STAR OF THE WEEK 40- Sharmila Shinde

‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रातील ‘पुढंच पाऊल…’ टाकत, तिने साकारलेली खलनायिका ‘रुपाली’ सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिली. पुढे तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 ‘जेनी’ म्हणून ती आपल्याला मितभाषी, शांत आणि समंजस म्हणून माहिती असली तरी, खऱ्या आयुष्यात मात्र ती अत्यंत बोलकी, खंबीर आणि परखड स्वभावाची आहे. या आठवड्यातील ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊयात दिलखुलास व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री ‘शर्मिला शिंदे’ विषयी….

  •  संपूर्ण नाव : शर्मिला राजाराम शिंदे
  • जन्म तारीख आणि ठिकाण : ५ एप्रिल, पुणे 
  • शिक्षण : बीएफए (अप्लाइड आर्ट)  चायनीज मँडरिंग , इव्हेंट मॅनेजमेंट , ब्युटी कोर्सेस 

लहानपणीचं ठरवलं… 
शाळेत असताना अभिनय, नृत्य, वक्तृत्व या आणि अशा अनेक अभ्यासेतर उपक्रमात आवडीने भाग घ्यायचे. केवळ शाळेतच नव्हे तर गणपती किंवा कोणत्या सणवारी सोसायटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात माझा नियमित सहभाग ठरलेला असायचा. माझी आवड आणि आवडीपोटी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीला तेव्हाही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. लहान असतानाचं मला अभिनय करायचायं आणि मोठी होऊन मला अभिनेत्री बनायचंय हे स्वतःशी ठरवलं होतं. त्यामुळे शाळेतील तोंडी परीक्षेच्या वेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं माझं ठरलेलं असायचं. ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला नीटस माहीतही नसतं, शिवाय त्याकाळी अभिनयात करिअर घडू शकतं हा विचारही क्वचित केला जायचा. मात्र अशातही ‘मला मोठी होऊन अभिनेत्री बनायचंय.’ या माझ्या उत्तराने शिक्षकही प्रभावित व्हायचे. अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. त्यातही मला कॉमिक रोल करायला किंवा निवेदन करायला आवडेल असं आत्मविश्वासाने सांगितलं होत. शिवाय, मी सुवर्णपदक विजेती धावपटू (Sprinter Gold Medalist) असल्यामुळे, सुरुवातीला कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांबाबतीत थोडी गोंधळले होते. परंतु अभिनयाकडे माझा अधिक कल असल्यामुळे आपणं अभिनेत्रीचं व्हायचे या मताशी ठाम झाले. मुळात माझं बालपण फार कमाल गेलं. खरं पाहता माझ्या पूर्वजांपैकी कोणी कला क्षेत्राशी निगडीत असं काहीचं काम केलं नव्हतं. त्यामुळे घरच्यांनाही या क्षेत्राविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु माझ्या आईचा पाठींबा मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. मला विविध स्पर्धांना घेऊन जा, अभिनयच्या वर्कशॉपसाठी घेऊन जा, अगदी वर्तमानपत्रातील जाहिराती बघून ती मला अनेक ठिकाणी ऑडिशन्ससाठी घेऊन जायची. माझ्यासाठीचा हा तिचा खटाटोप सतत सुरु असायचा. अनेकदा वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातींनाही आम्ही बळी पडलोय. त्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मुंबईत आले आणि अनेक गोष्टी नव्याने शिकू लागले.

