छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेल्या स्वराज्यस्थापनेच्या यज्ञात जिजाऊंच्या वाटेवरून चालून आपल्या पोटचं पोर या स्वराज्यासाठी अर्पण करणाऱ्या स्त्रीयांची ही गाथा आहे.
भारतीय संस्कृतीत आई वडील ह्या संकल्पनांना विशेष महत्त्व आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात नव्याने भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला वयाचं बंधन न ठेवता “माऊली” म्हणायची पद्धत आहे. माऊली ह्या शब्दात असलेलं एक वडीलधारी पालकत्व आपल्याला खूप काही शिकवून जातं. यंदाच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विचारांची कक्षा थोडी वाढवूया. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ती भूमी सोन्याची खाण आहे. सह्याद्री, सातपुडा ह्या डोंगरांगांपासून अगदी गोदावरी, कृष्ण, भीमा ह्या नद्यांच्या पवित्रतेने पावन झालेला महाराष्ट्र ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक बाबींमध्ये आपली विविधता दाखवतो. आपली मातृभाषा, आपला महाराष्ट्र ह्याबद्दल गोविंदाग्रज सुद्धा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा। अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा। भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा। शाहिरांच्या देश कर्त्या मर्दांच्या देशा। असं लिहितात.
आई हा आपला पाऊलोपाऊली वाट दाखवणारा शिक्षक आहे. अगदी निसर्गापासून ते देवदेवतांपर्यंत सगळीकडे आई ही आपल्याला पाहायला मिळतेच. आपल्यातल्या जवळपास सगळ्यांचाच दिवस आईपासून सुरू होतो आणि आईपाशी येऊन संपतो. अगदी मोज्यांच्या जोडीची अचूक जागा माहीत असलेल्या आईला आपल्या बाळाला प्रत्येक संकटाशी लढायची ताकद कशी द्यायची हे ही माहीत असतं. ह्याचंच एक अचूक आणि उत्तम उदाहरण म्हणजे हिरकणी. रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजाने घालून दिलेला नियम न मोडता त्याच्या शब्दावर चालणारी वेळप्रसंगी आपल्या लेकरासाठी आपला जीव धोक्यात घालणारी ही एक आई. ठरलेल्या नियमानुसार ठरलेल्या वेळी गडाची दारं बंद होतात. हिरकणी गडावर अडकते. आपलं मूल घरी आईसाठी व्याकुळ होऊन वाट पाहत असेल ह्या विचारांनी तिची घालमेल होत असते पण तरी आपल्या राजांनी घालून दिलेला नियम न मोडता आपला प्राण धोक्यात घालून कड्यावरून उडी मारणारी ही एक धाडसी निर्णय घेणारी आई. पालक म्हणून रयतेची काळजी करणाऱ्या राजांचा आदर्श घेऊन वागणारी आणखी एक माऊली. ही कथा वाचताना, पाहताना आपल्या अंगावर काटा येतो.
कधी सैनिकांच्या आईला पाहिलंय कोणी? स्वतःच्या मुलाला शत्रूच्या दाढेत जायचंय हे माहीत असूनही फक्त देशासाठी, भारत भूमीसाठी स्वतःच्या मनाला खंबीर बनवणारी, स्वतःच्या मनाची तयारी करणारी धाडसी आई. भारतभूमी ह्या आईची सेवा हे परमकर्तव्य हे स्वतःच्या बाळाला शिकवणारी आई. काय विलक्षण धैर्य असेल तिच्याकडे. एका आईच्या संरक्षणासाठी एका आईचा मोठा त्याग. आईची थोरवी सांगणारी अनेक गाणी आपल्याला परिचित आहेत पण एखाद्या अंगाईतून एखादी आईच आपल्या मुलाला कर्तव्याची आठवण करून देत असेल तर? अंगाई हे खरंतर आई बाळामधलं गप्पांचं साधन आहे. आईच्या कुशीत झोपायला आलेलं बाळ आणि त्याला शांत झोपवणारी आई. बरेचदा अंगाईतून शांत झोप लागण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पण एखाद्या अंगाईतून आई जर मुलाला लढाईला जायला कणखर करत असेल तर? अशीच एक अंगाई राजश्री मराठी ह्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित झालेली आहे.
ह्या अंगाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही मावळी भाषेत तयार केलेली आहे. अंगाई हा आईला तिच्या बाळाशी जोडणारा एक धागा आहे. स्वराज्याच्या कुशीत जन्मलेल्या एका बाळाला त्याची आई आत्ता घटकाभर झोप घे, आत्ता घटकाभर माझ्या जवळ राहा नंतर तुला स्वराज्यासाठी लढायला हातात तलवार घ्यायची आहे असं सांगते आहे. प्रत्येक आईला तिचं मूल कायम तिच्यासोबत असावं असं वाटतं. कोणतीच आई त्याला घटकाभर निजून घे असं सांगत नाही पण ह्या कथेतील आईने आपल्या बाळाला एवढ्या लहान वयात लढण्यासाठी तयार करणं, स्वतःच्या आईपणाचं कौतुक बाजूला सारून तिच्या मुलातील योध्याला मोठं करणं हेच आपलं ध्येय ठेवलं आहे. ह्या अतिशय सुंदर अंगाईचे शब्द लिहिले आहेत अनघा काकडे हिने आणि तिने स्वतःच ह्या विडिओचं दिग्दर्शन केलेलं आहे. ह्या सुंदर अंगाईमागचा आवाज आहे नुपुरा निफाडकर हिचा आणि ह्यात एका खंबीर आणि तितक्याच प्रेमळ आईची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी हिने साकारली आहे.स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या जिजाऊ मातेने आपला पुत्र ह्या मातीसाठी अर्पण केला त्याच मातेचे संस्कार पुढे नेत ह्या अंगाईतून एक आई आपल्या मुलाला कणखर करते आहे.
“आई हा प्रत्येक ठिकाणी आपला पहिला गुरू असतो.आपल्याला इतिहासातच आपल्याला अनेक मातांनी आपल्याला कर्तव्याच्या धडा शिकवला आहे. एखाद्या आईसाठी आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यालाच लढाईला जाण्यासाठी तयार करणं, अश्याच एका आईचा आणि मुलाचा एक प्रसंग ह्या गाण्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वराज्याच्या अनघा काकडे (गीतकार,दिग्दर्शिका)
“खरंतर मला एका खंबीर आईची भूमिका करायला मिळाली ह्याचा मला आनंद आहे. ही अंगाई जरी असली तरी ह्यातून आईने आपल्या मुलाला जी कर्तव्याची जाणीव करून दिलीये, जे बळ ती आपल्या मुलाला देते हे खूप महत्त्वाचं आहे. नुपूराचा आवाज किंवा अनघाने लिहिलेले शब्द ह्यांचं त्या आईला उभं करण्यात मोठं यश आहे. जिजाऊसाहेबांची प्रेरणा घेऊन आपल्या बाळाला धैर्य देणारी आई मला सगळ्यात जास्त भावते.” प्राजक्ता माळी (अभिनेत्री)
रसिका नानल (प्लॅनेट मराठी)