Month: September 2019

सहा जिगरी आणि फंडू दोस्तांची दुनियादारी करत त्यानं अनेकांची मनं जिंकली.

 ‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत सगळ्यांच्या भेटीला आलेला शिस्तप्रिय आणि शांत सुजय, शिकारीमधील वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला. “प्लॅनेट मराठी मॅगझीन” च्या ‘स्टार ऑफ द विक’ च्या माध्यमातून जाणून घेऊयात या दिलखुलास आणि स्पष्टवक्ता असलेल्या अभिनेता “सुव्रत जोशी” विषयी….  

 • संपूर्ण नाव : सुव्रत शेखर जोशी
 • जन्म तारीख आणि ठिकाण : २२ एप्रिल १९८५, पुणे 
 • लग्नाचा वाढदिवस : ११ एप्रिल
 • शिक्षण : फर्ग्युसन कॉलेज, पुणे
 • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) दिल्ली

सुव्रत, अभिनय आणि करीअर…

माझ्या घरी नाटक आणि चित्रपट बघण्याचं वातवरण होत. माझे वडील पत्रकार होते. शिवाय, ते चित्रपटांसाठी लिखाणही करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच मला ते अनेक नाटकं आणि सिनेमा बघायला घेऊन जायचे. म्हणून अगदी माझ्या लहानपणापासूनच या संपूर्ण माध्यमाविषयी खूप आवड आणि कुतूहलही होत. माझ्या या आवडीपोटी शाळेत असल्यापासूनच नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा विविध कॅम्पस थिएटरची परंपरा असलेल्या स्पर्धांच्या निमित्ताने विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये मी सातत्याने काम करायला लागलो. अखेर कॉलेजच्या संपूर्ण पाच वर्षाच्या प्रवासात आपण फक्त आणि फक्त ‘नाटकं’चं केल्याचं लक्षात आलं आणि म्हणून मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मला जेवढा अभिनय करायला आवडतो तेवढं मला इतर काही आवडत नाही. त्यामुळे माझ्या आवडीपोटी मी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. सोबतच, डॉ. श्रीराम लागू यांनी नाट्यक्षेत्रात सर्व्वोत्तम काम करणाऱ्यासाठी ‘तन्वीर सन्मान’ पुरस्काराची सुरुवात केली होती. तो पहिला पुरस्कार डॉ. इब्राहिम अल्का जेजे यांना मिळाला आणि त्यांना बघूनच माझा अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन मिळालं. पुण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीत एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्ष मी दिल्लीत नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात मला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं माझ्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती.         

वेगळ्या भूमिकांच्या शोधात…

‘दिल दोस्ती….’ नंतर मालिकांमध्ये काम करण्याच्या ज्या कमी ऑफर्स आल्या त्या ‘दिल दोस्ती…’मधील माझ्या भुमिकेसारख्याच होत्या. त्यामुळे त्या मालिका आणि तसेच रोल पुन्हा करण्यात मला रस वाटला नाही. माझ्यामते, आपण एकदा केलेलं काम आणि त्यानंतर पुन्हा तसचं काम करणं हे प्रेक्षकांच्या दृष्टीने मलाही कंटाळवाण वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, मालिकांमध्ये काम करायचं असेल तर त्या मालिकेचा लेखक अत्यंत चांगला असणं खूप गरजेचं आहे. वेगळी कथा, वेगळे सिन्स आणि वेगळा अभिनय हा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. मुळात वास्तवाशी जवळीक साधणारा अभिनय आणि कथा असाव्यात असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने फार कमी मालिकांमध्ये असं चित्र पहायला मिळतं. त्यामुळे मला हवी तशी वेगळी मालिका न मिळाल्यामुळे मी ‘दिल दोस्ती…’नंतर कोणतीही मालिका स्वीकारली नाही.

मालिका, वेब, नाटक की चित्रपट

मला नाटक सर्वाधिक आवडतं. नाटकाइतकी सुंदर गोष्ट मनुष्याने आजपर्यंत बनवली नाहीये असं मला मनोमन वाटतं. मला चित्रपट बघायला खूप आवडतात. अर्थात, त्यात काम करणही आवडतं. परंतु त्या माध्यमात मी अजून शिकत आहे आणि अजून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे चित्रपट आणि वेब (लॉंग फॉर्म सिरीज) मध्ये काम करण्याची दाट इच्छा आहे. वेबमुळे लोकांमध्ये नवनवीन पद्धतीचा वेगळा कॉन्टेंट तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. माझ्या संकल्पनेतून पुढे आलेला ‘भारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एक नवा कार्यक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमासाठी मी सहलेखक म्हणूनही काम केलं आहे. वेब हे एक वेगळ आणि मनोरंजक माध्यम आहे त्यामुळे ते काम करताना खूप मजा आली. मला अनेक वर्षात कोणतीही मालिका बघताना फार मजा आली नाही. ‘दिल दोस्ती…’ करताना आम्हाला खूप मजा आली तशी मजा प्रेक्षकांनाही आली असेल. प्रेक्षकांनीही त्याबद्दल आवर्जून सांगावं.

‘शिकारी’चा सुखद धक्का…

महेश मांजरेकर सर आणि विजू माने यांनी माझं ‘अमर फोटो स्टुडिओ’मधील काम पाहिलं होतं.  त्यानंतर मी ‘आषाढ बार’नावाचं प्रायोगिक नाटकं करत होतो. ते बघण्यासाठी विजूसर आले होते आणि तो प्रयोग झाल्यावर त्यांनी मला ‘शिकारी’साठी विचारलं. खरतर, ‘शिकारी’ माझ्याकडे आला त्यावेळी मलाच आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला होता. कारण , तोपर्यंत मी साकारलेल्या सगळ्याचं भूमिका अत्यंत सहृदयी आणि चांगला व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यामुळे विजूसर ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी मात्र खूप आनंद झाला होता. माझ्यापेक्षा ‘शिकारी’मधील माझी भूमिका अत्यंत वेगळी होती. एखादी भूमिका साकारताना त्यात खरेपणा यावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ‘शिकारी’च्या निमित्ताने वेगळ काम प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची संधी मला मिळाली. त्यात कोल्हापूरी ठसका असलेली भाषा मला बोलायची असल्याकारणाने ती भाषा शिकावी लागली. त्यासाठी माझा मित्र रोहित हळदीकर आणि विजूसरांनी मदत केली. मुख्यतः चित्रपटात एखादा बोल्ड सीन करताना तो विभस्त होऊन लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते. त्याबद्दल थोडी भीती होती परंतु विजूसरांनी सगळं छान जमवून आणलं होतं.      

नव्या भूमिका लवकरच….

अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित एका चित्रपटात मी काम केलं आहे. लवकरच तो चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एका नवा कार्यक्रम.शिवाय, ‘शाही पेहरेदार’ नावाचं हिंदी आणि उर्दू भाषेतील नाटकं करतोय. अप्रतिम संहिता असलेल्या या नाटकाचा प्रयोग नक्की बघा. २८ सप्टेंबरला मुंबईतील एनसीपीएलला सायंकाळी ७ वाजता हा प्रयोग आहे. ‘सत्ता आणि हिंसा’, ‘ड्युटी आणि दोस्ती’ यांच्यावर भाष्य करणार हे नाटकं नक्की बघा. त्याव्यतिरिक्त समीर जोशी यांच्या पुढील चित्रपटात काम करतोय. अत्यंत गोड आणि कौटुंबिक गोष्ट असलेल्या या चित्रपटाविषयी तूर्तास काही सांगत नाही.

तिची माझी लव्हस्टोरी….

सखी आणि माझ कसं जमलं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कसं जमलं यापेक्षा कुठल्याही नात्यात आपण प्रामाणिक असणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. कोणतीही घाई न करता एकमेकांना समजून घेऊन निर्णय घेणं फार आवश्यक असतं. सखी आणि मी लग्न करण्याआधीही बराच वेळ घेतला. ‘दिल दोस्तीच्या…’सेटवर आमची पहिली भेट झाली. आमच्यात एकमेकांविषयी आकर्षण होतं. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने आम्ही या नात्याबद्दल फारसे गंभीर नव्हतो. ज्याप्रकारे आम्ही दोघही स्वतंत्र आणि मुक्त विचारांचे आहोत. आमचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याची आम्हा दोघांनाही काळजी आणि इच्छा असते. त्यामुळे सिरिअस कमिटमेंटमध्ये वैगरे नव्हतो. त्यानंतर मात्र आम्ही हळूहळू प्रेमात पडलो. मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होण्याआधीचं आम्ही एकमेकांसोबत होतो. लव्हस्टोरीपेक्षाही आम्हाला समानता हा गुण फार महत्वाचा वाटतो त्यामुळे आमच्या नात्यामध्येही सगळ्याचं गोष्टी समानतेने व्हाव्या यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आयुष्यातील प्रत्येक निर्णयात एकमेकांना खंबीरपाने पाठींबा देण्याची आमची कमिटमेंट आहे आणि तेच आमच्यासाठी खरं प्रेम आहे. शिवाय, ‘माणूस आणि कलाकार म्हणून आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र समृद्ध करणं’, हि आमची प्रेमाची व्याख्या आहे.       

सखी-सुव्रत जोडी पुन्हा एकत्र काम करणार…?

सखी आणि मला एकत्र काम करायला आवडेल. पण तेही संहितेवर अवलंबून आहे. आम्हाला दोघांनाही ती संहिता आवडायला पाहिजे. शिवाय एखाद्या नटाचं वैयक्तिक आयुष्य कुठल्याही ठिकाणी यावं असं वाटतं नाही. मला आणि सखीला आमचं वैयक्तिक आयुष्य जपायला खूप आवडतं. त्यामुळे सखी बरोबर प्रियकर किंवा मित्र अशा भूमिकांपलीकडे काही भूमिका असतील तर आम्हाला एकत्र काम करायला नक्की आवडेल.  

ड्रीम रोलची व्याख्या वेगळी…

माझ्या डोक्यात ड्रीम रोल वैगरे अजून नाही. पण मला नसरुद्दिन शहा, श्रीराम लागू, डॅनिअल डे-लुईस यांच्या सारखं काम करायला नक्की आवडेल. हे नट ज्या ताकतीने आणि पद्धतीने काम करतात त्या पद्धतीच काम मलाही करता यावं हे माझ ड्रीम आहे. कुठलाही रोल मिळाला तरी ते त्याचं ताकतीने कराव असं माझ नेहमी ड्रीम आहे.

बरंच काही खुपतंय…

इंडस्ट्रीमधील काही गोष्टी नक्कीचं खुपतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कार्यनीती (Work Ethics) फार चांगले नाहीत. भारतीय मनोवृतीत असणारा बेशिस्त व्यवहार, मग तो वेळ पाळण्याच्या बाबतीत असो किंवा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत. या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच प्रमाणात विषमताही आहे. नटांना आता सुदैवाने बरे पैसे मिळू लागले आहेत. परंतु, नटांव्यतिरिक्तच्या कलाकारांना (स्पॉटदादा, लाईटमन, बॅकस्टेज) अजूनही न्याय्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे आपला व्यवहार अधिक शिस्तशीर व्हायला हवा आणि या सगळ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे, पत्रकारिता, विशेषतः ‘एंटटेनमेंट मिडिया’ ज्या पद्धतीने इंडस्ट्रीला विविध माध्यमातून सादर करत ते सादर करण्याची पद्धत मला खटकते. मालिकांमधील आयुष्य, आणि सेटवर केलेली मजा याचं गोष्टी दाखवल्यामुळे, फक्त मजा करायला जातात लोक असा एक भ्रम तयार केला जातो. खरंतर, मालिकांच आयुष्य अत्यंत स्ट्रेसफुल असतं, त्यामुळे फक्त गोड-गुलाबी बाजू दाखवण्यापेक्षा त्याची गंभीर बाजुही दाखवणं गरजेच आहे असं मला नक्की वाटतं.         

अभिनेता नसतो तर…

अभिनेता नसतो तर, मला शास्त्रीय गायक व्हायला नक्की आवडलं असतं. शिवाय शास्त्रज्ञ होणं, चित्रकलेची ओढ असल्यामुळे मला पेंटर होणंही आवडलं असतं. खर पाहता मला बरंच काही-काही करून बघायला आवडलं असतं. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्यामुळे कदाचित मी ट्रेकरही बनलो असतो.   

छंद माझे अनेक…

मला स्वयंपाक बनवायला प्रचंड आवडतं. सोबतच, वाचन करणं, चित्र काढणं या गोष्टी खूप आवडतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. तिथल्या सांस्कृतिक गोष्टी, तिथला इतिहास, तिथले प्रश्न, तिथल्या लोकांच्या जगण्याच्या आणि भविष्याविषयीच्या संकल्पना, तत्वज्ञान मला समजून घ्यायला आवडतं.  

सगळ्यात सोपा फिटनेस फंडा…..

‘सातत्य’ हा माझ्या फिटनेसचा मूलमंत्र म्हणता येईल. मला डायटिंग करणं खूप आवडतं. मी विविध पद्धतीचे डाएट ट्राय करत असतो. सध्या ‘लो-कार्ब-हाय-प्रोटीन’ आणि ‘इंटरमिडट फास्टिंग’ करण्याचा प्रयत्न केला, त्याचा फार उत्तम रिझल्टही मिळाला. गेली बरीच वर्ष मी पांढरी साखर खाणं बंद केलं आहे. ‘इट लोकल’ हा नियम मी प्रकर्षाने पाळतो. परदेशातून आणलेल्या महागड्या भाज्या खाण्यात काही पॉइंट नसतो. ज्या भाज्या बाजारात स्वस्त मिळतात त्या खाव्यात. निसर्गाने एखाद्या काळात एखादी भाजी मुबलक प्रमाणात तयार केली आहे, याचा अर्थ आरोग्याच्या दृष्टीने आपण त्या भाज्या खाणं अपेक्षेत आहे. असा ‘निसर्ग सुलभ’ आणि साध्या नियमांना फॉलो करणारा माझा डाएट आणि फिटनेस फंडा आहे.         

रॅपिड फायर 

 •  सखी कोणत्या भूमिकेत तुला जास्त आवडते? बायको की मैत्रीण? सखी मला सगळ्याच भूमिकांमध्ये आवडते आणि सगळ्याचं भूमिकांमध्ये तिच्याबद्दल मला काहीनाही तक्रारी असतात. त्यामुळे एक पर्याय निवडणं कठीण आहे.
 •  पुणे की मुंबई? दोन्ही शहरांनी मला भरभरून दिलंय. शिवाय मी मुंबईपेक्षा जास्त दिल्लीत राहिलो आहे. आता मी लंडनला राहतोय तर हे शहरही मला खूप आवडलंय. त्यामुळे कोणत्याही एका शहराची निवड नाही होऊ शकत.  
 •  होस्टिंग की अभिनय ?अभिनय
 •  सुव्रत चा विक पॉईंट? सखी 
Advertisements

भरनाट्यम विशारद, निरागस तसेच देखणी अभिनेत्री “मधुरा देशपांडे” 
नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी मनमोहक अभिनेत्री “मधुरा देशपांडे” सोबत च्या काही खास गप्पा वाचायला विसरू नका प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” मध्ये… 

 • संपूर्ण नाव : मधुरा पुष्कराज देशपांडे
 • वाढदिवस : २९ मार्च १९९२ 
 • जन्मठिकाण : कराड
 • शिक्षण : बीकॉम 


“रंगभूमी” आहे खास….
     मला सगळ्यात जास्त अभिनय आवडतो. मुळात मी ठरवून या क्षेत्रात आले नव्हते. मी भरतनाट्यम विशारद आहे तर मला यात मास्टर्स करायचं होतं. कॉलेज मध्ये असताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धा यातून अचानक अभिनय या क्षेत्राकडे वळले गेले. नाटक करत असताना अभिनयाची गोडी निर्माण झाली आणि अभिनयात पदार्पण झालं. एक डान्सर आणि अभिनेत्री म्हणून मला “रंगभूमी” फार जवळची आहे म्हणून अभिनय हा कोणत्याही माध्यमातून असला तरी तो आवडतो. 

“मालिका खुप काही शिकवून गेली / परफेक्ट गोष्टींची सुंदर मालिका”  
   पहिल्या मालिकेचा अनुभव हा खूप जास्त कमालीचा होता, कारण कुठेतरी आपल्याला आपल्या घरातून एक विशिष्ट योग्य वेळी हे करून दाखव किंवा कामं मिळवून दाखव ही एक मर्यादा होती. माझ्यासाठी हे काम मिळवणं हे आव्हानं होतं आणि त्यात आई ने एक वर्ष दिलं की या वर्षात काहीतरी काम मिळवून दाखव आणि वर्ष संपता संपता मला “कन्यादान” या मालिकेसाठी मुख्य भूमिका मिळाली. वडील आणि मुलीचं सुंदर नातं, त्यात एका डान्सर ची गोष्ट तर माझ्यासाठी ही मालिका एकदम परफेक्ट होती. मनासारखी कथा असणारी ही मालिका होती. प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार मस्त होते. काम करताना थोडं दडपण होतं कारण सोबत दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे होते आणि ते म्हणजे अभिनयाचं विद्यापीठचं आहेत. आमच्या दोघांचं नातं हे ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन एकदम कमाल होतं. अजूनही मी त्यांना शरद बाबा म्हणून हाक मारते त्यामुळे आमचं नातं खरंच सुंदर आहे. त्यांच्याकडून अभिनयातील बारकावे आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या सोबत काम करताना माझ्यात खूप बदल झाले. आमचं एवढं अफलातून बॉंडिंग आहे. 


“प्रत्येक कलाकारांला कामाचं दडपण यावं कारण….” 
प्रत्येक कलाकारांला काम करताना दडपण हे यायला हवंच असं मला वाटतं. कारण जेंव्हा कुठेतरी कामाचं दडपण असतं तेंव्हा आपण १०० % हुन जास्त उत्तम काम करू शकतो. मी खूप जास्त आनंदी आहे की आजवर जी काही काम केली ती सगळी काम उत्तम होती आणि उत्तम लोकांसोबत करण्याची संधी मला मिळाली. काम करताना कधीच ज्युनिअर आणि सिनियर ची भावना नाही आली. सगळ्या ठिकाणी काम करताना एक कुटूंब आहे आणि त्यात आपण काम करतो ही भावना घेऊन मी आजवर काम केलंय. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण खूप पाठींबा देणारे सहकलाकार मला भेटले आणि म्हणून मी उत्तम काम करू शकले. 

“गॉसिप पासून राहते दूर…” 
खरं सांगायचं झालं तर इंडस्ट्रीत होणाऱ्या गॉसिप मध्ये मी पडत नाही. मला कधीच कुठली अशी गोष्ट इंडस्ट्रीत खटकली नाही. मला काम करताना कधीच काही समस्या आल्या नाहीत किंवा असं काही खटकलं नाही.  


“अभिनयाने दिला आत्मविश्वास”  

मला अभिनेत्री झाल्यावर माझ्यातला आत्मविश्वास वाढला. आधीची मधुरा फार साधी, सरळ वैगरे होती तर अभिनया मुळे माझ्यात आत्मविश्वास वाढला आहे. आवडीचं काम करियर म्हणून करताना एक अनोखं समाधान आहे. 

“ग्लॅमरचं दडपण येतं” 
प्रत्येक कलाकाराला ग्लॅमर ची वेगळीचं क्रेझ असते. मला सुद्धा ग्लॅमर आवडतं पण कधी कधी ग्लॅमरचं दडपण सुद्धा येतं. हे दडपण सकारात्मक आहे की आपल्याला आपले लुक्स जपून आपण एक अभिनेत्री म्हणून घराबाहेर पडत आहोत हे लक्षात ठेवून बाहेरच्या जगात वावरावं लागतं. या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय करते आणि ग्लॅमर अनुभवते. 

“डान्स मध्ये काहीतरी करायचंय” 
मी भटनाट्यम कडे करियर च्या दृष्टीकोनातून पाहिलं होतं. मला भटनाट्यम मध्ये मास्टर्स करायचं होतं पण मी अचानक या क्षेत्राकडे वळले आणि हे काम मला आवडायला लागलं. सध्याच्या कामाच्या व्यापामुळे मला याकडे फारसं लक्ष देता येत नाहीये पण नक्कीच मी डान्स मध्ये काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

“नवीन काम गुलदस्त्यात” 
नवीन प्रोजेक्ट बद्दल सध्या बोलणी चालू आहेत तर नवीन काम गुलदस्त्यातचं आहे त्याबद्दल मी लवकरचं सांगेन. 

“चित्रपटात मुख्य भूमिका साकारायची ” 
मला काम करताना एक गोष्ट जाणवली की मी आजवर मालिका केली, नाटक तसेच चित्रपट केले पण चित्रपट असे मुख्य भूमिकेतुन नाही केले तर माझी अशी इच्छा आहे की लीड रोल असलेला एखादा सुंदर चित्रपट मला करायचा आहे. मी आजवर जे चित्रपट केले तर उत्तम होते पण आता मुख्य भूमिकेत दिसायचं आहे. 

“तरुणाईला जोडणारी वेब सिरीज / वेब सिरीज ची वाट बघतेय”  
नक्कीच मला वेब सिरीज करायची आहे. माझ्याकडे अजून कुठली वेब सिरीज आली नाही आहे. पण मी वेब ची वाट बघतेय. हल्लीची तरुणाई चित्रपटा पेक्षा नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ या प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज बघण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. वेब चे विषय वेगळ्या धाटणीचे असतात तसेचं तरुणांशी कनेक्ट होण्यासाठी मला वेब सिरीज करायची आहे. 


 “फिरणं आणि बरंच काही..” 
अभिनया व्यतिरिक्त मला डान्स आवडतो, प्रचंड फिरायला  आवडतं. फिरण्यासाठी माझी अशी एक सीक्रेट खास बकेट लिस्ट आहे. वाचन करायला मला आवडतं. हल्ली मी वाचायला सुरुवात केली आहे. फावल्या वेळात मला कल्पक गोष्टी करायला आवडतात. मी लवकरचं इन्स्टाग्राम वर एक या संदर्भात पेज चालू करणार आहे. चित्र काढायला, साडी / टी शर्टस् पेंटिंग करायला आवडतात. तर मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी असं काहीतरी करत असते. 


फोन पासून दूर राहते” / इन्स्टाग्राम आवडीचं” 
हल्ली मी फोन कमी वापरण्याचा प्रयत्न करते आहे कारण मधल्या काळात मला फोन वापरण्याचं व्यसन लागलं होतं.  इन्स्टाग्राम हे माझं आवडतं अप्लिकेशन आहे इथे आपण पटापट आपल्या फॅन्स सोबत कनेक्ट होऊ शकतो. 

रॅपिड फायर…हे कि ते…

 • नाटक, चित्रपट की मालिका : चित्रपट 
 • आवडता अभिनेता –  सिद्धार्थ चांदेकर की स्वप्नील जोशी: दोघे सुद्धा 
 • आवडती अभिनेत्री – अमृता खानविलकर की सोनाली कुलकर्णी : दोघी 
 • अभिनय की भरनाट्यम – अभिनय 

निरागस तसेच गुणी अभिनेत्री “मधुरा देशपांडे” हिला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

“देयर यु आर” हा संवाद आठवला की डोळ्यांसमोर उभे राहणारे “भय्यासाहेब” म्हणजेच किरण गायकवाड. 
“लागींर झालं जी” या मालिकेतून त्याने भय्यासाहेब हे पात्र साकारलं आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. किरण गायकवाड अभिनयाच्या सोबतीने उत्तम लिहितो आणि भविष्यात त्याला कोणत्या भूमिका साकारायच्या आहेत आणि कोणत्या दिग्दर्शका सोबत काम करायचंय अश्या काही विशेष गप्पा वाचायला विसरू नका प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या या “स्टार ऑफ द वीक मधून” …

 • संपूर्ण नाव : किरण बाबुराव गायकवाड
 • जन्मठिकाण : पुणे 
 • वाढदिवस : १२ जून १९९०
 • शिक्षण : एमकॉम 

“वेगळ्या धाटणीची भूमिका करतोय”
    भय्यासाहेब हे पात्र खलनायक (नकारात्मक) होतं. या भूमिकेत विविध छटा लपलेल्या होत्या. आता मी असं काही तरी करतो आहे जी नकारात्मक भूमिका नसून वेगळ्या धाटणीची भूमिका आहे. जेवढं प्रेम प्रेक्षकांनी भय्यासाहेब या भूमिकेला दिलंय तेवढंच प्रेम नवीन भूमिकेला सुद्धा देतील अशी आशा आहे. 

“वेबची दुनिया अनुभवायची” 
“खासरे” या युट्युब चॅनेल साठी आम्ही दोघांनी (मी आणि निखिल चव्हाण) याने एक व्हिडिओ केला होता तर हा अनुभव कमालीचा होता. वेब सिरीज हे माध्यम मला अजून जवळीने बघायचं आहे. मी वेब चा खूप मोठा फॅन आहे आपल्याकडे येणारा वेब चा कन्टेन्ट खूप जास्त चांगला आहे. अश्या कामाच्या शोधात मी आहे. आपल्याला मिळालेला “वेब” हा भन्नाट प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. 

“प्रेक्षकांनी खूप सारं प्रेम दिलं” 
    भय्यासाहेब या भूमिकेने मला प्रेक्षकांच खूप सार प्रेम दिलं. एखाद्या नकारात्मक भूमिकेला लोकं एवढं डोक्यावर घेतील असं वाटलं नाही. त्यांनी ती भूमिका आपलीशी करून घेतली. सकारात्मक भूमिकांना मिळणारी प्रसिद्धी या पेक्षा नकारात्मक भूमिकांना लोकांचं मिळणार तेवढंच प्रेम बघून आनंद मिळतो आणि आपल्या कामाची पोचपावती मिळते. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की भय्यासाहेब सारख्या भूमिकेला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं.

  “लवकरचं नवीन भूमिका साकारणार” / नवीन भूमिका गुलदस्त्यातच”
    मी लवकरचं काहीतरी वेगळं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे पण योग्य वेळ आली की मी ते प्रेक्षकांना सांगेन त्यामुळे नवीन काय असणार हे थोडं गुलदस्त्यात आहे.

“अनुराग कश्यप सोबत काम करायचंय” 
  मला सगळ्यांसोबत काम करायचंय कारण प्रत्येक कलाकारांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं. पण मला अनुराग कश्यप सोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या सोबतीने एकदा काम करावं हे स्वप्न आहे. त्याचं कारण असं की मी त्यांच्या कामाचे अनेक किस्से माझ्या सह कलाकार मित्रांकडून ऐकले आहेत. तो माणूस म्हणून कमाल आहे तर अश्या व्यक्ती सोबत काम करायला नक्कीच आवडेल. 

“देयर यु आर हे टोपण नाव” 
  “देयर यू आर” या संवादा मागे अनेक किस्से आहेत. कधीकधी गर्दीतुन चालताना लोकं माझ्या खऱ्या नावापेक्षा “देयर यु आर” या नावाने जास्त ओळखतात. माझ्यासाठी हे टोपण नावचं आहे.

“आव्हानात्मक खलनायक” 
  खलनायक साकारणं सोप्प काम नाही आहे. कारण आपलं मन हे सकारात्मक असतं आणि यात तुमच्या मनाला न पटणारं असं काम करायचंय तर खलनायक साकारताना ही मानसिक तयारी करावी लागते. मालिकेतली भय्यासाहेब ची भूमिका फार नकारात्मक होती तो आर्मी ला पाठींबा न देणारा होता, आर्मीच्या विरुद्ध बोलणारा, आई शी नीट न वागणारा असा होता  तर या गोष्टी आधी मनाला पटायच्या नाहीत. खलनायक साकारताना पहिल्यांदा ज्या गोष्टी पटत नाहीत त्या शांतपणे मनाला पटवून द्याव्या लागतात. मग लोकांना ही भूमिका कोणत्या तऱ्हेनं आवडू शकते यांसाठी त्या भूमिकेतील वेगळ्या छटा शोधू लागलो. तेजपाल वाघ यांचा फार पाठींबा होता ही भूमिका करताना. त्याने मला भूमिकेसाठी विविध छटा शोधून काम करायला सांगितलं. प्रेमळ, विक्षिप्त, राजकारणी, एकतर्फी प्रेमात बुडालेला अश्या विविध अंगी भूमिका एका रोल साठी करायच्या होत्या म्हणून त्या पात्रातील छटा शोधून काम करायचो आणि भय्यासाहेब सकारायचो. 

“प्रत्येक भूमिका मोलाची” 
  भूमिकेत कुठलंही उजवं – डाव करायला मला आवडतं नाही. मग ती भूमिका अगदी दोन मिनिटांची असू देत किंवा खूप मोठी असू देत काम हे काम असतं आणि मी प्रत्येक काम उठावदार पणे मी करेन याची मला शाश्वती असते. मी कुठलंही काम फार प्रामाणिक पणे करतो त्यामुळे मी भूमिकेत डाव-उजवं असं कधीच करत नाही.


“कविता आणि बरंच काही….” 
संगीत, लिखाण, कविता, चित्रपट आणि नाटक बघणं या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही.

“विरुद्ध भूमिका साकारणारा किरण”  
खऱ्या आयुष्यातला किरण आणि मालिकेतून लोकांच्या भेटीला आलेला किरण या दोन्ही फार विरुद्ध भूमिका आहेत. मी फार हळवा आणि संवेदनशील आहे तसा भय्यासाहेब नव्हता तो एकदम तापट आणि सतत काही न काही कुरघोड्या करणारा होता. 
“महेश मांजरेकरासोबत काम करायचंय” / अभिनया व्यतिरिक्त लिखाण” 
लोकांच्या दृष्टीकोनातून मी बरा लिहितो असं लोकांचं म्हणणं आहे. मी आजवर काही स्क्रिप्ट आणि शॉर्ट फिल्म लिहून त्या दिग्दर्शित केल्या आहेत तर अभिनया व्यतिरिक्त मी लिखाण करू शकतो आणि दिग्दर्शन करू शकतो. मला इथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो की मी आणि माझा एक मित्र महेश मांजरेकरांकडे एक स्क्रिप्ट घेऊन गेलो जी फिल्म आम्हाला दिग्दर्शित करायची होती. तेव्हा ते नटसम्राटचं दिग्दर्शन करत होते. आम्ही दबकत पाऊल टाकत सरांकडे गेलो सरांना स्क्रिप्ट ऐकवायला सुरुवात केली त्यांना माझा उडालेला गोंधळ समजला आणि त्यांनी स्वतः स्क्रिप्ट वाचली ती वाचून झाल्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला तर तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं त्या दिवशी रात्री तीन वाजता मी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते फिल्म करायला तयार झाले पण काही कारणामुळे ती फिल्म काही झाली नाही म्हणून मला महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याचं स्वप्न आहे. 

रॅपिड फायर…हे कि ते..

 • शिवानी बावकर की मुक्ता बर्वे – शिवानी बावकर 
 • नितेश चव्हाण की निखिल चव्हाण – निखिल चव्हाण 
 • आवडतं पुस्तक : दुनियादारी 
 • अभिनय की दिग्दर्शक – अभिनय 

किरण गायकवाड ह्या हरहुन्नरी कलाकाराला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

“लागींर झालं जी” या मालिकेतून शितली ने सगळ्यांची मनं जिंकून घेऊन “अलटी पलटी” या नवीन मालिकेतून आपल्या भेटीला आलेली “गरिबांची रॉबिनहूड”  शिवानी बावकर हिच्या अभिनयाच्या हटके प्रवासाबद्दल जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून…..
शिवानी बावकर हिला अभिनयाच्या सोबतीने जर्मन शिकण्याची आवड असून लवकरचं जर्मन थिएटर करण्याची इच्छा तिने व्यक्ती केली आहे.

