“घडलंय बिघडलंय” “शेजारी शेजारी पक्के शेजारी”, “कॉमेडी ची बुलेट ट्रेन”, “डब्बा गुल”, “फु बाई फु“, अश्या विविध मालिका आणि कॉमेडी शो मधून घराघरात पोहचलेली.
विनोदाच्या अनोख्या कौशल्याने सगळयांना खळखळून हसवणारी कॉमेडी ची राणी “प्राजक्ता हनमघर”
माणसात रमणारी तरीही एकांत आवडणाऱ्या या कॉमेडीच्या राणीचा अनोखा प्रवास आणि प्लॅनेट मराठीच्या नव्या चित्रपटातल्या तिच्या नव्या भूमिके बद्दल काही खास गप्पा जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझीन मधून…
प्राजक्ता हनमघर
संपूर्ण नाव : प्राजक्ता हनमघर
जन्मठिकाण : मुंबई
वाढदिवस : २३ सप्टेंबर
लग्नाचा वाढदिवस : १४ ऑगस्ट
शिक्षण : एम.ए. मराठी
“विनोदाने मला गंभीरपणे घेतलं”
“हास्याची राणी” अशी ओळख असणं फार मस्त आहे. इतकी वर्षे केलेल्या कामाचं चीज झालंय असं वाटतंय. मी असं नेहमीच म्हणते मी अनेक वर्षे विनोदाला गंभीर पणे घेतलं तर एक वेळ अशी आली विनोदाने मला गंभीर पणे घेतलं.
“कलेसाठी रुईयात गेले”
मी शाळेत असल्यापासून अभिनय करत होते. कॉलेज मध्ये हे सगळं अनुभवण्यासाठी मी खास “रुईया” कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. रुईयात कलेला फार वाव आहे म्हणून मी तिथे जाऊन शिक्षण पूर्ण केलं.
“विनोदाचा गंध सापडला”
मी नेहमी म्हणते माझा बाप प्रोड्युसर नाही त्यामुळे जे रोल येतील त्या उत्तम प्रकारे पार पाडायच्या इतकंच माझ्या हातात होतं. विविध कामं करताना, वेगळ्या भूमिका अनुभवताना मला जाणवलं की आपल्याला विनोदाचा वेगळा गंध आहे म्हणून मी विनोदाकडे वळले. “घडलंय बिघडलंय” ही पहिली मालिका करताना मला जाणवलं की आपल्याला विनोद चांगल्या प्रकारे करता येतो, इथे माझी आणि विनोदाची गट्टी जमली म्हणून मी विनोदी भूमिका करायला लागले.
“ग्लॅमर मुळे बदल झाला नाही”
अभिनेत्री झाल्यावर नक्कीचं ग्लॅमर येत पण मी तशी फार मातीतली आणि माणसांमधली आहे त्यामुळे या ग्लॅमर ने माझ्यात काही फार बदल झाला नाही असं मला वाटतं.
“स्पष्टवक्ती ते प्रेमळ प्राजक्ता”
खऱ्या आयुष्यातली प्राजक्ता खुप स्पष्टवक्ती आहे. खरं बोलणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी, कामावर निष्ठा असणारी, कामात जीव ओतून काम करणारी, खूप वाचन करणारी, सतत डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टींकडे बघणारी आणि व्यक्त होणारी आहे.
“प्रासंगिक विनोदावर भर देते”
मला असं वाटतं प्रत्येकात विनोद ओळखण्याचे, करण्याचे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. आता आपण विनोद करू या अर्थाने मी कधीच विनोद करायला जात नाही. खूप छोट्या प्रसंगातून एका तिरकस दृष्टीकोनातून आपोआप विनोद निर्मिती होत असते, त्यामुळे तो प्रयत्नपूर्वक करायला मी जात नाही. माझा प्रासंगिक विनोदावर भर आहे.
“आदर्श आहे कारण….”
माझी पहिली मालिका “श्रीरंग गोडबोलें” सोबत केली, त्यामुळे ते माझ्या फार जवळचे आहेत. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक तेच होते. या सगळ्या प्रवासात मी त्यांच्या कडून अनेक गोष्टी कळत-नकळत शिकत होते. रंगा सरांकडून मी खूप गोष्टी शिकले. सध्या प्लॅनेट मराठी सोबत मी एक नवा चित्रपट करते तर या चित्रपटाचा दिग्दर्शक “शंतनू रोडे” त्याच्याकडून गेल्या काही दिवसात मी प्रचंड गोष्टी शिकले. मी एवढा कामावर प्रेम असलेला त्याच्या सारखा दिग्दर्शक पाहिला नाही आहे. शंतनु ची कामावरची निष्ठा आणि कामावरच प्रेम या गोष्टी खूप भारावून टाकतात. या दोन व्यक्ती खूप मस्त आहेत.
“साजेसा रोल मिळाल्याचा आनंद”
प्लॅनेट मराठी च्या “गोष्ट एका पैठणीची” या आगामी चित्रपटात मला एक छान रोल मिळाला आहे. मला साजेसा असा हा बेस्ट रोल आहे. प्लॅनेट मराठी सोबत काम करताना छान वाटतंय, प्रत्येक कलाकाराला योग्य त्या सोयी सुविधा प्लॅनेट ने उपलब्ध करून दिल्यात आहेत म्हणून काम करायला खूप मज्जा येते.
“तरुणाईची कौतुकास्पद कामगिरी”
आपल्या कडची तरुण मंडळी काही तरी नवीन करतात याचा आनंद आहे. खूप गोष्टींमधून विनोद निर्मिती चा अनोखा प्रयत्न आजची पिढी करत आहे तर हे नक्कीच कौतुकास्पद आहे. नवीन कलाकार, नवीन कला निर्मिती करतात याचा आनंद आहे.
स्लॅम बुक….
आवडता चित्रपट – असे अनेक चित्रपट आहेत जे मी पुन्हा पुन्हा पाहिले आहेत. खूप चित्रपट आवडीचे आहेत.
आवडता विनोदी कलाकार – सतीश तारे
आवडता अभिनेता – मोहन जोशी
आवडती अभिनेत्री – रंजनाबाई ( रंजना देशपांडे )
आवडती डिश – केळ्याचे वेफर्स आणि चहा
आवडत सोशल मीडिया – फेसबुक
आवडत नाटक – वाडा चिरेबंदी / संगीत देवबाभळी
आवडत पुस्तक – कीप मुविंग
आवडता लेखक – महेश एलकुंचवार
आवडती वेबसेरीज – मेड इन हेवन / इंनसाइड एज
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)