 ‘स्ट्रगल’मधून शिकावं…

सुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. 
माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. बरेचं दिवस कामाच्या शोधात होते. यावेळी माझी संयमीवृत्ती मला फार कामास आली. आर्ट्स स्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे हा संयम आणि जीवनावश्यक अनेक गोष्टी तिकडूनच शिकले. माझ्यातील खेळाकडून मला अधिक सक्षमपणे परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ दिलं. ‘स्ट्रगल’ला स्ट्रगल म्हणणं चुकीचं आहे असं माझं ठाम मतं आहे. कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी लागणारी ‘स्ट्रगल’ ही तयारी असते. माझ्या घरातील माझी आई वगळता इतर कोणाचा मला फारसा पाठींबा नव्हता. शिवाय, इंडस्ट्रीमध्ये मी नवखी म्हणून पाऊल टाकणार असल्यामुळे कोणाशीही फारशी ओळख असण्याची पुसटशीही आशा नव्हती. कोणाकडून मार्गदर्शन मिळेल किंवा कोणी काम देईल असा कोणताच मार्ग माझ्यापुढे नव्हता. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात कुठून करावी याबद्दलही काही कल्पना नव्हती. बीएफएचं शिक्षण सुरु असताना सतत चार वर्ष वोल्वो गाडीमधून प्रवास करून मुंबई-पुणे प्रवास केला. ऑडिशनसाठी दर एका दिवसा आड मुंबईत येण्याचा आणि दिवसभर ऑडिशन देऊन सकाळी कॉलेजला पोचायचा माझा कार्यक्रम सुरूच असायचा. कॉलेजला सुट्ट्या वाढू लागल्या शिक्षकांचा ओरडा खावा लागायचा. अखेर कॉलेज संपल्यानंतर घरच्यांना ‘पटवून’ मुंबई गाठली. काम करायचं असेल तर मुंबईत रहावं लागेल म्हणून अखेर मुंबईत रहायला लागले. सुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. खरतरं हि गोष्ट माझ्या घरच्यांना अजूनही माहित नाहीये. त्यानंतर काही मुलांशी ओळख झाली आणि बोरीवलीमध्ये त्यांच्यासोबत काही दिवस राहिले. ‘मुंबई चोरांची नगरी आहे’ असं म्हणतात, पण इथे स्वतः राहायला लागल्यावर हे अगदी खोटं असल्याचं लक्षात आलं. एक ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन काही घाबरत याच्याकडे रहा, काही दिवस इकडे आसरा घ्या असं करत प्रयत्न करतं राहिले. शेवटी काम मिळतंचं नाही, हे लक्षात आल्यावर काही दिवसांचा अवधी घरच्यांकडून मिळाला. शिवाय, मुंबईत राहण्यासाठी घरच्यांनी दिलेले पैसेही संपत होते. अखेर निराशा मानून एका मित्रासोबत पुण्याला जायला निघाले. मुंबईहून गाडी पुण्याच्या दिशेने निघाली आणि दहा-पंधरा मिनिटांतचं माझं सिलेक्शन झाल्याचा फोन आला आणि तत्क्षणी मी गाडी सोडून दिली. अखेर मिळालेल्या पहिल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि सचोटीने काम करत राहिले.  

पहिली भूमिका मिळाली...
‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेमधून मी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि जिद्दीने काम केलं.  ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मला ‘सोनिया’ हि व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. खरतरं मला मिळालेली भूमिका हि फक्त सात दिवसांची होती. पण त्या व्यक्तिरेखेला मिळालेलं प्रेम आणि माझं काम पाहून त्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक वाढवण्यात आला.  मराठीत काम करणं अधिक आवडतं…
मी हिंदी आणि मराठी अशा दोन्हीकडे काम करत असले, तरी हिंदी पेक्षा मराठीमध्ये काम करणं मला अधिक आवडतं. मराठीत काम करताना एक वेगळीच आपुलकीची भावना असते. मराठी आणि हिंदी मध्ये दृष्टीकोनात (attitude)मध्ये ही मोठा फरक जाणवतो. कदाचित मी मराठी असल्यामुळे हा माझा समज म्हणता येईल. पण खरचं मराठीमध्ये मला कौटुंबिकतेची भावना जाणवते. हिंदीच्या सेटवर ही कौटुंबिक वातवरण असलं तरी फ्रोफेनलिझला तिकडे अधिक महत्त्व दिलं जात. त्यामुळे तिकडे खूप सांभाळून वागावं लागतं, खूप विचार करून बोलावं लागतं, अनेक नियम पाळावे लागतात, त्यामुळे तिकडचा दिलखुलासपणा हरवतो असं मला वाटतं. याउलट मराठीच्या सेटवर फार बिनधास्त वावरता येत आणि तिथला दिलखुलासपणा मला अधिक आवडतो. बऱ्याच ठिकाणी भाषे पलिकडे जाऊन कलाकारांसोबत कौटुंबिक नातं जुळत.   कास्टिंग काऊचं?
‘कास्टिंग काऊचं’ या विषयावर अनेकदा अनेकांशी चर्चा होतात. सुदैवाने माझं एकूण व्यक्तिमत्व आणि राहणीमान पाहून मला या गोष्टीचा कधीच सामना करावा लागला नाही. पण अनेक लोकांना असे अनुभव का बरं येत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. कदाचित ते लोक एखाद्या चुकीच्या व्यक्तिला भेटतं असावेत म्हणून असं घडतं किंवा एकाद्याला भेटायला जाताना त्या कलाकरांचा त्या समोरच्या व्यक्तिविषयीचा दृष्टीकोन चुकीचा असतो म्हणून असे प्रकार घडतं असावेत. इंडस्ट्रीत काम करताना अनेकदा माझ्या हितचिंतकांकडून मला एखाद्या ठराविक व्यक्तीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो किंवा एकद्याशी फार बोलू नकोसं असंही सांगितलं जात. परंतु, ती व्यक्ती माझ्याशी चांगलीच वागतं गेली. ज्या एकाद्या व्यक्तीचा अनेकांना वाईट अनुभव आला आहे. त्या व्यक्तीचा मला मात्र नेहमी चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे एखाद्याला पहिल्यांदा भेटायला जाताना तुम्ही पाटी कोरी ठेऊन त्या व्यक्तीसमोर जा. म्हणजेच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःला आलेल्या अनुभवांतून शिका आणि मी हेच नियमित लक्षात ठेवते आणि फॉलो करते.    

