जगात सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या “बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात” मराठमोळ्या अक्षय इंडीकर च्या “स्थलपुराण” या चित्रपटाची निवड झाली असून या तरुण दिग्दर्शकाच नाव प्रसिद्ध १० दिग्दर्शकांच्या यादीत झळकलं आहे. संपूर्ण देशाला यांचा अभिमान असून खास करून सोलापूरच्या अक्षय ची ही अनोखी झेप लक्षणीय आहे. अक्षय च्या स्थलपुराण या चित्रपटाविषयी काही खास गोष्टी आणि अक्षय च्या अनोख्या जगातभारी चित्रपट प्रवासाबद्दल ऐकू या तरुण दिग्दर्शक अक्षय इंडीकर कडून..
“स्थलपुराण ची गोष्ट”
हा चित्रपट म्हणजे एका आठ वर्षाच्या मुलाच्या नजरेतून दिसणारी एका जागेची गोष्ट आहे. त्याचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन आणि त्याचं अनुभवविश्व या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. जन्मतःच त्याला लाभलेली अती संवेदनशीलता तसेच त्याच्या आयुष्यात अचानक घडलेले काही अनपेक्षीत बदल आणि त्या बदलातून सुरू होणारा त्याचा शोध. अशी या सिनेमाची मध्यवर्ती कल्पना आहे.
“अभिमानास्पद क्षण”
बर्लिन सारख्या ठिकाणी जेव्हा आपल्या चित्रपटाची निवड होते तो एक समृद्ध करणारा अनुभव असतो. ज्या लोकांचे सिनेमे पाहात आपण मोठे होत असतो, सिनेमे शिकत असतो त्याच लोकांच्या यादीत आपलं नाव जोडलं जातं त्या लोकांसोबत आपला सिनेमा दाखवला जातो तेव्हा स्वतःचा अभिमान वाटतोच शिवाय भविष्यातल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. शिवाय बर्लिनसारख्या ठिकाणी जिथे मी उभा होतो त्याच ठिकाणी अनेक दिग्गज दिग्दर्शक माझे आवडते दिग्दर्शक कधीतरी उभे असतील ही जाणीव हा वारसा एक कलाकार म्हणून खूप श्रीमंत करणारा असतो.
“चित्रपटाचा अनोखा प्रवास”
खर तर त्रिज्या बनवत असताना त्यात नेमाडेंची एक कविता मला वापरायची होती. त्याच निमित्ताने नेमाडेंची भेट झाली. त्यांचा सहवास इतका व्यापून टाकणारा होता, की नेमाडेंना भेटल्यावर मला असं वाटलं की, या माणसाला आपण टिपलं पाहिजे. पण टिपायंच मग ते कशा पद्धतीने हे ठरवायचं होतं. कारण नेमाडे या माणसाला टिपताना हा माणूस म्हणजे फक्त हाच माणूस आहे का, की त्यानं निर्माण केलेलं साहित्यही हाच माणूस असेल? असे प्रश्न पडायला लागले. कारण ते साहित्यही तितकंच खरं आहे, जितके नेमाडे खरे आहेत. मग त्या साहित्याचं काय करायचं? आणि फक्त साहित्य घेतलं तर ते निर्माण करणाऱ्या नेमाडेंचं काय करायचं? त्यामुळे असं वाटलं की, आपण दोन्हींना एकत्र करू. त्यामुळे एकीकडे डॉक्युमेंटरी चालू आहे, तर एका बाजूला फिक्शन चालू आहे. त्यातून मग डॉक्यु-फिक्शन हा फॉर्म – माहीत नाही कसा, पण आला आणि त्यातून उदाहरणार्थ नेमाडे घडला आणि त्रिज्याविषयी बोलायचं झालं तर त्रिज्याला सेमी-ऑटो बायोग्राफिकल चित्रपट म्हणता येईल. अकलूजसारख्या गावातून पहिल्यांदा स्थलांतरित झाल्यानंतर जेव्हा एखादं शहर समोर येऊन आदळतं, आणि शहर समोर येऊन आदळल्यानंतर जी अवस्था होते, त्यानंतर आपला स्वतःशी एक झगडा सुरू असतो. हा झगडा या नव्या वातावरणात आपली स्वतःची अशी जागा शोधण्याचा असतो. याच शोधण्याविषयीचा हा चित्रपट आहे. स्वतःला शांत वाटेल अशी कुठली जागा असते का? आणि ती असेल तर ती बाहेर कुठे असते की, आपल्या आतच असते, अशा वाटेने हा चित्रपट जातो. अवधूत नावाच्या एका पंचवीस वर्षाच्या पात्राने केलेला हा प्रवास आहे. जो माझ्या प्रवासाची बराचसा मिळता जुळता आहे. आणि त्यानंतर आलेला स्थलपुराण ही एक स्वतंत्र कलात्मक मांडणी म्हणता येईल.
