“अस्मिता ते स्वराज्य रक्षक संभाजी” अश्या अनोख्या मालिकांचा पल्ला गाठून रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे.
अभिनयाच्या सोबतीने सामाजिक कामाची जाणीव जपून ‘रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन’ ची स्थापना करणाऱ्या या अभिनेत्रीचा अभिनय ते समाजकारण हा प्रवास उलगडून घेऊ या प्लॅनेट मराठीच्या स्टार ऑफ द वीक मधून…..
संपूर्ण नाव : अश्विनी प्रदिपकुमार महांगडे
जन्मठिकाण : वाई
वाढदिवस : २७ ऑक्टोबर १९९०
शिक्षण : बीकॉम, हॉटेल मॅनेजमेंट
“पसरणी ते मुंबई वारी / आव्हानात्मक राणूअक्का”
पसरणी हे माझं मूळ गाव जिथून माझं शिक्षण झालं. या खेडेगावातून अभिनयाचा प्रवास फार अवघड असतो. गावात काही अभिनयाचे धडे देणारे काही क्लास नव्हते. माझे वडील अभिनय आणि दिग्दर्शन करून वाईत राज्यनाट्य स्पर्धेसाठी काम करायचे. त्यांच्या कडूनचं अभिनयाचे धडे गिरवत गेले. वडिलांच्या मनात कुठेतरी होतं की मी अभिनेत्री व्हावं, आपण काही करू शकलो नाही. आपल्या मुलीने या क्षेत्रात पाऊल टाकावं म्हणून पसरणी मधून नाटक, एकांकिका करत करत इंडस्ट्रीत पोहचले. एका खेडेगावातून सुरू झालेला प्रवास मुंबईत अभिनयासाठी घेऊन आला. मुंबईत आल्यावर मी ऑडिशन देत होते. अस्मिताच्या आधी मला चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे नाटक करण्याची संधी मिळाली. अस्मिता मालिकेतून निवड झाल्याचा फोन आला आणि तेव्हा आनंद ही झाला, पण आपल्याला आता अजून जवाबदारी ने काम करायचं आहे याची जाणीव झाली. अस्मिता पासून सुरु झालेला प्रवास आणि झी सोबत एक अनोखं नातं इथून घडत गेलं. अस्मिता नंतर मला “स्वराज्य रक्षक संभाजी” मधून ऑडिशनसाठी फोन आला पण तो राणूअक्का या व्यक्तीरेखेसाठी नव्हता तर गुप्तहेर लाडी या भूमिकेसाठी विचारणा आली. मग ऑडिशन देऊन दोन दिवसांनी मला समजलं की आपलं या मालिकेत कास्टिंग नाही झालंय. जेव्हा यासाठी कास्टिंग नाही झालं तेव्हा खरंच रडले होते. कारण एवढ्या सुंदर मालिकेसाठी आपल्याला काम करायला मिळणार नव्हतं. पण मला पुन्हा आठ दिवसांनी सेटवरून लुक टेस्ट साठी फोन आला होता आणि क्षणात मी हो म्हणून सांगितलं आणि सेटवर गेल्यावर माझ्या हाती “राणूअक्का” च स्क्रिप्ट आलं. मला या भूमिके विषयी माहीत नव्हतं. मग इथून या भूमिकेसाठीचा अभ्यास सुरू झाला. राणूअक्का या संभाजीच्या मागे उभं राहणार एवढं मोठं पात्र होतं. हे आजवर कुणाला माहीत देखील नव्हतं. कास्टिंग झाल्याचा आनंद खूप होता पण सगळ्याचं गोष्टी नवीन होत्या अगदी कलाकारांपासून ते साडी मध्ये वावरण इथं पर्यंत गोष्टी शिकायला लागल्या. साडीत कसं चालावं किंवा सवय कशी करावी हे मला पल्लवी ताईने शिकवलं. लेखक प्रताप गंगावणे यांनी मला या भूमिकेसाठी फार मदत केली प्रत्येक सहकलाकार हा शिकवतं असतो त्यांच्याकडून गोष्टी शिकत गेले. माझे खूप सीन हे अमोल कोल्हें सोबत होते यामुळे हे फार चॅलेंजिंग होतं. सुरुवातीला मी त्यांच्या सोबत काम करायला घाबरायचे. अमोल दादांचे अनेक सीन हे वन टेक असायचे, त्यामुळे आपल्यावर काम करताना एक वेगळीच जवाबदारी असायची की आपलं पाठांतर चोख असायला हवं. पण हळूहळू त्यांच्या कडून गोष्टी शिकत गेले आणि त्यांनी मला समजून घेऊन काम केलं. प्रत्येक सहकलाकारासोबत त्यांचं वागणं हे कमाल आहे. आता यात रुळत जाऊन काम करते आहे. आता कुठे बाहेर फिरताना लोक सांगतात की तुम्ही आमच्या सुद्धा अक्कासाहेब आहात तर ही कामाची पोचपावती मिळणं फार मोलाची आहे आणि ती या मालिकेमुळे मिळाली यांचा जास्त आनंद आहे.