अन् मी ‘शनाया’ नाकारली… 
‘पुढचं पाऊल…’ मालिकेतील मी साकारलेली ‘रुपाली’ हि व्यक्तिरेखा मला आवडलेल्या कामांपैकी एक महत्त्वाची भूमिका. रुपाली खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी तिचा कॉमिकसेन्स अप्रतिम होता. त्यामुळे ती भूमिका करताना मला खूप मजा आली. तब्बल पाच वर्ष मी या मालिकेत काम केलं. त्यानंतर आता खलभुमिकेपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून सध्याच्या ‘माझ्या नवऱ्याची….’या मालिकेतील ‘जेनी’ची भूमिका निवडली. मालिकेचं कास्टिंग सुरु असताना मला ‘शनाया’च्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण ते नाकारून मी स्वतः जेनी साकारण्याचा निर्णय घेतला. सलग पाच वर्ष खलभूमिका साकारल्यानंतर लोकांच्या मनातील आपलं भूमिका बदलवणं हे सर्वस्वी माझ्या हातात होतं. ‘पुढचं पाऊल…’मधील रुपाली हे पात्र प्रमुख खलनायिकेच होतं. त्यामुळे आता जेनीची भूमिका छोटी आहे असं मला सांगण्यात आलं. पण काम करताना छोट-मोठं हा फरक मी कधीचं लक्षात घेत नाही. जेनी मला आवडली होती आणि हट्टाने मी जेनी साकारायचा निर्णय घेतला. माझ्या मते प्रत्येक भूमिका हि त्या गोष्टीसाठी तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे मी कोणतीही भूमिका लहान अथवा मोठी असं अंतर करत नाही.  

अनुभावंतून शिकते…
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही न काही घडतं असतं. त्यामुळे अभिनयासाठी कुठे काही वेगळं वाचायची किंवा शिकण्याची गरज नसते. आपलं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. आपण शांतपणे विचार केला तर प्रत्येक क्षणातून काहीतर शिकण्यासारख असतं हे आपल्या लक्षात येईल. मी हे तंतोतंत पाळते. त्यामुळे स्वतःची स्टोरी आपण लक्षात ठेवली आणि आठवली तर आपोआप डोळ्यांसमोर भावना येतात आणि त्यातून अभिनय खुलवण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा एकटी बसून राहून स्वतःचा विचार करून शिकत असते. तो एकटेपणा नसून स्वतःसाठी दिलेला वेळ असतो असं मी समजते.  

राऊडी भूमिका करायचीय...
‘आतंकवाद’ आणि ‘अंडरवर्ल्ड’शी निगडती गोष्टी वाचण्या आणि बघण्यापुरत्या खूप आवडतात. या गोष्टींना मी अजिबातच प्रोत्साहन देत नाहीये. परंतु अंडरवर्ल्डमधील एखादी भूमिका मला पडद्यावर साकारायला आवडेल. अत्यंत डार्क व्यक्तिरेखा असलेलं कोणतही पात्र मला साकारायची इच्छा आहे. या व्यक्तिरेखा साकारण खूप अवघड काम असतं असं मला वाटत. त्यांना समजून घेऊन त्यांचं विक्षिप्त पण कमाल पात्र पडद्यावर साकारायला मला नक्की आवडेल.

