आपल्याला आवडतं म्हणून अभिनय करायचं असं अनेकांना वाटतं. पण यात काम मिळेल कि नाही हि भीतीही असतेच. त्यामुळे आवड असली तरी आपण नोकरीच करायची असं मनाशी पक्क करत तिने एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल. पण अखेर आवड ती अभिनयाकडे वळली. इथे स्थिरावली.
‘जुळून येती रेशीम गाठी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा मालिका तर ‘चि. व चि. सौ. का.’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मन जिंकली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील ती अंतिम स्पर्धकांमधील एक ठरली.
येत्या काळात नवीन नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसोबत तिला निर्मिती क्षेत्राकडे वळायचं. प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या स्टार ऑफ द वीक मधून जाणून घेऊया अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बद्दल…
संपूर्ण नाव : शर्मिष्ठा भरत राऊत
जन्म तारीख आणि ठिकाण : २२ एप्रिल, मुंबई
शिक्षण : एमबीए, फायनान्स
अभिनयावर शिक्का मोर्तब…
ठाण्यात एकत्रित कुटुंबात माझं बालपण अगदी आनंदात गेलं. लगोरी, लपंडाव, चोर पोलीस हे आमचे आवडीचे खेळ. लहानपणी मी खूप खोडकर होते. अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा माझा अजिबातच विचार नव्हता. सर्वसामान्यासारखी मलाही ९ ते ६ नोकरी करायची आहे असं माझं सोप्प गणित होत. त्यासाठी मी एमबीए फायनान्सचं शिक्षणही घेतलं. छंद म्हणून मी बालनाट्यांमधून काम केलं करायचे, सोबतचं सातवीत असल्यापासून अनेक प्रायोगिक नाटकांमध्येही मी काम करत होते.भरतनाट्यमचं ही प्रशिक्षण घेतलं आहे. शाळेत पथनाट्यामध्ये काम करण्यापासून माझी अभिनयाची सुरुवात झाली. पथनाट्यातील मूळ सूत्रधाराच्या भूमिकेत असणारी मी अर्ध्याहून अधिक संवाद विसरले होते. तरी अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मला मिळालं होतं. कॉलेजमध्ये असताना विविध स्पर्धांमधून आमचा ग्रुप सहभाग घ्यायचा त्यांच्यासोबत मीही काम करायचे. एवढं सगळं मी करत असले तरीही अभिनय क्षेत्राचा मी करिअर म्हणून अजिबातच विचार केला नव्हता. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला नोकरीही मिळाली होती. त्याच्या सोबतीने केवळ आवड जपता यावी म्हणून मी सुरुवातीचा काही काळ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर काही वर्षांनी मला मी मराठी वाहिनीवर मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. इथे स्थिरावता आलं नाही तर एमबीएचा पर्याय माझ्या सामोरं होताच. त्यामुळे स्वतःला दोन वर्षांचा अवधी देत मी ही संधी स्विकारली. या दोन वर्षात स्ट्रगल सुरु होता. ही दोन वर्ष संपत आली आणि त्याचं दरम्यान ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत मला काम मिळालं. प्रमुख खलनायिका असलेली हि माझी पहिली भूमिका ठरली. मग माझा प्रवास सुस्साट सुरु झाला. ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीम गाठी’ अशा मालिकांसोबत ‘चि. व चि.सौ.का’ या चित्रपटातही काम केलं. पुढे जाऊन निर्माती म्हणून या क्षेत्रात काम करायचं माझं स्वप्न आहे आणि म्हणून त्यातील अनेक बारकावे शिकण्यासाठी दोन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्मिती म्हणून काम पाहिलं. त्यामुळे अभिनयाचं किंवा या क्षेत्रातील कोणतंही रीतसर प्रशिक्षण मी घेतलं नसलं तरी मिळणाऱ्या कामांमधून आणि सहकालाकरांकडून नेहमी शिकत राहून आज पर्यंत हा प्रवास सुरु आहे.