“बहुपैलू तयारी ने साकारली भूमिका / तलवार बाजी शिकले”
ऐतिहासिक भूमिका करताना अनेक गोष्टीचं भान ठेवून काम करावं लागतं. व्यक्तिरेखेचा आदब जपून ती योग्यरित्या लोकांपर्यंत पोहचवावी लागते. राणूअक्का आजवर कोणी साकारली नसल्यामुळे ती योग्यरित्या सांभाळून घेऊन भूमिका निभावणं फार आव्हानात्मक होतं. मला सेटवर तलवारबाजी शिकवण्यात आली. जेव्हा माझे सीन नसायचे तेव्हा मी कार्तिक सर आणि जोत्याजी ची भूमिका बजावणाऱ्या गणेश दादा यांच्या कडून तलवार बाजीचे धडे घेतले. दिलेरखानाच्या छावणी मधला सीन शूट करत होतो तेव्हा पाच तास तो एक सीन शूट करत असताना तलवारबाजी केली आणि दुसऱ्या दिवशी एवढा हात सुजला की तो बरा व्हायला अनेक दिवस गेले. माझ्या दृष्टीने ही सुद्धा एक प्रकारची तयारी आहे. व्यक्तिरेखा समजून घेऊन साकारणं हे फार महत्वपूर्ण आहे. मला मनाली साकारताना फक्त अभिनय करायचा होता पण राणूअक्का करताना मला अभिनया सोबत तलवारबाजी करायची होती. मला घोडेबाजी शिकण्याची इच्छा आहे आणि नक्कीच आयुष्यात हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ऐतिहासिक पात्र साकारताना नऊवारी सांभाळून ते अनेक गोष्टी सांभाळून अभिनय करण्याची जवाबदारी असते. स्क्रिप्ट मधली वाक्य आणि त्यातले शब्द समजून उमजून घेऊन बोलणं हे देखील एक टास्क आहे. अशी अनेक अंगांनी तयारी करून एखाद पात्र साकारणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
“नाटकाच्या शोधात…” मी नुकताच एक चित्रपट केला, ज्यात माझा रोल खूप मोठा आहे. खूप वेगळी आणि छान स्टारकास्ट आहे. मला नाटकं, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून काम करायला आवडेल आणि त्याचं सोबतीने खास करून वेब सिरीज करायला आवडेल . पण आता मला नाटक करायचंय ते फार जवळचं असं वाटणार माध्यम आहे. मी सध्या नाटकाच्या शोधात आहे.
“वेबसरीज करताना…”
माझी मैत्रीण (भाग्यशाली राऊत) आणि मी आम्हा दोघींना काहीतरी वेगळ अनुभवायचं आणि करायचं होतं. ती लेखिका आहे आणि कॉलेज पासून एक ठरलेलं होतं आपण काही तरी सोबत येऊन करू या. तर हे करण्यासाठी आम्हाला १२ वर्ष गेली. वेब चा बोलबाला होता म्हणून वेबसेरीज करू या हे पटकन डोक्यात आलं. या सगळ्यात शिकायला खूप काही मिळालं. मुलींसाठी काहीतरी करू या मग विषय निवडता निवडता मासिक पाळी हा विषय घेऊन आम्ही “महावारी” या सिरीज मधून तो लोकांसमोर घेऊन आलो. तेव्हा मी सिरीज निर्मिती करून दिग्दर्शन करत होते. हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अनोखा आणि शिकवून जाणारा होता. ज्या मुलींनी आजवर अभिनय नाही केला अश्या काही मुलींनी या निमित्ताने अभिनय केला. खेडेगावात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी टिपण्यासाठी म्हणून ही सिरीज केली. लवकरचं नवा विषय घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर येणार आहोत.
“गावाकडच्या गोष्टी मांडायला आवडतील ” / लवकरचं नवीन वेबसरीज….
असे अनेक विषय आहेत जे लोकांसमोर मांडता येऊ शकतात. आताचं उदाहरण घेऊ शकतो की आपल्याकडे जो महापूर आला. मी साताऱ्याची आहे, ही भीषण परिस्थिती मी पाहिली आहे. अशी परिस्थिती येताना त्यांच्या आधी काहीतरी होतं असेल ना म्हणून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या विषयाला अनुसरून वेबसेरीज करू शकतो. मला खेडेगावातल्या गोष्टी मांडायला आवडतात आणि माझ्या नव्या वेब सिरीजचा विषय लवकरचं सगळ्यांसमोर येणार आहे.
