नाटक, मालिका आगामी चित्रपट या नंतर अभिनेत्री हृता दुर्गुळे नव्या कोऱ्या लघुपटात झळकणार आहे. दुर्वा, फुलपाखरू या सारख्या मालिकांमधून आपल्या भेटीला आलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून हृता ओळखली जाते.
छोट्या पडद्यावरून ती आता चक्क “अनन्या” या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे पण याच सोबतीने ती आपल्यासाठी अजून एक गुड न्यूज घेऊन आली आहे. “स्ट्रॉबेरी शेक” या नव्या कोऱ्या लघुपटातुन हृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या नव्या लघुपटाची उत्सुकता सगळ्यांना होतीच कारण ती या लघुपटात दिगग्ज अभिनेता सुमीत राघवन सोबत काम करताना बघायला मिळणार आहे.
सुमीत राघवन आणि हृता ची वेगळीच केमिस्ट्री या लघुपटा मधून उलगडणार आहे. तसेच हृता च्या बॉयफ्रेंड ची भूमिका रोहित फाळके ने साकारली आहे. नक्की काय आहे हा “स्ट्रॉबेरी शेक” हेच जाणून घेऊ या लघुपटाच्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि DOP (छायाचित्रकार) यांच्या कडून…
“स्ट्रॉबेरी शेक च्या गोड आठवणी”
लघुपटाबद्दल सांगायचं झालं तर ही एका मुलीची आणि तिच्या सुपरकूल बाबाची गोष्ट आहे. लघुपटात मी मुलीची भूमिका साकारली आहे. एके दिवशी चिऊ तिच्या बॉयफ्रेंड ला तिच्या घरी घेऊन जाते आणि मग तेव्हा बाबाची उडणारी तारांबळ आणि ही सगळी गोष्ट “स्ट्रॉबेरी शेक” मधून उलगडणार आहे. बाबा तिच्या चिऊ सोबत एका मित्रा सारखा वागण्यासारखा प्रयत्न करतो आणि लघुपटाच्या शेवटी बाबा आणि त्यांच्या मुली मधला तो संवाद घडतो हा भाग माझ्यासाठी फार खास होता, कारण प्रत्येक मुलीला तिचा बाबा हा सुपरस्टार सारखा असतो. १९ वर्षाच्या मुलीची (मृण्मयी) ची भूमिका मी यात साकारते आहे. मृण्मयी (चिऊ) ही खूप जास्त तिच्या आयुष्यात सॉर्ट आहे तिची स्वतःची वेगळी मतं आहेत आणि मग ते प्रत्येक मुला-मुली सोबत त्यांच्या पालकांसोबत असलेलं नात हे यातून बघायला मिळणार आहे. माझा या लघुपटाचा अनुभव खूप कमाल आहे. पहिल्यांदाच मी शोनील, लौकिक आणि त्यांच्या टीम सोबत काम केलंय. शोनील सोबत काम करताना खूप छान वाटलं कारण आमचा दिग्दर्शक हा खूप शांत आहे, तो त्यांच्या कामाबद्दल एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे त्याच्या सोबतीने काम करणं हा अनुभव छान होता. लघुपट फार खास आहे कारण सुमीत सरांसोबत काम करायला मिळालं, त्यांचा अभिनय सेटवर वावरण्याची पध्दत हे सगळंच मला खूप शिकवून जाणारं होत. त्यांना सेटवर लाईव्ह काम करताना बघणं माझ्यासाठी एक प्रकारची अभिनयाची कार्यशाळा होती. ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही कडून मला गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुमीत सरांककडून काय गोष्टी शिकले तर सेटवर कसं रहावं ते फार छान स्वतःला प्रेसेंट करतात. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करत होते तर थोडं टेन्शन होत कारण मुलीचं आणि बाबाची गोष्ट साकारायची होती. शोनील, रोहित, लौकिक, तृषाला, या सगळ्यांसोबत काम करताना धम्माल आली. असं नाही की “स्ट्रॉबेरी शेक” ही एका विशिष्ट वयोगटातील लोकांनी बघावी तर ही सगळ्यांसाठी आहे. मुलीचं आणि तिच्या बाबाचं गोंडस नातं यातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. मागच्या एप्रिल ला आम्ही हे शूट केलं होतं तर ही शॉर्टफिल्म आता लोकांच्या भेटीला येत आहे तर मला या बद्दल खूप उत्सुकता आहे. झी ५ सारख्या प्लॅटफॉर्म वरून ती येत आहे तर तुम्ही ती नक्की बघा तुम्हाला चिऊ आणि तिचे बाबा नक्की आवडतील.
हृता दुर्गुळे (अभिनेत्री)
व्यावसायिक स्थरावर माझी ही दुसरी शॉर्ट फिल्म आहे. या टीम बरोबर काम करण्याचा अनुभव खूप उत्कृष्ट होता. सुमीत राघवन, रोहित फाळके आणि हृता दुर्गुळे यांच्या सारखे उत्तम अभिनेते असल्यावर दिग्दर्शक म्हणून जववाबदरी खुप वाढते. ही जरी शॉर्ट फिल्म असली तरी आम्ही एखादया चित्रपटासारखी ती शूट केली आहे. सगळ्यांनी एवढं उत्तम काम केलंय त्यामुळे हा प्रोजेक्ट कायम माझ्या खूप जवळचा राहणार. लघुपटाचं नाव “स्ट्रोबेरी शेक” का आहे ? याचं खरं कारण तुम्हाला लघुपट बघूनचं समजेल, पण प्रेक्षकांना आंब्याच्या सिजन मध्ये आमच्या स्ट्रोबेरी शेक ची चव जास्त आवडेल यांची मी आशा करतो.
शोनील यल्लातीकर (लेखक , दिग्दर्शक)
जवळपास ही शॉट फिल्म शूट करून वर्ष झालंय तरीसुद्धा काल परवा आपण शूट केलं असं वाटतंय. “स्ट्रॉबेरी शेक” माझ्यासाठी एक स्वप्नपूर्ती होती. शॉर्ट फिल्म शूट करण्याची संपूर्ण प्रक्रिया मी फार एन्जॉय केली आहे, प्री प्रोडक्शन प्लॅनिंग, शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन हा सगळा अनुभव माझ्यासाठी फार खास होता. खूप दिगग्ज आणि अनुभवी कलाकार असलेल्या सुमीत दादा सोबत काम करण्याची संधी यामुळे मला मिळाली. आताच्या पिढीची लाडकी अभिनेत्री हृता हिच्या सोबतीने काम करताना कामातला एक वेगळा दृष्टिकोन सापडत गेला. दोन्ही कलाकारांनी काम करताना कधीच दबाव येणार नाही याची घेतलेली काळजी हे सगळंच खूप कमाल होत. या सगळ्या पेक्षा “स्ट्रॉबेरी शेक” मधून मला शोनील सोबत काम करण्याची संधी मिळाली या साठी मी दोन वर्षे वाट बघत होतो.
लौकिक जोशी (DOP) (छायाचित्रकार)
हृता आणि सुमीत यांच्या नात्यांची ही सुंदर गोष्ट बघण्यासाठी हा “स्ट्रीबेरी शेक” नक्की बघा.
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)