रसोडे मैं कौन था?? या प्रश्नाला सांगितिक वळण देणारा आणि सगळ्यांच्या डोक्यात म्युजिकल प्रश्न टाकणारा औरंगाबाद चा “यशराज मुखाटे” जो त्याच्यातल्या टॅलेंट मुळे एका रात्रीत सोशल मीडिया स्टार झाला. इंजिनियर, गायक आणि संगीतकार अशी बहुपैलू ओळख असलेल्या यशराज चा विडिओ एका रात्रीत तुफान व्हायरल झाला. अनेक बड्या कलाकारांनी या विडिओ च कौतुक केलंय. व्हायरल झाल्यावर नंतरचा अद्भुत प्रवासाची गोष्ट सांगतोय यशराज मुखाटे.
“बबड्या” वर नवीन गाणं करणार
हिंदीत राशी चं रॅप सॉंग केलंय तसंच मराठीत देखील अनेक कॅरेक्टर आहेत पण सध्या गाजत असलेली अंगबाई सासूबाई या मालिकेतील “बबड्या” याच्यावर मला रॅप करायचं. ही मालिका मी बघतो, त्यातला कॉन्टेट भारी आहे आणि या बबड्याची सगळीकडे चर्चा देखील आहे म्हणून यावर काहीतरी करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे.
“विडिओ मुळे घडलेली ग्रेटभेट”
या विडिओ मुळे मी अनुराग कश्यप सरांना भेटू शकलो त्यांनी हाच विडिओ नाही तर माझे जुने विडिओ देखील बघितले आहेत. त्यांनी माझं काम बघितलं आणि ऐकलं आहे. आमच्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली पण आता नेमकं आम्ही कोणत्या प्रोजेक्ट वर काम करणार आहोत हे ठरलं नाही. एकदा ठरलं की मी माझ्या सोशल मीडियावरून ते सगळ्यांना नक्कीचं सांगेन.
“आणि असं रॅप घडलं”
मी म्युजिक कडून काही काळासाठी इंजिनिअरिंग कडे वळलो होतो. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर पुन्हा मी या क्षेत्राकडे आलो. रॅप करण्याची कल्पना कशी सुचली हे मला देखील माहित नाही. सोशल मीडियावर मिम्स बघताना जेव्हा मी राशी चा विडिओ बघितला आणि मग यातले काही डायलॉग घेऊन यातून काहीतरी कल्पक करू या असं ठरवलं. बऱ्याच काळापासून मी मिम्स विडिओ करतोय तर यातून काहीतरी वेगळं करून बघू आणि हे करायला मला मज्जा येते. कुठला तरी डायलॉग घेऊन त्याला म्युजिक आणि बिट्स देऊन यातून रॅप सॉंग तयार होतं. कुठलंच काम मी ठरवून केलं नव्हतं. हे गाणं करताना मला तो विडिओ बघितल्या क्षणी डोक्यात काहीतरी वाजलं आणि या गाण्याचा रॅप प्रयोग केला.
“आणि व्हायरल झालो…”
हा विडिओ पहिल्या दिवशी व्हायरल झाला हे मला माहित नव्हतं. जेव्हा दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी हे शेयर केलं आणि मोठया कलाकारांचे जेव्हा मेसेज आले तेव्हा हे सगळीकडे व्हायरल झालयं हे मला समजलं. व्हायरल होणं काय असतं हे मला लोकांकडे बघून माहीत होतं पण जेव्हा आपण स्वतः व्हायरल झाल्यावर काय होतं हे मला माझा विडिओ व्हायरल झाला तेव्हा समजलं. अनेक मोठ्या कलाकारांचे कॉल, मेसेज आले. खूप अफलातून प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन आठवड्या पासून मी फक्त इंटरव्ह्यू देतोय त्यामुळे कामाकडे थोडंफार दुर्लक्ष होतंय पण या विडिओ मुळे खरंच मस्त प्रतिक्रिया आल्या आणि कामासाठी अनेक ऑफर देखील आल्या आहेत.
“नवीन कामाची जोरदार तयारी”
राशीचा विडिओ करायच्या आधी मी काही डायलॉग काढून ठेवले होते तर त्यावर काम करतोय. काही नवीन कॅरेक्टर आहेत ज्यावर काम सुरू आहे. झाकीर खान चा विडिओ मी पोस्ट केला तो देखील लोकांना आवडला. मी माझी स्वतःची compositions असलेली काही गाणी आहेत यावर माझं काम सुरू आहे. लवकरचं काहीतरी अजून भन्नाट बघायला मिळणार आहे.
“अमित त्रिवेदी कडून कौतुकाची थाप”
विडिओ व्हायरल झाल्यावर मी अनुराग सरांना भेटलो त्यांनी मला अमित त्रिवेदी सरांचा नंबर दिला. मी अमित सरांचा भक्त आहे त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून मी त्यांच संगीत फॉलो करतोय. त्यांच्या संगीताचा मी फॅन आहे. अनुराग सरांनी आमची भेट घडवून दिली. अमित सरांना भेटणं त्यांच्या सोबत गप्पा मारण हे माझ्यासाठी खूप मस्त होतं. कामाबद्दल आम्ही चर्चा केली. अमित सरांना देखील माझं काम आवडलं त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं तर त्यांची कॉम्प्लिमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
“जवाबदारी वाढली आहे”
ऑडियन्स आणि फॉलोअर्स वाढतात तर नक्कीच जवाबदारी वाढली आहे पण मी प्रयत्न करतो की याकडे फारसं लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. माझा जो कन्टेंट आहे तो खूप हलकाफुलका आहे. यावर मी जास्त विचार करत बसलो तर त्यातली गंमत कुठेतरी कमी होऊ शकते म्हणून यावर जास्त विचार न करता आपल्याला जे सांगायचं ते सहजपणे आणि गंमतीशीर पणे लोकांना सांगावं हा माझा प्रयत्न असतो. हा विडिओ देखील मी व्हायरल होईल या दृष्टिकोनातून केला नव्हता. असा काही फॉर्म्युला नाही की प्रत्येक विडिओ व्हायरल व्हावा जे काम करतोय ते नक्कीच जवाबदारीने करावं लागणार आहे. या पुढे काम करताना थोडं दडपण असणार आहे. जेवढ्या सहज सोप्पेपणाने आधी गोष्टी करायचो तर आता थोडं जवाबदारी पूर्ण गोष्टी कराव्या लागणार आहेत.
“लाईक्स च्या पलीकडे”
व्हायरल झाल्यावर हे लक्षात ठेवायला हवं की आपण का व्हायरल झालो? आणि कोणत्या कारणांमुळे हा विडिओ व्हायरल झाला. व्हायरल होणं हे फक्त Views and Likes वर अवलंबून नसून जर आपल्याला खऱ्या प्रतिक्रिया बघायच्या असतील तर आपल्या विडिओ खालच्या कॉमेंट्स वाचल्या पाहिजेत. आपल्या कामावर आलेल्या कॉमेंट्स मधून अनेकदा आपण कसं काम करतोय यांची एक कल्पना येते.
एका रात्रीत सोशल मीडिया स्टार झालेल्या या तरुण संगीतकाराला प्लॅनेट मराठी कडून व्हायरल शुभेच्छा!
मुलाखत – नेहा कदम (प्लॅनेट मराठी)