वडील पोलिसात नोकरीला त्यामुळे त्यांच्या सततच्या बदल्यांमुळे हा पठ्या खर्या अर्थाने ‘बारा गावाचं पाणी’ त्याच्या लहानपणीच प्यायलाय.
परदेशात वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशमधून मास्टर्स केल्यानंतरही त्याने आपली आवडं जपत कला क्षेत्राच्या दिशेने त्याचा मोर्चा वळवला.
अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा पायऱ्या चढत तो आता निर्मिती क्षेत्रातही पाउल टाकतोय. एकांकिका, नाटकं, चित्रपट आणि मालिका असा चौफेर वावर असणारा आणि कोणत्याही विषयावर अगदी परखडपणे व्यक्त होणारा अभिनेता म्हणजे हेमंत ढोमे. ‘प्लॅनेट मराठी’च्या स्टार ऑफ द विक च्या माध्यमातून जाऊन घेऊया अवलियाबद्दल….
संपूर्ण नाव : हेमंत दयानंद ढोमे
जन्म तारीख आणि ठिकाण : २१ मार्च, शिरूर (पुणे)
शिक्षण : एम.एस.सी इन वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेश (युके)
बालपणीच प्यायलो बारा गावाचं पाणी…
माझा जन्म पुण्यातील पण, शालेय जीवनाची सुरुवात ठाण्यात झाली. परंतु बाबांची पोलिसातील नोकरी असल्यामुळे त्यांची कामानिमित्त सतत बदली व्हायायची. त्यामुळे आम्ही सतत स्थलांतर करत असत. पहिलीला मी रायगड जिल्ह्यातील माणगावला गेलो. रायगडमध्ये असलो तरी माणगाव, पोलादपूर (दुसरी असताना), म्हसळा (तिसरी), मग चौथी ते सातवी आम्ही कर्जतला आलो. मग आठवीत मी खोपोलीला शाळेत प्रवेश घेतला. नववी नागोठणे, दहावी पनवेल आणि मग अकरावी ते पुढील शिक्षणाला पुण्याला गेलो. त्यानंतर एमएससी करता युकेला गेलो. त्यामुळे ‘बारा गावचं पाणी पिणे’, ही म्हण माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळते. पण खरं सांगता, दरवर्षी माझी शाळा बदलते पर्यायी मित्रही बदलले याचं मला फार वाईट वाटायचं. त्यामुळे मला फक्त माझ्या कर्जतच्या शाळेतील मित्र लक्षात आहेत. जिथे मी फार अधिक काळ राहिलो होतो. पण बालपणं मजेत गेलं.
झाली अभिनयाची सुरुवात…
त्याकाळी खोपडी दारू प्यायल्यामुळे कर्जत, खालापूर सारख्या भागांत अनेकांचा मृत्यू झाला होता. बाबा पोलिसात असल्यामुळे या गोष्टींविषयी सतत बोललं जायचं, शिवाय, माझ्या बाबांनीही व्यसनमुक्तीविषयी जनजागृतीसाठी महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली होती. आमच्या शाळेकडून सुद्धा व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य बसवली होती. त्यामुळे अगोदरपासून अभिनयाची आवड असणाऱ्या मला यानिमित्तानं संधी मिळाली. त्यानंतर अकरावीला मी पुण्याला गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आणि विविध एकांकिका आणि अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे अभिनयाची लहानपणापासून आवडं होती. मग पथनाट्य आणि विविध स्पर्धा यांच्यातून भाग घेऊन ही आवडं वाढत गेली. मग ‘समन्वय’ नावाच्या आमच्या नाट्य संस्थेच्या माध्यमातून ‘लूझ कंट्रोल’ या प्रायोगिक नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर अनेक प्रयोग केले. या नाटकाचं लेखनही मी केल होत. त्याचं खूप कौतुक झालं. अनेक ठिकाणी मला लिखाणासाठी आणि अभिनयासाठी पारितोषिक मिळाली. त्यामुळे होणाऱ्या कौतुकातून काम करण्याची अधिकाधिक उर्जा मिळत गेली.
