स्टार ऑफ द विक : ५४ (प्रार्थना बेहरे)
संपूर्ण नाव : प्रार्थना अविनाश बेहरे – जावकर
जन्म तारीख आणि ठिकाण : ५ जानेवारी १९८८, भावनगर (गुजरात)
शिक्षण : PHd inMathmatics and Statistics, पत्रकारिता पदव्युत्तर
लग्नाचा वाढदिवस : १४ नोव्हेंबर
घरच्यांचं मन राखून, स्वतःच टीव्हीवर झळकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने न्यूज अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू सहाय्यक दिग्दर्शक आणि प्रोडक्शन मधूनही तिने काम केलं. अनेक बड्या स्टार्सच्या मुलाखती घेताना स्वतः स्टार बनण्याचं स्वप्नही ती पाहत होती.
अखेर हिंदीतील ‘पवित्र रीश्ता’ या लोकप्रिय मालिकेच्या निमित्तानं तिच्या अभिनयाला सुरुवात झाली. त्यानंतर मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, जय महाराष्ट्र ढाबा भथिंडा अनेक अनेक गाजलेल्या चित्रपाटांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. न्यूज अँकर ते उत्तम अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी, दिलखुलास अभिनेत्री म्हणजे “प्रार्थना बेहरे“
बालपणीच्या सुंदर आठवणी….
लहानपणापासूनच आई-बाबांनी एक गोष्ट नेहमी शिकवली, अभ्यास आणि त्याबरोबरीने देवावर श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे बालपणीच रामरक्षा, गीतेचे अध्याय असं सगळं ते आमच्याकडून म्हणून घेत. हे सगळ आमच्या आयुष्याचा भाग बनत गेलं. त्यामुळे लहानपणापासून झालेले संस्कार आजवरच्या आयुष्यात नेहमी उपयोगी ठरले आहेत. त्यावेळी घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. बाबा टेक्स्टाईल इंजिनिअर असल्यामुळे ते मिलमध्ये काम करायचे. अचानक मिल बंद झाल्यानंतर अनेक अडचणी येऊ लागल्या. पण त्या परिस्थितही ते दुखः करत बसले नाहीत. ते नेहमी आनंदी असायचे आजही ते तेवढेच आनंदी जगतात. त्यामुळे त्यांच्या कडून हे मी शिकलेय आणि ते कायम लक्षात ठेऊन जीवनाचा प्रवास करत असते.
न्यूज अँकर ते अभिनेत्री….
मला डान्सची प्रचंड आवड होती. त्यामुळे, मी तिसरीत असल्यापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. माझ पदवी पर्यंतच शिक्षण होईल पर्यंत मी भरतनाट्यम शिकले आणि काही काळ शिकऊ लागले. नृत्याची आवडं असल्यामुळे मी कोणत्याही समारंभात नाचायचे, पण आपण अभिनय करावा किंवा आपल्याला अभिनय जमतोय… असा विचार कधी केलाच नव्हता. शिवाय, “अभ्यास सोडून ही अभिनेत्री बनणार का?” असं विचारणाऱ्या कुटुंबातून मी आली असल्यामुळे त्यावेळी अर्थात अभिनय क्षेत्राची निवड करणं माझ्या हातात नव्हतं. पण, मला टीव्हीवर दिसायचं…. हे माझ स्वप्न होतं. म्हणून पत्रकारितेच शिक्षण घेऊन, त्यात नोकरी करायला सुरुवात केली. शिवाय, मी बातमीदार म्हणून काम करणं हे माझ्या पालकांनाही समाधान देणारं क्षेत्र असल्यामुळे मी रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी मुंबईत येण्याचं ठरवलं. मुंबईत आल्यावर जर्नालिझम करणं किंवा नालंदा विद्यापीठातून भरतनाट्यमचं पुढील प्रशिक्षण घेण. काही कारणास्तव भरतनाट्यमचं शिक्षण मला थांबवावं लागलं आणि जर्नालिझम करता मुंबईच्या केसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून जर्नालिझममध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण सुरु असताना आणि त्यानंतरही अनेक नामांकित वाहिन्यांमधून जर्नालीस्ट म्हणून कामही केलं.
तीन मिनिट ते तीन तास…
जर्नालिझम करत असताना मला ‘क्राईम बीट’वर काम करण्याची प्रचंड इच्छा होती. पण माझा एकूणच स्वभाव आणि बडबडीवृत्ती लक्षात घेऊन मला ‘एन्टरटेनमेंट रिपोर्टर’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनेक बड्या बॉलीवूड कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. परंतु, मी करत असलेल्या कामातून मला आनंद मिळत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. त्यामागे अनेक कारणही होती. रिपोर्टर म्हणून काम करत असताना ‘गुरुपौर्णिमे’निमित्तानं मी एक स्टोरी केली होती. पण ती स्टोरी काही कारणास्तव फक्त ३ मिनिटांत संपवली. त्यावेळी माझी खूप निराशा झाली, आणि यातूनच आपण तीन तासाच्या स्टोरी ऐवजी तीन तासांच्या चित्रपटासाठी काम करण्याचा मी निर्णय घेतला. मग दिग्दर्शनात अधिक रस असल्यामुळे मी ‘रीटा’ या चित्रपटासाठी रेणुका शहाणे यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल. याचं चित्रपटात एका अगदी छोट्या भूमिकेसाठी मी काम केलं. ती अभिनय करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण त्या छोट्या भूमिकेसाठी मी केला अभिनय सेटवरील सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी माझ्या त्या कामाचं कौतुकही केलं. ही माझ्या आयुष्यातील पहिली भूमिका आणि त्यासाठी माझं झालेलं कौतुकं मला कायम लक्षात राहिलाय. त्यानंतर मी अभिनेत्री म्हणून काम करण्याचं ठरवलं.