“लोकांची भूक भागवणारं रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन”
रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन सुरू करण्याचा कारण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. मालिका करताना आपण एक माणूस म्हणून घडत असतो आणि आपल्यात आतून बाहेरून अनेक बदल होत असतात म्हणून मालिका करताना माझ्या विचार सारणीत बदल झाला आणि समाजाचं आपण काही तरी देणं असतो ही भावना जागृत झाली. आम्ही सगळ्यांनी सोबत येऊन “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” ची स्थापना केली. प्रतापगडावर जाऊन आम्ही शपथ घेतली की या मार्फत होणारी कामं ही समाजासाठी असतील म्हणून यांची निर्मिती झाली. या प्रतिष्ठाना अंतर्गत पहिला उपक्रम म्हणून या लोकांच्या काही रोजच्या गरजा भागवू म्हणून लोकांना जिथे पोटभर जेवायला मिळेल या संकल्पनेतून रयतेचे स्वराज परिपूर्ण किचन सुरू झालं यांची पहिली शाखा आम्ही मीरा रोड ला सुरू केली. बेघर लोकांना या मार्फत मोफत जेवण पुरवलं जात आणि अगदी ४० रुपयांत लोकांची भूक भागेल म्हणून हा छोटासा प्रयत्न केला होता आणि याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. माणसाच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी हा उपक्रम आहे. हे करण्यात एक वेगळंचं सुख आहे.
“या गोष्टींशिवाय राहू शकत नाही”
मोबाईल, अभिनय, आणि माझं घर या गोष्टींशिवाय मी नाही राहू शकत.
“मानधनाची मोठी तफावत”
मानधना बद्दल जेव्हा निर्माती म्हणून याकडे बघते तेव्हा मराठी आणि हिंदी चॅनेल मध्ये फार तफावत जाणवते. मराठी आणि हिंदीत दोन्ही कडे मानधन वेगळ्या तऱ्हेचे दिलं जातं. एक अभिनेत्री म्हणून मला जिथे योग्य मानधन दिलं जात आणि चांगलं काम माझ्याकडे येतं तिथेच मी काम करते आणि यात मी खुश आहे.
“खूप बोल्ड भूमिका नाही जमणार”
मी स्क्रिप्ट वाचून ठरवेन की ते कितपत मला जमणारं काम आहे. मी स्वतः फार बोल्ड भूमिका नाही करू शकतं हे मला माहित आहे. त्यामुळे खूप बोल्ड भूमिका असेल तर मी ती नाही करणार.
“इंडस्ट्रीत होणारा Groupism, गॉसिप कशाला हवं”
खूप लोकं ग्रुप करून राहतात. अजून एक गोष्ट आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे की लोक तोंडावर छान बोलतात आणि आपल्या मागे फार वाईट बोलतात, मला या गोष्टी फार खटकतात. खोटं वागून लोक इंडस्ट्रीत वावरतात म्हणून हे खटकतं.
“कास्टिंग काऊच भयंकर” मी जेवढं काम केलं तेवढ्यात मला काही असा अनुभव नाही आला. कास्टिंग काऊच हा भयंकर विषय आहे.
“राजकारणात करणार प्रवेश”
विधानसभा तोंडावर असल्या कारणामुळे मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. वडिलांकडून मी अभिनयाचे धडे घेतले तसेच राजकारणाचे धडे सुद्धा त्यांच्याकडून मिळाले. ते चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही. आज राजकारणी माणूस निवडून येऊन पुढे आपल्यासाठी निर्णय घेतात, प्रत्येक व्यक्ती ही या राजकारणाचा भाग असते. आपण मतदान करून यांचा एक भाग होतो म्हणून मी स्वतःला राजकारणाचा भाग मानते. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते की मी भविष्यात नक्कीच राजकारणात प्रवेश करणार आहे.
“काम नसताना अनेक गोष्टी शिका”
इंडस्ट्रीत भेदभाव असा होत नाही पण जेव्हा मी राणूअक्का हे पात्र साकारलं त्यानंतर मला लगेच दुसरी भूमिका मिळणं थोडं आव्हानात्मक असतं. जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून अनेक नव्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं मला वाटतं.
“थँक्स आई आणि मावशी”
अनेकदा कामाच्या गडबडीत आपण आपल्या जवळच्या लोकांना थँक्स बोलत नाही. आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे मला माझ्या आई आणि मावशीला थँक्स बोलायचंय. या दोघींच्या मूळे आज मी इथे आहे. त्यामुळे थँक्स आई आणि मावशी.
रॅपिड फायर..हे कि ते....
- आवडता अभिनेता : अमोल कोल्हे, योगेश सोहोनी, शंतनू मोघे – अमोल कोल्हे
- आवडती अभिनेत्री : मयुरी वाघ , प्राजक्ता गायकवाड , पल्लवी वैद्य , स्नेहलता तावडे – पल्लवी वैद्य
- वाचन, फिरणं की कुकिंग – वाच
- आवडती ड्रेसिंग स्टाईल?
- वेस्टर्न की पारंपारिक – पारंपारिक
सामाजिक भान जपणारी अभिनेत्री “अश्विनी महांगडे” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!