आठवणींचा खजिना…. तेजस्विनी पंडित
जुन्या वाढदिवसाच्या आठवणी..
२०१८ सालचा माझा वाढदिवस खूप मोठा साजरा केला होता. माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांनी सगळं ठरवून वगैरे मला सरप्राईज दिलं होतं. खरंतर मला असा मोठा वाढदिवस साजरा करण्यात रस नसतो. पण माझे मित्र दरवर्षी असं काही ना काही प्लॅनिंग करत असतात.
कुटुंबाने आधार दिलेला एखादा क्षण
मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला तो क्षण. माझी आईला जरा थोडी काळजी वाटत होती पण माझ्या बाबांनी मला सहमती दर्शवली. त्या वेळी कोणाशीच ओळख नसल्याने कुठे जायचं, कसं राहायचं हे काहीच माहीत नसताना मी हा एवढा निर्णय स्वतः घेतला होता. पण त्या काळात मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं होतं आणि मग मी धाडस करून मुंबईला आले. तेव्हा जर मी कुटुंबाच्या आधाराशिवाय मुंबईत आले नसते तर काहीच झालं नसतं.
स्ट्रगलच्या काळातला एखादा क्षण?
खरंतर असे अनेक प्रसंग आहेत. पण सुरुवातीच्या काळात मी पोलीस हेडक्वाटर्स मध्ये राहायचे. अगदी लहानशी एक खोली होती. त्यावेळी मला मुंबई आणि मुंबईला मी नवीन होतो. अनेक वेळा छोटी पाच रुपयांची मॅगी खाऊन दिवसभर काढणं, ब्रेड आणि पाणी, बिस्कीट आणि पाणी खाणं असं बरंच काही केलं. मी कधी वाईट प्रसंगातून जात असेन किंवा आजारी जरी असेन तरी तेव्हा मी ते घरी सांगत नव्हते कारण आईबाबांना काळजी नको म्हणून आणि स्वतःवरची सगळी संकटं स्वतःच सहन करून दूर करायची म्हणूनही.म्हणजे सगळ्या काळातून मी गेलेय आणि आता मी खूप आभारी आहे तो काळ तेव्हा मी अनुभवला. कारण त्यामुळे आता मी माझ्या पायावर उभी राहिले आणि एवढं सगळं कमवू शकले.
मित्रांसोबतचे काही किस्से
२ ३ किस्से आहेत, एकतर लहानपणी आत्तासारखे फोन नसायचे फक्त लँडलाईन असायचे. तेव्हा आम्ही सगळे मित्र एकत्र जमून फोन डिरेक्ट्री मधून नंबर शोधयचो. मग कोणत्याही अनोळखी माणसाला मुद्दाम फोन करायचो आणि विचारायचो की काका प्रकाश आहे का समोरून उत्तर यायचं नाही मग आम्ही वर त्यांना सांगयचो की खिडकी उघडा प्रकाश येईल.थोडक्यात काहीतरी फुटकळ विनोद करून लोकांना उगाच फोन करायचा किस्सा आम्ही करायचो, दुसरं म्हणजे आमच्या कॉलनीतल्या मित्रांची एक ठरलेली गोष्ट आहे. जसं कोणी ठरलेली शिट्टी वाजवतं, आवाज करतं तसं आमचं ठरलेलं गाणं होतं. आणि त्यातला शेवटचा भाग हा आमचा क्लू असायचा आणि तेव्हा लांब लांब अंतर सोडून घरं असायची आणि घरून खेळायला सोडत नसत. मग तेव्हा खाली उतरायचं असायचं तेव्हा आम्ही हे गाणं गुणगुणून एकमेकांना बोलवायचो. त्यात ही खास गोष्ट अशी की त्या गाण्याच्या शेवटी एक ‘आए’ अशी हाक होती. ती ओळ येईपर्यंत समोरचा माणूस थांबायचा आणि त्याला समोरून ‘ओआ’ अशी परतीची हाक द्यायचा. अश्या पद्धतीने एकमेकांना हाक मारायला आम्ही असं काय काय मजेशीर करायचो.
३ गोष्टी ज्यांच्याशिवाय जगू शकत नाही
जेवण, स्वच्छता आणि फोन
३ गोष्टी शिकायच्या वा करायच्या राहिल्या आहेत
बासरी, साल्सा नृत्यप्रकार आणि स्काय डायविंग
३ व्यक्ती ज्यांच्याशिवाय जगू शकत नाही
मला असं वाटतं की आपण कोणीच कोणाशिवाय जगू शकत नाही असं नसतं. आपल्या जवळची माणसं असतातच पण कधीतरी त्यातलं कोणी सोडून गेलं तरी आपल्याला पुढे जगावंच लागतं. कोणीही कितीही जवळचं असलं तरी शो मस्ट गो ऑन म्हणयलाच लागतं.
एखादी सुपरपॉवर असती तर कोणती असती?
मला नायक चित्रपटात अनिल कपूरकडे जी सुपरपॉवर असते तसं काही असलं तर आवडेल. मला जर सुपरपॉवर दिलीच तर मी देशातून भ्रष्टाचार संपवून टाकेन आणि कायदे आणि सुव्यवस्था ह्यात बदल करून नियम आणि कायदे कडक करेन.
•स्वर्गातून काही व्यक्तींना परत आणायची पॉवर मिळाली तर कोणाला परत आणायला आवडेल?
माझे बाबा, माझा मित्र अमर, इरफान खान आणि लाल बहादूर शास्त्री
ह्या कलाकारांसोबत काम करायची इच्छा
खरंतर असे अनेकजण आहेत. एकंच नाव घेऊ शकत नाही. नवीन येणाऱ्यांपासून अगदी जुन्या दिग्गज कलाकारांसोबत अभिनय करायची इच्छा आहे.
मेक अ चुज बीटविन
१. पुणे की मुंबई- सध्या मुंबईत आहे म्हणून मुंबई
२. पुस्तक की सिरीज- सिरीज
३. अभिज्ञा की श्रेया- श्रेया
४. आदिश की धैर्य- नाही ह्यात एक निवडणं खूप कठीण आहे. खरंतर हे तिघे आहेत. आता ह्यात ज्याचं नाव नाहीये त्यालाच मी निवडते.तो आहे निलेश.
५. सिरिअल की चित्रपट- चित्रपट
६. ये रे ये रे पैसा की मी सिंधुताई सपकाळ- मी सिंधुताई सपकाळ
७. ताई की आई- दोघेही
लाईफ स्टाईल
आमचं लाईफ स्टाईल खरंतर वेगळं असतं असं नाही. पण आमच्याकडे इतके वेगवेगळे अनुभव असतात की आमची प्रत्येक परिस्थितीतून पार जाण्याची मानसिकता तयार झालेली असते. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, त्यांच्यासोबतचे रोजचे अनुभव आम्हाला शहाणं करतात. आम्हाला एकाच आयुष्यात खूप आयुष्य जगायला मिळतात. वेगळ्या पद्धतीने विचार करून बघता येतो. प्रत्येक भावना जगून पाहायला मिळते. एक गंमत अशी की माझं ऑन स्क्रीन इतके वेळा लग्न झालंय की मला माझ्या खऱ्या लग्नाच्या वेळी ती एक नव्या नवरीची भावना असते,उत्सुकता असते तीच वाटत नव्हती. सगळं एकदम नॉर्मल वाटत होतं.पण एक अभिनेता म्हणून जोपर्यंत ती उत्सुकता जिवंत आहे तोपर्यंत आमच्यातला अभिनेता जिवंत आहे.
इंडस्ट्री बद्दल काय वाटतं?
खरंतर प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.आपण बघू तसं आपल्याला सगळं दिसतं.प्रत्येकाच्या दृष्टीने विचार वेगळा असूच शकतो पण माझ्या मते इंडस्ट्री थोडी कृत्रिम आहे किंवा त्यात खऱ्या लोकांची संख्या कमी आहे. दिखावेबाजी बरीच आहे आणि प्रामाणिक लोकांची कमतरता आहे.
ट्रोलिंगचा त्रास होतो का?
आधी सुरवातीला मला त्रास व्हायचा पण आता मी थेट दुर्लक्ष करते. जिथे अपेक्षित आहे तिथे लोकांना सुनावते पण कधीकधी हे सगळं एक खोटं, मुद्दाम तयार केलेलं असू शकतं त्यामुळे मी शक्य तेवढं लांब राहते.लोकांनी जरूर माझ्या कामावर मत व्यक्त करावं पण त्या व्यतिरिक्त कोणी टीका करत असेल तर मी फार महत्व देत नाही. आता मी ह्या टप्प्यावर पोहोचले आहे जिथे मला जे महत्त्वाचं वाटतं त्यावर मी लक्ष केंद्रित करून बाकीचं सगळं सोडून देऊ शकते. त्यामुळे शक्यतो मी अश्या लोकांना ब्लॉक करते किंवा सोडून देते.
स्वतःबद्दल ऐकलेली अफवा
मी फार शीघ्रकोपी आहे किंवा माझ्या रागाचा उद्रेक जास्त होतो.
फॅनसोबतचा किस्सा
हल्ली खरे म्हणावे असे चाहते राहिले नाहीत ही दुःखद बाब आहे. माझ्यावर प्रेम करणारे, कामाचं कौतुक करणारे अनेकजण मला भेटतात. पण चाहत्यांच्या आवडीतील खरेपणा किंवा चाहता म्हणून खरं प्रेम फार कमी होत चाललं आहे. एका अभिनेत्रीने फार भाव दिला नाही म्हणून तिचं फॅनक्लब बंद करून इतर कोणासाठी तसंच फॅनक्लब सुरू करणारे अनेकजण पाहिलेत मी. माझ्या चाहतेवर्गात खरे चाहते पण असतील पण त्यांची संख्या फार कमी आहे.
हेल्दी कॉम्पिटीटर
आत्ताचे सगळेच कलाकार. सगळे मित्र आहेतच आणि त्याच बरोबर त्यात मैत्रीपूर्वक स्पर्धा आहेच पण त्या दोघांची मर्यादा प्रत्येक जण पाळतो.
कास्टिंग काऊच बद्दलचं मत
हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. ह्याचं उत्तर ज्याचं त्याने आपल्या इच्छेने द्यावं. पण मी अश्याप्रकारचे प्रस्ताव कधीच स्वीकारले नाहीत.
अभिनय आणि तेजाज्ञा दोन्ही कसं सांभाळता?
खरंच येतो. एकतर ठरलेलं वेळापत्रक नसल्याने प्रदर्शनाच्या वेळी थोडी धावपळ होते. पण जोपर्यंत शक्य आहे सगळं सांभाळायची इच्छा आहे. कोणाच्या तरी हातात सगळं सोपवून फक्त नाव लावून तेजाज्ञा मधला खास टच काढून नाही घ्यायचा. जे लोकं विश्वास ठेवून खरेदी करतात त्यांना कधी खोटं नाही पाडणार. अगदीच पुढे शक्य नाही झालं तर तेव्हा वेगळी उपाययोजना करावी लागेल. अजून बरीच स्वप्न पूर्ण करायची आहेत.
मुलाखत – रसिका नानल (प्लॅनेट मराठी)