“महाराष्ट्राचा सुपरस्टार” मधून घराघरात पोहचलेला “माझिया प्रियाला” मधला प्रेमळ अभि ते माझ्या नवऱ्याची बायको” मधला गुरुनाथ सुभेदार अश्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करणारा अभिजीत खांडकेकर.
नाटक, चित्रपट, मालिका आणि एक बहुपैलु निवेदक. स्टाईल चा अनोखा अंदाज जपून त्याने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्लॅनेट मराठी मॅगझीन “स्टार ऑफ द वीक” मधून आम्ही काही खास गप्पा मारल्या आहेत….
अभिजीत खांडकेकर
वाढदिवस : ७ जुलै १९८६
जन्मठिकाण : पुणे
शिक्षण : मास कम्युन्यूकेशन (mass communation)
“मालिका मुळे करिअरला नवीन वळण”
अभिनेता म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला शो म्हणजे ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ इथून आम्ही सगळेच कलाकार म्हणून लोकांसमोर आलो. एक कलाकार म्हणून करियरची सुरुवात इकडून झाली. मग झी सारखं मोठं चॅनेल आणि मग अभिनयासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी इथून शिकत गेलो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मुळे मी प्रकाशझोतात आलो. सगळे एक अभिनेता म्हणून ओळखायला लागले. या कार्यक्रमामुळे अभिनय क्षेत्रातील स्ट्रगल कमी झाला. अनेक ठिकाणी ऑडिशन देणं सुरू झालं. दिग्दर्शक आणि काही प्रोडक्शन ला भेटी देणं चालू असताना एकीकडे चित्रपट आणि मालिकांसाठी ऑडिशन देत असताना मला “माझिया प्रियाला” ही मालिका मिळाली. पहिली मालिका मिळणं हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता, कारण तेव्हा सासू सुनांच्या मालिका येत असताना त्यात एखादी रोमॅंटिक मालिका येणं आणि लोकांना ही प्रेम कहाणी आवडणं त्यात लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणं. मग माझा खऱ्या अर्थाने इथून प्रवास सुरु झाला. माझिया प्रियाला नंतर जवळपास ६ वर्ष मी दुसरी मालिका केली नाही. मग या मधल्या काळात इव्हेंट्स, चित्रपट यांच्यासाठी मी निवेदक म्हणून काम केलं. ६ वर्षांनी “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेसारखी संधी मला मिळाली आता सव्वा तीन वर्षे ही मालिका करतो आहे. लोकांना सुद्धा ही मालिका आवडत आहे आणि लोकप्रिय ठरते आहे.
“कलाकार आहे नशीबवान”
एक अभिनेता म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारता येतात, एक वेगळं आयुष्य जगून बघता येतं. आपल्याला रोजच्या आयुष्यात एकाच रोल मध्ये जगावं लागतं तर कलाकारांचं असं नसतं. कलाकार हा फार नशीबवान असतो कारण त्याला विविध भूमिका जगता येतात आणि साकारता येतात. माझ्या पहिल्या मालिकेत मी अगदी एक आदर्श नवरा, मुलगा, प्रियकर होतो अशी एक रामासारखी भूमिका बजावत असताना आताच्या मालिकेत एकदम विरुद्ध भूमिका साकारतो आहे. नकारात्मक भूमिका साकारायला मिळते आहे. माझ्यासाठी प्रत्येक रोल किंवा भूमिका साकारणं हे आव्हानात्मक आहे. मला असं नेहमी वाटतं की एक अभिनेता म्हणून मी प्रत्येक भूमिकेत दिसलो पाहिजे, नव्या भूमिका साकारल्या पाहिजे.
“मालिकेनंतर रंगभूमी कडे वळेन” / “लवकरचं नाटकात काम करेन”
रंगभूमीवर काम करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो डेलीसोप मुळे देता येत नाही म्हणून काही काळ नाटकापासून मी लांब आहे. मध्यंतरी मालिका चालू असताना मी एक व्यावसायिक नाटक केलं ज्याचे २५ प्रयोग सुद्धा झाले. आता मालिका संपल्या नंतर मी एखादं नाटक करेन.
“बायको माझी डिझायनर”
फॅशन आयकॉन असं नाही सांगता येणार. जर कोणी काही वेगळं आणि चांगलं ट्राय केलं असेल आणि त्यात काही वेगळं प्रयोग असेल तर मला ते ट्राय करून बघायला आवडतं. अगदी रणबीर पासून आयुषमान किंवा मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे उत्तम स्टाईल ट्राय करतात. फॅशन बद्दल एक उत्तम नजर असली पाहिजे, फॅशन सेन्स असला पाहिजे. माझ्या फॅशन च्या बाबतीत माझी बायको सुखदा ही मला नेहमी मदत करते तिच्याकडे एक बेस्ट डिजाईनर वृत्ती आहे. आमच्या या निमित्ताने काही आवडी निवडी जुळतात, मला काही तरी ट्राय करून बघायचं असतं मग ती त्यासाठी सल्ले देते. तीच कधीतरी माझ्यासाठी काहीतरी डिजाईन करते. सतत काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो.
