सोलापूर सारख्या शहरातून येऊन अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री “दीप्ती धोत्रे”
“डोंब” या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करून “मुळशी पॅटर्न” या चित्रपटाने दिप्तीच्या अभिनय कौशल्याला वाव देत, दीप्ती खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीला आली.
दिप्तीच्या अनेक चित्रपटांना पुरस्कार मिळाले असून अभिनयाच्या सोबतीने दिप्तीने जिम्नॅस्टिक सुद्धा केलंय.
दिप्तीच्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासातील अनेक चढ उतार आणि तिच्या आगामी कामांबद्दल काही खास गप्पा जाणून घेऊ या “प्लॅनेट मराठी मॅगझीन” च्या “स्टार ऑफ द वीक” मधून….
संपूर्ण नाव : दीप्ती शंकर धोत्रे
जन्मठिकाण : सोलापूर
वाढदिवस : १० जानेवारी
शिक्षण : एमबीए ( MBA )
“एक सुटकेस घेऊन मुंबईत आले आणि….
फ्लॉप चित्रपट ते चित्रपटाचा आलेख….”
अभिनयाचा कोणत्याही प्रकारचा गंध नसलेल्या मध्यमवर्गीय कुटूंबातून मी या क्षेत्रात आले आहे. पण आपल्यात कुठेतरी अभिनयाचा एक किडा आहे यांची जाणीव झाली. कॉलेज मध्ये असताना हौशी रंगमंच्या माध्यमातून मी पहिलं नाटक केलं. इथून कुठेतरी एक गोष्ट उमगली की आपण अभिनयात करियर करू या. अभिनयात कुठंवर काय करू किंवा मुंबईत माझं असं कोणी रहात नसताना अगदीच अनपेक्षित पणे अभिनयासाठी मुंबईत आले. काॅलेज पूर्ण होत असताना मी आमच्या शहरातील लोकल न्यूज चॅनेल साठी अँकर म्हणून काम केलं. मग पुण्यात एमबीए करण्यासाठी आले, तेव्हा असं वाटलं यार आपल्याला हे करायचं नाहीये. मला काही तरी वेगळं करायचंय या ध्यासाने मी एक सुटकेस घेऊन मुंबईत आले. मुंबईत आल्यावर एक वेगळ्या तऱ्हेचा स्ट्रगल होता, या मुंबईने मला आयुष्यात खूप काही दिलंय. मुंबईतली पहिली नोकरी दूरदर्शन मध्ये अँकर म्हणून मिळाली. पण इथे राहून आपल्याला अभिनयात काही करता येणार नाही हे समजलं आणि मी ती नोकरी सोडली. इथून खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. ठाण्यातून अंधेरीत रहायला गेले आणि तिथे वेगवेगळ्या दिग्दर्शकांना भेटणं, ऑडिशन देणं सुरू झालं. हे सुरू असताना जवळपास दोन वर्षांनी मला पहिला चित्रपट मिळाला. “डोंब” हा माझा पहिला चित्रपट जो येत्या २७ डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. माझा स्ट्रगल हा वेगळा होता कारण लोकं कामासाठी धडपड करतात मी ते करत असताना मी लागोपाठ आलेली कामं केली, फिल्म्स केल्या, पण माझ्या फिल्म्स प्रदर्शित झाल्या नाहीत. अगदी तरुण वयात एक बॅग घेऊन कामासाठी मुंबईत आले खरी पण केलेली काम कुठे दिसत नसल्याने घरच्यांकडून या बद्दल अनेक प्रश्न विचारले जायचे. या सगळ्यात माझ्या घरचे आणि खास करून माझी आई माझ्या मागे खंबीरपणे उभी होती. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सगळेच माझ्या पाठीशी होते. हा सगळा काळ थोडा धडपडीचा असताना मी थोडी हिंदी चित्रपट सृष्टी कडे वळले “धारा ३०२” ही हिंदी फिल्म मी केली. पण फिल्म येऊन ती फ्लॉप गेली तर हा काळ थोडा कठीण होता म्हणून मी मधलं एक वर्ष काही काम न करता स्वतःला वेळ दिला. आपण काय केलं पाहिजे हे स्वतःला समजवल त्या नंतर मी मुळशी पॅटर्न, भिरकीट, भोंगा, हे चित्रपट केले मग इथून माझ्या चित्रपटाचा एक अनोखा आलेख तयार होत गेला.
