होमिओपॅथी डॉक्टर ते सेलिब्रेटी बेकर अशी एक अनोखी ओळख निर्माण करून “पूजास् बेक बाय हार्ट” या होम बेकरी चा कमालीचा प्रवास सांगतात स्वतः डॉक्टर पूजा सावंत- मोहनदास.
डॉक्टरी सांभाळून त्यांनी बेकिंग या कल्पक क्षेत्राकडे आपलं पाऊल टाकलं आणि त्यांची स्वप्नपूर्ती झाली, त्यांच्या या प्रवासाची “गोड गोष्ट”
“आणि बेकर झाले”
२००९ साली मी डाॅक्टर झाले आणि २०१२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन होमिओपॅथी मध्ये MD केलं. २०१३ ला स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टीस गोरेगावला “Dr. Pooja’s Aspire Homoeopathy (होमिओपॅथी)” या नावाने सुरू केली. तोवर माझा बेकींगशी दुरूनही संबंध नव्हता. तेव्हा होमिओपॅथी बद्दल जनमानसात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मी बरीच व्याख्यानं घ्यायचे. ज्यामुळे माझा जनसंपर्क वाढला आणि अनेक माणसं जोडली गेली. सकाळ आणि संध्याकाळच्या तीन तासाच्या प्रॅक्टीसमध्ये चार पाच तासांचा वेळ मिळायचा. तो सत्कारणी लावताना मज्जा म्हणून मी बेकींग कडे वळले, तेही सासरी ओवन होता म्हणून. सुरूवातीला घरच्यांसाठी मग मित्र परिवारासाठी बेक करायचे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायचे आणि नव्याने बेकिंग मध्ये प्रयोग करायचे. सुदैवाने माझा गोतावळा मोठा असल्याने मला बेकिंग साठी अनेक संधी मिळायच्या. सहज आपली कलाकृती फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएपच्या स्टेटस वर शेयर करायचे. पेशंटनाही कुतूहल वाटायचं मॅडम च्या स्टेटसवर रोज नवनवे केक कसे काय बरं?? मग हळूहळू त्यांनाही कळलं. असं करता करता बेकिंग चा नवा प्रवास सुरु झाला. जसं word of mouth ने वैद्यकीय प्रॅक्टीस सेट झाली तसंच Hobby आणि Passion च्या सोबतीने बेकिंग हे माझ्यासाठी मी वेगळं क्षेत्र निर्माण केलं. आता पाच वर्ष होतील मी डॉक्टर आणि बेकिंग ही दोन्ही क्षेत्र सांभाळून काम करण्याची. “Pooja’s Bake By Heart” या ब्रँड ने मी होम बेकरी चालवते.
“सेलिब्रिटी केक्स आणि बरंच काही”
माझं निरीक्षण आणि कल्पकतेची सांगड घालून मी जास्तीत जास्त रियलिस्टिक केक बनवण्याचा प्रयत्न करते. बेकिंग करताना अगदी छोट्या गोष्टीचा विचार करून बेकिंग करण्यावर माझा नेहमी भर असतो. शिवाय मी कविता करते. माझ्या केकना तो खास टच देण्याचा प्रयत्न करते. खूप वेळा साधं हॅप्पी बिर्थडे मेसेज न लिहिता कवितेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मेसेज अजून हृदयस्पर्शी होतो.
मला काही सेलिब्रेटींसाठी बेक करण्याचा योग आला. प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकरयांचा वाढदिवस, अंकुश चौधरी, दीपा परब यांचा लग्नाचा वाढदिवस, केदार शिंदे यांची लेक सनाचा वाढदिवस, “ये रिश्ता क्या कहेलाता है” या मालिकेचा १००० वा भाग हे असे क्षण जे पाहून लोकांना वाटतं मी सेलिब्रेटी बेकर आहे. एकदा केक साठी चौकशी आली होती, एका छोटीने आपल्या आईतर्फे मला विचारलं होतं,”त्यांना reqest करशील का माझ्या ही बिर्थडे ला केक करायची. मी सेलिब्रेटी नाहीये तरी करतील का गं त्या?” मला गंमत वाटली. मी माझा प्रत्येक केक मन लावून करते. जेणेकरुन तो शोस्टॉपर दिसावा. कस्टमाएज केक्स आणि कपकेक्स ही माझी खासियत आहे. वाढदिवस नेहमीच विशेष असतो. तो साजरा करणाऱ्याला सेलेब्रिटी झाल्याची भावना यावी आणि केक बघताक्षणी त्यांच्या तोंडून वाहहह निघावं म्हणून मी कित्येकदा रात्रीचा दिवस करते.
