संपूर्ण नाव : राहुल संभाजी मगदूम
जन्मठिकाण : पेठ
वाढदिवस : २१ जानेवारी १९९१
शिक्षण : एमकॉम, बीएड
“मला लय कॉन्फिडान्स हाय” हा संवाद गाजवून प्रत्येक घराघरात पोहचलेला अभिनेता सगळ्यांचा लाडका लागिर झालं जी मधील “राहुल्या” म्हणजे राहुल मगदूम.
खऱ्या आयुष्यातील राहुल ते मालिकेतील राहुल्या हा अनोखा पल्ला गाठून यशाची उंची “राहुल मगदूम” याने गाठली आहे. राहुल मगदूम सोबतच्या काही खास गप्पा प्लॅनेट मराठीच्या स्टार ऑफ द वीक मधून…..
“अनपेक्षित घडलेली पहिली भूमिका”
माझ्या पहिल्या मालिकेला मिळालेली प्रसिद्धी आणि हा एवढा प्रतिसाद हे माझ्यासाठी फार अनपेक्षित होतं. मला वाटलं नव्हतं की मी इथंपर्यँत कधी पोहचेन. मी ग्रामीण भागातून आलो आहे तर मुंबईशी एवढा संपर्क होईल आणि एवढं यश मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्या पहिल्या मालिकेतील भूमिका ही झी मराठी सारख्या वाहिनीसाठी आहे हे अगदीच अनपेक्षित होतं. एवढी मोठी भूमिका मिळणं हे खूप मोठं यश आहे.
“नाटकचं करायचंय”
माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही रंगभूमी पासून झाली आहे. पण गेल्या दोन वर्षात मालिकेमूळे नाटक मागे पडलं म्हणून आता नाटक करायला आवडेल. आता प्रयोगिक नाटकं करायची आहेत.
“BMW ची गंमत”
जयदीप शिंदे या माझ्या मित्राने BMW घेतली आणि त्याने मला पूजनासाठी बोलवलं होतं तर पूजन करून मित्राने ते फोटो सोशल मीडियावर टाकले तर या फोटो मुळे मीच BMW घेतली असं सगळ्यांना वाटलं तर असा हा मजेशीर किस्सा या बाबतीत घडला होता.
“राहुल्याच्या कॉन्फिडान्स ची गोष्ट”
मालिकेत मी दुसरा तिसरा सीन करत असताना मला जाणवलं की राहुल्या ची भूमिका की फार साधी, सरळ आणि फार संथ आहे. हा आरामात, संथपणे वागणारा राहुल्याला फुल कॉन्फिडन्स दिला त्या एका संवादाने. मालिकेत हा संवाद थोडा मी माझ्या भाषेत आणि थोड्या वेगळ्या सुरात बोलायला सुरुवात केली त्या कॉन्फिडन्स ला कॉन्फिडान्स असा उच्चार केला तर हे अचानक सीन करताना सुचलं आणि ते मी कॅमेरा समोर सादर केलं, मग हे वेगळं वाटायला लागलं म्हणून मी अनेक सीन ला हे वाक्य पेरत गेलो. कॉन्फिडान्स या एका शब्दामूळे राहुल्या ची अनोखी ओळख निर्माण झाली. मग आता कधीही लोकं भेटली की हा संवाद म्हणायला लावतात. हे फार मजेशीर आहे त्यामुळे मला आवडतं.
“राहुल्या ने दिली नवी ओळख”
राहुल पासून राहुल्या हा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला. या भूमिकेने नवीन ओळख दिली. राहुल हा फक्त गाव, गल्लीत आणि आमच्या परिसरात माहीत होता पण हा राहुल्या महाराष्ट्रात आणि त्यांच्या बाहेर जाऊन लोकांना समजला. माझ्यासाठी ही भूमिका फार आव्हानात्मक होती आणि ती भूमिका साकारून ती प्रसिद्ध होते तेव्हा एक वेगळं समाधान मिळतं तर माझ्या या भूमिकेमुळे वैयक्तिक आयुष्यात फार फरक पडला आणि ही संधी माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरली.
