देखाव्यातून साकारला चाळीतला गणेशोत्सव!
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालंय अगदी भक्तिभावाने पूजन करून बाप्पाची स्थापना झाली आहे. कोरोनाच्या काळात देखील जल्लोषात आणि त्याच उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पा आपल्या भेटीला आले आहेत. सगळं वातावरण एकदम प्रसन्न झालंय पण यंदा लालबाग मधल्या दरवर्षी होणाऱ्या गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळत नाही. अश्यातच लालबागला राहणाऱ्या एका अवलिया कलाकाराने बाप्पाची सुंदर आरास साकारली आहे. लालबाग येथील “पराग सावंत” याने बाप्पाची खास आरास केली आहे. घरच्या बाप्पासाठी एक अनोखा देखावा पराग ने साकारला आहे. हा देखावा नक्की काय आहे जाणून घेऊया पराग सावंत कडून….
“चाळीतल्या गणेशोत्सवाचं दर्शन घडवून देणारा देखावा”
दरवर्षी आम्ही घरच्या घरी सामाजिक विषय घेऊन देखावे करत असतो यावर्षी आमच्या गणपतीच यंदाच १० वर्ष आहे. यावर्षी काय खास करावं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या आजूबाजूला असलेली कोरोनाची परिस्थिती त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा कुठेतरी यावर्षी दिसणार नाही आहे. मिरवणूका नाही तो गजबजाट नाही म्हणून यंदा आपण आपल्या बाप्पाच्या खास देखाव्यातुन तो सार्वजनिक गणेशोत्सवाचा खास देखावा लोकांना दाखवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.
चाळीतला गणेशोत्सव ही एक वेगळीच मज्जा असते आणि तो गणेशोत्सवाचा एक अनोखा माहोल असतो तर यंदा आपण चाळीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा साकारू ही संकल्पना सुचली आणि ती पूर्णत्वास आली. “पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ? गूळ, फुटाणे, खोबरं नि करत साऱ्या प्रसादाची केली भेळ” हे गाणं आजच्या परिस्थितीला एवढं साजेस आहे.
गणेशोत्सवाचं स्वरूप हे वर्षोनुवर्षे बदलत आहे दरवर्षी होणारा जल्लोष गजबजाट हा यावर्षी नाही. हे कुठेतरी डोक्यात होतं की आपण हे चित्र आपल्या देखाव्यातुन लोकांना दाखवू शकतो. यावर्षी चा गणेशोत्सव हा घरगुती आणि पारंपारिक रीतीने साजरा केला जाणार असला तरी त्याला एक वेगळीच मज्जा आहे असं मला वाटतं. या सगळ्या परिस्थितीत वर्षानुवर्षे साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव कसा असेल हे दाखवण्यासाठी हा देखावा साकारला आहे. चाळीतल्या आपल्या घराच्या दारात उभं राहून सोशल डिस्टंगसिंग पाळून हा गणेशोत्सव साजरा कसा साजरा होणार यांची एक झलक आपल्या देखाव्यातुन आपण दाखवू या म्हणून हा देखावा केला. चाळीतल्या गणेशोत्सवाची संकल्पना घेऊन मी माझा मित्र “वेदांत वाईकर” आणि “हेतन वारंग” यांनी हा इको – फ्रेंडली देखावा साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि यंदा बाप्पाचं विसर्जन घरच्या घरी करण्याचा आमचा विचार आहे.
जुन्या काळात प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सवात बघायला मिळणाऱ्या देखाव्याची संस्कृती कुठेतरी लुप्त होत चालली आहे पण अशी काही तरुण मंडळी आहेत जी आपली संस्कृती जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. गणेशोत्सव आणि चाळीचं एक अनोखं नातं जपण्याचा प्रयत्न पराग ने आपल्या देखाव्यातुन केला आहे आणि याला कल्पकतेची जोड देऊन खूप सुंदररित्या तो साकारला आहे.
मुलाखत – नेहा कदम (प्लॅनेट मराठी)