‘मिसळ जंक्शन’
मिसळ म्हणजे अनेकांचा विक पॉइंट. सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये या चमचमीत आणि चटकदार पदार्थाविषयी मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचं पाहायला मिळतंय. फाइव्ह स्टारच्या मेन्यूपासून ते हल्ली थेट लग्नाच्या पंगतींमध्येही मिसळ पाहायला मिळते. मग यात मिसळीचे नानाविध प्रकार, प्रांतवार त्याची बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची वेगवेगळी पद्धत आणि नावानुरूप चवीतील वेगळेपण हे मिसळीच खास वैशिष्ट्य म्हणता येईल. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, तंदुरी मिसळ, पाणीपुरी मिसळ या आणि याहून अधिक वेगळ्या प्रकारच्या मिसळींची लज्जत चाखायची असेल तर दादरच्या ‘मिसळ जंक्शन’ला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. पारंपारिक ते आधुनिक अशा वेगेवेगळ्या प्रकारच्या मिसळी तुम्हाला येथे मिळतील. सुयोग मधुकर भट्टे या मराठमोळ्या तरुणाने काही दिवसांपूर्वी ‘मिसळ जंक्शन’ची सुरुवात केली आहे.
मुंबई विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधून त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नामांकित हॉटेल्स आणि कंपनीमध्ये त्याने काही काळ नोकरी केली. पण, नोकरी करत असतानाचं आपलं स्वतःच एक रेस्ट्रो असावं हे कायम त्याच्या डोक्यात असायचं. त्या दृष्टीने सुयोगचे प्रयत्न सुरु झाले आणि त्याचं प्रयत्नांतून ‘मिसळ जंक्शन’ची सुरुवात झाली. ‘मला मिसळ खूप आवडते आणि ‘मिसळ’ ही क्यूएसआर (क्विक सर्विस रेस्टॉरंट) करता उत्तम डिश असल्यामुळे मी ‘मिसळ’ ही डिश निवडल्याच सुयोग सांगतो.’ अनेक ठिकाणं तिकडच्या मिसळसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सगळ्या ठिकाणच्या मिसळ एकाच ठिकाणी मिळण्याची उत्तम सोय म्हणजे मिसळ जंक्शन. ‘मिसळ जंक्शन’चा मेन्यु ठरवण्यासाठी तब्बल सहा महिने महाराष्ट्राच्या विविध भागात सुयोग फिरला. तिथली स्पेशल मिसळ चाखून त्यात स्वतःचा वेगळेपणा मिसळून जंक्शनचा मेन्यू ठरला. ‘मीट मिसळ रिपीट (Meet Misal Repeat)’ अशा टॅगलीन सह दिमाखात मे २०१९ पासून सुयोगच्या या प्रवासाचा शुभारंभ झाला आहे.
‘मिसळ जंक्शन’मध्ये मिळणाऱ्या प्रत्येक मिसळ करता वेगळा रस्सा आणि फरसाण हा मिसळ प्रकारागणीक वेगळा वापरला जातो. मुंबई स्पेशल मिसळ, उपवासाची मिसळ, खमंग पुणेरी , झणझणीत कोल्हापुरी, गावरान हिरवा ठेचा आणि चुलीवरची सावजी अशा पारंपारिक मिसळ प्रकारांसोबतच जैन जलसा, कॉर्न अँड चीझ महा मेक्सिकन, मखनी मिसळ आणि जंक्शन स्पेशल अशा आधुनिक मिसळ प्रकारांची रेलचेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे पारंपारिक ते आधुनिक मिसळ प्रकारांकडे आकर्षिला जाणारा वर्ग हा सर्व वयोगटातील असल्याचं सुयोग आवर्जून सांगतो. आणि म्हणूनच पारंपरिकता जपत मिसळला आधुनिक टच दिलेली इथली मिसळ सगळ्यांना तृप्त करते. शिवाय हेल्थ कौन्शस लोकांकरता पाव ऐवजी भाकरीचा पर्याय उपलब्ध आहे. सोबत अळूवडी, कोथिंबीर वडी, पियुष, गुळाचा खरवस, डिंकाचे लाडू असे अस्सल महाराष्ट्रीय पारंपारिक जंक्शनमध्ये पदार्थही मिळतात. विशेष म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स मिळतं नाही. त्याऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, पियुष, कैरी सरबत अशी शीतपेय मिळतात.
“पिझ्झा, बर्गरच्या युगात वावरताना लोकांनी आपल्याकडील पारंपारिक पदार्थाना विसरू नये. शिवाय, फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने आपली आपली संस्कृती आणि खाद्य लोकांसमोर आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे नवी पिढी आपोआपचं पारंपारिक पदार्थांकडे वळेल.”, अशी प्रतिक्रिया ‘मिसळ जंक्शन’चा सर्व्हेसार्वा सुयोग व्यक्त करतो.
