Special Interview- Anvita Phaltankar

गर्ल्स गॅंग मधली “रुमी” 
अन्विता फलटणकर

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ च्या यशानंतर विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरपासून सगळ्यांच्या भेटीला येतं आहे. ‘मुलींची लहर, केला कहर’ अशी टॅगलाईन असणारं बोल्ड पोस्टर प्रदर्शित झालं.

‘गर्ल्स’ सिनेमाचं पोस्टर लॉन्च झाल्यानंतर पोस्टरमधील तीन अभिनेत्री कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या चित्रपटातील दोन व्यक्तिरेखा ‘मती (अंकिता लांडे)’ आणि ‘मॅगी (केतकी नारायण)’ अशी नावं प्रकाशात आल्यानंतर ‘रुमी’ नावाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून अभिनेत्री ‘अन्विता फलटणकर’ ने ‘रुमी’ साकारल्याचे स्पष्ट झालं आहे. ‘प्रेमात फिगर नाही, जिगर पाहायचा असतो…’ असं म्हणत तिच्या हटके अंदाजात ‘गर्ल्स’ मधील तिच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल आणि तिच्या एकूण प्रवासाबद्दल अन्विताने ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ सोबत या दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. वाचा त्याविषयी…

झाली अभिनयाची सुरुवात…

चार वर्षांची असताना मी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यातून चेहऱ्यावरील हावभाव हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग बनला. कालांतराने मी स्टेजवर काम करण्यास सुरुवात केली. मग मला अभिनयाची आवड वाटू लागली. हे काम करताना आपल्याला मज्जा येतेय हे लक्षात आलं आणि अधिकाधिक काम करायला लागले. शिवाय, स्टेजवर गेल्यावर आपल्यासाठी टाळ्या वाजतात हे भारी फिलिंग प्रेरणा देतं गेलं. मग शाळेच्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. अभिनयासाठीची विविध पारितोषिकं मिळत गेली. खरं पाहता, मी पुढे येऊन अभिनयात करिअर करेन वैगरे… विचार त्यावेळी अजिबातच केला नव्हता. एका स्पर्धेत मला मी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा-पुरुष म्हणून बक्षिसं मिळाल्याचं अजूनही लक्षात आहे. त्यानंतर त्याचं स्पर्धेत सलग तीन वर्ष मला अभिनयासाठी बक्षिस मिळालं होतं. पहिलीत असताना एक जाहिरातीत काम केलं होतं पहिल्या जाहिरातीचं अप्रूप वाटतं होतचं पण, त्या कामासाठी मिळालेल्या पाचशे रुपयांतून माझं पाहिलं बँक खातं सुरु केल्याची गोड आठवणं कायम लक्षात राहिलीये. पुढे जाऊन ‘चतुर चौकडी’ नावाच्या मालिकेत काम केलं आणि अशाप्रकारे इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 

वेगवेगळी काम करत राहिले…

अकरावीत असताना टाईमपास चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि या चित्रपटातील ‘चंदा’ साकारायची संधी मिळाली. त्यानंतर साधारण वर्षभर ‘रुंजी’ मालिकेत काम केलं. बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणसाठी ललित कला केंद्र इथून बीए (नाट्य विभाग) चं शिक्षण पूर्ण केलं. ‘जर मी नाटकात बीए केलं नसतं, तर कदाचित माझं पदवीपर्यंत शिक्षण झालं नसतं’ असं मला वाटतं. शिक्षण झाल्यानंतर मुंबईत आल्यावर कामाच्या शोधात होते. त्याचवेळी ‘हास्यजत्रा’ केलं. हास्यजत्रा करण्याआधी छोट्यापडद्यावर कॉमेडी केली नसली तरी घरी नकला करणं हे माझं सुरु असायचं. ‘पु.ल…’ ऐकत लहानाची-मोठी झाली होते. त्यामुळे कॉमेडीचं टायमिंग आपोआप अवगत झालं होतं. 