अखेर मोठी संधी मिळालीच…
मुंबईत जर्नालिझमकरता प्रवेश घेण्याआधी बाबांनी मला एमबीए करण्याचा सल्ला दिला होता. परदेशात चांगली नोकरी मिळेल, शिवाय व्यवस्थित पगारही मिळेल या दृष्टीने त्यांनी मला हे सुचवलं होत. परंतु, मी जर्नालिझम करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यावेळी मी रिपोर्टर आहे, हे माझ्या कुटुंबियांना आणि फार कमी लोकांना माहिती होत. त्यात रिपोर्टरची नोकरी सोडल्यानंतर केलेल्या कामांत पुरेसे पैसे मिळत नव्हते. शिवाय, माझ्या जवळील पैसेही संपत आले होते. त्यामुळे, त्या काळात काही काम मिळत नव्हतं. दरम्यानच्या काळात माझ्या लग्नासाठी मुल बघण्याची सुरुवात झाली होती. गंमत म्हणजे, ‘पवित्र रिश्ता’चं कॉनट्रेक साईन करायला जाण्याच्या काही वेळ आधी मी एका मुलाला भेटले होते. पण, मग मी साईन केलेल्या कॉनट्रेकमधील नियम आणि अटींमुळे माझा लग्नाचा विषय तिकडेच थांबला. आईबाबांनीही मला पाठींबा दिला आणि माझ्या अभिनयातील करिअरचा शुभारंभ झाला.
मालिकांपासून ठरवून ब्रेक घेतला…
मी मराठी मालिकांमध्ये फार काम केलं नाही. ‘पवित्र रिश्ता’ सुरु असताना ‘मायलेक’ नावाच्या एका मालिकेत मी काम करत होते. पण मग दोन्ही मालिकांच्या शुटींगच्या वेळा संभाळण मला कठीण जाऊ लागलं आणि त्यामुळे मी ‘मायलेक’मध्ये काम करणं अगदी काही दिवसांतच थांबवलं होत. गुजरातमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे माझं मराठी फार चांगलं नव्हतं. त्यामुळे अनेक सिन्स मी अगदी रडून केल्याचं मला आजही आठवतंय. म्हणूनच, ‘मी मराठीत पुढे काही करणार नाही’, असं त्यावेळी ठरवलं होतं. पण मग चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि माझं हे मत आपोआप बदललं. ‘पवित्र रिश्ता’ सोडण्यामागेही हेच कारणं होतं. मला चित्रपट करायचे होते आणि त्या दृष्टीने संधी मिळत होती म्हणून मी ती मालिका सोडली आणि मग संपूर्ण वेळ चित्रपटाकडे वळण्याचा निर्णय घेतला. परंतु, मी कोणत्याही संधीला नकार द्यायचा नाही’, हे मनाशी पक्क केलं आहे. त्यामुळे कदाचित आता नाही पण मालिका करणारच नाही असं होणारं नाही. शिवाय आता माझा नवरा अभिषेक जावकर यांचं प्रोडक्शन हाउस असल्यामुळे सध्या मला आवडतं असलेल्या दिग्दर्शनातील बारकावे शिकण्यासाठी अधिक वेळ देत आहे. लेखनात मदत करतेय. त्यामुळे आता त्या कामावर अधिक लक्ष देऊन येत्या काळात दिग्दर्शनाकडे वळण्याचा विचार आहे.
लवकरच हिंदी वेब सिरीज…
मालिका, चित्रपट यातून काम केल्यानंतर मी आता लवकरच एका हिंदी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षात ती वेबसिरीज प्रदर्शित होईल. शिवाय, २० मार्च २०२० ला माझा ‘अजिंक्य’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणारं आहे. एका समाजसेविकेच्या भूमिकेत मी या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये अजून एक सिनेमा प्रदर्शित होईल ज्याची लवकरच घोषणा होईल.
नाटकं हे जबाबदारीच काम…
‘जय महाराष्ट्र ढाबा भठिंडा’ या चित्रपटानंतर मी, अंजन श्रीवास्तव आणि रीमा लागू यांच्या बरोबर एका हिंदी नाटकात काम केल होतं. पण नाटक ही खूप मोठी जबाबदारी आहे, असं मला वाटतं. शिवाय, मी नाटकाला तेवढा वेळ देऊ शकले नाही तर होणारं नुकसान आणि मला न मिळणार समाधान हे अजिबात पटणार नसल्यामुळे मी नाटकात काम करत नाही.
