ऑस्कर म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ऑस्करची रेखीव ट्रॉफी, रेड कार्पेटवरील सेलिब्रिटीजची मांदियाळी, आणि अवघ्या जगातून अमेरिकेत पोहोचलेले कलावंत. हो ना? पण या ऑस्कर सोहळ्यात एक मराठमोळा चेहरा आहे. उज्ज्वल निरगुडकर असं या व्यक्तिचं नावं. केमिकल इंजिनिअर असलेल्या उज्ज्वल यांनी त्यांच्या क्षेत्राशी साधर्म्य साधणाऱ्या मनोरंजन विश्वातील एक मार्ग निवडला. सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन (एसएमपीटी) या जागतिक संस्थेच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांची २०१७ साली ऑस्कर ॲकॅडमीच्या आजीवन सदस्यपदी निवड झाली. तांत्रिक विभागातून (ॲटलार्ज) सदस्य झालेले ते पहिले भारतीय आहेत. ही खरंतर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जाणून घेऊया उज्वल निरगुडकर यांच्याबद्दल…
घरात साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण. त्यामुळे लहानपणापासून उज्ज्वल यांना चित्रपटांची आवड होती. मुंबईच्या आयसीटी (इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी), म्हणजेच त्या काळच्या युडीसीटी मधून केमिकल इंजिनीअर झाल्यानंतर एका पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली; पण मन रमत नव्हते. कालांतराने मराठी विज्ञान परिषदेशी त्यांचा संबंध आला. त्यातूनच विविध उपक्रम ते राबवू लागले. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. एका नामांकित वृत्तपत्रातील एका जाहिरातीमुळे फिल्म सेंटरमध्ये प्रवेश झाला. चित्रपटांची आवड असल्याने त्यासंबंधित सगळी काम त्यांनी तेथे शिकून घेतली. आणि पाहता पाहता चित्रपटाचे तंत्रज्ञान हेच त्यांचं आयुष्य झालं.
प्रवास एसएमपीटीचा
सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन ही चित्रपटांची मार्गदर्शक तत्त्वे ठरविणारी जगातील एकमेव संस्था. १९१६ साली ही संस्था अमेरिकेत सुरू झाली. कालांतराने त्यामध्ये दूरचित्रवाणीचा समावेश करण्यात आला. फिल्म कशी तयार करावी, त्याचा आकार किती, फोकस, रंग, आवाज, चित्र, पडदा अशी फिल्म आणि डिजिटल सिनेमाची सूमारे ६००० स्टँडर्ड्स या संस्थेने तयार केली आहेत विविध ४८ प्रकारची तत्त्वे आखून दिली आहेत. हॉलिवूडचे चित्रपट या तत्त्वांना प्रमाण मानून तयार होतात, तसेच सर्व थिएटरची रचना याआधारेच असते. एसएमपीटीमध्ये उज्ज्वल यांनी तीन रिसर्च पेपर सादर केले. यामध्ये त्यांनी जे उपाय व तंत्रज्ञान सांगितले, त्यानंतर हॉलिवूडनेही तेच तंत्र स्वीकारले. उज्ज्वल यांना त्याचे अमेरिकन पेटंट मिळाले. या संस्थेची शाखा अनेक देशांमध्ये असल्याने ती भारतातही असावी असा उज्ज्वल यांचा प्रयत्न होता. जगात भारत हा चित्रपटांची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. चित्रपटांची मार्गदर्शक तत्त्वे आपल्या चित्रपटांना आणि थिएटरना आवश्यक असल्याने त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला आणि त्याला मान्यता मिळाली. शिवाय, भारताच्या शाखेची जबाबदारी त्यांच्याकडेच देण्यात आली. सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन पासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास थेट ऑस्कर समितीच्या सदस्य पदापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
इंजिनिअरिंगशी इथेही संबंध
माझं शिक्षण विज्ञान क्षेत्रातलं, त्यात मी इंजिनिअर. अनेकांना वाटतं मी माझं कामाचं ते क्षेत्र विसरून किंवा कंटाळून मनोरंजन विश्वात स्थिरावण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांचा हा समज अगदीच चुकीचा आहे. चित्रपटाची बांधणी झाल्यानंतर त्यावरची प्रक्रिया, फिल्म बनवण्याच काम या आणि अशा अनेक गोष्टी माझ्या रसायनशास्त्राशी निगडीत आहे. त्यामुळे मी माझ्या क्षेत्राशी आजही जोडलेलो आहे याचा मला अभिमान आहे.
जाणीव हवी
चित्रपट क्षेत्रात या माध्यम तंत्रज्ञानाची जागृती कमी आहे. त्यांना ही माहिती करून घ्यावी, असे वाटत नाही. परदेशातील तंत्रज्ञांच्या कामाची नेहमीच दखल घेतली जाते; परंतु भारतातले तंत्रज्ञही त्यांच्या तुलनेत कुठेच कमी नसतानाही कोणत्याच पुरस्कार यादीत त्यांचा समावेश केला जात नाही. चित्रसंस्कृतीची मुहूर्तमेढ भारतात रूजली, तरी आपण अजूनही परदेशातले तंत्रज्ञान का वापरतो, असा प्रश्न त्यांना कायम पडतो, असं उज्ज्वल म्हणतात.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)