 सिम्पल ‘फॅशन’ आणि फिटनेस फंडा…
मला काय आवडतंय, आणि मला काय छान वाटतंय याकडे मी अधिक लक्ष देते. अनेकदा मी वेस्टर्न पेहरावात असते. तर पारंपरिक कार्यक्रम किंवा सणावारी साडी नेसणं मला आवडतं. मग साडीतही मला मॉडर्न साडी अजिबात आवडतं नाही. काठपदराची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने घालून मिरवणं मला खूप आवडतं. अगदी मुलींसारखं नाजूक-साजूक वावरणं मला पटत नाही. शिवाय माझा पेहराव इतरांना कसा वाटेल यापेक्षा तो मला आवडला की नाही याकडे माझा अधिक भर असतो. सोबतच फिटनेसच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, मी जिमला जात नाही. मी डाएट करतं नाही. मी सगळ्या गोष्टी मनसोक्त खाते. पण खाण्याच्या वेळा मी कटाक्षाने पाळते. कधी खायचं? कधी काय खायचं? या गोष्टींचा मी नेहमी विचार करते. प्रत्येक गोष्ट खाण्यापूर्वी मी माझ्या शरीराला याची खरचं आता गरज आहे का? याचा विचार करते. ‘पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे’ हे मी कायम लक्षात ठेवते आणि त्यानुसार खाणं-पिणं सांभाळते. महत्त्वाचं म्हणजे खाताना मी नेहमी सकारात्मकतेने खाणं पसंत करते. एखादी गोष्ट मला आवडत असेल तर ती खाल्याने माझ्या किती कॅलरीज वाढतील? फॅट वाढेल का? असे विचार मी मनातही आणत नाही आणि कदाचित म्हणूनच मी फिट आहे.     

 नव्वदीचा काळ अनुभवते..
टिकटॉकवर व्हीडीओ बनवायला मला फार मजा येते. नव्वदीची गाणी आणि डायलॉग्जवर मला टिकटॉक करायला आवडतं. मी नव्वदच्या दशकातील चित्रपट आणि गाण्यांची प्रचंड चाहती आहे. मी अतिशय फिल्मी आहे. माझं आयुष्यही मला फिल्मी वाटतं. फिल्मस मला सकारात्मक उर्जा देतात. त्यामुळे माझं नव्वदीच्या काळावरील प्रेम मी टिकटॉकच्या माध्यमातून जगते, अनुभवते. त्यामुळे मी ते कायम करत राहीन.    

   रॅपिड फायर

  •    शर्मिला अभिनेत्री नसती तर?-शेफ किंवा खेळाडू किंवा गुप्तहेर (डीटेक्टीव) किंवा पोलीस किंवा देशासाठी सिक्रेट मिशनवर काम करणारी कोणतीही व्यक्ती.
  •   शर्मिलाचा आवडता सहकलाकार-अजिंक्य जोशी (‘पुढचं पाऊल’ मालिकेतील चिंत्या मामा)
  • शर्मिलाचा आवडती सहकलाकार-अजूनही शोधत आहे. 
  •   शर्मिलाचं आवडतं शहर मुंबई की पुणे-मुंबई  
  • शर्मिलाची आवडती भूमिका?-रुपाली (पुढचं पाऊल) 
  • शर्मिला अधिक वापरत असणार सोशल मिडिया ॲप?-इंस्टाग्राम 

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Advertisements
about author

PlanetMarathi

planetmarathi@gmail.com

<p>Planet Marathi is the pulse of Marathi Digital Entertainment world. A web platform that promotes and highlights Arts, Culture, Films, History, Politics and Social Life of Maharashtra through various shows and events.<br /> We feel proud to have been featured in FORBES INDIA magazine as the GAME CHANGER and also being awarded as the best Online Entertainment Channel by ArthSanket.<br /> We have been Online Media partners for Goa Marathi Film Festival, SanskrutiKalaDarPan Awards and also Regional Promoters for Indian Film Festival of Melbourne.<br /> Having a reach of more than 1.5 Million users , we aim to tap the Marathi Speaking audience of the world.</p>

Share your valuable opinion