स्पेशल इंटरव्ह्यू (जुई बेंडखळे)
एक छोटी मुलगी टिव्ही समोर उभी राहून टिव्हीमधील विविध पात्रांचा डान्स आणि अभिनय कॉपी करायची. तिच्या लहानपणापासून, ‘मला हिरोईन बनायचंय.’ हे तिचं ठामपणे सांगणं, सत्यात उतरलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समीर आठल्ये दिग्दर्शित ‘बकाल’ या पहिल्या ऍक्शनपटात ती प्रमुख अभिनेत्री म्हणून सगळ्यांसमोर आली. लहानपणापासून विविध डान्स रिआलिटी शो मधून आपणं तिच्या धम्माल आणि ठसकेदार डान्स पहिला आहे. तसेच विविध सौंदर्य स्पर्धांमधून हा चेहरा अनेकांच्या ओळखीचा बनला आहे. ‘बकाल’ हा तिचा पहिला चित्रपट असला तरी, स्क्रीनवरील तिचा वावर आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षक तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करतं आहेत. ‘बकाल’च्या निमित्तानं सिनेक्षेत्रात पदार्पण केलेल्या अभिनेत्री ‘जुई बेंडखळे’ने ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ सोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
पालकांनी ओळखलं टॅलेंट….
साधारणपणे तीन-साडेतीन वर्षांची असेन. टिव्ही लाऊन डान्स करण्याची माझी सवय लक्षात घेऊन, माझ्या पालकांनी मला डान्स क्लासमध्ये घातलं. माझ्या या आवडीमधील सातत्याची जोडं मिळाली आणि मला मी सहा वर्षांची असताना टिव्हीवरील ‘बुगी-वुगी’ या लोकप्रिय डान्स शोमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. या शोच्या अंतिम स्पर्धकांमध्ये मी ही होते. त्यानंतर याचं शोच्या विविध सिझन्समध्ये तब्बल आठ वेळा मी सहभागी झाले. त्यानंतर ‘एका पेक्षा एक – सिझन ४’ या ‘छोटे चॅम्पिअन’स्पेशल डान्स रिअलिटी शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होते. या स्पर्धेचीही रनरअप ठरले. त्यानंतर हळूहळू मॉडेलिंग, विविध ब्रांडसाठी फोटोशुट अशी काम करायला सुरुवात केली. पुढे जाऊन ‘मिस नवी मुंबई’ आणि सौंदर्य विश्वातील मानाची समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स – श्रावणक्वीन- २०१७’ या स्पर्धेची उपविजेती बनण्याचा मान मिळवला. त्यानंतर अनेक ठिकाणी ऑडिशन्स देण्याचे माझे प्रयत्न सुरु होते. पण विविध अडचणी येतं होत्या. अखेर समीर आठल्ये दिग्दर्शित ‘बकाल’ या पहिल्यावहिल्या ऍक्शनपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
पाठींबा महत्त्वाचा….
माझ्या लहानपणापासूनचं, मला अभिनय क्षेत्रातच काम करायचं हे मी मनाशी पक्क केलं होत आणि त्या दृष्टीने वाटचालही तेव्हापासूनच सुरु झाली होती. मराठी कुटुंबातील अनेक मुलींना मॉडेलिंग, अभिनय यांसारख्या क्षेत्रात काम करायचं झाल्यास कुटुंबाकडून फारसा पाठींबा मिळत नाही. माझ्या बाबतीत मात्र हे चित्र अगदी उलट होत. माझ्या पालकांबरोबर, आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने मला माझ्या प्रत्येक निर्णयासाठी खूप मोठा पाठींबा दिला.
शिक्षणालाही प्राधान्य…
लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न असलं तरी, माझ्या अभ्यासाकडे मी कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ‘खूप अभ्यास केला तरचं आपण यशस्वी होऊ शकतो.’ हा विचार मुळात माझ्या बाबांना न पटणारा होता आणि त्यामुळेच त्यांनी वेळोवेळी माझी आवडं ओळखून मला पाठींबा दिला. पण निदान पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण कर असं ते नेहमी सांगायचे. दहावीनंतर आपणं ‘लॉ’ करावं आणि सोबतचं सीएस (कंपनी सेक्रेटरी) करण्याचा माझा विचार होता. पण नंतर मी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये ‘मास-मिडिया’ करता प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी ‘मिस नवी मुंबई’मध्ये भाग घेतला होता. मग सुरुवातीचे अनेक महिने कॉलेजला जाता आलं नाही. त्यामुळे मला परीक्षेला न बसता सहा विषयांमध्ये केटी लागली. त्याचं वर्षीच्या अंतिम परीक्षेत मी तब्बल बारा विषयांचा अभ्यास करून पास झाले. हा प्रकार सातत्त्याने तीनही वर्षी घडला. त्यातही मास-मिडियाची विद्यार्थिनी असल्यामुळे भरमसाठ असाईनमेंट असायच्या. माझ्या सततच्या गैरहजेरीमुळे मला कोणीही त्यांच्या ग्रुप असाईनमेंटमध्ये सहभागी करून घेत नसल्याने मला त्या गोष्टीही एकटीने पूर्ण कराव्या लागतं होत्या. आपण स्वतः हा निर्णय घेतल्यामुळे माझी आवड आणि अभ्यास या दोघांनाही अंतर पडू न देता. दोन्हीकडे मन लाऊन मेहनत करत राहिले. आता पुढील शिक्षणाचा विचार सुरु आहे.
पहिला चित्रपट मिळाला…
श्रावणक्वीन नंतर बकालच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. तब्बल दोनशे मुलींमधून माझी प्रमुख अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली याचा आनंद आहे. सुरुवातीला दोन वेगवेगळ्या पध्दतीचे डायलॉग झाल्यानंतर मला दिग्दर्शकांनी परत वेगळे डायलॉग्ज दिले. त्यानंतर, ‘मी डान्सर आहे. मला तुम्हाला डान्स करून दाखवायचाय.’हे सांगितलं. माझा हा आत्मविश्वास त्यांना खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं. ऑडिशन झालं आणि एक महिन्याने मला फोन आला. ‘तुला ड्रायव्हिंग येतं का?’ हे विचारण्यासाठी आलेल्या या फोनवर खरंतर मी मोठ्या आत्मविश्वासाने पण ‘हो, येते’ (ड्रायविंग नीटस जमत नसल्यामुळे) असं खोटं सांगितलं होत. मग मला फिल्म साइन करण्यासाठी बोलावण्यात आलं.
निरीक्षण आलं कामी…
मराठी चित्रपट म्हटलं की, मराठी चोखं येणं अत्यंत गरजेचं असतं. पण लहानपणापासून सतत इंग्रजी भाषेशी सबंध येत असल्यामुळे, माझं मराठी फारस चांगलं नव्हतं. त्यामुळे चित्रपट मिळाल्यानंतर मी मराठीवर काम केलं. माझ्या भूमिकेसाठी आवश्यक अनेक गोष्टी मी ट्रेनमधून प्रवास करताना, कॉलेजमध्ये असताना माझ्या निरीक्षणातून शिकले होते. दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून नवीन शिकत आणि त्यांचे स्वभाव, वागणूक मी आधीपासून टिपत होते. त्याचा उपयोग मला ‘बकाल’मधील भूमिकेसाठी झाला.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)