“मंजिरी प्रसाद ओक” ची खवैय्येगिरी..
लॉकडाऊन मुळे सगळयांना स्वयंपाकाचा वेगळाच छंद लागला. अनेकांना ऑफिस, रोजच्या घाई गडबडीत कूकिंग करायला मिळत नाही अशी सगळी मंडळी या लॉक डाऊन मध्ये आपल्या खाण्याच्या आवडी निवडी जपायला लागले आहेत. याला अपवाद आपले मराठी कलाकार सुद्धा नाहीत. रोजच शूट, धावपळ या सगळ्यातून वेळ काढून निवांत जेवण करायला यांना फार कमी वेळ मिळतो पण लॉक डाऊन मुळे बरेच कलाकार स्वयंपाक घरात रमलेत. निर्मात्या मंजिरी ओक आणि अभिनेते प्रसाद ओक यांच्या घरी तर रोज चमचमीत पदार्थांची रेलचेल बघायला मिळते.
आसामी, राजस्थान, झारखंड, वेस्ट बंगाल, पंजाबी, हैद्राबादी, तामिळनाडू, गोवा, मिझोराम अश्या विविध राज्यांच्या पारंपारिक पदार्थांची रेलचेल सध्या ओक कुटूंबात बघायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या काळात “मंजिरी ओक” रोज काही तरी चविष्ट पदार्थ बनवतात, त्यांच्या या रोजच्या स्वादिष्ट जेवणाचे फोटो बघून अनेक कलाकार मंडळी लॉकडाऊन नंतर ओक यांच्या घरी जाण्याच्या बेतात आहेत. मंजिरी ओक यांच्या या खाद्य आवडी बद्दल आज आपण त्यांच्या कडून काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
“स्वयंपाकांचा अनोखा छंद”
ज्या दिवशी लॉक डाऊन जाहीर झाला त्याच्या नंतर २ दिवस मी असंच टाईमपास केला, मग लक्षात आलं की हे कधी संपेल यांची काही खात्री नाही. आपण हा वेळ काहीतरी वेगळं करण्यासाठी वापरू या. आपल्या जगात कोरोना सारखं संकट आलंय आणि प्रत्येक राज्यातील, देशातील सरकारी कर्मचारी आपल्या परीने या परिस्थितीशी दोन हात करतात आणि या साठी काम करतात. मग मला एक कल्पना सुचली की प्रत्येक राज्यातील माणसाला जो कोरोना साठी लढतोय काम करतोय त्या प्रत्येक माणसाला सलाम म्हणून त्या त्या राज्यातील काही खास पदार्थ आपण बनवू या. या सगळ्यात माझा वेळ जातो, त्या निमित्ताने मला नवीन पदार्थ शिकायला मिळतात. यामुळे घरच्यांना वेगळे पदार्थ चाखायला मिळतात आणि विविध चवीचे पदार्थ ही खायला मिळतात. यात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट “आपण जे खातो तसा आपण विचार करतो” खूप सकारात्मक ऊर्जेने जेवणं बनवलं की आपण तेवढे सकारात्मक राहतो. या परिस्थितीत सकारात्मक राहणं तितकंच महत्त्वाच आहे म्हणून मी खूप सकारात्मकतेने रोज काहीतरी नवीन गोष्टी बनवते त्यामुळे घरी एक आनंदी वातावरण राहतंय आणि ही सकारात्मकता सुद्धा जपली जाते.
“असे निवडते पदार्थ”
एखाद्या राज्यातील पदार्थ शोधतांना मी त्या राज्याचे काही खास सण आहेत का हे बघते आणि त्यानुसार रेसिपी बनवते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी एकदा ही घराबाहेर गेले नाही जे घरात सामान आहे ते बघून त्या नुसार पदार्थ करते. या सगळ्यामुळे घरचे तर खुश आहेत, त्यांना जेवणात रोज नवीन राज्यांच्या चवी चाखायला मिळतात त्यामुळे घरी सगळ्यांची मज्जा सुरु आहे. त्यांना मी केलेल्या रेसिपी आवडतात म्हणून मी हे करू शकतेय. स्वयंपाकात प्रसाद ची काही मदत नसते आणि मला फार कुणाची स्वयंपाकात मदत आवडत नाही पण मी इकडे असले की प्रसाद आणि माझा लहान मुलगा मयंक हे घरातली बाकीची कामं आवरतात. मी शक्यतो रेसिपी या नेट वरून शोधून काढते. कारण आपल्याला एवढी काही माहिती नसल्याने सध्या नेट हा बेस्ट पर्याय आहे. घरात काय सामान आहे आणि घरच्यांना काय खायला आवडेल यांचा विचार करून मी पदार्थ बनवते. मयंक च्या खाण्याच्या आवडीनिवडी फार नाही पण प्रसाद खाण्याच्या बाबतीत त्याच्या फार आवडीनिवडी आहेत. त्यामुळे मला खूप विचार करून काय जेवायला बनवायचं हे ठरवावं लागतं.
“लोकांना मिळतेय प्रेरणा”
या निमित्ताने मी एक नक्की सांगते की मी जश्या रेसिपी सोशल मीडिया वर पोस्ट करायला लागले मला अनेकांचे मेसेज येतात की तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी आज जेवण बनवलं. मला या गोष्टीचा फार आनंद होतो की लोकं घरी बसून अश्या तर्हेने सकारात्मक राहतात. यातून मला कामाची नवी ऊर्जा मिळते. अजून काय हवंय..
“नव्या चित्रपटासाठी सोबत काम”
कूकिंग बरोबर मी प्रसाद ची त्यांच्या नव्या फिल्म ची असिस्टंट असल्यामुळे (प्रसाद ओक दिग्दर्शित, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित) आमचा “चंद्रमुखी” या पुढच्या चित्रपटाची काम आम्ही दोघे मिळून करत आहोत. या सोबतीने व्यायाम करतो, हेल्दी खाऊन हेल्दी राहतोय.
देव करो आणि हे संकट लवकर संपो. एक नवीन देश नवीन विचारधारणा नवीन शक्ती या सगळ्या मधून जन्माला येऊ देत हीच प्रार्थना.
(मंजिरी प्रसाद ओक)
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)