“वागणूक आहे वेगळी कारण….”
चित्रपट हा चित्रपट असतो त्यामुळे मराठी आणि हिंदी असा फरक करून चालत नाही पण यात फिल्म चा सेटअप, प्रोडक्शन हाऊस, कॅमेरा या सगळ्या गोष्टी सारख्या असताना फक्त भाषा वेगळी असते. फिल्म आणि त्यांची टीम यावरून कळतं की तुम्हाला तिकडे कशी वागणूक मिळते.
“व्यायामाची वेडी”
कॉलेज मध्ये असताना मी बास्केटबॉल चॅम्पियन होते. कुठलाही खेळ म्हंटल की फिट राहणं हे आपसूक पणे येतंच, त्यामुळे खेळा व्यतिरिक्त व्यायाम करावा वर्कआउट करावं असं काही माहीत नव्हतं, पण जेव्हा मुंबईत आले तेव्हा फक्त कामासाठी लोकांना भेटणं, ऑडिशन देणं, हेच चालू असताना यात स्वतःसाठी फिट राहायला व्यायाम करायचा असतो हे मला माहित नव्हतं. पण जेव्हा हिंदी चित्रपट केला तेव्हा माझे सहकलाकार एवढे फिटनेस च्या बाबतीत काटेकोर होते हे बघून मला फिटनेस ची वेगळी बाजू समजली. मी त्यांच्याकडून फिटनेस च्या अनेक गोष्टी शिकले. माझा सहकलाकार हा जिम्नॅस्टिक करायचा ते बघून मला खूप भारी वाटायचं, मग मी जिम्नॅस्टिक शिकले. हे करून मला स्वतः मध्ये फार फरक जाणवला त्या नंतर मला फिटनेस च महत्व कळलं. व्यायाम करून आपण मानसिक आणि शारीरिक रित्या किती फिट राहतो यांची मला जाणीव झाली म्हणून मी आता नियमित व्यायाम, जिमिंग करते.
“मुळशी पॅटर्न आहे खास”
आपण चित्रपट करतो पण ते प्रदर्शित होत नाही आहेत तर हा एक काळ माझ्यासाठी माझ्या करियर साठी आव्हानात्मक होता. कोणतीही फिल्म मिळण्यापेक्षा आपण जे काम केलं ते लोकांसमोर येत नाही हे फार दुःखद होतं. मधल्या या काळात मी डिप्रेशन मध्ये गेले, पण कुठेतरी आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्यात काहीतरी करायचं असतं हे जाणवलं. मला मानसिकरित्या स्टेबल राहण्यासाठी व्यायामाने फार मदत केली. करियर मधली ५ वर्ष फार कठीण होती. भविष्यात काय होईल माहीत नाही पण काम करत राहू आणि पुढे जात राहू हे मनात ठेवून काम करत राहिले. मुळशी पॅटर्न प्रदर्शित झाला आणि त्याला वेगळ्या प्रकारचं यश मिळालं हा वेगळ्या उंचीवरचा सिनेमा केल्याचं सुख मला मिळालं. या चित्रपटाने मला ओळख दिली. यातून मी आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला सकारात्मक दृष्टीने घ्यायला लागले.
