आयुष्याच्या प्रवासात अशी अनेक माणसं भेटतात जी आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असतात. बालपणी आपल्यावर संस्कार करणारे आपल्या पालकांपासून ते अगदी शाळा-कॉलेजमधील आपल्या शिक्षकांपर्यंत. आयुष्याच्या वाटेवर भेटणाऱ्या या प्रत्येकाचा आपल्या जीवनात मोलाचा वाटा असतो. आपल्या जीवनात दिशा दाखवण्यात आणि लाख मोलाचे सल्ले देण्यात या प्रत्येकाची अनोखी भूमिका असते. अनेकदा कळत-नकळतपणे आपल्याला आपले जिगरी मित्र-मैत्रिणी देखील अनेक गोष्ट शिकवतात. आयुष्यात ‘गुरू रुपी मित्र’ हा देखील तितकाच महत्त्वपूर्ण असतो. आजच्या शिक्षक दिनी अशाच काही ‘मैत्री रुपी शिक्षकांना’ शुभेच्छा देऊन साजरा करूया यंदाचा शिक्षक दिन
‘आयुष्याच्या अभ्यासक्रमातला शिक्षक’
मुळात मी ‘गो विथ फ्लो’ या स्वभावाचा असल्याने आयुष्यात जे मिळतंय ते स्वीकारत जगत राहिलो. त्यात बऱ्याच गोष्टी गमावल्याही. पण मित्राच्या रुपात शिक्षक म्हणून आलेल्या मयुरेशने मन शांत ठेवून प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यावर निर्णय कसा घ्यायचा आणि यावर ठाम कसं राहायचं हे शिकवलं. एक मित्र तर तो आहेच पण माझ्या आयुष्यात मित्ररुपी शिक्षक म्हणून देखील तो अनेक गोष्टी मला नेहमीच शिकवत असतो. जगात सगळ्या गोष्टी पुस्तकात सापडतील पण ‘मैत्री’ या शब्दांचा बिनपुस्तकी अर्थ शिकवणाऱ्या आणि आयुष्याच्या अभ्यासक्रमातला मधला माझा आवडता विषय बनलेल्या ‘मयुरेश कोबल’ ला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! – तुषार खैर (युट्युबर / लेखक)
आयुष्यातले करण- अर्जुन
आपल्या प्रत्येकाला आयुष्यात शिक्षकरुपी मित्र भेटतात तसंच माझ्या आयुष्यात अश्या तीन महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. जेव्हा मी मेडिकल कॉलेजला गेले, तेव्हा एक मुंबईची मुलगी माझ्या सोबत होती ती म्हणजे डॉ. प्रियांका कुंभार. आम्हा दोघींचे स्वभाव आणि छंद सारखे असल्याने आमची छान गट्टी जमली. ती उत्तम गायक आणि डान्सर आहे आणि मला या दोन गोष्टीची प्रचंड आवड आहे म्हणून आम्ही एकमेकींना छान समजून घेतलंय. मला आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकले. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी मी तिच्या वागण्यातून शिकले. तिची विचारसरणी ही खूप जास्त ऑर्गनाईज आहे त्यामुळे मला हे तिच्याकडून शिकायला मिळतंय. माझ्यात आता जो आत्मविश्वास आहे तोही तिच्यामुळेच.
समाजात कसं वावरायच यांची मनात कुठेतरी एक भीती होती तर तिने ती घालवून टाकली तिने मला खूप सुंदररित्या समजावलय आणि शिकवलंय म्हणून मी आज एवढी आत्मविश्वासाने या क्षेत्रात वावरते. आयुष्यात खूप मोठे निर्णय घेताना ती मला अगदी छान समजावून सांगायची. तिने अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. माझी संगीताची आवड तिच्यामुळे वाढली. माझ्या आयुष्यात तिचं खूप महत्त्वाच स्थान आहे. आम्ही एकत्र खूप धमाल केली तेवढच आम्ही एकमेकीकडून शिकलो. मी पुण्यात आल्यावर माझ्या आयुष्यात अशाच दोन महत्त्वाच्या व्यक्ती भेटल्या माझे ‘करण-अर्जुन’. माझे शिक्षक, मित्र अशा अनेक भूमिका ते माझ्या आयुष्यात बजावतात. त्यांना भेटणं हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे असं मला वाटतं. चिन्मय बिडकर आणि निनाद मिश्रा हे दोघ माझे कारण-अर्जुन आहेत. आयुष्यात हे दोघ खूप महत्त्वाचे आहेत कारण अनेक गोष्टी ते मला समजावत अगदी जिगरी मित्र आहेत. हिंमतीने जगण्याची मोलाची शिकवण मला यांनी दिली. आज मी जी काही आहे ती या दोघांमुळे आहे. आयुष्यात प्रॅक्टिकल कसं रहायचं हे या दोघांनी शिकवलं. शिक्षक रुपी मित्र म्हणून माझे करण-अर्जुन नेहमी माझ्यासोबत कायम असतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला हे नेहमी शिकवत असतात. ही आमच्या मैत्रीची शिदोरी आयुष्यभर राहणार आहे. माझे खरंच हे आजी-आजोबा आहेत. आजी-आजोबा जशी आपली काळजी घेतात तसं ते एकदम मला छान समजून घेतात. आयुष्यातले अनेक निर्णय घेण्यात आणि कायमसोबत राहणारे हे तिघ माझ्यासाठी ‘मैत्री रुपी शिक्षक’ आहेत. – पूर्णिमा डे (अभिनेत्री)
खरंच, आपल्या पालक आणि शिक्षकांसोबातच आपले मित्र-मैत्रिणी ही आपल्याला खूप काही शिकवत असतात. अगदी कॉलेज बंक करण्यापासून ते आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत असे अनेक सल्ले ते आपल्याला देत असतात. या सगळ्या मैत्री रुपी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!
नेहा कदम (प्लॅनेट मराठी)