“डॉक्टरी सांभाळून बेकिंग करतेय”
मी बारावीत असताना माझ्या समोर करिअर साठी दोन पर्याय होते. मेडिकल आणि अनिमेशन. २००४ साली अनिमेशन ची फी एक लाख होती. एक अनोळखी क्षेत्र जिथे कदाचित माझ्या कल्पकतेला ला वाव मिळेल पण मेडिकल मध्ये गेले तर सन्मान मिळेल आणि अभ्यासातल्या हुशारीचं चीज होईल असं बाबांचं मत होतं. छंद तू काय पुढे केव्हाही जपू शकतेस… शिवाय बाबांच्या पूर्वी च्या परिस्थितीमुळे डाॅक्टर होऊ शकले नव्हते. तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण करायला म्हणून मी मेडिकल चा पर्याय निवडला होता. आज मागे वळून पाहताना त्यांचे शब्द खरे ठरले हे कळतंय. “So if I have been chosen for a noble profession it’s my destiny but same time I can follow my dream then I am fortunate is all I can say” कुठल्याही संधीचं सोनं करायचं इतकाचं दृष्टीकोन आहे सध्या.
“कौन्सिलिंग आणि बेकिंग ची अनोखी सांगड”
माझं बाळ ९ महिन्यांचं असल्यामुळे मी सध्या ऑनलाइन कॅन्सलटिंग (online consultation) करत आहे. माझ्या मॅटर्निटीची सुट्टी होती तेव्हा कोरोना परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पेशंटना ऑनलाइन पर्याय आधीच उपलब्ध करून दिला होता. मेडिसीन कुरीअर किंवा होम पिक करण्याची सुविधाही आहेच.
केक च्या बहुतांश मोठ्या ऑर्डर्स या वीकेंड ला येतात. केक करून मोकळी झाले की पेशंट च कौन्सिलिंग सुरू होतं. कुटुंबासाठी जो वेळ दिला पाहिजे तो खुपदा केकच्या घाई गडबडीत आणि पेशंटशी बोलण्यात जातो. पण माझ्या केक चं कौतुक बघून घरच्यांचा पण हुरूप वाढतो. केक करताना चिक्कार पसारा होतो पण घरचे या सगळ्या परिस्थिती माझ्या सोबतीने मला मदत करतात.
“तारेवरची कसरत तरीही….”
वैद्यकीय क्षेत्र हे जोखमीचं आणि जबाबदारीचं आहे तर बेकींग शर्तीच आणि कल्पकतेचं काम आहे. दोन्ही कडे पेशन्स आहे. बेकींग मुळे ताण हलका होतो. कौतुक झालं की अजून नवं काही करायची उर्मी येते. मी गरोदर पणात अगदी नऊ महिने प्रॅक्टीस सांभाळून बेकींग केलं. तेव्हाही शारीरीक त्रासाकडे दुर्लक्ष करायला बेकींग मुळे व्यस्त राहील्याने मदत झाली. पण सर्वात महत्वाचा कुटुंबाचा आधार. तो असेल तर कुठलंही शिवधनुष्य लिलया पेलता येतं. माझा नवरा माझी खरी ताकद आहे. तो व्यवसायाने सीए आहे. माझा छंद हा मोठ्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी त्याचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या आई वडीलांनी नेहमीच माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं. मी कामात असले की माझ्या बाळाला ते सांभाळतात ज्यामुळे मी निश्चिंतपणे कामावर लक्ष केंद्रित करू शकते. माझी बहिण मला टेक्नोसेवी कसं राहायचं याचे धडे देत असते. सोशल मीडिया वरचा presences कसा टिकवायला हवा हे मी तिच्या कडूनच शिकले. सासरीही माहेर सारखंच स्वातंत्र्य असल्यामुळे मी दोन्ही प्रोफेशन्स सहज सांभाळू शकते. थोडी तारेवरची कसरत होते पण घरच्यांमुळे सहजपणे सांभाळून घेते.