“म्हणून हा विषय निवडला”
जेव्हा कुठलंही कथानक एका दिग्दर्शकाच्या मनात घोळत असतं ते तेव्हा ते कथानक आणि त्याचं पडद्यावर दिसणारं रुप याची सांगड तो दिग्दर्शक घालत असतो. त्यातून जी गोष्ट त्याच्या मनाला प्रभावी वाटते तिची निवड तो करतो. एखादी गोष्ट दृकश्राव्य माध्यमात कशी दिसेल ती नजर दिग्दर्शकाकडे असणे गरजेचे आहे. सोबतच दिग्दर्शकाची सिनेमा बनवायची पद्धत, त्याचा सिनेमा बनवायच्या मागचा विचार, त्याची वैयक्तिक विचारसरणी या सगळ्याचे पडसाद ज्या गोष्टीत सापडतात ती गोष्टी दिग्दर्शक निवडतो.
“आणि दिग्दर्शनात पाऊल ठेवलं”
मी मूळचा सोलापूरचा. दहावीपर्यंतचं शिक्षण तिथेच घेतलं. थोडे चांगले मार्क्स मिळाले म्हणून आपल्याकडच्या तथाकथित परंपरेनुसार विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. या शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो; पण अभ्यास, डिग्री, नोकरी हा माझा पिंड कधीच नव्हता. तिथं अपयश आलं, म्हणून मग पुन्हा गावी परतलो. लहाणपणी वाटायचं, आपण जादूगार व्हायला पाहिजे. थोडक्यात, कलेची आवड तेव्हापासूनच होती. बारावी झाल्यावर पुन्हा पुण्यात आलो. एस. पी. कॉलेजमध्ये नाटक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. कालांतरानं त्याचाही कंटाळा आला. पुढे मग ‘स्पंदन’ नावाच्या एका ग्रुपसोबत जोडला गेलो. ते लोक वेगवेगळे विषय घेऊन लघुपट करायचे. त्यांच्यासोबत रमलो आणि हे माध्यम नाटकापेक्षा जास्त प्रगल्भ वाटू लागलं, आवडू लागलं. आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना त्या त्या क्षेत्राचं अधिकृत शिक्षण घेणं बंधनकारक झालं आहे. त्याप्रमाणे चित्रपट क्षेत्रात काम करायचंय, तर या विषयातलं शिक्षण घेतलं पाहिजे, असं वाटून पुढे फिल्म इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला. त्या कलेचं प्रत्यक्ष शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात वाचनाची आवड निर्माण झाली होती. पुढे ओघानंच लिहावं असंही वाटू लागलं; पण आपल्याला लेखनाचं अंग नाही, हेदेखील समजलं. शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यामुळे चित्रपट विषयातल्या तांत्रिक गोष्टी एव्हाना समजू लागल्या होत्या. त्या तांत्रिक बाबींवर काम करणं आवडू लागलं आणि ते जमतही होतं. हे काम करत करत मग दिग्दर्शनात आलो आणि दिग्दर्शन हे क्षेत्र निश्चित झालं.
“कन्स्ट्रक्शन” हा पुढचा सिनेमा”
मराठीत सिनेमा करण्याचं असं आहे की, तुमची जी खरी निर्मिती आहे ती तुमच्या मातृभाषेत होते. सिनेमा जर स्वप्नासारखा असला पाहिजे, अंतरंगात डोकावणारा असला पाहिजे तर तुम्ही ज्या भाषेत स्वप्न बघता, त्या भाषेत तुमची कलाकृती असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदी सिनेमा करणं हे मला मोठं वाटतच नाही. म्हणजे ते मोठं कसं असू शकतं, शेवटी एक भाषा आहे तीही. ठीक आहे, जास्त प्रमाणात बोलली जात असेल ती, पण आपण अब्बास किअरोत्सामी बघतोच ना? किंवा इराणचा माजिद माजिदी बघतोच ना? तसं मग भाषेचा अडसर येतो म्हणून तुम्ही तुमच्या पात्रांचीच भाषा बदलणं हे मला योग्य वाटत नाही. आता मी पुढची फिल्म लिहितोय, ‘कन्स्ट्रक्शन’ नावाची. तिच्यामध्ये काही गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेर घडतात. मग कथानकातील तो भाग त्या भाषिक प्रदेशात घडतोय म्हटल्यावर मी तिथली भाषा नक्कीच वापरेन. पण मला हिंदी सिनेमा किंवा बॉलिवुड यांचं तसं आकर्षण नाहीये. त्यामुळे मी म्हणतो की, मला मराठीत काम करायचं आहे. ‘हिंदीत कधी जाणार?’ असं जे काही विचारलं जातं ना, ते आणि हिंदी म्हणजे काहीतरी मोठी पायरी आहे, हे मला फारसं पटत नाही.
अक्षय इंडीकर ला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! एक तरुण दिग्दर्शक म्हणून तुझं हे कौतुक कायम होत राहू दे आणि तू आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावत राहशील.
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)