मेकॅनिकॅल इंजिनिअर म्हणून शिक्षण पूर्ण करून, त्यांनी स्वतःचा व्यवसाय थाटला. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण काही कारणामुळे ते शक्य झाल नाही. पुढे जाऊन या आपण करत असलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या मॉडेलिंग कडे तो वळाला. अनेक जाहिरातींमधून नावारूपास येऊन पुढे जाऊन मराठी, हिंदी, तमिळ, तेलगु, गुजराती, बंगाली बरोबरच हॉलीवूडपटामध्येही त्याने महत्त्वपूर्ण काम केलं फोटोग्राफी आणि भटकंतीची आवड जपत त्यांनी अनेक पुस्तकाचं लेखन केलं. चित्रपटातील विविध भूमिकांबरोबरीने त्यांच्या विविध पुस्तकांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहे. ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊया एवर्ग्रीन आणि अष्ठपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या मॉडेल, अभिनेता आणि लेखक मिलिंद गुणाजी बद्दल…
संपूर्ण नाव : मिलिंद गुणाजी
जन्म तारीख आणि ठिकाण : २३ जुलै १९६१, मुंबई
शिक्षण : मेकॅनिकॅल इंजिनिअरिंग, पॉलिमर टेक्नोलॉजी
अभिनय केवळ योगायोग
माझं बालपण अगदी मजेत गेलं. लहान असताना किंवा अगदी कॉलेजमधील जीवनात माझा खेळण्याकडे अधिक कल असायचा. त्यामुळे चित्रपट आणि स्टार याबद्दल मला कुतूहल किंवा आकर्षण कधीच नव्हतं. त्यामुळे आवडं नाही म्हटल्यावर मी फारसे चित्रपट बघत नसे. पण, मला नाटकं बघायला प्रचंड आवडायचं. विशेष म्हणजे मराठी नाटकांविषयी विशेष आकर्षण असायचं. माझ्या आई-बाबांना नाटकं पाहण्याची आवड असल्यामुळे ते मला अनेकदा नाटकं बघयला घेऊन जात. कदाचित याचमुळे ही आवड वाढत गेली असावी…. हॉलीवूडच्या चित्रपटांच त्यावेळी भलतच अप्रूप असायचं. पण खेळामधील माझी आवडं लक्षात घेता, ‘आपण क्रीडा क्षेत्राचीच करिअर म्हणून निवड करायची असं’ त्यावेळी ठरवलं होतं. त्या दृष्टीने मी प्रयत्नही करतं होतो. त्यात क्रिकेट आणि बॅटमींटन हे माझे आवडीचे खेळ. यात मी उच्च स्थरांपर्यंत खेळलो आहे. अखेर हे सगळ सुरु असताना मी माझ इंजिनिअरिंगपर्यंतच शिक्षण पूर्ण करून गोव्यात स्वतःचा कारखाना सुरु केला. कालांतराने हा व्यवसाय बंद करून एका नवीन व्यवसायाची सुरुवात केली. यात मी मार्केटिंगवर काम करत असल्याने मुंबईतून काम सांभाळनं सहज शक्य व्हायचं. त्यामुळे, ‘काम झाल्यानंतर फावल्या वेळेत करायचं काय?’ असा प्रश्न पडला होता. बरं, क्रीडा क्षेत्रात करिअर करायचा विचारही माझ्या डोक्यात कायम होताचं. पण कंपनीच्या एका कामादरम्यान माझ्या उजव्या खांद्याला इजा झाली आणि त्यामुळे स्पोर्ट्सपर्सन म्हणून करिअर करण्याचा माझा विचार मागे पडला. मग माझ्या काही मित्रांनी, ‘तुझी पर्सनालीटी उत्तम आहे, तर तू मॉडेलिंग कर…’ असं सुचवलं. म्हणून मी त्या काळचे आघाडीचे फोटोग्राफर असणार्या गौतम राजाध्यक्ष यांची भेट घेतली. मुळात इंजिनिअर म्हणून शिक्षण घेऊन नंतर व्यवसायात रमलेल्या मला या क्षेत्राची फारशी माहिती नव्हती. आमच्या भेटीच्या अगदी दुसर्याच दिवशी गौतम सरांनी मला माझे फोटो काढण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्याकाळच्या नामांकित एजन्सीजमध्ये माझे फोटो देऊन आलो. काही तासांत शंतनू शेगडे कडून मला फोन आला. अनेक नामांकित ब्रॅन्डसाठी काम करणाऱ्या एजन्सीमधून फोन आल्यानं मला आनंद झाला होता. मला स्क्रीनटेस्ट साठी बोलावण्यात आला. पण स्क्रीनटेस्ट म्हणजे काय हे मला अजिबात माहिती नव्हतं. अखेर माझ्या पहिल्या शुटिंगसाठी झाल्यानंतर दिल्लीला रवाना झालो. त्यानंतर हळूहळू चित्रपटाच्या ऑफर्स यायला सुरुवात झाली. सुरुवातीला या ऑफर्स मी नाकारत होतो. या दरम्यान अनेक मोठ्या जाहिरातींसाठी मी काम केलं. आणि इथून माझा इंडस्ट्रीमधील प्रवास सुरु झाला. मग विविध मालिका आणि चित्रपटामधून मी काम करत राहिलो.
