तू चाल पुढं….
‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये प्रीथ्वी मोलाची… तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची…पर्वा बी कुनाची’ या ओळींना साजेस काम सध्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी, सर्व सफाई कामगार आणि अत्यावशक सेवेत काम करणारी सगळीच मंडळी करत आहेत.
सध्याच्या कठीण प्रसंगाशी ही सर्व मंडळी जिद्दीनं लढा देतं आहेत. अशा या सगळ्या देवदुतांचे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी आभार मानले आहेत. लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि समीर विद्वांस यांनी अनेक मराठी कलाकारांचा एक आगळा वेगळा व्हिडीओ तयार केला आहे. सिने, नाट्य आणि मालिका विश्वातील तीसहून अधिक कलाकार यात सहभागी झाले आहेत. देशभरात आज करोनानं थैमान घातलं, सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. असं असतानाही आपल्या जिवाची बाजी लावून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना त्यांच्या कार्याला अनोखा सलाम केला आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांना उद्देशून ‘झेंडा भल्या कामाचा जो घेऊनी निघाला’ असं म्हणत या कलाकारांनी, ‘मानवतेसाठी झटणाऱ्या प्रत्येकाला हा मानाचा मुजरा केला आहे.
सध्या जरी ही सर्व कलाकार मंडळी घरी असली तरी, करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाचं मनोबल कसं वाढवता येईल ते पाहणं नागरिक आणि कलाकर म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. या भावनेतूनच हेमंत आणि समीरला हा व्हिडीओ तयार करण्याची संकल्पना सुचली. सुमारे साठ-पासष्ठ कलाकारांची नावं सहभागी होण्यासाठी काढली होती. परंतु, गाण्याच्या मर्यादेमुळे सर्वांनाच यात सहभागी करून घेता आलं नाही. पण, हा व्हिडीओ संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं हेमंत आवर्जून सांगतो.या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक, अमृता खानविलकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, प्रवीण तरडे, ऋता दुर्गुळे, मिथिला पालकर, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव, गश्मीर महाजनी, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे, चिन्मय मांडलेकर, अभिनय बेर्डे, जसराज जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, श्रेया बुगडे, अनिता दाते, शिवानी सुर्वे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, हे कलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व कलाकारांनी आपापल्या घरीच व्हिडीओ शूट करून मेलच्या माध्यमातून व्हिडीओचा सर्व कारभार ऑनलाईन पार पडल्याचं हेमंत सांगतो.अवघ्या तीन-चार दिवसांत कलाकारांनी आपापले व्हिडीओ बनून मेलच्या माध्यमातून हेमंत आणि समीर यांच्याकडे पाठवले. ‘मला आणि समीरला सर्व कलाकारांच्या घरातील चित्र माहीत आहे. त्यामुळे कोणत्या कलाकारानं घरात कुठे उभं राहून गाण्याचं शूटिंग करावं याविषयी आम्ही प्रत्येकाला कल्पना दिली. त्यानंतर सर्व कलाकारांनी आपापला भाग शूट करून पाठवला. कलाकारांकडून आलेले सर्व व्हिडीओ एकत्र करून भावेश तोडणकर, फैजल महाडिक यांनी त्यांच्या घरातून याचं एडिटिंग केलं. तर सचिन गुरव याने यातील पोस्टरसाठी काम केलं. व्हिडीओ पॅलेसच्या नानूभाई जयसिंग यांचीही या कामात मोलाची साथ लाभल्याच’ हेमंत सांगतो. कलाकारांची ही मानवंदना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत – अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)