भूमिकेसाठी चोखंदळ…
अभिनेत्री म्हणून काम करत असताना नेहमी त्याचं त्या पद्धतीच्या भूमिका करण्यापेक्षा सतत काहीतरी वेगळ करण्याच्या प्रयत्नांत आपण असावं असं मला वाटतं. त्यामुळे भूमिका स्विकारताना मी अनेकदा विचार करते. त्यामुळे मी करत असलेल्या भूमिका मला आवडल्या पाहिजेत आणि मला ती भूमिका साकारताना मज्जा आली पाहिजे हे लक्षात ठेवून मी भूमिकेची निवड करते.
नकार मिळालेत कि…
मला एखाद्या चित्रपटाची कथा आवडली, मिटिंग झाली पण त्यातील भूमिका नंतर मला न मिळता कोणीतरी दुसऱ्याने ती साकारली असं झालंय. पण त्यामुळे मी कधी निराश झाला नाही. अभिनेत्री म्हणून तुम्हाला चांगला चित्रपट मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आणि नशिबाचा भाग असतो, असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या नशिबात नसेल म्हणून नकार मिळाले हे लक्षात ठेऊन मी कायम पुढे जाते. आणि त्याहून चांगल्या भूमिका नेहमी माझ्या वाट्याला आल्यात.
अभिनेत्री नसते तर…
मी अभिनेत्री नसते तर नक्कीच या इंडस्ट्रीमध्येचं काम करत असते. मला दिग्दर्शन आवडतं, मला दिग्दर्शन करायचंय. त्यामुळे मी अभिनेत्री नसते तर शंभर टक्के मी दिग्दर्शक बनले असते.
माणसं इथली खरीच…
मला इंडस्ट्रीमधील खरंतर काही खटकत नाही. याउलट मला लोकांना सांगायला आवडेल. अनेकदा लोकांना वाटतं ही इंडस्ट्री फार खोटी आहे. इथले लोक फार खोट वागतात. कोणाच कोणाशी आपापसात पटत नाही. माझ्यामते हे अगदीच चुकीचं आहे. त्यामुळे आम्हीही माणसं आहोत. आम्हीही आमचं काम करत असतो. तुमच्या प्रमाणे कामाच्या बाबतीत आमच्यातही स्पर्धा असते. पण त्यामुळे आमच्या मैत्रीत कधीचं फरक पडत नाही. इथली माणस सगळी खरी आहेत आणि ते खरचं वागतात. आणि असं नसतं, तर कदाचित मी या इंडस्ट्रीत नसते.
ट्रोलिंग होतंच…
माझ्या वागण्या-बोलण्यावरून मला कधीच ट्रोल केलं नाही. परंतु, मध्यंतरी मी थोडी जाड झाले होते. त्यावेळी मात्र मला ट्रोल केल गेलं. माझ्यावर काही प्रमाणात टीका झाल्या. त्यात चित्रपट कारण सोडलं का? असंही विचारणारे अनेक जण होते. फिटनेस बद्दल अनेक कमेंट्स आल्या. पण काही काळ मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्याचं ठरवलं होत. त्यामुळे लोक काय म्हणतील याचं मला काही वाईट वाटलं नव्हतं. उलट मी बारीक झाल्यानंतर त्याचं प्रेक्षकांकडून चांगल्या कमेंट्सही आल्या.
मी अशीच हसते…
मी लहानपणापासून अशीच हसते. शाळेत असताना, ‘बिघडलेल्या गाडीच्या स्टार्टर’चा आवाज म्हणून मला चिडवलं जायचं. पण,ते हसणं लोकांपर्यंत तेव्हा पोहचल नव्हतं. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात काम करताना कॅमेऱ्यामागे मी हसायचे त्यामुळे ते जगजाहीर नव्हतं. पण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये गेल्यावर ते हसू मी लपवू शकले नाही. पण त्यावरून मला कधी कोणी वाईट बोललं नाही.
फिटनेस मंत्रा…
कामात व्यस्थ असले तरी जिम सोडणं मला आवडतं नाही. सकाळी उठल्यावर ११ १२ वाजता रोज जिमला जातेच. खाण्याकडे विशेष लक्ष देते. शिवाय, मला चालायला खूप आवडतं.
झटपट प्रश्न
० प्रार्थनाच टोपणनाव
-टूम्पा
० प्रार्थनाला स्वतःमधील आवडणारी एक गोष्ट?
-मला दुखी व्हायला आवडतं नाही.
० प्रार्थानाला स्वतःमधील न आवडणारी एक गोष्ट?
-मी खूप आळशी आहे.
० निवेदन कि अभिनय
-अभिनय
० प्रार्थनाचा लाईफ फंडा
-आयुष्यात नेहमी आनंदी रहा.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)