रातोरात झालो स्टार…
‘कुरुक्षेत्र’ नावाच्या मालिकेमध्ये मी काम केलं. माझं ते काम बघून मुकेश भट्ट यांनी मला फोन करून भेटायला बोलवलं आणि ‘फरेब’ चित्रपटामधील मध्यवर्ती भूमिकेसाठी मला विचारण्यात आल. ‘फरेब’ मधील माझ्या खलभूमिकेचं खूप कौतुक झालं. त्या वर्षाच्या सगळ्याच मानाच्या आणि नामांकित पुरस्कारांच्या नामांकनाच्या यादीत माझं नाव होतं. या चित्रपटामुळे मी रातोरात स्टार झालो आणि इथून माझी खरी सुरुवात झाली असं मला वाटत. त्यानंतर ‘विरासत’ चित्रपटातील माझी खलभूमिका गाजली, त्या भूमिकेसाठीही सलग दोन वर्ष अनेक पुरस्कार मला मिळाले. मग नायक आणि खलनायक साकारत करिअरला सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल दोनशेहून अधिक चित्रपटांमधून मी काम केल आहे. शिवाय, अजूनही मॉडलिंग करतो.
भटकंती माझी आवडं…
कॉलेजमध्ये असल्यापासून मला विविध गड-किल्ले, डोंगर-दऱ्यामधून फिरायला मला प्रचंड आवडतं होतं. विविध ठिकाणची माहिती असणारी अनेक दिग्गजांची पुस्तक मी वाचायचो. मला फोटोग्राफीची आवडं असल्यामुळे, मी माझी जीप काढून अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असे. मग फिरायला गेल्यावर जवळपासच्या एखाद्या गावकऱ्याला भेटून त्याच्या कडून त्या ठिकाणची सगळी माहिती, इतिहास जाणून घ्यायचो आणि त्याची नोंद करून ठेवायचो. असं करता-करता माझ्याकडे माहितीचा संग्रह झाला. मग ‘लोकप्रभा’ नावाच्या साप्ताहिकामध्ये लिहिण्यास सुरुवात केली. माळशेज घाटावर आधारित माझ्या त्या लेखाचं नाव होत ‘महाराष्ट्राचे कुलुमनाली-माळशेज घाट’. माझ्या त्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉडेलअसताना मी भटकंतीही करतो यामुळे लोकांना माझ्याबद्दल फार अप्रूप वाटायचं. मग यातूनच ‘अनोखी पर्यटन स्थळे’ हा माझा स्तंभलेख सतत पाच वर्ष सुरु होता. मग ‘माझी मुलूखगिरी’ नावाचं माझ पुस्तक प्रकाशित झाल. आज या पुस्तकाची सोळावी आवृतू बाजारत आहे. याच पुस्तकच इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं. आणि अखेर याच पुस्तकावर आधारीत ‘भटकंती’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तो कार्यक्रम अनेक काळ चालला. मग ‘भटकंती’ शो करताना नव्याने गवसलेल्या ठिकाणांवर आधारीत ‘भटकंती’ नावच पुस्तक लिहिलं ज्याची आता नववी आवृत्ती आहे. अशा तब्बल बारा पुस्तकांचं मी लेखन केल. यातील ‘अनवट ‘ नावाच्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाली आहे. मग ‘डिस्कव्हर महाराष्ट्र’या नव्या प्रोडक्शनची मी सुरुवात करून त्याचे साधारण २५ भाग केले याचा आनंद आहे.