छंद व्यवसाय बनतो तेव्हा…
अभिनय क्षेत्रात जम बसला नाही तर हे क्षेत्र सोडून परत नोकरीकडे वळण्याचा माझा विचार अभिनयातील माझं काम सुरु झाल्यामुळे खुंटला गेला. सुदैवानं कामातून काम मिळतं गेली. तुमचा छंद ज्यावेळी तुमचा व्यवसाय बनतो त्यावेळी आपोआपच त्यातून काहीतरी चांगलं घडतं हे माझ्या बाबतीतही घडलं. शिवाय, मॅनेजमेंट माझ्या रक्तात असल्यामुळे तिथल्या शिक्षणाचा, तिथल्या सवयीचा मला इथे चांगला उपयोग होतो. आताही एक्झी-प्रोड्युसर म्हणून काम करताना मॅनेजमेंटमधील सगळ्या स्किल्स वापरून काम करते. त्यामुळे शिक्षणाचा सगळीकडेच छान उपयोगही होत आहे. सोबतच या क्षेत्रात अभिनय सोडल्यास मला येत्या काळात निर्माती म्हणून नाव मिळवायचं आहे. आताच्या काळातील या क्षेत्रातील स्पर्धा बघता एक जोडधंदा असणं अत्यंत गरजेचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये मला माझा बिझनेस सुरु करायचा आहे. त्यामुळे माझं एखादं रेस्टोरंट किंवा फूडजॉईन असावं असं माझं स्वप्नं आहे. पण कामाच्या बाबतीत हे क्षेत्र शाश्वत नसल्यामुळे जोडधंदा असणं गरजेचंच आहे असं मला वाटतं .
पहिलं प्रोत्साहन महत्त्वाचं…
शाळेत असताना ‘लोकसंख्या’ नावाचं पथनाट्य केलं होत. स्क्रिप्टमधील अर्ध्याहून अधिक पान आपण गाळली आहेत. मग आपल्याला काही बक्षीस मिळणार नाही हे गृहीत धरूनच मी मैत्रिणीसोबत मागे मस्ती करत बसले होते. अचानक मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचं जाहीर झालं. त्यावेळी माझ्या शिक्षकांनी फार कौतुकाने माझ्याकडे पाहिलं होतं.. त्यातून मला प्रोत्साहन मिळालं आणि मी हळूहळू अभिनय करायला लागले. त्यामुळे माझ्या शाळेतील अष्टपुत्रे बाई आणि चोपडे बाई यांचा मला अभिनय क्षेत्राकडे वळवण्यासाठी मोलाचा वाटा आहे. मला बक्षीस देताना त्यांनी मला दिलेली शाब्बासकी आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
फटकळ स्वभावाची मी…
मी फटकळ स्वभावाची आहे. माझ्या जे मनात आहे तेच माझ्या तोंडावर येतं. माझ्या या स्वभावाचा मला इंडस्ट्रीमध्ये खूप फायदा झाला. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नशिबाने मला फसवणार कोणी मिळालं नाही. त्यामुळे काम मिळवण्यासाठी कोणत्याही गैरप्रकाराला सामोरं जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही. कामातून अनेक काम मिळतं गेली. माझ्या स्वभाव पाहता अनेक खलभूमिका मिळाल्या. स्पष्टवक्ती असल्यामुळे मी या सगळ्यात फारशी अडकली नाही. नायिकेपेक्षाही मला खलनायिका साकारणं सर्वाधिक आवडतं. प्रत्येक व्यक्तीत कमी-अधिक प्रमाणात राग, ईर्षा असतेच. आपण जे नाही आहोत ते साकारण्यात खरी मजा आहे. त्यामुळे माझ्यातील थोड्या फार राग आणि ईर्षेला प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असते.चित्रपट आणि नाटकात वेळेची मर्यादा असल्यामुळे खलभूमिकेतील अनेक घटना थोडक्यात मांडल्या जातात. मात्र मालिकांमध्ये याच घटना अधिक वेगळ्यापद्धतीनेही मांडल्या जातात. त्यामुळे स्वतःला पटेल अश्या पद्धतीने केलेलं काम आपोआपचं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.
