कोविडयोद्धा ‘डॉ. श्वेता शेरवेगार’
देशाचं नावं उंचावण्यासाठी सेलर म्हणून खेळताना शीड सावरणाऱ्या हातांत करोनाविरुद्ध लढ्यात स्टेटसस्कोप…
करोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्या बरोबरीनेचं आता समाजातील विविध घटकही पुढे सरसावत आहेत. नाट्य-सिने श्रुष्टीतील कलाकार मंडळीही पुढाकार घेऊन जेवढी आणि जशी शक्य होईल तशी मदत करताहेत. करोनाविरुद्धच्या या लढाईत सुप्रसिद्ध सेलिंगपटू डॉ. श्वेता शेरवेगार लॉकडाउनची सुरुवात झाल्यापासून कोविडयोद्धा बनून सध्य परिस्थितीशी लढतेय. जाणून घेऊयात हरहुन्नरी खेळाडू आणि जबाबदार डॉक्टरची भूमिका बजावणाऱ्या डॉ. श्वेता शेरवेगार विषयी….
करोनामुळे संपूर्ण जग जणू थांबलंय. सर्वच उद्योगक्षेत्राबरोबर कधीही न थांबणारी सिनेमा-नाट्य श्रुष्टीही ठप्प झाली आहे. याबरोबरच आता क्रीडा जगतही शांत आहे. खेळांच्या स्पर्धा नाहीत कि कोणत्याही प्रकारचा सराव नाही. दोन वर्षापूर्वी आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतच प्रतिनिधत्व करत रौप्य पदक जिंकणारी. तसेच, महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही श्वेताला गौरवण्यात आलंय. सेलिंगपटू (शीडनौकायान) श्वेताला सध्या सराव करणं शक्य नाहीये. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाउन आणि त्यामुळे मिळालेला हा वेळ सत्कारणी लावायचं श्वेतानं ठरवलं आहे. त्यासाठी तिने घेतलेल्या बीएचएमएसचे (होमिओपॅथी) पदवीचा पुरेपूर वापर उपयोग करून सर्वतोपरी स्वतःला अहोरात्र देशसेवेत गुंतवून डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य बजावायचं तिनं ठरवलं आहे.
डॉ. श्वेता शेरवेगारचं नुकतंच होमिओपॅथीचं शिक्षण पूर्ण झाल होतं. प्रत्यक्षात काम सुरू करण्याआधीच करोनाने जगभर थैमान घातलं. वाढता संसर्ग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता सरकारने नव शिक्षित डॉक्टरांना आरोग्यसेवेत रुजू होण्याचं आवाहन केलं. त्यानुसार डॉ.श्वेता देखील करोना विरूद्धच्या लढाईत करोना योद्धा बनून सहभागी झाली. दक्षिण मुंबईतील माझगाव, भायखळा, गिरगाव, ताडदेव आणि कुलाबा परिसरातील गरजू नागिरकांची आरोग्य तपासणी करण्यास तिने सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता लोकांची अहोरात्र सेवा करतेय. तिचा भाऊ मेजर डॉ.राजदीप शेरवेगार ही भारतीय सेनेत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकामापासून प्रेरित होऊन आपण मेडिकल क्षेत्राकडे वळल्याचं श्वेता आवर्जुन सांगते.
‘कोविडयोद्धा’ म्हणून ती करोनाविरोधातील युद्धात उतरून, या भयावह परिस्थितीमुळे घाबरलेल्या, उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असणाऱ्या आणि तपासणी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मार्ग दाखवण्याचं ती काम करते. कुलाब्यातील आयईएसईसीसीआय ही नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांची संस्था आणि चेंबूर कर्नाटका लॉ कॉलेजमधील विद्यार्थी तिला याकामात मदत करतात. तिच्या कामाबद्दल सांगताना ती म्हणते,‘सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मी काम करते. सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती पहायला मिळतेय. अशा परिस्थितीत त्यांना दिलास देतं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं ही एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे. लोकांचा ताप, रक्तदाब तपासणं, त्यांना माहिती देणं आणि त्यांच्या मनातील भीती दूर करणं या गोष्टींमुळे मला समाधान मिळतं. दररोज जवळपास दोनशेहून अधिक लोकांची तपासणी मी करतेय. एरव्ही खेळाडू म्हणून सेलिंगसाठी शीड धरणारी मी पीपीई किट घालून आता देशासाठी उपयोगी पडतेय. खेळाडू म्हणून देशासाठी नेहमी काहीतरी करण्याचा मी नेहमी प्रयंत्न केला. पण, आता माझ्या ज्ञानाचा उपयोग राज्यासाठी, पर्यायी देशासाठी होतोय याचा मला आनंद आहे.
श्वेता ऑलम्पिकसाठीही तयारी करत होती. पण, करोनामुळे टोकियोत होणारी ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता तूर्तास करोनासोबतचा लढा संपवून त्यानंतर ऑलम्पिकचं लक्ष्य तिच्या डोळ्यांसमोर आहे. अशा खेळाडू आणि डॉक्टर म्हणून देशासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या डॉ. श्वेता शेरवेगार हिला ‘प्लॅनेट मराठी’च्या संपूर्ण टीमकडून अनेकानेक शुभेच्छा…!
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)