दिवाळी निमित्त..!!!
घराघरात आता दिवाळीची सुरुवात झाली आहे. दिवाळी येते ती चांगली पाच दिवस मुक्काम ठोकून असते. हिंदू संस्कृतीमधील हा एक प्रमुख सण असला तरी देशभर सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातो. अर्थात दिव्यांचा सण म्हणून याला ‘दिपावली’ किंवा ‘दिवाळी’ असंही म्हणतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून राम आयोध्येला परत आलेल्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते, अशी या सणामागील आख्यायिका आहे. असे असले तरी तत्कालीन ‘दिवाळी’ आणि आत्ताचा ‘दिवाळसण’ यात खूप फरक आहे. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा ‘दीप’मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या दिवसांत मातीचाकिल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. हल्ली हि परंपरा दिवसागणिक मागे पडत चालली आहे. ‘यक्षरात्री’, ‘दीपमाला’, ‘दीपप्रतिपदुत्सव’, ‘दिपालिका’, ‘सुखरात्री’, ‘सुख सुप्तिका’ अशी सर्वांच्या लाडक्या दिवाळीची इतर नावांनी ओळख. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे वाचूया त्या विषयी…
वसुबारस : भारतदेश कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. याला ‘गोवस्तद्वादशी’ असंही म्हणतात. पारंपरिकतेने या दिवशी संध्याकाळी ‘गाय आणि वासराची’ पूजा करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे-वासरे आहेत त्यांच्याघरी गोड पुरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील स्त्रिया गाईचे पाय धुवून, तिला फुलांची माळ घातली जाते. निरांजनाने ओवाळून मग केळीच्या पानावर गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि सगळे अन्नपदार्थ दिले जातात.
धनत्रयोदशी : अश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या सणामागे अनेक आणि धर्मनिहाय दंतकथा मानल्या जातात. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात आणि यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून लक्ष्मी देवी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये ‘गुडोदकम्’ म्हणतात.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करतात.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात.
नरक चतुर्दशी :नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले होते. त्यामुळे कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्थीस ‘नरक चतुर्थी’ साजरी केली जाते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशीअभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे आणि सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
लक्ष्मीपूजन : अश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस ‘बलिप्रतिपदा’ हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून ही ओळखतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.
गोवर्धन पूजा : मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’असे नाव मिळाले असे मानले जाते. भाऊ-बहिणीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी’ देऊन करतो.
भारतातील विविध समाजांची दिवाळी
जैन समाज : अश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना ‘निर्वाण लाडूं’चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.
आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
–अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)