भारतीय आणि पाश्चात्य संगतीचा सुंदर मिलाफ घडवून आपल्या व्हायोलिन मधून सादर करणारी व्हायोलिनिस्ट “श्रुती भावे”
“इंडिवा” सारख्या बँड मधून आपल्या कामाची जादू संपूर्ण जगाला दाखवून देणारी तरुण वादक, अनेक दर्जेदार कार्यक्रम लिलया पार पाडणारी व्हायोलिनिस्ट “श्रुती भावे” सोबत गप्पा काही खास गप्पा प्लॅनेट मराठीच्या स्टार ऑफ द वीक मध्ये….
- संपूर्ण नाव : श्रुती राजेंद्र भावे
- जन्मठिकाण : नागपूर
- वाढदिवस : २१ ऑक्टोबर
- शिक्षण : एमए संगीत ( MA in Music )
“आईमुळे व्हायोलिनिस्ट झाले” माझं कुटूंब हेच कला या क्षेत्रातलं आहे. आई बाबा संगीतकार आहेत. आई सरिता भावे ही व्होकोलिस्ट आहे आणि बाबा व्हायोलिन वादक आणि सिव्हिल इंजिनियर होते. तर साहजिकचं त्यांच्या माझ्याकडून या क्षेत्रात यावं अशी अपेक्षा होती. माझं शालेय जीवन हे कथक्क शिकण्यात गेलं पण हे काही पुढे पूर्णपणे जोपासता नाही आलं. कॉलेज मध्ये असताना आईला वाटलं की मी व्हायोलिन शिकावं. मी त्यात गाणं गायचे. सुरूवातीला शिकण्यासाठी नकार देऊन मी हे वाद्य जबरदस्तीने हाती घेतलं, मग हळूहळू हे शिकण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या २४ व्या वर्षी मी माझी कला लोकांसमोर सादर केली. माझ्या करियरची सुरुवात थोडी उशिरा झाली. यात आधी शास्त्रीय संगीत, मग सोबतीला नाट्य संगीत आणि मग सारेगमप ला पहिल्यांदा वाजवायला मिळालं. त्यात मध्ये मी रेल्वेत सरकारी नोकरी केली. तिकडून राम राम ठोकून पुन्हा ४ ते ५ महिने मी मग कामाच्या शोधात होते. तेव्हा मधल्या काळात असंच ऑर्केस्ट्रा मध्ये वाजवणं, विविध कार्यक्रमात वाजवणं असं चालू असताना मला हंमसिका अय्यर “इंडिवा” साठी विचारलं. इकडे उभं राहून व्हायोलिन वाजवायचं होतं. हा अनुभव घेत पुढे विविध बँड मध्ये वाजवून मग स्वतःचे काही कार्यक्रम केले आणि असा हा प्रवास चालू आहे.
“आणि गाण्याची संधी मिळाली”
आषाढ घन सुंदरा” हे गाणं ज्यांनी बनवलं आहे आशिष
“व्हायोलिन वाजवणं चॅलेंजिग आहे”
खरंतर हे वाद्य पाश्चात्य देशात आणि दक्षिण भारतात अगदी प्रत्येक मुलगी व्हायोलिन वाजवताना आपल्याला बघायला मिळेल. कारण तिकडच्या प्रत्येक घरात कुठेतरी संगीत आहे. हे तिकडे परंपरागत चालू आहे. त्यांच्याकडे मुलांना हे शिकवलं जातं. आपल्याकडे एखादं गाणं ऐकलं की मग गाणं शिकण्याची किंवा वाद्य शिकण्याची आवड निर्माण होते. पालकांनी त्यांची जवाबदारी म्हणून एखादं वाद्य शिकवलं असं आपल्याकडे नाही आहे. आईमुळे मी हे शिकले माझ्यात ते शिकण्याची आणि पुढे नीट सांभाळून घेऊन काम करण्याची जिद्द होती म्हणून आजवर जे काही काम केलं ते शिकून केलं गेलंय. या क्षेत्रात काम करण्यासाठी शिकण्याची तयारी आणि संयम असावा लागतो. मला एखादं वाद्य वाजवणं हे फार चॅलेंजिंग वाटतं कारण हे आपलं शरीर नाही आहे हे आपल्या शरीराबाहेरचा एक भाग आहे, म्हणून त्यांच्या सोबत नाळ जोडायला वेळ जातो. आता कुठे आपल्याकडे लोकांना त्यांची कला दाखवायला मिळते आहे. आधीच्या लोकांच्या मानसिकतेमुळे या क्षेत्रात फार कमी मुली आल्या आहेत असं मला वाटतं.
“शिकण्याचा पाया भक्कम हवा”
या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्यांना एवढचं सांगेन की पाया खूप मजबूत असला पाहिजे. शास्त्रीय संगीत शिकण्याला काही पर्याय नाही. वेस्टर्न क्लासिकल किंवा इंडियन क्लासिकल शिका हे लक्षात घेऊन या क्षेत्रात यावं. नवीन शिकून त्यातून काहीतरी करण्याची एक तयारी आणि मानसिकता असली पाहिजे. काहींना फक्त शास्त्रीय करायचं असतं तर काहींना फक्त ऑर्केस्ट्रा, बॉलीवूड करायचं असतं, तर जे काही कराल त्याचा पाया भक्कम असू द्यात. आपल्यात संयम असायला हवा.
