निर्माते अक्षय बर्दापूरकर सांगताहेत पहिल्यावहिल्या मराठीपण जपणाऱ्या मराठी मनोरंजन विश्वातील ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ या पहिल्या मराठी ओटीटी माध्यमाविषयी…
मराठी सिने विश्वात नवनवीन प्रयोग करून दरवेळी चर्चेत राहणार नावं म्हणजे ‘प्लॅनेट मराठी’. प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा, निर्माते आणि एक उत्तम उद्योजक असणाऱ्या अक्षय विलास बर्दापूरकर यांनी काही वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीची स्थापना केली. अल्पावधीतच यशाची शिखर गाठतं त्यांनी नव्या टॅलेंटसाठी ‘प्लॅनेट-टी’ अर्थातच ‘प्लॅनेट टॅलेंट’ची सुरुवात केली. प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला, बिग-बि अमिताभ बच्चन आणि जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला. शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवचा ‘गोष्ट एका पैठणीची…’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे दोन महत्त्वाचे चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत. पण सध्या ‘प्लॅनेट मराठी’ची चर्चा आहे टी एका वेगळ्याच कारणासाठी. जगातील पाहिलंवहील संपूर्णतः मराठीपण जपणारं नवंकोरं ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत. याविषयी प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा आणि ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे सीएमडी, निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत….
० ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची कल्पना कशी सुचली आणि त्यामागील नेमका उद्देश काय?
उत्तम कथा, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच गोष्टींमुळे मराठी चित्रपट दिवसागणिक समृद्ध होतोय. परंतु, तरीही अनेक गोष्टींच्या बाबतीत त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो ही गोष्ट नाकारता येणारं नाही. चित्रपट गृहांसाठी हिंदी सिनेमांबरोबरची स्पर्धा, वितरणातील कमतरता, काही अंशी प्रेक्षकांचा मराठी सिनेमांना मिळणारा कमी प्रतिसाद आणि सिनेमांचं बजेट या आणि अशा अनेक गोष्टींचा परिणाम चित्रपटावर होत असतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सिनेमे थांबले आहेत, काही चित्रपटगृह पूर्ववत सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत तर काही सध्याची परिस्थिती पाहता विविध ओटीटी माध्यमांवर आपले सिनेमे प्रदर्शित करताहेत. परंतु या ‘ओटीटी’च्या गर्दीतील मराठी सिनेमांची नावं अगदी बोटावर मोजण्याइतकी असावीत. सध्या उपलब्ध ओटीटी माध्यमांवर मराठी सिनेमाला आणि एकूणच मराठी भाषेला म्हणावा तसा वाव मिळत नाही. हिचं गोष्ट लक्षात घेऊन आम्ही फक्त मराठी सिनेमा, वेबसिरीज, नाटकं आणि इतर मनोरंजनाने परिपूर्ण असणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मराठीपण जपणार हे पहिलंवहिलं ओटीटी माध्यम ठरतंय याचा अभिमान आहे.
० सध्या ओटीटी जगतावर अनेक बड्या कंपन्यांची मक्तेदारी आहे. मग या स्पर्धेत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ कसा तग धरेल?
खरं सांगायचं तर, मराठी मनोरंजन सृष्टीत आमच्या या बाबतीत अशी काही स्पर्धा नाही आणि सध्याच्या ओटीटी माध्यमांना आम्ही आमचे स्पर्धक मानत नाही. एकूणच मराठी कंटेंटची त्या माध्यमांवर खूप कमतरता असल्याचं जाणवतं. उत्तमं कंटेंट असूनही मराठीला योग्य तो मंच मिळत नव्हता ही खरंतर दुःखाची बाब आहे. पण आता आमच्या ओटीटीच्या माध्यमातून ही पोकळीही भरून निघेल याची खात्री वाटते. मराठी भाषेसाठी आणि सिनेमांसाठी अजून लोकांनी पुढाकार घेऊन स्पर्धा निर्माण केली तर याचा नक्कीच आनंद असेल.
तूर्तास मराठी नाटकं, वेबसिरीज, लाइव्ह कार्यक्रम, लहानांसाठी मनोरंजन, विविध विषयांवरील टॉक-शो, विविध कलांसाठी मंच,फिटनेस अशा एक न अनेक गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध करून देणारा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हा एकमेव मंच असेल. त्यामुळे आता हे माध्यमही मोबाईल वरील टेलिव्हिजन ठरेल यात शंका नाही.
० ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ कडून प्रेक्षकांच्या काय अपेक्षा असतील?
मुळात काय अपेक्षा करावी हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उरणारं नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतं आहोत. जगभरातील सगळ्या वयोगटातील प्रत्येकासाठी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ त्यांना आवडतील आणि रुचतील अशा अनेक गोष्टी असतील. अगदी ६ वर्षाच्या लहान मुलापासून ते ६० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी काहींनाकाही खास आमच्या ओटीटीवर प्रेक्षकांना मिळेल. सलग पन्नास हजार तास प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असा भन्नाट कंटेंट आमच्याकडे तयार आहे; त्यात नव्या गोष्टी आणि मनोरंजनपट समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. आमच्याकडून प्रेक्षकांच्या मनोरंजनात तिळमात्र कमतरता उरणार नाही याची पूर्ण काळजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेईल. मराठी प्रेक्षक आणि मराठमोळ्या टॅलेंटसाठी हे एक उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं.
० चांगला कंटेंट मिळवण्याच्या दृष्टीने भाषा अडथला ठरू शकते का? निर्माता म्हणून तुम्हाला काय वाटतं?
अजिबात नाही. कोणतीही भाषा त्यात मिळणाऱ्या संहीते (कंटेंट) साठी अडथला ठरते किंवा ठरेल असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटण्याचं कारण म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याची माझी आणि माझ्या टीमची दृष्टी. मराठीत उत्तम कलाकार आहेत त्यांच्यातील कला उत्तम पद्धतीने जगासमोर आणून त्यांना स्टार्स बनवलं पाहिजे. उत्तम कथा-पटकथा मराठीत आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळणं आवश्यक आहे. शिवाय, आपल्याकडील सिनेमे, वेबसिरीज, नाटकं योग्य वितरण होऊन जगभर पोहचायला हवं. निर्माता म्हणून ज्यावेळी आपण एका टीमच्या मागे खंभीरपणे उभे राहतो त्यावेळी टीममधील प्रत्येकाची काम करण्याची जिद्द आणि उर्जा काही औरच असते. मग, त्यांना भाषेची कोणतीही बंधन थांबवू शकत नाही आणि त्यातूनच उत्तमोत्तम कलाकृती घडतील असा विश्वास मला वाटतो. त्यामुळे कोणत्याही भाषेपेक्षा त्याची प्रगल्भता आणि निर्मात्याचा विश्वास यापुढे कोणतीही अडचण फार काळ टिकत नाही.
शब्दांकन : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
visit – http://www.planetmarathi.com