नाटक माझ्यासाठी रिफ्रेशमेंट
मला सगळ्या माध्यमांपैकी नाटकं आणि टेलेव्हीजन हि दोन माध्यमं सर्वाधिक आवडतं. मी अनेक वर्ष मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या. त्यातील अनेक मालिका खूप मोठा काळ चालल्या. परंतु मालिका करताना सोबतीने विविध नाटकांतील कामही सुरु असतात. त्यामुळे मालिकेतील भूमिकेचा कंटाळा आला तरी तो कंटाळा सुरू करण्याचं काम नाटकं करतं. शिवाय, नाटकाच्या निमित्तानं अनेक प्रेक्षकांना भेटता येतं, त्यांचे अभिप्राय जाणून घेता येतात. त्यामुळे मालिकेच्या सेटवर गेल्यावर मी फ्रेश असते. त्यामुळे मालिका कितीही काळ चालली तरी मला कंटाळा येत नाही. मुळात माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम असल्यामुळे मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही येणार नाही. त्यामुळे सततच्या कामांतून मी नेहमी आनंदी आणि उत्साही असते. कदाचित त्याचंमुळे सोशल मिडीयावर मला ‘लेडी रणवीर सिंग’ वैगरेंच्या कमेंट येतात. जसं टेलिव्हिजनमुळे घराघरात पोहचता येतं तसं वेबसिरीज हे युथपर्यंत पोहचण्याचं प्रभावी माध्यम आहे. आता येत्या काळात वेबकडे वळण्याचा विचार आहे. वेळ आणि कामाची संधी मिळाली तर वेबसिरीज करायलाही आवडेल. शिवाय सध्या एका नवीन नाटकाच्या शोधात आहे.
ड्रीम रोल…
माझ्या ड्रीम रोल बद्दल सांगायचं झाल्यास मला ऐतिहासिक भूमिका साकारायची आहे. त्यातही आनंदीबाईं जोशी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्वीकारेन. शिवाय,सध्या सुरु असलेल्या ‘स्वामिनी’ मालिकेतही मला काम करण्याची संधी काही कारणांमुळे हुकली. शिवाय एक प्रेमकथेवर आधारित काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. शिवाय, हिंदीमध्ये रोहीत शेट्टी, संजय लीला भन्साली, नसरुद्दीन शहा, अमिताभ बच्चन, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्या सोबत काम करण्याचं माझं स्वप्नं आहे.
कधीकधी प्रेक्षकही चुकतात…
आम्हा कलाकारांवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम असतं. आमच्या प्रत्येक कामावर ते भरभरून प्रेम करतात. परंतु अनेकदा त्यांचं वागणं चुकीचं असतं. आपण कुठे आहोत, परिस्थिती काय आहे याचं काही भान न ठेवता फोटो किंवा सेल्फी काढायला येतात. त्यांचं हे वागणं खरंच चुकीचं असतं. शिवाय, अनेकदा कलाकार खात असताना वैगरे चाहते लपून फोटो काढतात हे प्रचंड खटकतं. मला स्वतःला हि गोष्ट अजिबातच आवडतं नाही. जेवतानाच वेळ प्रत्येक व्यक्तीचा त्याने स्वतःला दिलेला वेळ असतो. त्यामुळे त्यावेळी कोणीही कोणालाही त्रास देऊ नये असं मला वाटतं. सोबतच, अनेकदा मालिका लांबली कि, ‘मालिका केव्हा बंद करणार.’ ‘खूप बोरिंग दाखवता बुवा तुम्ही, ते बंद करा’ असं प्रेक्षक सांगतात.पण एका मालिकेवर अनेक लोकांची पोट अवलंबून असतात. आमच्यासाठी हे काम आहे. हे प्रेक्षक विसरतात. यावर माझं असं सांगणं असतं, ‘प्रेक्षकांच्या हाती रिमोट असतो, त्यांनी चॅनल बदलावं.’ प्रत्येक प्रोजेक्टचं एक ठराविक वय असतं. प्रेक्षकांवर अनेक गणित अवलंबून असतात. हे त्यांनी लक्षात घेऊन व्यक्त व्हायला हवं. तुम्ही पाहता म्हणून त्या मालिकांना टीआरपी मिळतो. मालिका पाहणं तुम्ही थांबवलं कि आपोआपच मालिका बंद होईल. त्यामुळे प्रेक्षकांचं असं म्हणणं मन दुखावणार असतं.
