चित्ररूपी ‘लालबागचा राजा’ ठरतोय भक्तांसाठी आपुलकीचा विषय.
लालबागच्या राजाचं अनोख दर्शन…
यंदा जगावर करोनाचं संकट असल्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीची उंची कमी करून भाविकांना व्हर्च्युअल दर्शनाच आवाहन केलं आहे. तर काही मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करता विविध सामाजिक कार्यांमध्ये हातभार लावला आहे.
मुंबईतील ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ने यंदा राजाची मोठी मूर्ती स्थापन न करता देव्हाऱ्यातील गणेशमूर्तीच पूजनं करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा ‘आरोग्योत्सोव’ साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या मंडळाने घेतला. मंडळाच्या या निर्णयाचं विविध स्तरातून कौतुकं करण्यात आलं. परंतु कुठे तरी राजाच्या भक्तांमध्ये मात्र काही प्रमाणत नाराजी असल्याचं बोललं गेलं.
उत्सवावर करोनच सावट असलं तरी विघ्नहर्ता बाप्पाच्या भक्तांमधील उत्साहात मात्र तसूभरही कमतरता जाणवतं नाही. हाच उत्साह कायम राखत कलांचा अधिपत गणरायाचं एक भव्य पोट्रेट एका कलाकाराने साकारलं आहे. मुंबईच्या श्रुतिका शिर्के हिने ही कलाकृती साकारली आहे. ८ फुट रुंद आणि ११.५ फुट लांब असं हे लालबागच्या राजाचं खास पोट्रेट आहे. सहा रंग छटांच्या ३६००० हजार कागदी गुलाबांच्या फुलांचा यासाठी उपयोग करण्यात आला आहे. श्रुतिकाच्या बरोबरीने अस्मिता संस्थेतील दिव्यांग महिला (शीला पगारे, किशोरी मल्हार, सोनाल मोकानी, किरण मूळम आणि ज्योत्स्ना पटेल), चैताली मेस्त्री, सिद्धेश घाग, अक्षय जाधव, कुणाल घाटगे, प्रतिक जाधव, रुची सावंत, कोमल घाटगे अशा १३ कलाकारांनी ही कलाकृती साकारली आहे. विक्रमवीर चेतन राऊत याने ही कलाकृती साकारण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)