निमित्ताने आणि अनेक तरुण हे राणा सारखी बॉडी असावी आणि त्याच्या सारखं फिट राहण्याचा हट्ट करतात आणि फिटनेस जपतात. हे ऐकून आनंद होतो की आपल्याला कोणी तरी फॉलो करून फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
“लाडू सोबत ऑफ स्क्रीन कल्ला”
जेव्हा लाडू (राजवीर) सेटवर आला होता तेव्हा तो राणाचा फॅन होता. तो अगदी लहान आहे तर सगळ्यांचा लाडका आहे. आमची सेटवर मस्त मज्जा मस्ती चालू असते. तो फार गोड मुलगा आहे. त्याला आम्ही विचारतो की तुला बाहेर लोक काय विचारतात तर त्याला लोक राणाचा मुलगा आहेस का असा प्रश्न विचारतात. सेटवर कल्ला चालू असतो त्यामुळे आमच्यातील एक लहान मुलं जाग होतं. आम्ही ऑफ स्क्रीन फार मज्जा करतो, म्हणून ते ऑन स्क्रीन एवढं छान दिसतं.
“सेटवरच कौटुंबिक वातावरण”
नंदिनी वहिनी खऱ्या आयुष्यात बिलकुल त्रास देत नाही. आम्ही सेटवर सगळे एकाकुटूंबा सारखे असतो. धनश्री माझी चांगली सहकलाकार आहे, सोबत काम करताना तिच्याकडे काही गोष्टी शिकायला मिळतात. सेटवर प्रत्येक जण काही न काही शिकवून जातो. जे ऑन स्क्रीन आहे त्याच्या उलट आम्ही सगळेच ऑफ स्क्रीन फार मज्जा करतो.
“खऱ्या आयुष्यातील अंजली बाई कोण?”
अख्या महाराष्ट्राला एकाच झटक्यात समजेल की मी कोणाला डेट करतो आहे. खऱ्या आयुष्यात कोण अंजली बाई आहेत ते सगळ्यांना लवकरच समजेल.
“हटके भूमिका करायला आवडतील”/ वेगळे लुक्स ट्राय करेन”
मी एका वेळी एकच काम करतो पण याच सोबतीने काही ऑफर्स आल्या आहेत. माझ्या आयुष्यात मी समोरच्याला दिलेली कमिटमेंट फार मोठी असते. कामाच्या बाबतीत ती कमिटमेंट गरजेची आहे. सध्या एकाच कामावर लक्ष केंद्रित करून ते काम करतोय. अनेक लोकांना काही नव्या कामासाठी हो सांगितलं आहे ते थांबले आहेत. नशिबात जे काम असेल ते मला मिळेल.
“उत्तम चहा करतो”
मला फार काही बनवता येत नाही पण मी उत्तम चहा करू शकतो. लिंबू सरबत, ताक, तसेच पोळ्या लाटता येतात, वरण भात करता येऊ शकतो.
“लोकं हे पात्र जगतात”
राणा – अंजली जोडी ही हिट ठरलीच पण लोकं मालिका किती बघतात आणि त्यांना आपल्या जीवनाचा एक भाग मानतात हे नुकतंच समजून आलं. जेव्हा मालिकेत राणा मरतो तेव्हा अंजली अश्या विधवा लूक मध्ये असते तर गावातली लोकं तिला येऊन सांगतात की तू काळजी करू नको सगळं नीट होईल. तर हे कुठेतरी फार आश्चर्य करणारं वाटतं. लोकं किती मालिका आपल्या जीवनाचा भाग मानतात त्यांना त्यातली गोष्ट खरी वाटते. लोकं हे पात्र जगतात, जेव्हा मालिकेत मी मेलो तेव्हा माझी आई रडली.
“हक्काने ओरडणारी आई”
आई हक्काने ओरडते. आपल्याला आयुष्यात कोणाची तरी भीती असायला हवी. मी कुठे चुकलो तर ती मला ओरडते.
“स्पोर्ट्स बाईक आवडीची”
स्पोर्ट्स बाईक माझी ड्रीम बाईक आहे. मला कार आणि स्पोर्ट्स बाईक फार आवडतात. आजोबांपासून ते दादा या सगळ्यांकडून मला या बद्दल आवड निर्माण झाली. ड्रीम बाईक असं म्हणाल तर तेव्हा जी चांगली असेल, मला सूट होईल, जी मला आवडेल तर अशी बाईक घेईन. आणि तेव्हा सुद्धा मी आईला आधी विचारेन आणि मग ती बाईक घेईन.
“सोशल प्रपोजल आणि बरंच काही….”
असे कित्येक मजेशीर किस्से घडत असतात. सेटवर मुली येतात गुडघ्या वर बसून गुलाब देऊन जातात हे खूपदा झालंय. सोशल मीडिया वर मेसेज येतात “माझ्याशी लग्न करा, तुमचं लग्न झालंय का? , तुम्ही अंजली बाई शी लग्न करा, तुम्ही आमचे आहात. तर अश्या तऱ्हेचे अनेक धम्माल मेसेज येत असतात. मी हे फार धम्माल म्हणून बघतो.
रॅपिड फायर …हे कि ते
राणा दा की आताच नवा लुक?? – मला हार्दिक जोशीचा लुक आवडतो.
मुंबई की कोल्हापूर – महाराष्ट्र
वडापाव की कोल्हापूर चा तांबडा पांढरा रस्सा – वडापाव
अंजली बाई की वहिनी साहेब – अंजली बाई
अक्षया देवधर की धनश्री काडगावकर – अक्षया देवधर
चित्रपट, रंगभूमी, मालिका – रंगभूमी
कोणता लुक आवडतो वेस्टर्न की पारंपारीक – पारंपारीक
प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे अभिनेता “हार्दिक जोशी” ला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा!