सहा जिगरी आणि फंडू दोस्तांची दुनियादारी करत त्यानं अनेकांची मनं जिंकली.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत सगळ्यांच्या भेटीला आलेला शिस्तप्रिय आणि शांत सुजय, शिकारीमधील वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला. “प्लॅनेट मराठी मॅगझीन” च्या ‘स्टार ऑफ द विक’ च्या माध्यमातून जाणून घेऊयात या दिलखुलास आणि स्पष्टवक्ता असलेल्या अभिनेता “सुव्रत जोशी” विषयी….
- संपूर्ण नाव : सुव्रत शेखर जोशी
- जन्म तारीख आणि ठिकाण : २२ एप्रिल १९८५, पुणे
- लग्नाचा वाढदिवस : ११ एप्रिल
- शिक्षण : फर्ग्युसन कॉलेज, पुणे
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) दिल्ली
सुव्रत, अभिनय आणि करीअर…
माझ्या घरी नाटक आणि चित्रपट बघण्याचं वातवरण होत. माझे वडील पत्रकार होते. शिवाय, ते चित्रपटांसाठी लिखाणही करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच मला ते अनेक नाटकं आणि सिनेमा बघायला घेऊन जायचे. म्हणून अगदी माझ्या लहानपणापासूनच या संपूर्ण माध्यमाविषयी खूप आवड आणि कुतूहलही होत. माझ्या या आवडीपोटी शाळेत असल्यापासूनच नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा विविध कॅम्पस थिएटरची परंपरा असलेल्या स्पर्धांच्या निमित्ताने विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये मी सातत्याने काम करायला लागलो. अखेर कॉलेजच्या संपूर्ण पाच वर्षाच्या प्रवासात आपण फक्त आणि फक्त ‘नाटकं’चं केल्याचं लक्षात आलं आणि म्हणून मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मला जेवढा अभिनय करायला आवडतो तेवढं मला इतर काही आवडत नाही. त्यामुळे माझ्या आवडीपोटी मी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. सोबतच, डॉ. श्रीराम लागू यांनी नाट्यक्षेत्रात सर्व्वोत्तम काम करणाऱ्यासाठी ‘तन्वीर सन्मान’ पुरस्काराची सुरुवात केली होती. तो पहिला पुरस्कार डॉ. इब्राहिम अल्का जेजे यांना मिळाला आणि त्यांना बघूनच माझा अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन मिळालं. पुण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीत एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्ष मी दिल्लीत नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात मला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं माझ्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती.
वेगळ्या भूमिकांच्या शोधात…
‘दिल दोस्ती….’ नंतर मालिकांमध्ये काम करण्याच्या ज्या कमी ऑफर्स आल्या त्या ‘दिल दोस्ती…’मधील माझ्या भुमिकेसारख्याच होत्या. त्यामुळे त्या मालिका आणि तसेच रोल पुन्हा करण्यात मला रस वाटला नाही. माझ्यामते, आपण एकदा केलेलं काम आणि त्यानंतर पुन्हा तसचं काम करणं हे प्रेक्षकांच्या दृष्टीने मलाही कंटाळवाण वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, मालिकांमध्ये काम करायचं असेल तर त्या मालिकेचा लेखक अत्यंत चांगला असणं खूप गरजेचं आहे. वेगळी कथा, वेगळे सिन्स आणि वेगळा अभिनय हा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. मुळात वास्तवाशी जवळीक साधणारा अभिनय आणि कथा असाव्यात असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने फार कमी मालिकांमध्ये असं चित्र पहायला मिळतं. त्यामुळे मला हवी तशी वेगळी मालिका न मिळाल्यामुळे मी ‘दिल दोस्ती…’नंतर कोणतीही मालिका स्वीकारली नाही.
मालिका, वेब, नाटक की चित्रपट
मला नाटक सर्वाधिक आवडतं. नाटकाइतकी सुंदर गोष्ट मनुष्याने आजपर्यंत बनवली नाहीये असं मला मनोमन वाटतं. मला चित्रपट बघायला खूप आवडतात. अर्थात, त्यात काम करणही आवडतं. परंतु त्या माध्यमात मी अजून शिकत आहे आणि अजून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे चित्रपट आणि वेब (लॉंग फॉर्म सिरीज) मध्ये काम करण्याची दाट इच्छा आहे. वेबमुळे लोकांमध्ये नवनवीन पद्धतीचा वेगळा कॉन्टेंट तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. माझ्या संकल्पनेतून पुढे आलेला ‘भारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एक नवा कार्यक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमासाठी मी सहलेखक म्हणूनही काम केलं आहे. वेब हे एक वेगळ आणि मनोरंजक माध्यम आहे त्यामुळे ते काम करताना खूप मजा आली. मला अनेक वर्षात कोणतीही मालिका बघताना फार मजा आली नाही. ‘दिल दोस्ती…’ करताना आम्हाला खूप मजा आली तशी मजा प्रेक्षकांनाही आली असेल. प्रेक्षकांनीही त्याबद्दल आवर्जून सांगावं.
‘शिकारी’चा सुखद धक्का…
महेश मांजरेकर सर आणि विजू माने यांनी माझं ‘अमर फोटो स्टुडिओ’मधील काम पाहिलं होतं. त्यानंतर मी ‘आषाढ बार’नावाचं प्रायोगिक नाटकं करत होतो. ते बघण्यासाठी विजूसर आले होते आणि तो प्रयोग झाल्यावर त्यांनी मला ‘शिकारी’साठी विचारलं. खरतर, ‘शिकारी’ माझ्याकडे आला त्यावेळी मलाच आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला होता. कारण , तोपर्यंत मी साकारलेल्या सगळ्याचं भूमिका अत्यंत सहृदयी आणि चांगला व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यामुळे विजूसर ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी मात्र खूप आनंद झाला होता. माझ्यापेक्षा ‘शिकारी’मधील माझी भूमिका अत्यंत वेगळी होती. एखादी भूमिका साकारताना त्यात खरेपणा यावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ‘शिकारी’च्या निमित्ताने वेगळ काम प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची संधी मला मिळाली. त्यात कोल्हापूरी ठसका असलेली भाषा मला बोलायची असल्याकारणाने ती भाषा शिकावी लागली. त्यासाठी माझा मित्र रोहित हळदीकर आणि विजूसरांनी मदत केली. मुख्यतः चित्रपटात एखादा बोल्ड सीन करताना तो विभस्त होऊन लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते. त्याबद्दल थोडी भीती होती परंतु विजूसरांनी सगळं छान जमवून आणलं होतं.
नव्या भूमिका लवकरच….
अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित एका चित्रपटात मी काम केलं आहे. लवकरच तो चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एका नवा कार्यक्रम.शिवाय, ‘शाही पेहरेदार’ नावाचं हिंदी आणि उर्दू भाषेतील नाटकं करतोय. अप्रतिम संहिता असलेल्या या नाटकाचा प्रयोग नक्की बघा. २८ सप्टेंबरला मुंबईतील एनसीपीएलला सायंकाळी ७ वाजता हा प्रयोग आहे. ‘सत्ता आणि हिंसा’, ‘ड्युटी आणि दोस्ती’ यांच्यावर भाष्य करणार हे नाटकं नक्की बघा. त्याव्यतिरिक्त समीर जोशी यांच्या पुढील चित्रपटात काम करतोय. अत्यंत गोड आणि कौटुंबिक गोष्ट असलेल्या या चित्रपटाविषयी तूर्तास काही सांगत नाही.
तिची माझी लव्हस्टोरी….
सखी आणि माझ कसं जमलं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कसं जमलं यापेक्षा कुठल्याही नात्यात आपण प्रामाणिक असणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. कोणतीही घाई न करता एकमेकांना समजून घेऊन निर्णय घेणं फार आवश्यक असतं. सखी आणि मी लग्न करण्याआधीही बराच वेळ घेतला. ‘दिल दोस्तीच्या…’सेटवर आमची पहिली भेट झाली. आमच्यात एकमेकांविषयी आकर्षण होतं. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने आम्ही या नात्याबद्दल फारसे गंभीर नव्हतो. ज्याप्रकारे आम्ही दोघही स्वतंत्र आणि मुक्त विचारांचे आहोत. आमचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याची आम्हा दोघांनाही काळजी आणि इच्छा असते. त्यामुळे सिरिअस कमिटमेंटमध्ये वैगरे नव्हतो. त्यानंतर मात्र आम्ही हळूहळू प्रेमात पडलो. मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होण्याआधीचं आम्ही एकमेकांसोबत होतो. लव्हस्टोरीपेक्षाही आम्हाला समानता हा गुण फार महत्वाचा वाटतो त्यामुळे आमच्या नात्यामध्येही सगळ्याचं गोष्टी समानतेने व्हाव्या यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आयुष्यातील प्रत्येक निर्णयात एकमेकांना खंबीरपाने पाठींबा देण्याची आमची कमिटमेंट आहे आणि तेच आमच्यासाठी खरं प्रेम आहे. शिवाय, ‘माणूस आणि कलाकार म्हणून आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र समृद्ध करणं’, हि आमची प्रेमाची व्याख्या आहे.
सखी-सुव्रत जोडी पुन्हा एकत्र काम करणार…?
सखी आणि मला एकत्र काम करायला आवडेल. पण तेही संहितेवर अवलंबून आहे. आम्हाला दोघांनाही ती संहिता आवडायला पाहिजे. शिवाय एखाद्या नटाचं वैयक्तिक आयुष्य कुठल्याही ठिकाणी यावं असं वाटतं नाही. मला आणि सखीला आमचं वैयक्तिक आयुष्य जपायला खूप आवडतं. त्यामुळे सखी बरोबर प्रियकर किंवा मित्र अशा भूमिकांपलीकडे काही भूमिका असतील तर आम्हाला एकत्र काम करायला नक्की आवडेल.
ड्रीम रोलची व्याख्या वेगळी…
माझ्या डोक्यात ड्रीम रोल वैगरे अजून नाही. पण मला नसरुद्दिन शहा, श्रीराम लागू, डॅनिअल डे-लुईस यांच्या सारखं काम करायला नक्की आवडेल. हे नट ज्या ताकतीने आणि पद्धतीने काम करतात त्या पद्धतीच काम मलाही करता यावं हे माझ ड्रीम आहे. कुठलाही रोल मिळाला तरी ते त्याचं ताकतीने कराव असं माझ नेहमी ड्रीम आहे.
बरंच काही खुपतंय…
इंडस्ट्रीमधील काही गोष्टी नक्कीचं खुपतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कार्यनीती (Work Ethics) फार चांगले नाहीत. भारतीय मनोवृतीत असणारा बेशिस्त व्यवहार, मग तो वेळ पाळण्याच्या बाबतीत असो किंवा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत. या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच प्रमाणात विषमताही आहे. नटांना आता सुदैवाने बरे पैसे मिळू लागले आहेत. परंतु, नटांव्यतिरिक्तच्या कलाकारांना (स्पॉटदादा, लाईटमन, बॅकस्टेज) अजूनही न्याय्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे आपला व्यवहार अधिक शिस्तशीर व्हायला हवा आणि या सगळ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे, पत्रकारिता, विशेषतः ‘एंटटेनमेंट मिडिया’ ज्या पद्धतीने इंडस्ट्रीला विविध माध्यमातून सादर करत ते सादर करण्याची पद्धत मला खटकते. मालिकांमधील आयुष्य, आणि सेटवर केलेली मजा याचं गोष्टी दाखवल्यामुळे, फक्त मजा करायला जातात लोक असा एक भ्रम तयार केला जातो. खरंतर, मालिकांच आयुष्य अत्यंत स्ट्रेसफुल असतं, त्यामुळे फक्त गोड-गुलाबी बाजू दाखवण्यापेक्षा त्याची गंभीर बाजुही दाखवणं गरजेच आहे असं मला नक्की वाटतं.
अभिनेता नसतो तर…
अभिनेता नसतो तर, मला शास्त्रीय गायक व्हायला नक्की आवडलं असतं. शिवाय शास्त्रज्ञ होणं, चित्रकलेची ओढ असल्यामुळे मला पेंटर होणंही आवडलं असतं. खर पाहता मला बरंच काही-काही करून बघायला आवडलं असतं. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्यामुळे कदाचित मी ट्रेकरही बनलो असतो.
छंद माझे अनेक…
मला स्वयंपाक बनवायला प्रचंड आवडतं. सोबतच, वाचन करणं, चित्र काढणं या गोष्टी खूप आवडतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. तिथल्या सांस्कृतिक गोष्टी, तिथला इतिहास, तिथले प्रश्न, तिथल्या लोकांच्या जगण्याच्या आणि भविष्याविषयीच्या संकल्पना, तत्वज्ञान मला समजून घ्यायला आवडतं.
सगळ्यात सोपा फिटनेस फंडा…..
‘सातत्य’ हा माझ्या फिटनेसचा मूलमंत्र म्हणता येईल. मला डायटिंग करणं खूप आवडतं. मी विविध पद्धतीचे डाएट ट्राय करत असतो. सध्या ‘लो-कार्ब-हाय-प्रोटीन’ आणि ‘इंटरमिडट फास्टिंग’ करण्याचा प्रयत्न केला, त्याचा फार उत्तम रिझल्टही मिळाला. गेली बरीच वर्ष मी पांढरी साखर खाणं बंद केलं आहे. ‘इट लोकल’ हा नियम मी प्रकर्षाने पाळतो. परदेशातून आणलेल्या महागड्या भाज्या खाण्यात काही पॉइंट नसतो. ज्या भाज्या बाजारात स्वस्त मिळतात त्या खाव्यात. निसर्गाने एखाद्या काळात एखादी भाजी मुबलक प्रमाणात तयार केली आहे, याचा अर्थ आरोग्याच्या दृष्टीने आपण त्या भाज्या खाणं अपेक्षेत आहे. असा ‘निसर्ग सुलभ’ आणि साध्या नियमांना फॉलो करणारा माझा डाएट आणि फिटनेस फंडा आहे.
रॅपिड फायर
- सखी कोणत्या भूमिकेत तुला जास्त आवडते? बायको की मैत्रीण? सखी मला सगळ्याच भूमिकांमध्ये आवडते आणि सगळ्याचं भूमिकांमध्ये तिच्याबद्दल मला काहीनाही तक्रारी असतात. त्यामुळे एक पर्याय निवडणं कठीण आहे.
- पुणे की मुंबई? दोन्ही शहरांनी मला भरभरून दिलंय. शिवाय मी मुंबईपेक्षा जास्त दिल्लीत राहिलो आहे. आता मी लंडनला राहतोय तर हे शहरही मला खूप आवडलंय. त्यामुळे कोणत्याही एका शहराची निवड नाही होऊ शकत.
- होस्टिंग की अभिनय ?अभिनय
- सुव्रत चा विक पॉईंट? सखी