 • संपूर्ण नाव : शिवानी नितीन बावकर 
 • जन्मठिकाण : मुंबई 
 • वाढदिवस : ११ मार्च 
 • शिक्षण :  बीकॉम, एमकॉम

भूमिकेसाठी सोडली नोकरी” 
     अभिनयाची गोडी आधीपासूनचं होती. घरातून मला अभिनयासाठी नेहमीच पाठींबा होता पण अभिनयासोबत कुठेही शिक्षण मागे सोडू नकोस असं घरच्यांनी सांगितलं आणि प्लॅन बी नेहमी सोबत असावा म्हणून कॉलेज पूर्ण केलं. रुपारेल मध्ये असताना कॉलेज मधल्या एका एकांकिकेत मला छोटासा रोल मिळाला अगदी एकचं वाक्य होतं पण ते मिळाल्याचा आनंद खूप जास्त होता. प्रत्येक प्रयोगाला मी जायचे. नंतर शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला. मास्टर्स करत असताना ऑडिशन देत होते. हिंदी जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या. मग यातून ऑडिशन कशी असते यांची एक कल्पना आली. स्वतःचा पोर्टफोलिओ सुद्धा बनवला मग फक्त ऑडिशन च्या भरवश्यावर न राहता सोबतीने जॉब करू या असं ठरवलं. मास्टर्स आणि जर्मन शिकत असताना सहजपणे मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. नोकरी करतानाचं मी ‘उंडगा’ हा चित्रपट केला. नोकरी सांभाळुन अभिनय चालू होता. माझ्या एका मित्राने माझे फोटो कुठेतरी पाठवले आणि त्यातून मला “लागींर झालं जी” साठी फोन आला. नोकरी मुळे साताऱ्याला ऑडिशन द्यायला जायला जमलं नाही मग फोन वरून ऑडिशन दिली आणि मग मालिकेचे लेखक तेजपाल वाघ यांनी सांगितलं की त्यांना माझं काम आवडलंय. मला त्यांनी सांगितलं की तुला आताच्या आता नोकरी सोडावी लागेल आणि इकडे यावं लागेल. त्या घाईत नोकरी सोडली खूप समस्या आल्या पण घरच्यांनी पाठींबा दिला. नवीन भूमिका स्विकारण्यासाठी घरच्यांचा भक्कम पाठींबा होता ते सोबत होते म्हणून इथवर पोहोचले. इथून नवीन प्रवास सुरु झाला. साताऱ्याला गेल्यावर समजलं की आपल्याला एक महिना इथेच राहायचंय. शीतल च्या भूमिकेसाठी साताऱ्याची मूळ भाषा शिकण्याची सुरुवात झाली. जसं जर्मन शिकताना तयारी केली तेवढ्याच तयारीने नवीन भाषा शिकायला सुरुवात झाली. मूळ भाषेवर जम बसवण्यासाठी ती शिकण्याची अनोखी पद्धत वापरत गेले. वही पेन घेऊन तासभर मार्केट मध्ये जाऊन तिथल्या लोकांची भाषा ऐकायचे. असं करता करता ती भाषा अवगत होत गेली. सुरुवातीला तिथली लोकं काय बोलायचे हे समजायचं नाही, मग थोडं टेन्शन यायचं की ही भाषा आपल्याला समजतं नाही आणि त्या भाषेतच आपल्याला भूमिका साकारायची आहे हे दडपण होतं. ही भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं आणि हे जमत गेलं आणि पुढे मी फार एन्जॉय केलं. मालिका सुरू झाल्यावर हे वेगळंच जग माझ्यासमोर उभं राहिलं. 

आपल्या गुणांना योग्य वाव देणारी भाषा” 
    एक गोष्ट असते की आपल्याला भूमिका सोडून भाषा बोलायची नसते हे पक्कं करून ती भूमिका करायची असते. मी आता पल्लवी साकारतेय आणि आधी शीतल ची भूमिका करायचे तर या दोघी फार डॅशिंग आहेत. मी एवढी डॅशिंग नाही पण आपल्यात कुठेतरी ते गुण असतात, त्या गुणांना योग्य तऱ्हेनं वाव दिला तर आपण उत्तम पध्दतीने ते साकारू शकतो आणि आपल्याला ते जमतचं. 

“लोकांच्या प्रेमामुळे दुसरी मालिका मिळाली” 
     खरं सांगायचं झालं तर लागींर झालं संपून एक महिना नाही झाला आणि मला नवीन मालिका मिळाली. घरी येऊन कुठेतरी घरी सेट होत असताना मी शूटिंग आणि बाकी गोष्टी मिस करायचे. इन्स्टाग्राम वर मी एक शेवटची पोस्ट टाकली होती माझा आणि नितीश चा फोटो होता आणि त्यावर लोकांच्या एवढ्या कंमेंट्स होत्या की त्या वाचताना मला खूप भरून आलं होतं. लोकांच्या प्रेमामुळे मला ही नवीन मालिका मिळाली असं मी म्हणेन. दुसरी मालिका आणि ती सुद्धा झी मराठीवरचं!!

