रंगमंच कलाकारांसाठी तरुण रंगकर्मीचा मदतीचा हात
लॉकडाउनमुळे अनेकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. दिवसाच्या रोजगारावर जगणाऱ्या माणसाचं आयुष्य तर त्याहूनही कठीण झालं आहे. मराठी रंगभूमीवर सुरु असलेल्या, नाटकातील अचानक बेरोजगार झालेला पडद्यामागील घटक म्हणजे रंगमंच कामगार. म्हणूनच एकांकिका करणारी आणि नाट्यक्षेत्राशी जोडलेली अनेक मंडळी रंगमंच कामगारांसाठी मदत निधी गोळा करत आहेत. हा मदत निधी उभा करण्यासाठी आता महाविद्यालयीन आणि हौशी कलाकार संस्था पुढे सरसावल्या आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन हा निधी उभारण्याचा उपक्रम हाती घेत तब्बल ५७,२०१ रुपये इतका निधी जमा केला आहे. जमा झालेला निधी अखिल भारतीय नाट्य परिषदेला सुपूर्त केला असून या पूढेही निधी उभारण्यासाठी एकांकिका करणारी ही मंडळी कार्यरत असणार आहेत. नेपथ्य कामगार, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत करणारे, नाटकांच्या बस, टेम्पोचे चालक, थिएटर्सचे बुकिंग करणारे, व्यवस्थापक इत्यादी घटकांचा समावेश आहे.
रुईया , एम. डी, साठ्ये, डहाणूकर , कीर्ती आणि एम.सी.सी. या कॉलेजेसची नाट्यमंडळ तसेच ‘वर्क इन प्रोग्रेस कल्याण’ ही हौशी संस्था मदत निधी उभा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. सुयोग भुवड, उज्वल कानसकर, समीर सावंत, कुणाल पवार, ऋषि मुरकर, सुरज नेवरेकर, पराग ओझा, संकेत पाटील, सुरज कांबळे या कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थी तसेच नाट्यमंडळाशी नेहमी जोडून असलेल्यांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येक कॉलेजच्या नाट्यप्रमुख किंवा विद्यार्थी प्रतिनिधीने पैसे जमा करण्याचे काम सुरू केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपली पॉकेटमनी या उपक्रमासाठी दिली तर काहीनी कठीण काळासाठी जपून ठेवलेली बक्षिसाची रक्कम या उपक्रमाला दिली. एकांकिका करताना अनेकांचे हातभार लागतात त्यात अनेकवेळा ही रंगमंच कामगार मंडळी अगदी नाममात्र शुल्क आकारून मदत करतात. एकांकिका हा नाट्यसृष्टीचा एक अविभाज्य घटक आहे आणि रंगभूमीला नवीन कलाकार देण्यासोबत, सामाजिक बांधिलकी जपणं सुद्धा एकांकिका क्षेत्रातील मुलांनी जाणले आहे. तसेच अनेक कलाकारांनी या योजनेला संपूर्ण पाठींबा दिला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. निनाद लिमये, रामचंद्र गावकर, प्रल्हाद कुरतडकर, ऋतुजा बागवे, स्नेहल शिदम, मंदार मांडवकर, स्वप्निल टकले, चेतन गुरव राजरत्न भोजने या एकांकिका मधून पुढे आलेल्या अनेक कलाकारांनी देखील या उपक्रमात सहभाग घेत मदतीचा हात पुढे केला. मदत जरी सुपूर्त केली गेली असली तरी उपक्रम इथे थांबला नसून तो पुढे चालू राहणार असून त्यासाठी मुंबईसोबत महाराष्ट्रातल्या अनेक नाट्यप्रेमी कॉलेज आणि हौशी संस्थांनी एकत्र यावे असे आवाहन सुद्धा या एकांकिका करणाऱ्या मंडळींनी केले आहे.