नव्या भूमिका…
सध्या प्लॅनेट मराठीचीच निर्मिती असलेला आणि शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या एका माझ्या चित्रपटाच शुटींग सुरु आहे. त्याबरोबरच, यज्ञेश शेट्टीच्या ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ चित्रपटाचाही मी महत्वाचा भाग आहे. शिवाय, एका तेलगु चित्रपटाची शुटींग लवकरच सुरु होईल. यासोबतच, एखाद्या चांगल्या प्रोजेक्टच्या निमित्तानं वेबवर झळकता आलं तर मी नक्की वेबकडे वळेन.
भाषेचाच फरक…
कुठेही काम करताना फायनान्स फार महत्वाचा असतो. मी मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ अशा विविध भाषांतील चित्रपटामध्ये काम केल आहे. शिवाय हॉलीवूडच्या चित्रपटामधून मी काम केल आहे. या सगळ्यात मला हॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्रीची कामाची पद्धत आणि प्रोफेशनललीझम प्रचंड आवडतं. तिकडे सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात. पण चित्रपटाचा दर्जा पहिला तर आपले मराठी चित्रपट उच्च दर्जाचे असतात यात वाद नाही. फक्त त्याला व्यवस्थित सिनेमागृह मिळून ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचले तर त्याला तोड उरणार नाही आणि लोकांनाही त्याची मजा घेता येईल.
फिटनेस फंडा…
योग्य आहार आणि नियमित व्यायाम हा माझा फिटनेस फंडा आहे. शिवाय कमीत कमी दहा-बारा हजार पावलं मी दररोज चालतो. शिवाय नियमित जीम् करण्यावरही माझा कटाक्ष असतो.
राजकारणात रस नाही…
मी आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आम्ही एका कॉलनीत राहतो. त्यामुळे लहानपणापासून आमच्यात मैत्री आहे. त्यानाही फोटोग्राफीची आवडं आहे त्यामुळे आमच चांगलं जमतं. हेलिकॉप्टरमधून त्यांनी केलेल्या अनेक फोटोशूटवेळी आम्ही एकत्र काम फोटो काढले आहेत. अनेक किल्लेही आम्ही एकत्र फिरलो आहे. त्यावर आधारित एक पुस्तकही प्रकशित होऊन साधारण दहा दिवसात आठ हजारप्रतींची विक्री झाली आहे. त्यामुळे आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण, मला राजकारणात अजिबात रस नाही.
रॅपिड फायर…
आवडता अभिनेता
रोबिन विल्यम, किंग मार्टिन, बमन इराणी, अमिताभ बच्चन, दिलीपकुमार
स्वतः काम केलेला आवडता चित्रपट
– ‘विरासत’ आणि ‘फरेब’ माझे आवडते चित्रपट पण ‘गॉड मदर’मधील माझी भूमिका मला आवडते.
स्वतःमधील न आवडणारी गोष्ट
-खूप हायपर होतो. खूप वाट बघणं मला आवडतं नाही.
स्वतःमधील आवडणारी गोष्ट
-मी एखादी गोष्ट हातात घेतली कि ती मी पूर्ण करतो, माझी ही वृत्ती मला खूप आवडते.
आवडतं पर्यटन स्थळ
-हरिश्चंद्रगड
मिलिंद गुणाजींचा विक पॉइंट
-मी हळवा आहे , त्यामुळे भावनेच्या आहारी लवकर जातो. ज्यामुळे लोक मला फसवू शकतात.
अभिनय, मॉडेलिंग, लेखन, फोटोग्राफी?
-फोटोग्राफी
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)