आवडं माझ्यासाठी महत्त्वाची…
मी आयपीएस अधिकारी व्हावं अशी माझ्या बाबांची इच्छा होती. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा द्याव्यात या दृष्टीने मी कॉलेज सुरु असताना, त्यासोबतीने स्पर्धा परीक्षांचीही तयारी करतं होतो. परंतु अभिनयाची जास्त आवडं वाटू लागली आणि आपण याचं क्षेत्रात काहीतरी करावं असं मला वाटत होतं. मास्टर्स करण्यासाठी युकेला गेल्यावर अडीच वर्ष तिकडे होतो. त्याकाळातही आपल्याला अभिनय करायचा आहे हे सतत डोक्यात असायचं. वाईल्ड लाईफ विषयी मला प्रचंड आवडं आहे. त्यात मला जमेल त्या पद्धतीने मी काम करतं होतो, अजूनही करतोय. पण, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शक म्हणून आपणं काम करावं हे मनाशी पक्क केलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलली. अभिनय ही मुळची आवडं. मी लिखाण करतचं होतो. मग हळूहळू दिग्दर्शकाच्या भूमिकेत जाण्यास सुरुवात केली. पूर्ण शिकल्याशिवाय दिग्दर्शनाला सुरुवात करायची नाही हे मनाशी पक्क केल होतं. कदाचित त्याचमुळे दिग्दर्शनाचा योग खूप उशिरा आला. जवळपास दहा वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मी दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली.
नाटकात रमतो…
मी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतं असलो तरी नाटकात काम करणं मला सर्वाधिक आवडतं. त्यानंतर अनुक्रमे सिनेमा आणि टेलिव्हिजन. त्यामुळे नाटकं हे माझं लाडकं माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु, टेलिव्हिजनवर काम करणं हे सगळ्यात अवघड काम आहे हे सत्यही नाकारता येणारं नाही. पण मी नाटकं किंवा सिनेमात रमतो.
शाब्बासकी मोलाची…
एका स्पर्धेसाठी क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित एका एकांकिकेत मी अभिनय केला होता. त्यामुळे ती माझी पहिली एकांकिका पण, मी केलेली पथनाट्यातील काम माझ्या अजूनही लक्षात आहेत. त्यावेळी त्याकामाचं खूप कौतुकही व्हायचं. पथनाट्यात मी साकारलेला सोंगाड्या आणि मावशीच्या माझ्या भूमिकांसाठी मला शाब्बासकी मिळाली. त्यावेळी गंभीर भूमिकाही साकारल्या पण विनोदी भूमिकांचं खूप कौतुक झालं. त्यामुळे कलाकार म्हणून लोकांना जे आवडतं ते देतं रहायचं या विचाराने नेहमी वेगळं साकारायच्या प्रयन्तात असतो.
लवकरच वेगळी भूमिका….
जवळपास दोन वर्षानंतर मी एका चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. माझा जवळचा मित्र, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित आगामी ‘चोरीचा मामला’ या चित्रपटात मी एक मध्यवर्ती आणि वेगळी भूमिका साकारतोय. शिवाय ‘झिंमा’ नावाचा एक चित्रपटही मी करत आहे. मी आणि माझी पत्नी क्षिती असं आमची निर्मिती असणारा आणि मी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे पहिली चित्रपट निर्मिती, माझं दिग्दर्शन आणि सात बायकांच्या वेढ्यात अडकलेल्या एका पुरुषाची कथा सांगणारा हा वेगळा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शिवाय इतर अनेक प्रोजेक्टही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय, एका चांगल्या नाटकाच्या मी शोधात आहे. सोबतीने एक नाटकं लिहून ते पूर्णत्वास नेण्याच्या मार्गावर आहे.
ड्रीमरोल निराळाच…
ड्रीम रोल ही संकल्पना मुळात माझ्यासाठी नाही. कोणीतरी साकारलेली एखादी व्यक्तिरेखा किंवा भूमिका आपण साकारण्यात मजा नाही असं मला वाटतं. त्यामुळे, एखाद्या नाटकात किंवा सिनेमात मी ‘पांडू’ (उदाहरणार्थ) साकारला तर तो पांडू लोकांसाठी ड्रीमरोल वाटावा या दृष्टीने मी काम करेन. त्यामुळे मी केलेला एखादा रोल अनेक पिढ्या लोकांच्या लक्षात राहिलं या साठी मी काम करेन. त्यामुळे मला मिळणारी प्रत्येक भूमिका माझ्यासाठी ड्रीमरोल आहे.
इंडस्ट्रीमधील हे खुपत….
