आता अभिनेत्री म्हणून आपणं तिला ओळखत असलो तरी तिचा प्रवास गायिका म्हणून सुरु झाला होता. आजी प्रसिद्ध गायिका, संगीतमय वातावण त्यामुळे हिने शास्त्रीय संगीताचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.
नाट्य संगीताचा डिप्लोमा आणि मग स्वतःचा गायन क्लास तिने सुरु केला. त्यानंतरच्या काळात तिने एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून नोकरी केली.
‘का रे दुरावा’ या मालिकेच्या माध्यमातून ‘जुई’ म्हणून तिने या क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून. आता ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे. ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊया अभिनेत्री अर्चना निपाणकर बद्दल…
संपूर्ण नाव : अर्चना श्रीकांत निपाणकर
जन्म तारीख आणि ठिकाण : २६ एप्रिल १९९३, नाशिक
शिक्षण : कॉमर्स पदवीधर,
शास्त्रीय संगीत विशारद
मराठी नाट्यसंगीत (डिप्लोमा)
लहानपणापासून कलेकडे कल…
माझी आजी मालती निपाणकर शास्त्रीय गायिका होती. त्यामुळे घरात कायम संगीतमय वातवरण होतं. तिचे क्लासेस, विविध मैफिली, रियाज या सगळ्या गोष्टी मी माझ्या लहानपणापासून पाहत होते. सतत कानावर गाणं, तबला, ताल, ठेका या गोष्टी पडत होत्या. त्यामुळे कलाक्षेत्राची गोडी अगदी तेव्हापासूनच लागली होती. पण सोबतीने शिक्षणालाही तेवढंच महत्त्व देतं कॉमर्समधील शिक्षण पूर्ण करून सीए किंवा सीएस करण्याचं ठरवलं होतं. गाण्याचं प्रशिक्षण सुरु होतचं. पण अभिनयाच्या बाबतीत फारसा विचार त्यावेळी नक्कीच केला नव्हता. शाळेत आणि कॉलनीत नाटकात काम करायचं, एवढाचं माझा अभिनय क्षेत्राशी संबंध असायचा. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर मात्र ‘नाटकं’ सिरिअसली घ्यायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलली. त्याआधी सुगमसंगीत, नाट्यसंगीत असे नानाविविध प्रकारचे कार्यक्रम करणं माझं सुरु असायचं. शिवाय, सुरुवातीचे काही दिवस गाण्याचे क्लासेसही मी घेतले. त्यामुळे गाण्याचे क्लासेस, माझा रीआज, अभ्यास हा सगळा डोलारा सांभाळत मी एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले. अखेर अभ्यासाव्यतिरिक मी अभिनयामध्ये छान रमते हे लक्षात आल्यावर पूर्णवेळ या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
मिळाली पहिली संधी….
बीकॉम झाल्यानंतर मी एमए (संगीत) साठी प्रवेश मिळवला. यावेळी माझे गायनाचे क्लासेस सुरु होतेच, त्याच्या सोबतीने मी एका शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. घरच्यांसोबत बोलून, ‘शनिवार-रविवार मी ऑडिशन्स करताना मुंबईला जाईन’, या एका अटीवर मी ही नोकरी स्वीकारली होती. त्यानंतर माझ्या ‘कारे दुरावा…’ या मालिकेसाठी अंगद म्हसकर यांनी ऑडिशन सुरु असल्याचं सांगितलं. मी ऑडिशन दिली आणि काही दिवसांतचं माझं सिलेक्शन झाल्याचं कळलं. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी काम करतं असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी मला पाठींबा दर्शवत नोकरी सोडण्याची परवानगी दिली आणि मी मुंबईला आले.
‘मुंबई’ने शिकवलं…
आधीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. कालांतराने माझी ती इच्छा पूर्ण झाली. पण काम मिळवण्यासाठीच्या धडपडीपेक्षा मुंबईत स्वतःला ॲडजस्ट (सामाऊन घेण्यात) करण्यात खरा स्ट्रगल करावा लागला. लहानपणापासून नाशिकमध्ये वाढलेल्या मला अशा गर्दीची आणि धावपळीची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे धावत्या मुंबईबरोबर स्वतःचा वेग सावरायला थोडा वेळ लागला. मुंबईत माझ्या ओळखीचं कोणी नसल्यामुळे जागा शोधण्यासाठीही एक वेगळी कसरत जाणवत होती. त्यात सुरुवातीला जेमतेम चार दिवसांचं शुटींग असायचं, शिवाय मला मिळणाऱ्या पैशांवर स्वतः घर घेऊन राहणं माझ्या खिशाला न परवडणारही होत. सुदैवानं, अंगद म्हसकर आणि त्याच्या बायकोने शुटींगच्या वेळी मुंबईत आल्यावर त्यांच्याकडेच राहण्याचं सांगितलं. मग मी ठाण्यात अंगदकडे राहायला लागले. शुटींग आरे कॉलनीजवळ असायचं. पहिल्या दिवशी ठाणे ते आरे रिक्षाने आले. पण रिक्षाचे दररोजचे पैसे अवाढव्य होते. त्यामुळे ठाण्याहून घाटकोपर मग तिकडून मेट्रो आणि पुढे रिक्षा अशी तारेवरची कसरत करायचा निर्णय घेतला. त्यात कधी मुंबईच्या लोकलमधील गर्दी पाहून दोन-तीन लोकल सोडाव्या लागायच्या. त्यामुळे कॉलटाईमच्या दोन-अडीच तास अगोदर घर सोडावं लागयचं. अखेर हळूहळू या सगळ्याची सवय झाली. अनेकदा शुटींग लांबलं आणि घरी येणं शक्य झालं नाही तर… या प्रश्नापोटी आवश्यक ते टॉवेल, ब्रश, अधिकचे कपडे अशी एक वेगळी मोठी बॅग कायम सोबत ठेवायचे. त्यामुळे मुंबई शहरात स्वतःला ॲडजस्ट करायाल खरा स्ट्रगल जाणवला.