“फॅन्सी आणि ट्रेंडी केक्स चा जमाना”
हल्ली लोकांना काहीतरी हटके वेगळ्या संकल्पना असलेले कस्टमाइज केक हवे असतात. पिंटरेस्ट सारख्या वेबसाईटवर वर दिसणारे फॅन्सी, ट्रेंडी केक, जे चवीला चविष्ट हवे. सर्व साधारण बेकरीत मिळणारे तेच टीपीकल डिजाईनचे केक प्रीमिक्स वापरून त्यात तेल, पाणी, स्पॉंजी व्हायला जेल अशी रसायन टाकून बनवतात. त्यामुळे केक करताना होमबेक आणि डाॅक्टर म्हणून मला जास्त सजग रहावं लागतं. माझ्या केक रेसिपी या वेगळ्या आहेत. “Good cake is not cheap and cheap cake is not good” हे ग्राहकांना आता समजलंय. कोवीड १९ मुळे तर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे केक करताना डॉक्टर आणि बेकर म्हणून माझी जबाबदारी वाढलीय.
“बेकिंग वर्कशॉप आणि बेकिंग शिकण्याची कला”
बेकींग साठी बरंच साहित्य लागतं आणि जागासुद्धा. सुरूवातीला एक वर्ष साहित्याची जमवाजमव करण्यातच गेली. सोबत स्वतःचे कौशल्य शिकण्यात साठी काही शॉर्ट प्रोफेशनल केक कोर्स केले. युट्युब वर केकचेच विडीओ पाहायचं obsession होतं. खूप प्रॅक्टीस केल्यानंतर ऑर्डर्स घेण्याचं धाडस केलं.
जेव्हा ऑर्डर्स सोबत तुम्ही केक शिकवाल का अशाही चौकशी येऊ लागल्या तेव्हा महीन्यातले दोन रविवार केक वर्कशॉप घेणं सुरू केलं. २०० हून अधिक जण यातून शिकून गेले. काहींनी स्वतःची होमबेकरीही सुरू केली. त्यांनाही ऑर्डर्स मिळतायत हे पाहून जास्त आनंद होतो.
“स्वप्नपूर्ती”
सुरुवातीचे २ महिने मी ऑर्डर्स स्विकारल्या नाहीत. बेकरी सप्लाय ची दुकान ही बंद होती. शिवाय मदत करायला कोणी नाहीये. लॉकडाऊन मध्येही घरगुती सेलिब्रेशन सुरूच होती. स्वच्छतेची काळजी घेऊन विश्वासू जागी बनलेले केक मिळावे म्हणून बरेच जण चौकशी करायचे म्हणून मग ऑर्डर्स घेणं पुन्हा सुरू केलं. सगळं सांभाळून दिवसाला सध्या दोन ते तीन च केक करू शकते.
मला अजून एक सांगायला आवडेल… स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. मी वैद्यकीय प्रॅक्टीस सुरू केली तेव्हाची जागा भाड्याने घेतली होती. तेव्हा पासून गोरेगावात स्वतःची जागा घ्यायचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाला प्रोफेशन बेकिंग करण्यासाठी माझ्या मेहनती आणि महत्वाकांक्षी नवऱ्याची जोड मिळाली. आमच्या एकत्रित प्रयत्नाने या वर्षात आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेत पाऊल ठेवलं. जिथून मी माझी स्वतंत्र प्रॅक्टीस आणि नवरा आपलं सीए चं ऑफिस सांभाळतो. डॉक्टरीच क्षेत्र सांभाळून पॅशन जपताना स्वप्नपूर्तीला एक नवी उमेद मिळाली. सोबत मायेची माणसं जोडली गेली. आता कामाचा थकवा नाही तर उरक आणि पसारा वाढलाय. जो अतिशय गोड आहे. केक सारखाच असा आहे माझा “Aspire to Bake by heart” चा प्रवास अथांग सुरू राहणार आहे.
डॉक्टर आणि बेकिंग अश्या दोन भिन्न क्षेत्राची गोड सांगड डॉ. पूजा सावंत- मोहनदास यांनी घातली आहे. स्वप्न बघून त्यांची स्वप्नपूर्ती होण्याच्या त्यांच्या या कमालीच्या प्रवासाला प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)