इंडस्ट्रीमध्ये काम करताना एकमेकांविषयी असणारी इर्षा, असूह्या आणि स्पर्धा हे ज्यावेळी एका वेगळ्या पातळीवर पोहचतात त्याची फार चीड येते. दुसऱ्याच चांगलं काम आपणं बघू शकत नाही एवढी ती स्पर्धा टोकावर पोहोचलेली असते. मराठी इंडस्ट्री ही तेव्हाचं मोठी होईल, जेव्हा सगळे एकत्र मिळून काम करतील, असं मला वाटतं. एकत्र येऊन जेव्हा दुसऱ्याचा सिनेमा तेवढ्याच उत्साहात प्रमोट करतील, त्याचं कौतुकं करतील त्यावेळी याची सुरुवात होईल. हल्ली आपल्याचं लोकांमध्ये खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे वर्षभरात जवळजवळ शंभर सिनेमे येतात. त्यातील फार कमी लक्षात राहतात. जर हे सिनेमे समजा एकाच दिवशी आले तर त्याचा उपयोग होणारा नाही. त्यामुळे आपल्याआपल्यातील स्पर्धा थांबवून संपूर्ण इंडस्ट्री अधिकाधिक प्रगल्भ बनवण्याचा आपणं प्रयत्न करणं गरजेचं आहे.
वेळीच व्यक्त व्हा…
जे वाईट आहे त्याबद्दल व्यक्त व्हायलाच हवं हे अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या पालकांनी मला शिकवलं होतं. काय वाचावं, काय सोडून द्यावं. राजकारणा आणि समाजकारणाची आवडं अशा अनेक गोष्टी मला वडिलांनी शिकवल्या. त्यामुळे प्रत्येकाची ही जडणघडण होणं गरजेचं आहे. मी कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा समर्थक नाही. कोणत्याही जाती-धर्मांचा पगडा मला मान्य नाही. आपणं भारतीय आहोत या मताचा मी आहे. शिवाय आपण माणूस आहोत हे त्याहून महत्त्वाचं आहे. परंतु हल्ली देशातील परिस्थिती बघता जिथे मला व्यक्त व्हावसं वाटत तिथे मी व्यक्त होतो. याचा परिणाम म्हणून मला धमक्यांचे फोन वगैरेही येतात. शिवाय, कलाकार हा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे अनेकदा मला ट्रोल केल जातं. पण त्याचा मला फरक पडत नाही. इंटरनेट स्वस्त झाल्याचा हा मोठा गैरफायदा आहे मला वाटतं. कारणं, लोकांना कधी कुठे काय बोलावं याचं भानं उरतं नाही आणि मग गरज असेल तरी व्यक्त होणं त्यांना जमत नाही. शिवाय, भाषे पलीकडे जाऊन सर्वानीच विचार करायला हवा असं मला वाटत.
प्रत्येक प्रतिक्रिया मोलाची…
काही सिनेमे ही केवळ ‘मनोरंजन पट’ असतात, त्याचा हेतू मनोरंजन हा एवढाच असतो. परंतु सिनेमे आणि नाटकं ही केवळ प्रबोधनासाठीचं असतात असा अनेकांचा समज असतो. पण तस अजिबात नसतं. शिवाय, आपलं काम हे काहींना आवडू शकतं, काहींना नाही आवडू शकतं. त्यामुळे जर सिनेमा सगळ्यांनाचं आवडला तर त्यातही काहीतरी चुकतयं असं मला वाटतं. त्यामुळे एखादा चित्रपट कोणाला आवडतं नसेल तरी त्यातूनही मला अनेक गोष्टी शिकता येतात. यातूनच स्वतःशी स्पर्धा निर्माण होते. शिवाय येत्या काळातील ऐतिहासिक सिनेमाच्या लाटेत आपणं काहीतरी वेगळा विषय घेऊन मीही काहीतरी नवीन घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहे. लोकांना इतिहास बघायला आवडतोय, आणि तो अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला जातोय हे सुखावह आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच मी ही काही ऐतिहासिक करण्याच्या प्रयत्नात असणार् आहे.
नवीन वर्षाची आव्हान खूप…
आपल्या हातून खूप चांगलं काम घडलं पाहिजे म्हणून मी नवीन वर्षात अधिक मेहनत करणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि आता निर्माता म्हणून शक्य तेवढ्या चांगल्या कामांतून आपणं प्रेक्षकांच्या लक्षात राहावं म्हणून काम करतं राहण्याचा माझा प्रयत्न कायम असेल. मनोरंजनपट करत विविध विषयांवर भर देत. मराठी सिनेमाचा यशाचा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
रॅपिड फायर
० हेमंतचं टोपणनाव
-भैया (माझी लहान बहिण मला याचं नावाने हाक मारते)
० हेमंतची आवडती अभिनेत्री
-मेरील स्ट्रीप, स्मिता पाटील, रत्ना पाठक-शहा, सुप्रिया पाठक, क्रीती सॅनन
० स्वतःमधील न आवडणारी गोष्ट?
-आळस
० स्वतःमधील आवडणारी गोष्ट?
-खरेपणा
० हेमंतचा विक पॉईंट?
-जेवण
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
http://www.planetmarathimagazine.com