कलाकार “चेतन राऊत” ची करोना वीरांना अनोखी मानवंदना..
कलाकार हा शब्दांपेक्षा त्याच्या कलेतून व्यक्त होणं पसंत करतो असं म्हणतात. चेतन राऊत हाही असंच एक अवलिया. तब्बल दहा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर असणारा हा कलाकार समाजाप्रतीही तेवढाच जागरूक आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेच्या सुरक्षिततेसाठी अविरतपणे झटणाऱ्या वर्दीतल्या देवदूतांना त्याने त्याच्या कलेतून मानवंदना दिली आहे.
जगभरात करोनामुळे हाहाकार सुरु आहे. करोनाचा फैलाव जोरदारपणे सुरु आहे. अशा परिस्थितीतही हजारो डॉक्टर, परिचारिका, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आपले प्राण संकटात टाकून केवळ आपल्या संरक्षणासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी केवळ जनतेच्या पर्यायी देशसेवेत स्वतःला झोकून दिलं आहे. काही दिवसापूर्वी अशाप्रकारे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांसाठीच मानवंदना देण्याचं आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केलं होत. त्यांच्या आवाहनाला मान देतं सर्वानीच अशा लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. चेतन राऊत या कलाकारानेही त्याच्या स्टाईलने आरोग्य विभाग आणि पोलीस खात्यात काम करत तत्पर असणाऱ्यांना एक कलाकार म्हणून त्याच्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
चेतनचे वडील नवशा राऊत हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस दलात कार्यरत होते. तब्बल ३३ पोलीस दलात काम केल्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती मिळाली आहे. पण अतितटिच्या वेळी पोलीस म्हणून त्यांची होणारी धावपळ, जीवाची तमा न बाळगता होणारं काम, या सगळ्या गोष्टी त्याने जवळून पहिल्या होत्या. त्यामुळे समंध पोलीस बांधवांविषयी चेतनला नितांत आदर असल्याचे सांगत त्याने या आदरापोटी आता सगळ्यांना मानवंदना देण्याकरता एक पोर्ट्रेट साकारले आहे. शिवाय, आरोग्य विभागात कार्यरत असणार्यां सगळ्यानाही त्याने अशाच आपल्या कलाकृतीतून मानवंदना दिली आहे. ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याचं धर्तीवर करोनाशी दोन हात करत लढणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांसाठी ६ रंगछटा असलेल्या तब्बल ४२६६ पुशपिन चा वापर करून पोर्ट्रेट साकारलेले आहे. तर ४ हजार आठशे साठ पुशपिन्सचा वापर करून ३० बाय १८ इंचाचे पोलिसांचं त्याने पोर्ट्रेट साकारले आहे.
करोनाची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांसोबतच खंबीरपणे उभं राहून झटणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं पोट्रेटही चेतनने साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ३ हजार आठशे अठ्याऐंशी पुशपिन्स वापरून २४ X १८ इंचाची कलाकृती साकारत त्याने मुख्यमंत्र्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. तर नुकतंच, ४ हजार दोनशे सहासष्ठ पुशपिन्स वापरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं पोट्रेट साकारलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या सगळ्याप्रती आदर असल्याचे सांगत, ‘कलाकार असल्यामुळे अनेक गोष्टींच्या बाबतीत कलेच्या माध्यमातून व्यक्त होणं मला आवडतं, त्यामुळे याही वेळी मी माझ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करून मानवंदना दिल्याचं चेतन आवर्जुन सांगतो. सध्या संचार बंदी असल्यामुळे बाहेर जाऊन कोणत्याही गोष्टी खरेदी करायला जाणं शक्य होत नसल्यामुळे घरी उपलब्ध असलेल्या थोडक्याच साहित्याचा वापर करून कलाकृती साकारत असल्याचेही तो सांगतो. शिवाय उद्योजक रतन टाटा आणि अभिनेता अक्षय कुमार यांचेही पोर्ट्रेट साकारले आहेत.
चेतनच्या इतर विक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://planetmarathimagazine.com/2020/02/
अजय उभारे (प्लॅनेट मराठी)