आनंदी आनंद…
प्रवासा दरम्यान बसवर वैगरे आमच्या ‘का रे दुरावा…’मालिकेचं पोस्टर पाहून खूप भारी वाटायचं. आपणही याचा एक भाग आहोत याचा आनंद असायचा. मालिकेत माझा अगदी साधा लुक असल्यामुळे मला लोकं फारसे ओळखतं नव्हते. त्यानंतर हळूहळू माझी भूमिका लोकांना आवडू लागली. एके दिवशी मी बसने प्रवास करतं होते. माझ्या बाजूच्या सीटवरील एक काकू आणि त्यांची एक मैत्रीण आमच्या मालिकेबद्दल बोलतं होत्या. मग माझं पात्र असलेल्या ‘जुई’बद्दल बोलू लागल्या. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला ओळखलं. मग त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले आणि त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही हा खुपचं वेगळा आणि स्पेशल क्षण ठरला.
सकारात्मकता जपते…
‘का रे…’, ‘१०० डेज्’, ‘राधा प्रेम रंगी…’ ही मालिका संपल्यानंतर माझी नाटक करण्याची खूप इच्छा होती. त्यात सुरुवातीपासूनचं विजय केंकरे सरांसोबत काम करावं असं मनोमन वाटतं होतं. अखेर ‘महारथी’च्या निमित्तानं माझी ही दोन्ही स्वप्नं पूर्ण झाली. त्या आधी मी ‘गेला उडतं…’या नाटकात काम केलं होतं. पण नेहमी वेगळी भूमिका मला करता यावी म्हणून मी सतत प्रयंत्न करत असते. महारथीमध्ये मी साकारत असलेली भूमिका एका साध्या मुलीची आहे. ती निरागस आणि चतुर आहे. त्यामुळे हि वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली. ‘राधा….’मध्ये मी खलनायिका साकारली होती. त्यानंतर हि वेगळी भूमिका मला करायला मिळणं ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटात काम करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. अखेर आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. माझी भूमिका अगदी लहान असली तरी, दिग्गजांसोबत काम करण्याचं सुख मला मिळालं. शिवाय, यानिमित्तानं अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे यापुढेही वेगळ्या माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारायला नक्की आवडेल. शिवाय, येत्या काळात गायन आणि अभिनय अशी सांगड असणारी भूमिका साकारायची आहे.
भूमिका महत्त्वाची…
प्रत्येक कथेची आणि त्यातील पात्रांची वेगळी गरज असते. मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याचं भूमिका फार वेगळ्या होत्या. प्रत्येक भूमिकेमध्ये मला वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले. त्यामुळे पुढे जाऊन मला वेगळी किंवा बोल्ड शेड असणारं पात्र साकारायची संधी मिळाली. तर त्या भूमिकेची गरज म्हणून आणि मला वेगळं काम करायला मिळेल म्हणून बोल्ड भूमिका नक्की साकारेन. सध्या मला चांगली भूमिका मिळवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यात मी माध्यमापेक्षा भूमिकेला आणि त्यातून मला मिळणाऱ्या आव्हानांना अधिकाधिक महत्त्व देईन.
डान्स ही माझी विशेष आवडं..
गायन आणि अभिनयाची आवड यांविषयी सगळ्यांना माहित आहेच. पण मला डान्स करायलाही खूप आवडतं. नृत्याचं मी प्रशिक्षण घेतलं नसलं तरी मला त्याची आवडं आहे. माझा एक स्पीकर नेहमी माझ्या बरोबर असतो. अगदी सेटवर सुद्धा… त्यामुळे तो स्पीकर आणि डान्स असं माझं ठरेलल समीकरण. आता तशी संधी मिळाली आणि वेळ जुळून आली तर मी नृत्याचं प्रशिक्षण घेईन. शिवाय, वेगळ्या ठिकाणी फिरायला मला प्रचंड आवडतं.
खोटं वागणं जमतं नाही…
अनेकदा लोकांविषयी खूप पटकन मतं बनवलं जात. एखादा मुलगा-मुलगी एकत्र असतील तर मग त्यांचं असेलंच…. किंवा असेल तरी त्यात गैर काय या मताची मी आहे. त्यामुळे मला एकूणच नकारात्मकता आवडतं नाही. म्हणून सेटवरही मी गाणी ऐकून सगळ्यांना गाणी ऐकवते आणि प्रसन्न राहते. शिवाय, मला कोणाच्या पुढेमागे करत खोटं वागणं जमतं नाही. आहे हा माझा स्वभाव आहे. त्याला मी ही काही करू शकत नाही.
रॅपिड फायर
० अर्चना अभिनेत्री किंवा गायिका नसती तर?
-कलेशिवाय माझ्या जीवनाची मी कल्पनाही करू शकतं नाही. मग मी कदाचित डान्सर झाली असते.
० गायन की अभिनय?
-दोन्ही
० अर्चनाचं आवडतं शहर नाशिक की मुंबई
-एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी
० अर्चनाचा विकपॉइंट
-खाणं (कोणताही पदार्थ, त्यात गोडं दुधाचे पदार्थ सर्वाधिक)
० शर्मिला अधिक वापरत असणार सोशल मिडिया ॲप?
-इंस्टाग्राम
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
http://www.planetmarathi.org
http://www.planetmarathimagazine.com