ट्रोलर्स त्रासदायक…
आयुष्यात मी कधीही ट्रोल झाली नाहीये. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मी स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात गेले होते त्याही वेळीही मी ट्रोल झाले नाही. पण बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात एका टास्कसाठी आत गेली असता प्रचंड वाईट पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. त्याचा खूप त्रासही होतो. पण या सगळ्याची सवय झाली आहे आणि म्हणूनच ट्रोल आणि ट्रोलर्सना दुर्लक्षित करायला मी शिकले आहे. पण उगाच कुटुंबाला होणारा त्रास संताप आणणारा असतो. पण,माझ्यात खूप सहनशक्ती आहे हे मला ‘बिग बॉस’मुळे लक्षात आलं. एखाद्या वाईट गोष्टीकडे सहजपणे दुर्लक्ष करता येऊ शकतं हे कळलं. आयुष्यात महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी मी यातून शिकले.
आमचं नातं स्पेशल..
‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेच्या निमित्ताने ललित प्रभाकर सोबत ओळख झाली. त्या मालिकेत आम्ही भाऊ-बहीण साकारत होतो. मालिका संपल्यानंतर मात्र आम्ही हे नातं कायम जपलं आहे. आजही प्रत्येक रक्षाबंधन, भाऊबीजला आम्ही भेटतो. त्यामुळे ऑफ स्क्रीनही आमचं नातं तेवढंच घट्ट आहे.
झटपट बोल…
शर्मिष्ठाचं टोपणनाव (निक नेम)
-शमा
शर्मिष्ठा अभिनेत्री नसती तर…
-बिझनेस वुमन
अभिनयाव्यतिरिक्त काय आवडतं?
-कुकिंग,
शर्मिष्ठाचं फर्स्ट क्रश?
– खूप आहेत… पण त्यातही श्रेयस तळपदे, सुमित राघवन, आमिर खान, अमिताभ बच्चन
स्वतःमधील न आवडणारी गोष्ट
-प्रेमापोटी कोणावरही पटकन विश्वास ठेवते
स्वतःमधील आवडणारी गोष्ट
-सध्या एकही नाहीये (अजून शोधतेय, कारण अनेक गोष्टी शिकतं आहे)
शर्मिष्ठाचा वीक पॉइंट
-लोकांवर पटकन विश्वास ठेवते पण त्याचा नंतर त्रास होतो.
शर्मिष्ठाची स्ट्रेंथ
-माझे बाबा
शर्मिष्ठाचा लाईफ फंडा
-वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा, काही मनात ठेऊ नका आणि आनंदाने जीवन जगा
शर्मिष्ठाची आवडती अभिनेत्री
-स्मिता पाटील, शबाना आझमी
आयुष्यात न विसरता येणारा क्षण
-बिग बॉस पहिल्या पर्वाची फायनलिस्ट झाले तो क्षण
इंडस्ट्रीमधील चांगल्या मैत्रिणी
-मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते
सर्वाधिक वापरलं जाणार सोशल मिडिया अप
-इंस्टाग्राम
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)