“निवेदक ते अभिनेता”
निवेदक आणि सूत्रसंचालक हे काम आज सुद्धा चालू आहे. सध्या मी अभिनय आणि निवेदक म्हणून काम करतो आहे. मी माझं करियर निवेदनापासून सुरू केलंय. वयाच्या १६ वर्षी एका लोकल वृत्त वाहिनी साठी वृत्त निवेदक म्हणून मी काम केलं त्यानंतर रेडिओ मध्ये मी पाच ते सहा वर्षे मी काम केलं. अभिनेता होण्याआधी मी विविध माध्यमातून निवेदन करत होतो. आता टेलिव्हिजन वर आल्यावर अभिनेता आणि निवेदक हे कॉम्बिनेशन तयार होतं तर तेव्हा सारेगमप चे दोन सिजन केले. झी च्या अनेक कार्यक्रमांसाठी निवेदन केलं. देशात परदेशात अनेक निवेदनाची काम केली. तर माझ्यात असलेल्या दोन्ही कलांमुळे मी अभिनय आणि निवेदक अशी दुहेरी भूमिका बजावतो आहे.
“भविष्यात सुखदा सोबत काम करायचं”
सुखदा आणि मला नक्कीच सोबत काम करायला आवडेल. आम्ही अजून सोबत काम नाही केलंय पण भविष्यात नक्कीच सोबत काम करू. या पूर्वी आम्ही दोघांनी सोबत थोडंफार काम केलंय. काही जाहिराती, एक नाटक आणि स्टार प्रहाव वर आम्ही एक एपिसोडिक काम केलंय. ती सुद्धा तिच्या हिंदी आणि मराठी नाटकात व्यस्त आहे. मला फार हेवा वाटतो ती पृथ्वी थिएटर सारख्या संस्थेसाठी एवढं उत्तम काम करते तर नक्कीच मला तिच्यासोबत काहीतरी वेगळं काम करायला आवडेल.
“क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी मी ग्लॅमरस नाही”
माझं क्षेत्र ग्लॅमरस आहे पण मी ग्लॅमरस नाही आहे असं मला नेहमी वाटतं. अभिनयाला एक वलय आहे ग्लॅमर आहे पण या व्यतिरिक्त मी एक माणूस म्हणून जगतो. आपल्याकडे अभिनयाला एक एवढं मोठं वलंय प्राप्त झालंय की लोकं त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. इथे लोकांकडून मिळणारं प्रेम खूप आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला एवढं प्रेम आणि कामामुळे प्रसिद्धी मिळते. पण यांची दुसरी बाजू अशी की तुम्हाला पब्लिक फिगर म्हणून फार गोष्टी जपून कराव्या लागतात. राजकारण्या नंतर अभिनेत्यांवर सुद्धा बारकाईने नजर ठेवली जाते. खऱ्या आयुष्यात मला फार साधं जगायला आवडतं. कारण प्रसिद्धी ही एका बुडबुडया सारखी आहे. आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यात किती वाहवत जायचं हे आपल्यावर आहे. मला माझी माणसं जपून ठेवायला आवडतात, आजूबाजूला सतत कोणीतरी हवं असतं, साध्या साध्या गोष्टी मध्ये आनंद मी शोधत असतो. त्यामूळे क्षेत्राला जरी वलंय असलं तरी मी खऱ्या आयुष्यात मी ग्लॅमरस नाही.
स्लॅमबुक ….
आवडता चित्रपट : जिंदगी ना मिलेगी दोबारा
आवडती जागा : फिरण्यासाठी चांगली सोबत असेल तर कुठेही फिरायला आवडतं.
आवडता अभिनेता : रणवीर सिंग, अमिर खान, शाहरुख खान.
आवडती अभिनेत्री : जुलिया रॉबर्ट्स.
आवडती डिश : आजकाल घरगुती जेवणं आवडायला लागलंय. (अगदी साधा वरण भात, नॉनव्हेज)
आवडत सोशल मीडिया : इन्स्टाग्राम
आवडते गायक , गायिका : अवधूत गुप्ते, महेश काळे, अजय-अतुल, श्रेया घोषाल, बेला शेंडे.
आवडत नाटक : प्रशांत दामलेंची सगळी नाटकं
आवडत पुस्तक : पुलं च कुठलंही पुस्तक
आवडता लेखक : पुलं देशपांडे
आवडती वेबसिरीज : सेक्रेड गेम्स, फ्रेंड्स
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)