हे आहेत मिसळ प्रकार :
पारंपारिक मिसळ प्रकार
० खमंग पुणेरी मिसळ : मुग आणि मटकीच्या रस्यासोबत पोह्याचा चिवडा घालून ही मिसळ सर्व्ह केली जाते.
० झणझणीत कोल्हापुरी : या मिसळ प्रकारात सुयोगने बनवलेला स्पेशल झणझणीत कोल्हापुरी मसाला वापरला जातो. मुग मटकीच्या रस्याबरोबरीने ‘भडंग फरसाण’ घालून मिळणारी ही मिसळ तिखट खाण्याच्या शौकिनांसाठी पुरेपूर मेजवानी ठरेल.
० गावरान हिरवा ठेचा : हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर यांचा एकत्रित ठेचा ही मिसळ बनवण्यासाठी वापरला जातो. तिखट आवडणाऱ्या प्रत्येकासाठी हा मिसळ प्रकार पर्वणी आहे. हिरव्या ठेच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे घालून त्याचा स्पेशल रस्सा बनवला जातो. वरून चटकदार लाल शेव घालून हा मिसळ प्रकार सर्व्ह केला जातो.
० चुलीवरची सावजी : हा मिसळ प्रकार ‘मिसळ जंक्शन’ची सिग्नेचर डिश आहे. कांदा, खोबरं आणि गरम मसाला चुलीवर भाजून त्याचा रस्सा बनवला जातो. विविध ठिकाणच्या मिसळ चाखताना आपल्या मेन्यूमध्ये गावरान ठसका असावा या हेतूने सुयोगने ही डिश बनवली आहे. वैदर्भीय ‘सावजी’ या नॉनव्हेज प्रकारात बदल करून सावजी मिसळ ही डिश सुचल्याच सुयोग सांगतो. सावजी मिसळ सोबत भाकरीही सर्व्ह केली जाते.
आधुनिक मिसळ प्रकार
० कॉर्न अँड चीझ : लहान मुलांच्या जिभेची चव आणि खाण्याची आवडं लक्षात घेता. हा मिसळ प्रकार बनवला जातो. जराही तिखटपणा नसलेला हा प्रकार लहानमुलांसाठी अत्यंत पौष्टिक ठरणारा आहे. मुग-मटकीसह कॉर्न (मक्याचे दाणे) आणि चीझ घालून बनवला जाणारा हा मिसळ प्रकार मक्याचा चिवडा घालून पांढऱ्या रस्यासह (सूप) सर्व्ह केला जातो.
० महा मेक्सिकन : लाल मिरच्या, लसूण आणि व्हिनेगर वापरून मेक्सिकन बेस बनतो. त्यावर टॉमेटो आणि अलेपॅनो चिलीचा साल्सा त्यात घातला जातो. सोबत कॉर्न आणि चीझ घालून हा प्रकार बनवला जातो. मेक्सिकन नाचोज आणि टाकोजची चव असणारा आंबट आणि गोडसर तिखट मिसळ प्रकार अस्सल खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा आहे.
० जैन जलसा : या मिसळ प्रकारासाठी फक्त टॉमेटो वापरून खास जैन रस्सा बनवला जातो. नंतर त्यात पनीर घालून ही जैन मिसळ सर्व्ह केली जाते.
० मखनी मिसळ : टॉमेटो आणि पनीरच्या वापराने खास मखनी बनवली जाते. काहीसा पंजाबी टच असणारा हा मिसळ प्रकार प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.
० जंक्शन स्पेशल : दोन व्यक्तींसाठी एक प्लेट अशी ही मिसळ आहे. कोल्हापुरी रस्सा आणि मखनी रस्सा एकत्र करून चार बटर पाव सहित ही डिश सर्व्ह केली जाते.
(वेगळा बॉक्स)
एक्सप्रेस मिसळ : हल्ली कॉर्पोरेट आणि बर्थडे पार्टीजकरता अनेक लोक मिसळ हा पदार्थ निवडतात. हे लक्षात घेऊन कॉर्पोरेट पार्टीज करता खास एक्सप्रेस मिसळ हा प्रकार तयार करण्यात आला आहे. एका विघटनशील ग्लासमध्ये हा मिसळ प्रकार सर्व्ह केला जातो. कॉर्पोरेटच्या घाईच्या विश्वाकरता हा एक उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.
महाराष्ट्राची पारंपारिकता जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या सुयोगाला टीम प्लॅनेट मराठीकडून अनेकानेक शुभेच्छा….
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
सुयोग तुझ्या वेगवेगळ्या चवीष्ट मिसळ कृती वाचताना खरंच तोंडाला पाणी सुटत. अतिशय सुंदर. मे महिन्यात तुझ्या ह्या मिसळ junction ला १ वर्ष पूर्ण होतेय तला अधिकाधिक यश ह्यात मिळेल ही खात्री आहे. अनेक शुभेच्छा