मराठी कलाकार लुटताहेत उत्सवाचा आनंद. उत्सव शांततेत, पण उत्साह कायम.
आधी वंदू तुज मोरया…!
गणेशोत्सव म्हणजे आपल्या सगळ्यांच्याचं आवडत्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांच्या अधिपतीच्या आगमनाचा सगळ्यांमध्ये उत्साह असतो. यंदा करोनाच्या परिस्थितीमुळे उत्सव शांततेत पार पडत असला तरी उत्साहात मात्र कमतरता राहू नये. असं प्रत्येकाला वाटतंय. अशाच काही कलाकार मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान झालेत, त्यांनी कशी आणि काय तयारी केलीये नक्की वाचा.
करोनाचा धोखा लक्षात घेता आणि खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षीपेक्षा कमी सजावट कमी लोकं असं असलं तरी बाप्पााच्या उत्सवात आणि माझ्या उत्साहात कोणतीच कमतरता राहणार नाही याची संपूर्ण काळजी मी घेतली होती. सजावटीच सामान खरेदी करायला बाहेर जाणं मी शक्यतो टाळण्याचा प्रयत्नं केला. दरवर्षी माझी ठरलेली सजावट आणि आरास असते. तेच याही वर्षी परंपरागत जपण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. शिवाय, इको-फ्रेंडली पद्धतीने उत्सव साजरा करण्याकडे माझा नेहमी भर असतो. यावर्षी घरच्या घरी मूर्ती बनवण्याचा मी विचार केला होता. पण करोनामुळे आधीच अडचणीत असलेल्या मूर्तीकारांना थोडा आर्थिक हातभार लागला म्हणून तो विचार यंदा पुरता थांबवला. अगदी साधी, सुबक, गुबगुबीत अशी बाप्पाची मूर्ती, विटांच अगदी साध डेकोरेशन असं मी ठरवल होतं. काही स्पेशल तयारी पेक्षा माझा उत्साह बाप्पाासाठी स्पेशल असेल हे माझ्या डोक्यात मी पक्क केलं होतं. – सायली संजीव, अभिनेत्री
खरं सांगायचं तर, मी फार काही वेगळी तयारी केली नव्हती. कारण, बाजारात जाऊन काही सामान घेऊन येणं आणि त्याची सजावट करणं सध्याची परिस्थिती पाहता अशक्य होतं. त्यामुळे घरी उपलब्ध साहित्य वापरून आणि साधी-सोपी सजावट करून यंदा बाप्पाचं स्वागत करण्याचं आम्ही ठरवलं होतं. माझ्या आणि माझ्या मामांच्या घरच्या गणपतीची स्थापना ही मीच करतो. दरवर्षी हार, प्रसाद असं सगळं बाहेरून आणलं जायचं, यंदा मात्र मी घरी प्रसाद बनवायला शिकलोय. मला मोदक बनवायला जमतं नव्हते, परंतु यावर्षी मी मोदक स्वतः मोदक बनवून बाप्पााला पहिल्या दिवशी तोच नैवेद्य दाखवला. शिवाय, मला वेळ मिळेल तसा मी जवळपासच्या गणेशमंदिरांमध्ये न चुकता जातो, गणपतीत आवर्जून जातो. यावेळी मात्र ते शक्य झालं नाही. – निखिल चव्हाण, अभिनेता
माझ्या घरी गणपती येतं नाहीत. पण आमच्या सोसायटीमधील गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी आहेत. लहानपणापासून बाप्पाची तयार करण्यासाठी माझा सहभाग असायचा. मी आणि माझ्या काही मैत्रिणी, आम्हाला सजावटीच्या कामातून एक विलक्षण आनंद मिळायचा. सजावटीच सामान आनन, नवनवीन प्रकारची सजावट करणं यात एक वेगळी मजा असायची. यंदा ते फारस शक्य झालं नाही. परंतु बाप्पा या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या बळ देईल अशी माझी श्रद्धा आहे. – शिवानी बावकर, अभिनेत्री
आमच्या घरी गौरी-गणपती म्हणजेच सहा सात दिवसांचा बाप्पा आणि गौरीचा मुक्काम असतो. अगोदर आजीकडे गणपती असायचा त्यानंतर गेली पंचवीस वर्ष ही परंपरा आम्ही जपतोय. गौरी सजवण्याच सगळं काम माझ्याकडे असतं. माझा जन्म खरंतर गौरीच्या सणावेळचा म्हणून माझं नावं गौरी. गौरीच्या मुखवट्याची सजावट, त्यांचे दागिने, गौरीच्या साड्या हे सगळं करताना मला प्रचंड आनंद मिळतो. घरी प्रसाद-फराळ अशी लगबग असते. यंदाची परिस्थिती पाहता घरी उपलब्ध साड्या आणि मागच्या वर्षीच काही सजावटीच्या गोष्टी वापरून यंदाच डेकोरेशन करण्यात आलं. शाडूच्या मूर्तीचं घरीच विसर्जन होणारं आहे. नातेवाईकांना फारस बोलावलं नाही. सगळ्यांना वाईट वाटतंय, पण आपण या वर्षी काळजी घेतली तर आपण या सगळ्यावर मात करू शकणार आहोत. शांततेत हा उत्सव साजरा होत असला तरी हा सगळ्यांच्या लक्षात राहणारा ठरेल – गौरी नलावडे, अभिनेत्री
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)