नाट्य क्षेत्राशी जोडली गेलेली अनेक मंडळी रंगमंच कामगारांसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी पुढे येतात हीच मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. एकांकिका करताना ही मुलं नेहमीच आपल्या चौकटीबाहेर जाऊन नवनवीन प्रयोग करत असतात आणि ही मदत सुद्धा एक चौकटी बाहेरचा त्यांचा प्रयोगच आहे. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक या मदत निधीसाठी त्यांचा मोलाचा वाटा देत असताना या मुलांनी निधी उभारण्याचे हे काम स्व इच्छेने सुरू केलंय हे प्रशंसनीय आहे. एकांकिका या नाटकाच्या अविभाज्य घटकाचे प्रतिनिधित्व करणारी ही मुलं या निधी उभारण्यासोबतच सामाजिक भान असलेली उद्याची रंगभूमी सुद्धा घडवतील हे नक्कीच.
-प्रसाद कांबळी (अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद)
एकांकिका स्पर्धांना आमने सामने असलेलो आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आमच्यात एक दुवा आहे जो आम्हा सगळ्याना एकत्र आणतो तो दुवा म्हणजे नाटक. अनेक कॉलेज, विद्यार्थी, पालकवर्ग, प्रेक्षक सर्वांचीच साथ लाभली आणि आम्ही इथवर पोहोचू शकलो. रंगमंच कामगार ही मंडळी आमच्यासाठी देवाहून कमी नाही आहेत, कारण आम्हाला गरज पडेल तेव्हा ही मंडळी धावून येतात. आम्हाला त्यांचा इतका आधार असतो की त्यामुळे आम्ही बेफिकीर असतो. त्यांच्यासाठी निधी उभारण हे आमचं कर्तव्य होतच पण तो जेवढा शक्य होईल तेवढा जास्त जमवणे हे महत्त्वाच होत. एकांकिका कलाकार हे पहिल्यांदाच यासाठीच एकत्र आले असून हा उपक्रम फक्त एकदा करून न थांबता तो वर्षभर चालू राहणार आहे.
– सुयोग भुवड, सुरज कांबळे (समन्वयक, एकांकिका मंडळी)
‘नाट्यजत्रा’ तुमच्या भेटीला.
लॉकडाउनमुळे आता अनेकांच्याच आयुष्यात आर्थिक अडथळे आले आहेत परंतु तसं असूनही अचानक बेरोजगार झालेल्या रंगमंच कामगारांच्या मदत निधीसाठी एम. डी नाट्यांगणच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘नाट्यजत्रा’ आयोजित करण्याचं ठरवलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचून रंगमंच कामगार मदत निधी उभारण्यासाठी हि सर्व नाटकवेडे सज्ज झाले आहे. २८ ते ३० मे असे तीन दिवस हि नाट्य जत्रा रंगणार आहे. या नाट्य जत्रेत वेगवेगळ्या कॉलेजच्या गाजलेल्या एकांकिका आता प्रेक्षकांना घरबसल्या ऑनलाइन पाहता येणार आहेत. त्यामध्ये रुईया कॉलेजची ‘एकादशावतार’, किर्ती कॉलेजची ‘एकुटसमूह’ व डहाणूकर कॉलेजची ‘लौट आओ गौरी’ ह्या व अश्या अनेक एकांकिकांचा आस्वाद घेता येईल. लॉकडाउनमुळे नाटक व एकांकिकेचे प्रयोग जरी थांबले असले तरी आता अनेक एकांकिका ऑनलाइन पाहता येणार आहेत. एम.डी नाट्यांगणच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ह्या नाट्य जत्रेला अनेक कॉलेजेस आणि हौशी नाट्यसंस्थांनी पाठींबा दिला आहे. रुईया, साठ्ये, डहाणूकर, कीर्ती आणि एम.सी.सी. या कॉलेजेसची नाट्यमंडळ तसेच ‘वर्क इन प्रोग्रेस कल्याण’ ही हौशी संस्था मदत निधी उभा करण्यासाठी पुढे आल्या. रंगमंच कामगार मदत निधी उभा करण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी सर्वानीच उचललेलं हे विचारपूर्वक पाऊल आहे. या उपक्रमाच्या शेवटी इच्छुक प्रेक्षकांनी त्यांच्या परीने रंगमंच कामगारांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. रंगमंच कामगारांसाठी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत मिळण्यासाठी नाट्य जत्रा तीन दिवस रंगणार आहे.
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)