स्वतःचा गैरसमज स्वतःचं मोडला…

‘वाय सो गंभीर’ या माझ्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले होते. एके दिवशी अचानक मला फोन आला. ‘गर्ल्स’मधील प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी मला सांगण्यात आलं. परंतु, माझी शरीरयष्टी पाहता; मला लीड म्हणून का घेतील? आणि मला लीड रोल मिळूच शकणार नाही अशा विचारांची मी. त्यामुळे कदाचित नंतरच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादं छोटं काम मिळेल या विचाराने ऑडिशन दिलं. आठवड्याभरात मला त्यांचा परत फोन आला. तरीही एखाद्या छोट्या भूमिकेसाठी माझा विचार करत असावेत असं मला वाटलं. पण तीन प्रमुख अभिनेत्रींपैकी आपणही एक असल्याचं कळल्यावर आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला. कारणं, माझा कधी कोणी प्रमुख भूमिकेसाठी विचारही करेल हे मलाच मान्य नव्हतं. अखेर आमच्या कामाला सुरुवात झाली. ‘गर्ल्स’चा दिग्दर्शक विशाल देवरुखकरच्या मते, त्याच्या डोक्यात असलेल्या ‘रुमी’ची छवी त्याला माझ्यात दिसली आणि मला ‘रुमी’ मिळाली. परंतु, रुमीचा जेवढा प्रेमावर विश्वास आहे तेवढा ‘अन्विता’चा अजिबात नाही हाच फरक मला, माझ्यात आणि ‘रुमी’मध्ये जाणवतो. ‘रुमी’कडून मी प्रामाणिकपणा शिकले. प्रत्येक नात्याबद्दल खूप प्रामाणिक असणारी माझी चित्रपटातील भूमिका खऱ्या आयुष्यात अगदी बेधडक आहे. शिवाय, मी माझं स्वतःच असं लीड म्हणून पोस्टर असेल असा विचारही केला नव्हता. ‘गर्ल्स’च्या निमित्ताने ते स्वप्नं सत्यात उतरल्याचं समाधान आहे. माझ्या एवढ्या वर्षांच्या कामांतील हे सगळ्यात मी करत असलेलं हे मोठ आणि प्रमुख भूमिकेतील पहिलचं काम असल्याने त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. 

सतत काम करत राहायचंय….

‘गर्ल्स’ मधील ‘रुमी’ हि प्रमुख व्यक्तिरेखा असणारी भूमिका मला मिळाल्यानंतर माझा खऱ्या आयुष्यातही स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला आहे. या भूमिकेने मला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. डान्सर असले तर माझं संपूर्ण आयुष्य मी अशीचं ‘हेल्दी’ आहे आणि त्यामुळे स्वतःमध्ये एक न्यूनगंड बाळगणारी मी ‘रुमी’मुळे खूप बदलले आहे. मला मिळणारी भूमिका कोणती आहे आणि भूमिकेच्या उंचीपेक्षा मला मिळणाऱ्या प्रत्येक कामाचं सोनं करण्याच्या मी प्रयत्नात असते. त्यामुळे मला काम करायला आवडं आणि ते सतत करत राहण्याची इच्छा आहे.

अजय जयश्री उभारे
(प्लॅनेट मराठी)

Advertisements
about author

PlanetMarathi

planetmarathi@gmail.com

<p>Planet Marathi is the pulse of Marathi Digital Entertainment world. A web platform that promotes and highlights Arts, Culture, Films, History, Politics and Social Life of Maharashtra through various shows and events.<br /> We feel proud to have been featured in FORBES INDIA magazine as the GAME CHANGER and also being awarded as the best Online Entertainment Channel by ArthSanket.<br /> We have been Online Media partners for Goa Marathi Film Festival, SanskrutiKalaDarPan Awards and also Regional Promoters for Indian Film Festival of Melbourne.<br /> Having a reach of more than 1.5 Million users , we aim to tap the Marathi Speaking audience of the world.</p>

Share your valuable opinion