“प्रत्येक कामाने काहीतरी शिकवलं”
माझं एक ठरलंय की प्रत्येक चित्रपटातुन काही न काही शिकेन आणि मी ते शिकतेय. प्रवीण तरडे सरांसोबत मुळशी पॅटर्न करताना मला फार मज्जा आली. सगळी टीम कमालीची आहे. स्वतः प्रवीण सर एवढे एनरजेटीक आहेत, त्यांची कामाची पद्धत आणि काम करण्याचा उत्साह हा वेगळा आहे. त्यांची काम करून घेण्याची पद्धत खूप मस्त आहे, आणि सेटवर प्रत्येक कलाकाराला त्यांच्या कडून मिळणारी वागणूक फार वेगळी आणि उत्तम आहे. आपण आपल्या कामातून सगळीकडे उत्तमरित्या परफॉर्म केलं पाहिजे हे मी या सेटवर शिकले. भोंगा करताना महेश लिमये सरांसोबत काम करण्याचा थोडं दडपण होत पण इथे सगळ्यांनी छान समजून घेऊन मस्त काम केलं. मी अगदी कमीवेळात चांगलातल चांगलं काम कसं करावं हे शिकले. मी आताच विजेता हा चित्रपट केला, चित्रपट मला आयुष्यात संयम काय असतो हे शिकवून गेला.
“विद्या बालन ते विकी कौशल”
भविष्यात मला विद्या बालन, रणवीर सिंग आणि विकी कौशल सोबत काम करायचंय.
“अभिनय करते कारण..”
मला ज्या कामात सुख मिळतं, मी जिथे मनाने आणि आत्म्याने मनापासून काम करू शकते, तिथे मी काम करते, जिथे मला माझ्या भावना व्यक्त करता येतात तिथे मला काम करायला आवडतं, म्हणून मी मॉडेलिंग करणार नाही. पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी मी काम न करता, अभिनय हा मी माझ्या स्वतःच्या आवडीसाठीसाठी करते.
“कामाची भव्यदिव्यात आणि अभ्यासपूर्ण कामाचा अनुभव”
करियर च्या सुरवातीला मी अनेक गोष्टी केल्या मग त्यात एडिटिंग, असिस्टंट एडिटिंग मग प्रणव दिवार (दिग्दर्शक) यांनी मला विचारलं की मला असिस्टं करशील का? मग मोठ्या प्रोजेक्ट ची काम कशी होतात यांचा अनुभव घेता आला. हिंदी मध्ये प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला जातो.
“बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे”
जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला जज करणारी खूप लोक असतात. इथे प्रत्येक जण हा वेगळ्या वेगळ्या भागातून आलेला असतो. तर इथे येणाऱ्या प्रत्येकाची देहबोली वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नवीन गोष्टी शिकायला आणि त्या आत्मसात करायला वेळ जातो, यामुळे आपल्याकडे फार पटकन एखाद्याला जज केलं जातं. लुक्स, ड्रेसिंग, भाषेवरून मला सुद्धा इथे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं गेलं, साहजिकचपणे मला या गोष्टी शिकायला वेळ गेला.
“बोल्ड करेन पण…”
मी एखादी बोल्ड भूमिका करेन पण ती त्या गोष्टीला अनुसरून असली पाहिजे. गोष्टीची गरज असल्यास नक्की बोल्ड भूमिका करेन.
स्लॅम बुक
आवडता अभिनेता : रणवीर सिंग, विकी कौशल
आवडती अभिनेत्री : विद्या बालन
सिंगल आहेस की कमिटेड : सिंगल
फिरण्याची आवडती जागा : सिंगापूर, दुबई
कोणती गाडी आवडते : स्पोर्ट्स कार
खऱ्या आयुष्यातली दीप्ती कशी आहे : मी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशीच स्क्रीन वर असते. मी खूप आत्मविश्वासू, भावुक आणि डेअरिंगबाज आहे.
अभिनया व्यतिरिक्त काय आवडतं : डान्स, जिम्नॅस्टिक, गायन
अभिनयाच्या सोबतीने जिम्नॅस्टिक करून फिटनेसचा अनोखा फंडा जपणारी, बोल्ड भूमिका साकारुन खऱ्या आयुष्यात तितकीच हळवी असणारी अभिनेत्री दीप्ती धोत्रे.
सेल्फ मेड अशी अनोखी ओळख संपादन करून आजवर तिने चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)