“बायोपिक करायचा आहे” 
       मला बायोपिक करायला खूप आवडेल. कारण मला एखाद्या भूमिकेचा अभ्यास करून ती साकारायला आवडते. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी आधी फुटबॉल खेळायचे, भाषा शिकण्याची अनोखी आवड आहे, देश फिरायला आवडतात त्यामुळे सगळ्यांमधलं सगळं शिकण्याची ओढ आहे. मला बायोपिक्स साठी कुठल्याही स्पोर्ट्स पर्सन (खेळाडू व्यक्तिमत्त्व) साकारायला आवडेल किंवा अशी एखादी महिला जिने आपल्या देशाचं नाव मोठ्ठ् केलंय अशी भूमिका साकारायला नक्कीचं आवडेल. 

“शाहरुख सोबत काम करायचंय”
    मला लहान असल्यापासून शाहरुख खान फार आवडतो. तो माझं प्रेम आहे, क्रश आहे तर भविष्यात शाहरुख खान सोबत काम करण्याचं स्वप्न आहे.

“नाटक करण्याची इच्छा” 
    मला नाटक करण्याची फार इच्छा आहे. लागींर नंतर नाटक करावं असा माझा विचार सुद्धा होता पण लगेच मालिका मिळाल्या मुळे नाटक जमलं नाही. पण मला माझ्या आधीच्या ड्रामा ग्रुप सोबत किंवा नवीन लोकांसोबत काहीतरी हटके आणि वेगळ्या विषयावर नाटक करायचंय. 

“गरिबांची रॉबिनहूड” 
    मला लोकं असं कुठेच सांगत नाहीत की शितली सारखी भूमिका आहे. मला प्रेक्षकांनी नवीन भूमिकेत देखील तितक्याच आपुलकीने स्वीकारलं आहे. पल्लवी  सुद्धा त्यांना आवडते आहे. लुक्स वर एखादी भूमिका अवलंबून असते तर लोकांना माझा नवीन लुक देखील आवडला. हल्ली  ड्रेसिंग, स्टायलिंग यावर लोकं कंमेंट्स करतात. गरिबांची रॉबिनहूड अशी प्रतिक्रिया मला प्रेक्षकांकडून मिळते.

“भाषेचं अनोखं आव्हानं” 
     लागींर च्या वेळी भाषा शिकताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. भाषा अवगत होण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. भाषेच्या विविध पायऱ्या शिकत ती बोलली जाते. 
“जर्मन थिएटर करायचंय” 
    मी ज्या इन्स्टिट्युशन मधून जर्मन शिकले आहे तिथे परफोर्मिंग आर्टस् आणि थिएटर आहे तर तिकडे अनेक इव्हेंट्स होत असतात म्हणून मला एकदा जर्मन थिएटर करायचंयं.

“हिंदीत काम करायला आवडेल / उत्तम स्क्रिप्ट असल्यास हिंदीत काम करेन” 

    मला हिंदीत सुद्धा काम करण्याची संधी आली तर नक्कीच मी हिंदी इंडस्ट्रीत काम करेन. जेवढं मला मराठी उत्तम जमतं तेवढ्याच सहजतेने मी हिंदी बोलू शकते. मी कॉन्व्हेंट शाळेत होते तर आजूबाजूला सगळी कॉस्मो लोकं होती. तिकडे फार मराठी बोललं जायचं नाही. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत अगदी सहजतेनं काम करू शकते. मला भाषा शिकण्याची आवड असल्याने ती पटकन अवगत होते. म्हणून उत्तम स्क्रिप्ट आलं तर कुठल्याही भाषेत मी काम करू शकते. 

“बोल्ड भूमिकेसाठी मनाची तयारी” / सध्या बोल्डनेस भूमिका नको” 
    मला नाही वाटत मी बोल्डनेस भूमिका साकारेन. कारण जरी भूमिका बोल्ड असली तर ती आपण एक भूमिका म्हणून त्याकडे बघून ती साकारतो. मला असं वाटतं नाही की मी सध्या बोल्ड भूमिकेसाठी तयार आहे. यासाठी मला मानसिक तयारी करावी लागेल.


     रॅपिड फायर….हे की ते….
चित्रपट, वेब की मालिका : चित्रपट आणि मालिका दोन्ही. कारण काम काम असतं. 
अलटी पलटी की लागींर झालं जी – लागींर झालं जी. 
शीतली की पल्लवी – पल्लवी 
आवडता अभिनेता : निखिल चव्हाण, राहुल मगदूम, नितीश चव्हाण – निखिल चव्हाण आणि नितीश सोबत केमिस्ट्री सीन करायला आवडतात. 
आवडती अभिनेत्री : लक्ष्मी विभुते, अनिता दाते, किरण धाने – लक्ष्मी विभुते 
जर्मन की मराठी : मराठी! कारण गोडवा आहे या भाषेत.
सगळ्यात जास्त कोणतं सोशल मीडिया फॉलो करतेस? : इन्स्टाग्राम

आवडता लुक / आऊट फिट : वेस्टर्न की पारंपरिक – वेस्टर्न 

स्टाईल आयकॉन – आलिया भट 

शिवानी बावकर ह्या गुणी अभिनेत्री ला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्लॅनेट मराठी कडून खूप शुभेच्छा!!