“हळव्या मनाचा तत्वनिष्ठ राहुल”
खऱ्या आयुष्यात राहुल थोडा हळवा आहे आणि तो फार तत्वनिष्ठ आहे. मी स्वतःला काही नियम घालून घेऊन तत्व पाळून मी वागतो.
“अश्या गोष्टी ज्या शिवाय राहू शकत नाही.
अभिनय, वाचन, पावसात फिरणं, मित्रांना भेटणं, आईच्या हातची अळूची वडी, भरलेली वांगी आणि भाकरी!
“सामाजिक संघर्षाची कहाणी”
“पळशीची पीटी” हा ग्रामीण भागातील चित्रपट आहे. समाजाने घालून दिलेल्या रूढी आणि परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एका हट्टी हवालदाराची भूमिका मी साकारतो आहे.
“मालिकेमुळे घराघरात पोहचलो”
“लागीर झालं जी” या मालिकेनं मला महाराष्ट्रातील घराघरात पोहचवलं. माझी पहिली मालिका ही एवढ्या मोठ्या वाहिनीवर आली त्यामुळे एक वेगळाच आनंद होता. या मालिकेनं खूप चांगले जीवाभावाचे मित्र (भय्यासाहेब, अज्या, विक्या) दिले. सगळ्यात मोठी गोष्ट ही की या मालिकेमुळे मला उत्तमरित्या कॅमेरा समोर काम करता आलं.
“बालनाट्य ते मालिका”
मी सातवी आठवीत असताना गणपतीच्या मंडळात नाटकात भाग घ्यायचो. गणपतीच्या मंचावरून अभिनयाची सुरुवात झाली मग शाळेत असताना बालनाट्य करायचो. कॉलेज मध्ये युथ फेस्टिव्हल, सवाई, पुरुषोत्तम करंडक, राज्यनाट्य अश्या अनेक नामांकित स्पर्धांसाठी नाटकं, एकांकिका करायचो. त्या जिंकून यायचो आणि इथून एक खरी सुरुवात झाली. एक व्यावसायिक नाटक केलं यानंतर माझे गुरू जंगम सरांनी मला “पळशीची पीटी” साठी विचारलं तर हा चित्रपट करतांना तिथे तेजपाल वाघ या चित्रपटाचे संवाद लिहीत होते तर त्यांनी मला लागीर झालं जी या मालिकेत राहुल्या च्या भूमिकेसाठी घेतलं.
“एकांतात वाचन आणि कोकण फिरणं”
मला अभिनया व्यतिरिक्त पावसाळ्यात कोकणात फिरायला खूप आवडतं कोकण हे आवडीचं आहे. फिरण्यासाठी मी तिकडे जातो. एकांतात वाचन करायला आवडतं.
“अभिनेता नसतो तर…”
अभिनेता नसतो तर शिक्षक झालो असतो. मला शाळेत मुलांना शिकवायला आणि त्यांच्या सोबत गप्पा मारून त्यांची नाटकं बसवायला आवडतात. अभिनेता नसतो तर शिक्षक म्हणून जगलो असतो.
“ड्रीम वर्क”
मला भविष्यात नवाजुद्दीन सिद्दकी सोबत काम करायचं हे माझं ड्रीम वर्क असेल.
“चित्रपट आणि नवीन नाटक”
माझा आगामी “पळशीची पीटी” हा चित्रपट येणार आहे आणि वग नाट्य करायचंय. हा वग नाट्य प्रकार आणि यातलं एखाद नाटक मला करायचं.
रॅपिड फायर….हे कि ते !
- खऱ्या आयुष्यातला राहुल की मालिकेतील राहुल्या ? मालिकेतील राहुल्या
- आवडता अभिनेता : निखिल चव्हाण, तेजपाल वाघ, नितिश चव्हाण – निखिल चव्हाण
- आवडती अभिनेत्री : शिवानी बोरकर, किरण धाने – किरण धाने
- मालिका, चित्रपट की नाटक – नाटक
- मुंबई की सातारा : सातारा
- खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करतोस – अजूनतरी नाही
अभिनेता राहुल मगदूम ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!