“कामाच्या अपेक्षा करून पैसे न मिळणं”
इंडस्ट्रीत खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे कधी कधी जे संगीतकार (म्युजिशियन) असतात ते व्हायोलिन हे वाद्य समजतं नाहीत. जर मला एखादं गाणं व्हायोलिन वर वाजवायचं असेल तर त्यांना ते कसं वाजवतात किंवा काय हे माहीत नसतं. तर तेव्हा तुम्ही काहीतरी वाजवा असं सांगतात. दुसरी गोष्ट ही की पैसे दिले जात नाही आणि अपेक्षा फार ठेवणं हे मला खटकत. गृहीत धरून पुढे जाण्याचा प्रकार इंडस्ट्रीत मध्ये फार घडतो.
“आई वडील हे पहिले गुरू”
माझे आई – वडील हे माझे गुरू आहेत. माझे गुरुजी कलारामनाथन ते माझं प्रेरणा स्थान आहेत, कारण व्हायोलिन वरचं त्यांचं वाजवण्याचं परफेक्शन खूप मस्त आहे. इंडस्ट्रीत अशी अनेक लोकं आहेत ज्यांची कामं आवडतात. मला अभिषेकी बुवा चं गाणं फार आवडतं, ए आर रेहमान अशी अनेक लोकं आवडतात. अनेक सिनियर आणि ज्युनिअर आपल्याला कधी कधी अनेक गोष्टी शिकवून जातात.
“इंडिवा मुळे नवं वळण”
माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईन्ट “इंडिवा” बँड होता. ऑल वूमन बँड मध्ये जेव्हा मी गेले तेव्हा माझ्या संगीतासाठी आणि वादनासाठी हा एक अफलातून अनुभव होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वात फार बदल झाले. मी नेहमी सलवार कुर्ती मध्ये वावरायचे मग इकडे येऊन फ्युजन स्टाईल फॉलो करायला मिळाली. स्वतःमधला बदल हा इथे येऊन उमगला आणि हा आयुष्यातला टर्निंग पॉईन्ट ठरला.
“संमिश्र संगीत करायचंय”
मला ओरिजनल म्युझिक करायला आवडेल, फक्त मला ती एक संधी आणि इथे ती एक जागा मिळत नाही आहे. ओरिजनल म्युझिक जे विविध जॉनर मधलं असेल, अल्बम करायला आवडेल, इंडियन क्लासिकल, जॅझ किंवा फोक असेल या सगळ्यांच संमिश्र संगीत मला नक्कीच करायला आवडेल.
“गोष्ट ट्युनिंग ची”
या दोन्ही संगीताचा मिलाफ जमवायला ट्यूनिंग फार महत्त्वाच असतं. दोन्ही संगीतात विशिष्ट ट्युनिंग असतं तर या गोष्टीचा विचार करून ट्युनिंग च भान ठेवून हे जमवून आणलं जात. ट्युनिंग जमली की यांचा मिलाफ घडवून आणला जातो.
“बँड टिकवले गेले पाहिजेत” बँड ही गोष्ट छान आहे. फक्त ती जोपासली जाऊ नये तर बँड टिकवता आले पाहिजेत. बँड हे टिकत नाहीत. कारण बँड म्हंटलं की ओरिजनल म्युझिक आलं मग प्रमोशन आलं तर यासाठी फार खटाटोप करावा लागतो. बॉलिवूड बँड किंवा गाणी याचं प्रमोशन किंवा प्रसिद्धी ही फार पटकन होते. तिकडे फार पैसे गुंतवले गेलेले असतात. फार सुमार गाणं, पैसा आहे म्हणून प्रमोट होतं. त्यामुळे लोकांच्या तोंडी हे गाणं आपसूक बसल जातं. बँड संस्कृतीला उत्साह देणारी गोष्ट हीच की लोकांनी तिला आपलंसं केलं पाहिजे. बँड हे पॅशन वर चालू केले जातात आणि बॉलिवूड बँड हे फार चालतात.
“सकारात्मक अनुभव”
आपण आपलं संगीत हे जवाबदारी ने सादर केलं पाहिजे तर ते जगाला आवडतं. अनुभव चांगला येतो तर आपण दर्जेदार आणि उत्तम रित्या सादर केलं तर ते लोकांना आवडतचं. यामुळे आम्हाला आजवर खूप छान आणि सकारात्मक प्रतिसाद आला आहे.
“कामासाठी कौतुकाची थाप”
मी फार पटकन गोष्टी शिकते आणि त्या आत्मसात करते या बद्दल लोक कौतुक करतात. वाजवण्याचा अनोखा फोकस आणि सुरेल वाजावते म्हणून माझं कौतुक केलं जातं. गाणं येत असल्याने ते व्हायोलिन वर वाजवताना पटकन येत. तोंडात शब्द असतात तर मी शब्द वाजवण्याचा प्रयत्न करते. अश्या पोचपावत्या मिळत असतात लोक कामाचं कौतुक करतात हे जास्त भावत.
“प्रवास आणि वाचन”
मला प्रवास करायला प्रचंड आवडतो. कुठेतरी वर्ल्ड टूर करायला, नव्या जागा भटकायला आवडतात आणि वाचन आवडतं .
रॅपिड फायर हे कि ते….
- वादन की गायन : गायन
- आवडती गायिका : सावनी रवींद्र, बेला शेंडे, प्रियांका बर्वे – प्रियांका बर्वे
- आवडता गायक : अवधूत गुप्ते, महेश काळे, मंगेश बोरगावकर – अवधूत गुप्ते
खाणं, फिरणं की वाचन – फिरणं
देखणी आणि कर्तृत्ववान व्हायोलिनिस्ट “श्रुती भावे” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!